यंदाचं वर्ष रोमँटिसिझमचं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ऐश्वर्याच्या सिंड्रेला गाऊनपासून थेट रणवीर सिंगच्या स्कर्टपर्यंत आतापर्यंतचे सगळे ट्रेण्ड पाहिल्यास याची खात्री पटेल. अर्थात यातील रणवीरच्या स्कर्टचा विषय आपण काही काळ बाजूलाच ठेवू यात. पण तरुणींच्याच नाही तर तरुणांच्या कपडय़ांमधील फेमिनीन, रोमँटिसिझम लुकचा वाढता प्रभाव नजरेआड करून चालणार नाही. फेमिनीन फॅशनचा विषय निघतो तेव्हा फुलांविषयी न बोलता पुढे जाता येत नाहीच. यंदाच्या सीझनमध्ये या फुलांचा प्रभाव फॅशनमध्ये स्पष्ट दिसून येतोय. फ्लोरल प्रिंट्स एरवीही कपडय़ांचा अविभाज्य भाग होती. अगदी लहान मुलांपासून थेट जेष्ठांच्या कपडय़ांपर्यंत सगळीकडे फ्लोरल प्रिंट्सचा वापर सगळीकडे वर्षांनुवर्षे केला गेलाय. स्त्रियांच्या कपडय़ांमध्येच नाही, तर पुरुषही कपडय़ांमध्ये फ्लोरल प्रिंट्स तितकेच पसंत करतात. इतर ट्रेण्ड्सप्रमाणे यातही काळानुसार बदल होत गेलेत. यंदाच्या सीझनमध्ये हा फ्लोरल ट्रेण्ड अगदी फुलांसारखाच बहरला आहे. फुलांकडे फक्त प्रिंट्स म्हणून न बघता, अ‍ॅक्सेसरी म्हणून पाहण्याकडेही डिझायनर्सचा कल वाढला असल्याने फुलांचा थ्रीडी लुकसुद्धा या सीझनमध्ये आवर्जून पाहायला मिळतोय.

फ्लोरल प्रिंट्सचं स्वरूप सार्वत्रिक आहे. कपडे, इंटिरिअर, कटलरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी फ्लोरल प्रिंट्स आवर्जून वापरले जातात. त्यांना लिंगाचंसुद्धा तितकं बंधन नाही.  फ्लोरल हवाई शर्ट्स, बेल बॉटम हा सत्तरीच्या दशकातील पुरुषांच्या पेहरावाचा अविभाज्य घटक होता. अगदी आजही फॉर्मल, कॉलेज ड्रेसिंगमध्ये थोडं वेगळेपण हवं असेल तर आवर्जून फ्लोरल प्रिंटचा वापर केला जातो. अर्थात हे प्रिंट्स व्यक्तीनुसार वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जातात. या सीझनमध्ये व्हायब्रँट फ्लोरल प्रिंट्सचा प्रामुख्याने वापर होतोय. सध्याच्या बदलत्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे कपडय़ांवर अधिकाधिक ब्राइट रंग पकडून ठेवणं शक्य होतंय. याचा फायदा यंदाच्या ट्रेण्डमध्ये आवर्जून केला गेलाय. त्यामुळे फुलांचे नैसर्गिक रंग, स्वरूप कपडय़ावर बंदिस्त करण्यावर डिझायनर्सनी भर दिला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चित्रकार आणि ग्राफिक डिझायनर्सच्या कल्पनेतून तयार झालेले फ्लोरल पॅटर्नसुद्धा यंदा आवर्जून पाहायला मिळताहेत.

यंदाच्या सीझनमधील फ्लोरल प्रिंट्सची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे छोटय़ा नाजूक प्रिंट्सची जागा आता आकाराने मोठय़ा, ब्राइट रंगाच्या नजरेत भरणाऱ्या प्रिंट्सनी घेतली आहे. आतापर्यंत कपडय़ांमध्ये प्रामुख्याने छोटय़ा फ्लोरल प्रिंट्सचा वापर केला जायचा. सहसा एक किंवा दोन रंगांचा वापर करून तयार केलेले ऑलओव्हर डिझाइन प्रामुख्याने पसंत केले गेलेत. कारण यातील फुलं पटकन नजरेत भरत नाहीत पण कपडय़ांवर टवटवीतपणा मात्र दिसून येतो. पण यंदा मात्र आवर्जून मोठाली, वेगवेगळ्या रंगाची फुलं कपडय़ांवर वापरली जाऊ  लागली आहेत. त्यामुळे पेहरावात सगळ्यात आधी नजर या फुलांवर पडते. फुलांचा संबंध एरवी नजाकतता, हळुवारपणा, संवेदनशीलतेशी लावला जातो. व्यक्तीच्या वागणुकीतील हीच संवेदनशीलता कपडय़ांवरही आणण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे. त्यासाठी पुरुषांच्या पेहरावातसुद्धा ब्राइट, मोठय़ा फुलांचा वापर आवर्जून केला जातोय. त्यामुळे फ्लोरल प्रिंट्सकडे दुर्लक्ष न करता ती किती वेगळ्या पद्धतीने कॅरी करता येईल, याचे पर्याय शोधायला हवेत. एखाद्या गोष्टीची सवय झाली की त्यात तोचतोचपणा येतो. फ्लोरल प्रिंट्सच्या बाबतीत हे करण टाळणं, हेच मुळी या सीझनमधील फॅशनचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे पेहरावात प्रयोग करायला आवडत असतील तर नक्कीच हा सीझन तुमचा आहे.

फ्लोरल ड्रेसिंगमधील तोचतोचपणा टाळण्यासाठी हटके टिप्स :

  • फ्लोरल टी-शर्ट आणि जीन्स हे नेहमीच कॉम्बिनेशन घालण्यापेक्षा फ्लोरल जीन्स आणि प्लेन शर्ट घालून फ्लोरल प्रिंट्सना फोकसमध्ये आणा.
  • बेसिक रंगांसोबत फ्लोरल डिझाइन घालून फ्लोरल प्रिंट्सचा प्रभाव कमी करण्यापेक्षा एकाच प्रिंटचा स्कर्ट आणि क्रॅप टॉप घालून प्रिंट्सना फोकसमध्ये आणा.
  • मॅक्सी ड्रेससोबत लेदर जॅकेट किंवा मस्त श्रगसोबत घालून बघा. फ्लोरल प्रिंट्सची नजाकतता आणि जॅकेटचा बोल्डपणा याचं समीकरण मस्त दिसतं.
  • स्नीकर्स आणि फ्लोरल प्रिंट्सच्या नव्या मैत्रीच्या चर्चा ऐकल्या आहेत की नाही? फ्लोरल स्कर्टसोबत गोल्ड किंवा सफेद स्नीकर्स नक्की घालून बघा.
  • एरवी फ्लोरल प्रिंट्स म्हटल्यावर पेस्टल शेड्स डोळ्यांसमोर येतात. पण यंदा आवर्जून अर्थी, बोल्ड शेड्स वापरून बघा. लाल, नारंगी, कोबाल्ट ब्ल्यू, नेव्ही, हिरवा असे रंग आवर्जून वापरून बघा.
  • फक्त कपडे नाही ज्वेलरी, बॅग्स, अ‍ॅक्सेसरीमध्येही फ्लोरल प्रिंट्सचा प्रभाव यंदा पाहायला मिळतोय. त्यामुळे छान फ्लोरल नेकपीस, अंगठी नक्कीच ट्राय करा.
  • फक्त प्रिंट्स नाही तर यंदा फुलांचा वापर एम्ब्रॉयडरी, बटन्समध्ये करून ड्रेसला थ्रीडी लुक द्यायचा प्रयत्नही डिझायनर्स करीत आहेत. येत्या सणांच्या मोसमात हा ट्रेण्ड नक्कीच मदतीला येऊ शकतो.

viva@expressindia.com