फूड चॅनेल्स, इन्स्टाग्राम, डिझायनर हॉटेल आणि बरंच काही..

खाण्यासाठी जगावंहे सुत्र आता मागे पडत असून खाणं मिरवत खावंहे सुत्र आता मूळ धरू लागलं आहे. पदार्थाना नवं रूप, साज, नाव मिळू लागले आहे. चुलीवरून पोटात जाण्याआधीचा पदार्थाचा प्रवास वाढला आहे. अर्थात अजूनही पदार्थाची चव हा मुख्य मुद्दा असला तरी इन्स्टाग्रामपासून डिझायनर हॉटेलपर्यंत विस्तारलेलं खाणं हे प्रतिष्ठेचा नवा मापदंड ठरलं आहे.

फुड आणि फॅशन यांचा संबंध शोधण्यापेक्षा तो स्वीकारणं हे कठीण काम आहे. जेवणाच्या बाबतीत त्याच्या दिसण्यापेक्षा चवीला अधिक महत्त्व असलं तरी समोर वाढलेलं ताट दिसायला आकर्षक असण्याकडेही तितकंच लक्ष दिलं जातं. अगदी भारतीय संस्कृतीबद्दल बोलायचं झाल्यास ताटात भाजी कोणत्या बाजूला वाढावी आणि कोिशबीर कुठे याचेही नियम प्रत्येक गृहिणीला माहिती असतात. जेवण्याआधी समोर वाढलेले ताट पाहून व्यक्ती तृप्त होते, मग पदार्थाचा मोहक वास त्याची भूक वाढवतो आणि सरतेशेवटी तो अन्नाचा आस्वाद घेतो, हे संस्कार लहानपणापासून केले जातात. त्यामुळे ताटातील भाताची मुद व्यवस्थित असणं, चपातीची घडी नीट असणं, भाजीतील पाण्याचा ओघळ चपातीला ओलं करणार नाही, याची खबरदारी घेणं आणि अशा बऱ्याच गोष्टी ताट वाढताना कटाक्षाने पाळल्या जातात. अगदी जेवण वाढण्यापूर्वी पाटाभोवतीची सुबक रांगोळी,  पदार्थानुसार ताट, वाट्यांचा आकार ठरवणं अगदी पोह्यांवर किती कोिथबीर आणि खोबरं भुरभुरावं, या सगळ्यामागे पदार्थाचं ‘दिसणं’ आकर्षक असेल, हा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ताटातलं जेवण आणि फॅशन याचा काही संबंधच नाही, असं म्हणणं चुकीचं होईल. आज हॉटेल्समध्ये होलसेलमध्ये घेतलेल्या स्टीलच्या साध्या ताटवाट्यांची जागा उंची कटलरीने घेतली आहे. कित्येक फूड चॅनल्स, फूड शोजमधूनही पदार्थाच्या चवीइतकंच त्याच्या दिसण्याला, तुम्ही कुठली भांडी वापरून, कोणत्या प्रकारच्या किचनमध्ये पदार्थ बनवताय?, यालाही तितकंच ग्लॅमर आलं आहे. यातून किचन प्लॅटफॉम्र्स, किचनवेअर अशी मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. ‘इन्स्टाग्राम’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या युगाने तर हे श्रीमंती फु ड कल्चर वेगाने फॅ शनेबल होतंय..

 डिझायनर हॉटेिलग

‘गुची’, ‘शनेल’, ‘प्रादा’, ‘अरमानी’ ही नावं फॅशनप्रेमींना परिचयाची आहेतच. त्यांचे कपडे, अ‍ॅक्सेसरीजच्या किंमती काही लाखांच्या घरात जातात. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला त्यांचे कपडे खरेदी करता येतीलच असं नाही. हेच ब्रँड आता हॉटेल क्षेत्रामध्ये उतरले आहेत. त्यामागचं कारण तितकच साधं आणि सोपं आहे. यांचे कपडे परवडणार नाहीत, पण त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन एखादा पदार्थ चाखणं परवडू शकतं. सहाजिकच तुम्ही त्यांचे ग्राहक बनून जाता. त्यामुळे आज ‘गुची कॅफे’, ‘अरमानी कॅफे’, ‘कॅफे डीओर’, ‘शनेल कॅफे’, ‘प्रादा पेस्ट्रीसेरिया’, ‘वर्साचे रेस्टॉरंट’ यांच्या शाखा जगभरात विस्तारताहेत. भारतात सध्या ही डिझायनर हॉटेल्स नसली तरी ब्रँडेड हॉटेल्सला जाणं किंवा ब्रँडेड पदार्थ विकत घेणं यांचा शौक नक्कीच वाढता आहे. एखाद्या महागडय़ा ब्रँडची लिपस्टिक किंवा घड्याळं मिरवावी अशा तोऱ्यात हाय फायबर बिस्किट्स, योगर्ट, लो फॅट दुध, ब्रेड मिरविला जातो.

प्रत्येक गोष्ट फॅ शनेबल करण्याचा हा वेग इतका मोठा आहे की आपली तयारी असो वा नसो.. आपण नकळतपणे या ‘फॅ शनेबल फु डकल्चर’चा भाग झालो आहोत. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे फुड आणि फॅ शनचा हा संबंध आता तरी डोळसपणे, समंजसपणे आपण स्वीकारायला हवा!

मामला स्टेट्सचा

‘घरी एक रुपयाचं कॉफीचं पाऊच आणून बनणाऱ्या कॉफीवर कॅफेत दीडशे रुपये का खर्च करायचे?’ हा आजच्या पालकांना न उलगडलेला प्रश्न आहे. रविवार सुट्टीचा दिवस, घरच्या किचनला आराम देऊन हॉटेलला जायचा ट्रेंड आता मागे पडला आहे. आता हॉटेलची वारीही आपलं स्टेट्स दाखवण्यासाठी होऊ लागली आहे. कपडे, दिसणं यावरून आपल्या कामाचं स्वरूप, सामाजिक प्रतिष्ठा, स्वभाव कळतो, हे तत्त्व तर आपण स्वीकारलं आहेच. पण आपल्या खाण्यावरून आपली होणारी ओळख याकडे अजूनही आपण तितकंसं लक्ष देत नाही. ऑफिसमध्ये नियमित भाजीपोळीचा डबा आणणारा संसारी माणूस, रोज खालच्या चायनीज नुडल्स खाणारा बॅचलर, उकडलेल्या भाज्यांचे डब्बे आणणारा डायट कॉन्शियस, अशी कित्येक लेबल्स आपल्याला केवळ आपल्या डब्यामुळे पडतात. मग ठरावीक डबेवाल्यांचे गट बनतात. हॉटेिलग किंवा तस्सम बेतामध्ये त्या ठरावीक लोकांना स्थान मिळतं. त्यामुळे शेजारच्या उडप्याकडे जाऊन साधी इडली खाण्याऐवजी महागडय़ा हॉटेलमधल्या मसाला इडलीवर पसे खर्च करायची तयारी आजच्या पिढीमध्ये असते. कारण उडपीच्या हॉटेलमध्ये साध्याशा प्लेटमध्ये येणारी इडली ही चवीला कितीही चांगली असली, तरी तिची फोटो व्हॅल्यू कमी असते. पण महागडय़ा हॉटेलमध्ये याच इडलीला फॅ न्सी नाव मिळतं, सुंदर प्लेटमध्ये ती सजवली जाते. या फोटोमधून तुमची खर्च करायची ऐपत, पगार, राहणीमान याचा सहज अंदाज येतो. हे सगळं सामाजिक पत टिकविण्यासाठी गरजेचं ठरतं. त्यामुळे साहजिकच हल्ली हॉटेल्ससुद्धा पदार्थाच्या चवीसोबत त्याचं सादरीकरण, हॉटेलचा देखावा याकडे जास्त लक्ष देत आहेत.

इन्स्टाग्राम कल्चर 

मध्यंतरी ओल्गा नोस्कोवा या रशियन केकमेकरच्या केक्सनी इन्स्टाग्रामवर सगळ्यांना वेड लावलं होतं. वेगवेगळ्या रंगांचे साध्या आकारातील, पण मार्बल फिनिशचे हे केक जगभरात चच्रेचा विषय ठरलेले. या केक्सच्या तिला जगभरातून मागण्या येऊ लागल्या आणि त्यातूनच तिचा व्यवसाय वाढू लागला. आताचं नवं खूळ आहे ते डीटॉक्स पाण्याचं. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळी फळं पाण्यात टाकून ते पाणी पिणं ही त्यामागची साधीसोप्पी संकल्पना. पण त्यात कोणती फळं टाकावीत याची माहिती सोशल मीडियावर असतेच, पण हे पाणी दिवसभर ऑफिसमध्ये, प्रवासात घेऊन जायचं तर बाटलीही तितकीच आकर्षक हवी. त्यामुळे हे पाणी सजवण्याच्या कित्येक क्लृप्त्या इन्स्टाग्राम, फेसबुकवर पाहायला मिळतात. वेगवेगळ्या आकर्षक आकारांतील डीटॉक्स बाटल्या आता ऑनलाइन साइटवर विकत घेता येतात. हे ट्रेंड्स दर वेळी बदलत जातात. चॉकलेट्सच्या सोप्या पाककृतींपासून ते बिर्याणी, केक्स, पार्टी डिशेस, पास्ता, पिझ्झा या आणि अशा कित्येक पदार्थाची कृती सांगणारे कित्येक व्हिडीयोज सोशल मीडियावर आज गाजताहेत. मोजून दोन मिनिटांचा व्हिडीयो, पण त्यातील कृतीपासून ती भांडी, ते बनवणाऱ्याच्या नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जगभरातील लोकांचं लक्ष असतं. थोडक्यात, पदार्थ पाहताच क्षणी नजरेत भरेल, याची विशेष काळजी घेतली जाते.

आज कोणीही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर पहिल्यांदा समोरच्या ताटातील पदार्थ इन्स्टाग्रामवर टाकण्याचा सोहळा रंगतो. तुम्ही पाणी प्या किंवा कॉकटेल ‘#पौवा’ हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला नाही तर हॉटेलला जाणं व्यर्थ मानलं जातं. साहजिकच वेगवेगळे कॅफे, हॉटेल्स, बार आपल्या कटलरी, भांडी यांचा प्रसिद्धीसाठी कुशलतेने वापर करतात. या ब्रँिडगसाठी जादाचे पसे खर्च करण्यासाठीही त्यांची ना नसते. पण आपल्या जेवणाच्या साहित्यावरून आपली ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. मध्यंतरी आलेल्या वृत्तात ‘स्टारबग्स’ या कॉफी चेनने त्यांच्या कॉफी मगवर ग्राहकाचं नाव मुद्दाम चुकीचं लिहिण्यास सुरुवात केली. जेणेकरून त्यांची खिल्ली उडविण्याच्या निमित्ताने ग्राहक मगचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करील आणि त्यांना आयती प्रसिद्धी मिळेल. हे स्तोम इतकं वाढलंय की, केवळ असे फोटो टाकण्यासाठी ही महागडी कॉफी खरेदी करणारी शेकडो उदाहरणे गुगलवर मिळतील. गोल चॉकलेटच्या आवरणावर गरम क्रीम टाकल्यावर त्याचं वितळणं आणि आतमधलं सुंदर आइस्क्रीम दिसणं, पिझ्झाच्या स्लाइसमधली चीजची तार, सुरीने चिकनचा अलगद पडणारा तुकडा हे सगळं अगदी काही सेकंदांच्या व्हिडीयोच्या माध्यमातून पाहणाऱ्याच्या समोर येतं. सोशल मीडियावर तुम्हाला पदार्थाची चव कळत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जावं लागतं. पण डोळ्यांचं समाधान मात्र होतं. त्यामुळे पदार्थाचं ‘दिसणं’ जास्त महत्त्वाचं होऊ लागलं आहे.

#foodporn #foodie #foodlover हे आणि असे बरेच हॅशटॅग यातून पुढे आले. ताटातल्या पदार्थाचा आनंद घेण्यापेक्षा दुसऱ्यांना दाखवून त्याचं कौतुक मिळविण्याला प्राधान्य मिळतंय. फक्त तयार पदार्थच नाही, तर अवोकाडो, चीज, अंडे अशा जिन्नसांचा सुद्धा हॅशटॅग प्रसिद्ध होऊ लागतो. या सगळ्यातून फूड ब्लॉगर्स, फूड फोटोग्राफर, फूड क्रिटिक अशी नवी करिअरची क्षेत्रं जन्माला आलीत. कित्येक शेफ यातून नावारूपाला आले.

viva@expressindia.com