रस्तोरस्ती मिळणारे खाद्यपदार्थ, त्यातलं वैविध्य पाहिलं की लक्षात येतं, शहराचं वैशिष्टय़ या खाऊगल्ल्यांमध्ये दडलेलं आहे. गावाला व्यक्तिमत्त्व देणाऱ्या, त्याचं वैशिष्टय़ जपणाऱ्या खाऊगल्ल्या आणि त्या निमित्ताने त्या गावाशहरांची चवदार सफर या नव्या पाक्षिक सदरातून.. गोव्याच्या सफरीतल्या मडगावच्या पहिल्या टप्प्यानंतर आता पणजीकडे कूच करताना दिसणारं खाद्यसंस्कृतीचं वैविध्य..

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?
indus waters treaty
विश्लेषण : शहापूरकंडी धरणाद्वारे भारताने पाकिस्तानमध्ये जाणारा रावी नदीचा प्रवाह का रोखला? याचा जम्मू व काश्मीरला कसा फायदा होईल?

मडगाव-पणजी रस्त्याला ‘आगशी’ नावाचं छोटंसं देखणं गाव आहे. हायवेने गावाचे दोन तुकडे केले असले तरी गावाच्या एका बाजूला झुआरी नदीचं विस्तीर्ण पात्र आहे. ज्यामुळे आगशी गाव अधिकच सुंदर दिसतं. या नदीच्या किनाऱ्यावर इथले शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे मडगावला जाताना ताजी भाजी मिळते. याच रस्त्याला गोवन पद्धतीची छोटी छोटी रेस्टॉरंट आहेत. तिथे भाजीपाव, मिरची भजी, बन्ससारखे स्थानिक पदार्थ मिळतात. पण तुमचं लक्ष वेधून घेतो तो इथला ‘चेरीस पाव’ हा पदार्थ. या रस्त्याने जाताना कॅथलिक घरांच्या बाहेर टेबल मांडून फूड स्टॉल लावलेले दिसतात. जवळ गेल्यावर लक्षात येतं की हे चेरीस पावचे स्टॉल आहेत. चेरीस पाव हा खास पोर्तुगीज पदार्थ. पोर्तुगीजांच्या काही रेसिपी आजही इथल्या कॅथलिक ख्रिश्चन घरांमध्ये केल्या जातात. चेरीस पाव हा त्यातलाच एक पदार्थ.

भारतात सर्वप्रथम पावाची निर्मिती गोव्यात पोर्तुगीजांकडून झाली. त्यामुळे गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीमध्ये पावाला विशेष महत्त्व आहे. ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे पाव इथे खाल्ले जातात. चेरीस पाव हा मांसाहारी स्नॅक्स प्रकारात मोडणारा पदार्थ. यातला ‘चेरीस’ हा ‘सॉसेज’चा एक प्रकार आहे. बिफ, पोर्क, चिकन, प्रॉन्स यापासून तयार केलेले वेगवेगळे सॉसेज म्हणजेच चेरीस. या सॉसेजचे बारीक पातळ काप करून कधी ते छान खरपूस फ्राय करून तर कधी तसेच खाल्ले जातात. पावात कांदा, गाजर यांच्या सलाडबरोबर सॉसेजचे पातळ काप घालून सोबत वेगवेगळ्या चटण्या घालून खायला दिले जाते.

चेरीस हा मूळचा स्पॅनिश-पोर्तुगीज शब्द, विशेषत: पोर्क सॉसेजला हा शब्द वापरला जातो. पोर्क मटणात लसूण, आलं, व्हिनेगर आणि लाल मिरची घालून हे सगळं (पोर्क मटणासहित) बारीक एकजीव वाटून घेतलं जातं. मग ते तीन महिने उन्हात वाळवलं जातं. पोर्तुगीज पद्धतीनं बनवताना यात या साऱ्या मसाल्यांच्या बरोबरीनं वाइन आणि मिरी घातले जातात. लोकांनी आता चवीप्रमाणे मसाल्यांमध्ये बदल केले आहेत. आता तर खास गोवन पद्धतीचे मसाले घालून म्हणजेच दालचिनी, लवंगा, हळद, लाल मिरच्या, आलं-लसूण, या सगळ्या मसाल्यापासून झणझणीत चेरीस बनवले जातात. हे बारीक वाटलेलं मिश्रण कालवून त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या माळा करून विकायला ठेवतात. त्यातलं तुम्हाला हवं तितकं विकत घेऊन ते तुम्ही घरी साठवून ठेवू शकता. विकायला ठेवलेल्या या सॉसेजच्या माळा वेगवेगळ्या आकारांमुळे सुंदर दिसतात. काही माळा तर रुद्राक्षाच्या माळांसारख्याच दिसतात. पावसाळी हवेत चेरीस पाव चवीने खाल्ला जातो.

‘आगशी’ भागातच पावाबरोबर आणखी एक वेगळा पदार्थ खायला मिळतो त्याचं नाव ‘सोरपोतेल’. हादेखील पोर्तुगीज पदार्थ आहे. पोर्कच्या मटणाची बनवलेली चमचमीत भाजी म्हणजे सोरपोतेल. आगशी गावातील कॅथलिक महिला चेरीस पावबरोबर सोरपोतेलही विकायला ठेवतात. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, व्हिनेगर, लाल मिरच्या आणि गरममसाला  यात शिजवलेलं पोर्क मटण म्हणजे सोरपोतेल. खवय्ये मंडळी या रस्त्याने जाताना गाडी रस्त्याला थांबवून हे पदार्थ खाऊनच मग पुढे जातात.

या रस्त्याने पुढे आल्यावर काही किलोमीटरवर पणजी शहर लागतं. पोर्तुगाल, इटलीमधील भागात आपण फिरतोय की काय असंच या शहरात फिरताना वाटू लागतं. इथली पोर्तुगीज पद्धतीची घरं त्यांच्या विशेष रंगसंगतीमुळे पर्यटकांना आकर्षित करतात. इतर शहरांच्या तुलनेनं पणजीत तुम्हाला तशा ‘स्ट्रीट फूड’च्या गाडय़ा दिसत नाहीत. शहराची रचनाच अशी आहे की, अगदी सहजपणे झटपट खाता येईल अशी छोटी छोटी अनेक कॅफेज, रेस्टॉरंट इथे आहेत. काही ठरावीक भागांत शेवपुरीच्या, रस्सा आम्लेटच्या गाडय़ा आहेत. पण यापेक्षा वेगळं काही या गाडय़ांवर मिळणार नाही. पणजीच्या काही प्रमुख रस्त्यांवरचे छोटेसे कॅफे काही वैशिष्टय़पूर्ण पदार्थासाठी प्रसिद्ध आहेत. इथे तुम्हाला अस्सल गोवन टेस्ट चाखायला मिळते. पणजी चर्चवरून सरळ चालत पुढे गेले की उजव्या हाताला कॅफे भोसले लागतं. इथले बन्स आणि मिरची भजी अगदी चुकवू नये असेच असतात. बन्स म्हणजे केळ्याची खुसखुशीत पुरी. मैद्यात थोडंसं पिकलेलं केळं, थोडं यीस्ट, थोडेसे जिरे घालून एकजीव मळून रात्रभर ठेवतात. सकाळी याचे गरमगरम बन्स तळून म्हणजे पुऱ्या तळून देतात. अतिशय हलके आणि खुसखुशीत लागणारे हे बन्स जिरे आणि केळ्याची चव जिभेवर सोडतात. हाताच्या पंजाएवढी आकाराने मिळणारी मिरची भजी तर तोंडाला पाणी सोडते. नारळाच्या चटणीबरोबर ही मिरची भजी अप्रतिम लागते. आपण स्वयंपाकात वापरतो ती मिरची नाही, थोडी वेगळ्याच प्रकारची जाड अशी मिरची भजीसाठी वापरतात. हे दोन पदार्थ म्हणजे कॅफे भोसलेची खासियत आहे. याच्या जवळच्याच रस्त्याला कॅफे सेंट्रल आहे. इथला मशरूम सामोसा असाच आगळावेगळा आहे. बारीक चिरलेल्या मशरूमचे स्टफ असलेला सामोसा अतिशय रुचकर लागतो. कॅफे सेंट्रल म्हणजे पणजीतील ‘चितळे’ म्हणावे लागेल. त्यांच्याकडे बनणारा प्रत्येक पदार्थ वैशिष्टय़पूर्ण आहे. तो पदार्थ बनवल्याच्या पंधराव्या मिनिटाला संपून जातो. खूपदा तुम्हाला हात हलवत परत जावं लागतं. पण इथल्या सगळ्या पदार्थामध्ये मशरूम सामोसा एकदम लाजबाब. याच रस्त्याला कॅफे आराम आहे, जिथे बटाटा कापं (बटाटय़ाची भजी) आणि कांदा भजी मिळते. चहा आणि बटाटा कापं खायला अनेक जण गर्दी करतात. पणजीतील १८ जून रस्ता हा महत्त्वाचा रस्ता. या रस्त्यावर अनेक महत्त्वाची दुकानं आहेत. कायम गर्दीने गजबजलेल्या रस्त्याच्या एका चौकात ‘चायपानी’ नावाचा छोटासा स्टॉल आहे. या स्टॉलवर  ‘बोंडा भजी’ म्हणजे म्हैसुरी गोड भजी मिळते. नारळाच्या चटणीबरोबर ही जास्त गोड नसलेली खुसखुशीत गरमगरम भजी भारी लागतात.

पणजीतील मिरामार बीचवर गेल्यावर चाट, शेवपुरी आणि स्नॅक्सच्या अनेक गाडय़ा दिसतात. चौपाटीसारखे चटपटीत पदार्थ इथे या गाडय़ांवर मिळतात. शाकाहारी खाणाऱ्यांसाठी ही चौपाटी चांगली आहे, पण नॉन-व्हेजिटेरिअन खवय्यांना इथे अजून एक चांगला पदार्थ आहे. याच रस्त्याला म्हणजे मिरामार सर्कलवरून थोडंसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला विशेषत: संध्याकाळच्या वेळेस अनेक टू व्हीलर, फोर व्हीलर गाडय़ा थांबलेल्या दिसतात. तिथेच डिसिल्वाचा छोटासा स्टॉल आहे. या स्टॉलवर कटलेट मिळतात. बिफ कटलेटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या डिसिल्वाच्या स्टॉलवर तब्बल १२० प्रकारची कटलेटस् मिळतात. बिफच्या मोठय़ा तुकडय़ाला आधी आलं-लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून मग रवा आणि व्हिनेगरमधून काढून तळून काढतात. लोकल कडक पावात कांदा, गाजर, मिओनीज आणि बिफचा कुरकुरीत तळलेला तुकडा घालून दिलं जातं. बिफ चिली फ्राय, पोर्क क्रीम चॉपसारखे वेगळे पदार्थ इथे मिळतात. शिवाय फिशेटेरिअन खवय्यांसाठी खास फिश कटलेटदेखील आहेत. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती झाल्यावर भूक लागली की अनेकांचे पाय आपोआप डिसिल्वाची कटलेट खायला वळतात.

खाऊगल्लीचे फोटो आणि माहिती पाठवा

देशभरातील वेगवेगळ्या गावा-शहरांमध्ये भटकंतीदरम्यान/वास्तव्यात तुमच्याही नजरेला (आणि मग जिभेला) असे वैशिष्टय़पूर्ण पदार्थ लागलेच असतील. गावोगावच्या अशा खाऊगल्ल्या आणि त्यातल्या पदार्थाविषयी आम्हाला कळवा. सोबत तुमचं नाव, संपर्क क्रमांक आणि पदार्थाचे/खाऊगल्लीचे फोटोही पाठवा. ५०० शब्दांपेक्षा अधिक मोठा लेख नसावा. लेख आणि फोटो पाठवण्यासाठी आमचा इ मेल – viva@expressindia.com किंवा viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये खाऊगल्ली असा उल्लेख आवर्जून करावा. निवडक लेखांना प्रसिद्धी दिली जाईल.

viva@expressindia.com