आवडीच्या पदार्थाचं पोषणमूल्य वाढवता येतं आणि तरीही ते तितकेच रुचकर लागतात. अशा हेल्दी रेसिपी सुचवणारं हे नवं पाक्षिक सदर. नेहमीच्या हेल्दी खिचडीला ओट्सचा सुपरहेल्दी ट्विस्ट देणारी रेसिपी आणि केळ्याचे घावन अर्थात बनाना पॉपीसीड पॅनकेक आजच्या भागात..

गेल्याच आठवडय़ात संक्रांत झाली. अजूनही घराघरांत तिळगूळ सुरू आहेत. संक्रांतीची गूळपोळी चाखून झाली असेल तर आता त्याच्या जवळ जाणारा पदार्थ म्हणजे पॉपीसीड्स पॅनकेक करून बघा. पदार्थ पाश्चिमात्य वाटला तरी आहे अगदी आपल्या घावनासारखा. त्यात पौष्टिक केळ्याची भर घातली की सकाळची पौष्टिक न्याहारी होईल. त्यात असणारे केळी आणि अक्रोड पौष्टिक आहेत आणि चविष्टही. ही पोटभरीची डिश तयार करीत असताना खसखस त्यात चुरचुरीतपणा आणते आणि मधाची रिमझिम उत्तम फिनिशिंग करते.

संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची मुगाची खिचडी तुम्ही खाल्ली असेलच. सगळ्या भाज्या घातलेली ही खिचडी पौष्टिकच. याच खिचडीला थोडी ट्विस्ट देऊन बनवलेली ओट्स खिचडी नक्की करून बघा. त्यामध्ये पालक असल्याने व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी परिपूर्ण असा तो पूर्णाहार ठरेल. ओट्समधून फायबर आणि पालकातून लोह आणि इतर जीवनसत्त्वे मिळत असल्याचे हेल्दी रेसिपी ठरेल. ब्रेकफस्ट, हेल्दी टिफिन किंवा संध्याकाळच्या जेवणालाही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. थंडीच्या दिवसात मसाल्याची ही गरमागरम खिचडी म्हणजे क्या बात!!

 (‘फिट फूडीच्या सौजन्याने)

 

ओट्स पालक खिचडी

साहित्य : तेल एक छोटा चमचा, लवंगा दोन-तीन, दालचिनी एक इंचाचा तुकडा, काळीमिरी चार-पाच दाणे, जिरे एक चमचा (दोन ग्रॅम), िहग पाव चमचा, सुक्या लाल मिरच्या तीन-चार, कांदे चिरून अर्धा कप, आले किसून एक चमचा, प्लेन ओट्स एक कप, धुतलेली मूगडाळ एक कप पाणी – सहा कप, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ, पालक बारीक चिरून दोन कप.

शिजवण्यासाठीचा कालावधी : ३० मिनिटे

कृती : प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात लवंग, दालचिनी आणि काळ्या मिऱ्या घाला आणि काही सेकंद परतून घ्या. त्यात जिरे आणि िहग घाला आणि जिरं तडतडलं की, सुक्या लाल मिरच्या, कांदे आणि आलं घाला. कांदे पारदर्शक होईपर्यंत परता. मग त्यात ओट्स आणि मूगडाळ घाला. चांगलं परतून घेतलं की सहा कप पाणी, हळद, मीठ आणि पालक घाला. आता खिचडी चांगली शिजवून घ्या. कुकरमध्ये लावली असेल तर मोठय़ा आचेवर एक शिटी करून घ्या. मग थोडा गॅस बारीक करून दोन शिट्टय़ा करा आणि गॅस बंद करा. प्रेशर कुकरची वाफ  जिरेपर्यंत थांबा. भाजलेला पापड आणि रायत्यासोबत गरमागरम खिचडी सव्‍‌र्ह करा.

पॉपीसीड्स पॅन केक

साहित्य : गव्हाची कणिक – दोन कप (२५० ग्रॅम), बेकिंग पावडर दोन चमचे (१० ग्रॅम), खसखस एक चमचा (१० ग्रॅम), मीठ अर्धा चमचा (१ ग्रॅम), प्लेन ओट्स (मिक्सरवर पावडर केलेले) – अर्धा कप (१०० ग्रॅम), मध दोन मोठे चमचे (१० मिलि), अंडी – दोन नग, पिकलेले केळे – एक मध्यम आकाराचे कुस्करून बारीक केलेले (१०० ग्रॅम), दूध दोन कप (४०० मिलि), व्हॅनिला इसेन्स एक छोटा चमचा (५ मिलि), तेल – दोन मोठे चमचे (१० मिलि), वर ओतण्यासाठी थोडं मध, सजावटीसाठी अक्रोडाचे तुकडे.

बनवण्यासाठी लागणारा कालावधी : ३० मिनिटे

कृती : तेल, थोडं मध आणि अक्रोड सोडून सर्व साहित्य एका भांडय़ात एकत्र करून घ्या आणि गुठळ्या काढून टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. २० मिनिटे बाजूला ठेवा. पाच इंचांचा नॉनस्टिक पॅन घेऊन त्याला थोडे तेल लावून ठेवा आणि दोन मोठय़ा वाटय़ा कालवलेलं पीठ पॅनमध्ये ओता. पॅनवर झाकण ठेवा आणि पॅनकेक्स कमी आचेवर हलके तपकिरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. अलगद ताटलीमध्ये काढून त्यावर मधाची धार ओता आणि वरून अक्रोडाचे तुकडे घालून सजवा. गरम गरमच खायला द्या.

viva@expressindia.com