म्युच्युअल फंड, शेअर मार्केट ते थेट पारंपरिक बचत ठेवी यांच्यातल्या परताव्याचं गणित एरवी किचकट वाटतं; पण ते सुलभतेने सोडवून दाखवलं ‘यूटीआय’च्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि फंड मॅनेजर स्वाती कुलकर्णी यांनी. निमित्त होतं केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज कार्यक्रमाचं. इक्विटीशी संबंधित ८,३०० कोटी रुपयांच्या फंडांची बांधणी करणाऱ्या स्वाती यांनी यावेळी एक महिला म्हणून निधी व्यवस्थापकपदाची भूमिका, जबाबदारी व आव्हानंही विशद केली. ‘लोकसत्ता’च्या
अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तरुणाईनं वेळीच आपल्या अर्थजाणिवा समृद्ध करून आपली उद्दिष्टं ठरवावीत आणि त्याप्रमाणे योग्य वयात गुंतवणूक आणि नियोजनाला सुरुवात करावी, असा मोलाचा सल्ला स्वाती कुलकर्णी यांनी दिला. तसंच स्त्रियांमध्ये असलेल्या आर्थिक जाणिवेच्या ‘आयक्यू लेव्हल’ला वाव मिळायला हवा, अशी गरजही त्यांनी ‘व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावरून मांडली. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादाचा हा लेखाजोखा त्यांच्यात शब्दात..

बचत आणि गुंतवणुकीतला फरक
सर्वसामान्य माणसं बचत आणि गुंतवणुकीबाबत नेहमी गल्लत करतात. बचत ही तुम्हाला भांडवली स्थिरता देते. तर गुंतवणुकीतून तुम्ही वाढ अपेक्षित करता. सध्या शत्रूसारखा भासणाऱ्या महागाईच्या काळात तर गुंतवणुकीतून होणारा लाभ निश्चितच उपयोगी ठरतो. बचत ही तुम्हाला गरज लागते तेव्हा उपयोगी पडते; मात्र भविष्यातील तरतुदीसाठी गुंतवणूक आवश्यक आहे . त्यावरचा परतावाही त्यासाठी लक्षणीय ठरतो.

vv08

अर्थसाक्षरता आवश्यक
आज आर्थिक साक्षरता आवश्यक ठरली आहे. मात्र तिच्या खऱ्या अर्थाने वाढीसाठी हा विषय शाळा स्तरावर घेऊन जाणे गरजेचे आहे. आज केवळ एखाद्या बँकेचा काही सामाजिक कार्यक्रम किंवा अशा व्यासपीठावरूनअर्थविषयक चर्चा होतात. याच माध्यमातून ही बाब शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऐकू जात असते. मात्र प्रत्यक्ष वित्तव्यवस्थापन, गुंतवणूक, त्यातले लाभ हे त्यांच्या लेखीही नसतात. तेव्हा अर्थशास्त्र हा विषय सध्याच्या घडामोडींची जोड देऊन शाळेमध्ये अनिवार्य केला तरच तरुणाईला अर्थभान येईल आणि तरुण मुलांच्या करिअरच्या दृष्टीनेही त्याचा खूप उपयोग होऊ शकेल.

फंड मॅनेजर काय करतो?
फंड मॅनेजर तुमच्यासाठी शाहरुख खान अथवा माधुरी दीक्षित असतो. एखाद्या चित्रपटात आपण हीरो अथवा हिरोईनला जेवढं महत्त्वपूर्ण मानतो, ज्याच्यासाठी (अनेकदा करण जोहरसाठीही आपण चित्रपट पाहतो म्हणा!) सिनेमा पाहतो; तसंच फंड मॅनेजर हादेखील तुमच्या फंड गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा ठरतो. चित्रपटातील हीरो/हिरोईन दिसतात तसे आम्ही त्या फंडामागे असलो तरी दिसत नाही. मात्र अशा फंडांची आखणीवरच तुमच्या गुंतवणुकीचा डोलारा उभा असतो. सोबतच प्रॉडक्ट (स्किम) व ब्रॅण्ड (कंपनी) चाही हातभार असतो. अगदी चित्रपटात असतं तसं, फक्त हीरो- हिरोइनमुळे चित्रपट चांगला होत नाही, संपूर्ण टीमला त्यासाठी उत्तम काम करावं लागतं. तसंच तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या फंडामागे एक अख्खी टीम कार्य करत असते.

आजच्या पिढीसमोर एसआयपीसारखा उत्तम पर्याय आहे
म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी हा गुंतवणूक पर्याय सध्या उत्कृष्ट ठरत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच अथवा लग्नाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर हा पर्याय निवडला तर भविष्यातील आर्थिक प्रवास काहीसा सुरळीत निश्चितच होतो. आमच्या वेळी – म्हणजे सुरुवातीच्या काळात – एसआयपीसारखा पर्यायच नव्हता. नव्या पिढीला हे एक चांगले गुंतवणूक माध्यम उपलब्ध झालं आहे, हे त्यांच्यासाठी खरं तर खूपच लाभदायी आहे.

vv21

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचं आदर्श पिरॅमिड
कोणत्या फंडात गुंतवणूक करावी हा वैयक्तित निर्णय असला तरी कशाप्रकारे असावी, याचा सल्ला मी देऊ शकेन. म्युच्युअल फंडातली गुंतवणुक नेहमी पिरॅमिडसारखी असावी. या पिरॅमिडच्या खालच्या तळाला लार्ज कॅप फंड्स असतील, मध्ये मिड कॅप आणि सगळ्यात टोकाला स्मॉल कॅप. कारण अर्थातच लार्ज कॅप फंड्स कमी जोखमीचे असतात, पण ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. त्याचा चांगला परताना येण्यासाठी कालावधी जावा लागतो. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडात कदाचित कमी कालावधीत लवकर फायदा मिळू शकतो, पण त्यातली जोखीम वाढत जाते.

फंडातही ‘एफडी’सारखा परतावा शक्य, पण..
बाजारात आज म्युच्युअल फंड, कंपन्यांचे शेअर तसंच मुदत, बचत ठेवी असे विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. स्थिर उत्पन्न देणाऱ्या आणि जोखीम नसलेल्या मुदत/बचत ठेवींना नेहमीच सर्वसामान्यांकडून प्राधान्य दिलं जातं. मात्र त्यावरील कर पाहता ठेवींवर वार्षिक ७ ते ७.५ टक्के व्याज मिळत असलं तरी परतावा मर्यादित असतो. महागाईचा ६ टक्के दर गृहीत धरला तरी अवघा एक ते दीड टक्काच जास्त रिटर्न्स मिळू शकतात. अशी महागाई किमान सलग १० वषर्ं राहिली तर गुंतवणुकीवर मिळणारा परतावा काय तो लाभदायी ठरेल? तेव्हा स्थिर परताव्या बरोबरच त्यावरील वाढीचेही ध्येय हवेच. मुदत ठेवींसारखेच पर्याय म्युच्युअल फंडांतही उपलब्ध आहेत. अनेक फंडांमध्ये ठेवींची वैशिष्टय़ंही दडलेली असतात. मात्र त्यात सुरक्षितपणे गुंतवणूक करणं आवश्यक ठरते. म्युच्युअल फंडांमध्ये चक्रवाढ व्याज नसतं; मात्र दीर्घकालीन वाढ निश्चितच आहे.

टर्निग पॉइंट
वित्तीय क्षेत्र आणि त्यातही म्युच्युअल फंडसारख्या क्षेत्रात मी ओघानंच आले, असं म्हणावे लागेल. मी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घेण्याचा निर्णय रद्द करत कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेतली. कारण मला स्पोर्ट्सची आवड होती. मी व्हॉलीबॉल खेळायचे. संध्याकाळचे चार-चाडेचार वाजले की मैदानाकडे पळावंसं वाटायचं. पण त्यासाठी अभ्यास पूर्ण करण्याची ताकीद होती. यावेळी माझ्या व्हॉलीबॉलच्या कॅप्टनचा सल्ला माझ्या आयुष्यातील ‘टर्निग पॉइंट’ ठरला. ही कॅप्टन माझी मैत्रीणही होती आणि रोल मॉडेलही. आयुष्यात काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे, काहीतरी बनलं पाहिजे हे तिच्यामुळे मनावर बिंबलं आणि मग अभ्यासावर अधिक लक्ष दिले. बी.कॉम झाले. एनएम इन्स्टिटय़ूटमधून फायनान्समध्ये एमबीएही केले आणि मग वित्तीय क्षेत्रातच करिअर करायचं ठरविलं. सुरुवातीला एका खासगी कंपनीत काम केलं आणि नंतर इथे यूटीआयमध्येच विश्लेषक म्हणून सुरुवात केली. ते करतानाच फंड मॅनेजर होता येईल, हेही लक्षात आले. तुम्हाला जेव्हा एक्स्पेक्टेशन्स असतात तेव्हा खऱ्या अर्थी त्याच प्रमाणात एक्सपोजरही मिळायला हवं. ते इथं मिळालं.

स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड
स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड या दोन गुंतवणूक पर्यायाबद्दल सांगायचं तर दोन्ही जोखमीचं निश्चित आहे. मात्र फंडातील गुंतवणूक तुम्हाला वेळ देऊ शकतो. प्रत्यक्ष इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना संबंधित कंपनी, त्या कंपनीचं क्षेत्र, त्याच्यावर परिणाम करणाऱ्या घटना यावर देखरेख ठेवावी लागते. अनेकदा तुम्हाला त्या विषयाची जाण असूनही वेळेअभावी तुम्ही त्यात लक्ष घालू शकत नाही. तेव्हा काहीसे शुल्क आकारून ही सुविधा तुम्हाला म्युच्युअल फंड योजना देऊ करतात. म्युच्युअल फंड कंपन्या त्या त्या क्षेत्रातील अभ्यासावर आधारितच गुंतवणूक करत असतात. भविष्यातील परिणामकारक घडामोडींचा संदर्भही त्यासाठी हेरलेला असतो. एका फंडाद्वारे तुम्ही एकाच वेळी ५० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असता. ते स्टॉक मार्केटमध्ये अभावानंच शक्य होतं. सॅक मार्केटमध्ये तुम्ही कमी कालावधीत अधिक परताव्याची अपेक्षा करू शकता पण जोखीम अधिक असते. म्युच्युअल फंड ही नियंत्रित आणि सेबीनं नियमित केलेली व्यवस्था आहे.

भांडवल सुरक्षित आणि परतावा अधिक
लिक्विड फंड, सरकारी रोखे, कंपनी बॉण्ड आदी पर्याय याही प्रकारात आहेत. सुरक्षित मार्ग आपण त्यांना येथेही म्हणू शकतो. तुमचे भांडवल सुरक्षित राहण्याबरोबरच त्यावर परतावाही अधिक चांगला मिळणे ही किमान अपेक्षा म्युच्युअल फंडात पूर्ण होऊ शकते. कमीत कमी जोखीम आणि अधिकाधिक परतावा हे दोन्ही फंडातील गुंतवणुकीद्वारे साध्य करता येणं शक्य आहे.

फंडाची चौकट
म्युच्युअल फंडांचीही एक चौकट असते. १०० टक्क्यांपैकी किती प्रमाणात गुंतवणूक कोणत्या कंपन्या, क्षेत्रांमध्ये करावी, हे अभ्यासाअंती ठरवलं जातं. त्यासाठी म्युच्युअल फंडाचे काही नियम असतात. कुठल्याही एका कंपनीत एकदम मोठय़ा प्रमाणावर आम्ही गुंतवणूक करत नाही. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा फंडांमध्ये का पैसे टाकावे तसेच गुंतवणूकदारांकडून काय अपेक्षा असाव्यात हे सारं मांडून फंडांची एकसंध बांधणी केली जाते. अनेकदा ठरावीक क्षेत्रातील आर्थिक वातावरणातील अथवा नियमांमधील बदल हेरूनही फंड तयार केले जातात. म्हणजे त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या भविष्यातील बदलत्या घडामोडी अथवा त्यावर परिणाम करणारे घटक लक्षात घेऊन आधीच फंडांची आखणी करावी लागते. संबंधित क्षेत्रावर कायम नजर ठेवावी लागते. त्या क्षेत्रावर व आपसूकच संबंधित कंपनीवर होणारे लाभ व तोटे लक्षात घ्यावे लागतात. गुंतवणूक परतावा व भविष्यातील अंदाज घेऊन फंड तयार केला जातो.

वित्तीय सल्लागाराबरोबर तुमचा विचारही महत्त्वाचा
फायनान्शिअल प्लॅनिंगमध्ये सल्ला देण्यासाठी एक चांगला वित्तीय नियोजनकार निश्चितच फायद्याचा असतो. पण त्याच्यावर सगळं काम सोपवून निश्चिंत राहण्यापेक्षा नियोजनात तुमचा स्वतचा विचारही आवश्यक आहे. एक चांगला वित्तीय नियोजनकार तुम्ही निवडला असला तरी स्टॉक मार्केट जेव्हा खाली जातं, तेव्हा तो त्याच्याच विवंचनेत असतो. तुम्हाला त्यावेळी त्याची मदत होईलच असं नाही. अशा वेळी वित्तनियोजनात तुमची भावनिक गुंतवणूकही आवश्यक ठरते. स्टॉक मार्केटमधील अनिश्चितता बाजूला ठेवून अशा वेळी म्युच्युअल फंडांसारखा निर्धोक मार्ग योग्य ठरतो.

गुंतवणूक कशी असावी?
गुंतवणूक करताना नेहमी संबंधित कंपनीचा ताळेबंद तपासावा. कंपन्यांचे कर्ज दायित्वही लक्षात घ्यावे. त्याचबरोबर ‘रिटर्न ऑन इक्विटी’ १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणं चांगलं, हेही हेरावं. स्टॉक मार्केटमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक करू नये. तरुण वयातील व्यक्तींनी हे प्रमाण अधिक ठेवलं तर हरकत नाही. पण ज्यांना उत्पन्नाचे किंवा मिळकतीचे नियमित इतर स्रोत नाहीत त्यांनी मात्र त्यात अधिक जोखीम घेऊ नये.

स्त्रियांमध्ये आर्थिक जाणीव आपसूकच; फक्त त्याला वाव मिळायला हवा
घर उत्कृष्ट मॅनेज करणारी स्त्री वित्तीय नियोजनात अनेकदा मागे पडते. पण आता काळ बदलतोय. आज वित्तीय क्षेत्रातही महिलांची वाढती संख्या आहे. किंबहुना अनेकदा त्यांच्याकडून या क्षेत्राचं नेतृत्वही केलं जातंय. घराच्या पातळीवर वित्तीय नियोजनात ती मागे पडत असल्याची काही नाममात्र उदाहरणं असली तरी आर्थिक जािणवाना ती अवगत नाही, असं मुळीच नाही. सामान्य स्त्रीलादेखील बऱ्यापैकी आर्थिक जाण असतेच. फक्त ती वृिद्धगत होण्यासाठी पोषक वातावरणाची गरज आहे. आज तेच वातावरण मिळतंय. त्यामुळे ‘एमबीए’साठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण अधिक दिसतंय. हळूहळू या क्षेत्रातल्या संधी वाढताहेत तशी मुलींची संख्याही वाढतेय. ही चांगली गोष्ट आहे.

‘बरसाती मेंढकां’ना दूर ठेवा
स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पाय ठेवला की आजूबाजूला अनेक ‘बरसाती मेंढक’ दिसू लागतील. म्हणजे ठरावीक काळापुरता, थोडय़ा कालावधीत भरभरून फायदा देणारे पर्याय समोर दिसतात, अमुक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याच्या ‘टिप्स’ देणारे ‘तज्ज्ञ’ही जमा होतात. तेव्हा त्यांच्यापासून सावधच राहा. त्यांच्यातील कुजबुजही अनेकदा शत्रूसमान काम करते. तेव्हा स्वत:च्या अभ्यासावरच गुंतवणूक स्वीकारा. स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीत तुम्ही याबाबत न्याय देऊ शकत नसाल तर म्युच्युअल फंडांसारखा, तसाच काहीसा व्यवहार करणाऱ्या पण कमी जोखमीच्या पर्यायावर लक्ष द्या.

तो आव्हानांचा काळ..
करिअरमध्ये आव्हानांचा काळ येतोच. माझ्याही बाबतीत आला. २००७ दरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर आदी क्षेत्रं भक्कम होती. सगळेजण त्याकडे धावत होते. आम्ही त्याकडे तेव्हा अधिक लक्ष दिलं नाही. २००९ च्या निवडणुकाआधी ४० टक्क्यांनी स्टॉक मार्केट वाढलं होतं. यंदाच्या निवडणुकीतही तसंच काहीसं वातावरण होतं. उपरोक्त क्षेत्रातील घडामोडी वेग घेतील, असं पुन्हा वाटलं. मात्र प्रत्यक्षात तो बुनबुडाचा ठरला. अल्पावधीत या क्षेत्रात प्रगती शक्य होईल, असं वाटलं नाही. तेव्हा आम्ही आयटी, फार्मा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं. २०१२ मध्येही त्यात वाढ झाली. आमचा निर्णय चुकेल की काय अशी कुणकुण वाटली होती. मात्र आम्ही यशस्वी ठरलो होतो. या क्षेत्रांना कुठेही ओहोटी लागली नव्हती.

व्हॉलीबॉल आणि फंड मॅनेजिंग : जोखमीपेक्षा जबाबदारी अधिक
फंड मॅनेजर म्हणून काम करताना जोखमीपेक्षा जबाबदारी अधिक जाणवते. पण इथे मी त्याची सांगड मला आवड असलेल्या व्हॉलीबॉल खेळाशी घालते. बॉल पकडून तो पास करण्यातील चपळाई, चाणाक्षता इथेही कामी येते. खेळण्याआधी एक्झरसाईज आवश्यक असतो. तसंच इथेही अभ्यास लागतो. संयमही हवाच. स्टॉक मार्केटचा कल समजून त्यातील काही फंड योजनेद्वारे देता येतो का हे पाहता येतं. फंड मॅनेजर हा एकच असला तरी एक टीम म्हणून तो काम करत असतो. विश्लेषक आणि व्यवस्थापक म्हणून काही बाबींवर मतभेद असू शकतात मात्र तो वाद नव्हे तर संवाद ठरतो.

माझी गुंतवणूक..
वैयक्तिक गुंतवणुकीसाठी एक फंड मॅनेजर म्हणून आम्हाला ‘सेबी’चे काही नियम लागू आहेत. काही र्निबध आहेत. स्टॉकमध्ये थेट गुंतवणूक करण्याला मर्यादा असतात. फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी ६० टक्के गुंतवणूक ही मी स्वत: बांधलेल्या फंडांमध्ये करते. तेही आमच्याच कंपनीच्या. आणि इतर गुंतवणूक ही अन्य क्षेत्रांमध्ये. बँकिंग क्षेत्रातही माझी गुंतवणूक आहे.

..अन् फंडातील गुंतवणूक आधार ठरला
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ती आपल्या बिकट प्रसंगीही उपयोगी पडते, हेही लक्षात घ्यावे. तुम्ही जेव्हा घर खरेदी करत असता आणि त्यासाठी कर्ज घेत असता तेव्हा रकमेच्या १० ते १५ टक्के रक्कम किमान तुम्हाला स्वत:ला उभी करायची असते. अशा वेळी फंडातील गुंतवणूक तुम्हाला उपयोगी पडते. मी स्वत: हे केलं आहे. म्युच्युअल फंडातली गुंतवणूक हा आधार पर्याय तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्याजवळ होता. तुम्हालाही तो मिळू शकतो. म्युच्युअल फंडांची गुंतवणूक कशी फायद्याची ठरते, यासाठी काही उदाहरणं देते. म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’सारख्या गुंतवणूक पर्यायात महिन्याला ५,००० रुपये गुंतविले तर पुढील ३० वर्षांत ती रक्कम १.७४ कोटी रुपयेपर्यंत जाऊ शकते. १५ वर्षांपूर्वी गुंतविलेली १०,००० ची रक्कम आज ६.५० लाख रुपये झाली आहे. ‘एसआयपी’ सारखा पर्याय माझ्या तरुणपणी नव्हता, याबाबत मला आत्ता खूप वाईट वाटतं. त्याचा आत्ता फार फायदा झाला असता. योग्य वयात योग्य नियोजनभानानं केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा आधार ठरू शकते, मोठा फायदा देऊ शकते.

इन्व्हेस्टमेंट टिप्स :
मुदत ठेवींमध्ये ५ ते ६ टक्के वार्षिक व्याज मिळत असेल तर म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीतही १२ टक्के परतावा आरामशीर मिळू शकतो. हा सध्याच्या आकडेवारीनं दाखवून दिलंय.
* फंडातील गुंतवणूक दीर्घकालीन लाभदायी ठरते; फक्त जोखीम स्वीकारण्याची आणि संयमाची तुमची तयारी असावी.
* घरासाठी कर्ज घेताना उर्वरित रकमेच्या जुळवाजुळवीसाठी फंडातील अशी रक्कम निश्चितच वेळेवर उपयोगी ठरते.
* ‘एसआयपी’सारख्या पर्यायात १२ टक्क्यांपेक्षा अधिक लाभ मिळू शकतो. सध्या हा पर्याय खूपच लोकप्रिय ठरत आहे.
* वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक केल्यास त्यावरील लाभ अधिक प्रमाणात असतो. तुलनेने त्यासाठी अधिक उशीर झाल्यास तो कमी ठरतो.
* स्टॉक मार्केटमध्ये नेहमी मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करावी. तुलनेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी जोखमेची

या कार्यक्रमात स्वाती कुलकर्णी यांनी व्यक्त केलेली मते वैयक्तिक स्वरूपाची असून त्या काम करत असलेल्या संस्थेची नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
शब्दांकन : वीरेंद्र तळेगांवकर