तो कलाकारही आहे, अन पर्यावरणस्नेहीसुद्धा. भक्तिभावाला विचार आणि कल्पकतेची जोड देणारा हा कल्लाकार आहे, दत्ताद्री कोथूर.

गणपती हे कला, बुद्धी आणि विद्येचं दैवत. हा अनेकांचा लाडका देव. गणेशोत्सवाचं लोण आता देशविदेशांतही पोहोचलं आहे. दिवसेंदिवस या उत्सवाचं स्वरूप मात्र बदलत चाललंय. त्यामुळे हा उत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांपैकी एक म्हणजे ‘ट्री गणेशा प्रकल्प’. याचा शिल्पकार आहे, युवा कलाकार दत्ताद्री कोथूर.

चारचौघांप्रमाणंच दत्ताद्रीच्या घरीही गणपती येतो. पण आपली मूर्ती तो स्वत: घडवतो. इतकंच नव्हे तर ती पर्यावरणस्नेही असावी, असाही त्याचा प्रयत्न असतो. त्याचे गुरू फाइन आर्ट आर्टिस्ट विशाल शिंदे यांच्याकडं तो मूर्ती घडवायला शिकला. घरच्या गणपतीसोबतच दत्ताद्री मंडळांसाठीसुद्धा सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित संदेश देणारे चलतचित्र देखावे तयार करतो. गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर दिसणारे दृश्य, भंग पावलेल्या मूर्ती पाहून दत्ताद्रीला वाईट वाटलं. हे सगळं थांबायला हवं. ही दुरवस्था टाळायला हवी असं त्याला वाटू लागलं. यातून काहीतरी सकारात्मक मार्ग शोधणं आवश्यक होतं. तो शोधता शोधताच त्याला सापडली, ‘ट्री गणेशा’ ही अफलातून कल्पना. लाल मातीची एक मूर्ती घडण्यापासून ते तिच्या विसर्जनापर्यंतचा प्रवास त्याने व्हिडीओत चित्रित केला. तो ऑनलाइन शेअरही केला. तो अनेकांना भावला. त्याच्याशी बऱ्याच जणांनी संवाद साधला. असं काही करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला काही ऑर्डर्स मिळाल्या. यंदाही या ऑर्डर पूर्ण करता करताच त्याने व्हिवाशी संवाद साधला आहे.

‘ट्री गणेशा’ या संकल्पनेमध्ये लाल माती, खत आणि बियाणं वापरून गणेशमूर्ती साकारली जाते. मूर्तीसोबत कुंडीही दिली जाते. विसर्जनाच्या वेळी कुंडीत मूर्ती ठेवून ती गच्ची किंवा गॅलरीत ठेवायची. त्या मूर्तीवर पाणी घालायचं, अगदी झाडांना घालतो त्याचप्रमाणे. माती हळूहळू विरघळते. बियाणं रुजू लागतं. दत्ताद्री म्हणतो, ‘‘आम्ही फक्त भेंडीच्या बियांचा वापर करतो. इतरही बिया वापरता येतात पण त्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. ऋतुमानाचा अंदाज आणि बागकामाची माहिती असणारे मूर्ती घरी नेऊन बिया स्वत:च पेरतात. अशा कुंडीतून उगवलेल्या झाडांचे फोटो लोक आमच्याशी शेअर करतात.’’ या ‘ट्री गणेशा’ संकल्पनेला ‘ऑलिव्ह क्राऊन अ‍ॅवॉर्ड २०१६- डिजिटल सिल्वर’ आणि ‘ऑलिव्ह क्राऊन अवॉर्ड – यंग ग्रीन आर्ट डिरेक्टर ऑफ द ईअर २०१६’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. दिया मिर्झा, सई ताम्हणकर, रितेश देशमुख, भारत गणेशपुरे, आर. जे. मलिष्का, प्राजक्ता शुक्रे आदी अनेक नामवंतांनी या उपक्रमाला दाद दिली आहे.

दत्ताद्री म्हणतो, ‘‘ट्री गणेशा या संकल्पनेतला गणेश मी मुद्दामच साधा परंतु सुंदर ठेवला आहे. खरंतर मी कलाकार आहे, या मूर्तीवरची कलाकुसर मला अवघड नव्हती. पण पर्यावरणस्नेह हा मुख्य मुद्दा लक्षात घेऊन ते करणं, कटाक्षानं टाळलं. मूर्तीची उंची बेताची ठेवत, नैसर्गिक रंगांचा वापर केला. साधी पण आकर्षक मूर्ती मला करायची होती. रंग वापरला तर बी रुजू शकलं नसतं. त्यामुळे मूर्ती फक्त लाल मातीची झाली. मूर्तीची सोंड, पाय, बैठकीवर थोडं कोरीव काम केलं. एका मूर्तीत साधारण ७-८ बिया टाकल्या जातात. त्यातील निदान एक जरी जगलं तरी ३००-४०० झाडं उगवली असतील, असा अंदाज आहे. मात्र या झाडांची निगा राखून जोपासना करणं, आवश्यक आहे. मूर्ती देतानाच आम्ही लोकांना फोटो पाठवण्याचं आवाहन करतो. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेसुद्धा या पर्यावरणस्नेही गणपती संकल्पनेला पाठिंबा दिला आहे.’’ सध्या जागेचा प्रश्न असल्याने या मूर्ती अधिक मोठय़ा प्रमाणात घडवता येत नाहीत, अशी खंत दत्ताद्रीने व्यक्त केली. या मूर्ती घडवण्यासाठी त्यांची १५ जणांची टीम कार्यरत असते. ही संकल्पना साकारताना त्याला त्याचा मित्र आणि सहकारी अभिषेक जाधवची मोलाची मदत झाली.

दत्ताद्रीच्या वडिलांना चित्रकलेत रस आहे. त्याचे भाऊ इंजिनीअर असून त्यांच्याकडेही कलागुण आहेत. ओघाने कलेचा वारसा दत्ताद्रीला होताच. त्याने एस एल रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून अप्लाइड आर्टची पदवी घेतली. गेली १० र्वष तो जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या ‘स्केअरक्रो कम्युनिकेशन’ या एजन्सीमध्ये ‘आर्ट ग्रुप हेड’ म्हणून तो काम पाहत आहे. तो म्हणतो, या क्षेत्रात एखादी कल्पना सुचण्याला फार महत्त्व आहे. मी एजन्सीमध्ये एक पर्यावरणस्नेही कल्पना मांडली होती. त्यानुसार आम्ही ‘स्पायकर’साठी हाफ बॅग डिझाइन केल्या होत्या. याही संकल्पनेला ‘ऑलिव्ह क्राऊन अवॉर्ड २०१६- डिजिटल गोल्ड’ आणि ‘ऑलिव्ह क्राऊन अ‍ॅवार्ड २०१६ डिजिटल सिल्वर’ आणि ‘गोवाफेस्ट २०१७- सिल्वर’ हे पुरस्कार मिळालेले आहेत.

या एजन्सीआधी दत्ताद्री ‘ओगिल्वी अ‍ॅण्ड माथूर’ या नामांकित एजन्सीमध्ये ‘सीनिअर आर्ट डिरेक्टर’ म्हणून काम पाहत होता. त्या वेळी त्याला मुंबई इंडियन्सच्या टीमला भेटण्याची संधी मिळाली. तिथं त्याने लेनोव्हो, टाटा सुमो, ओनिडासारख्या ब्रँडसाठी काम केलं. ‘जोशब्रो कम्युनिकेशन्स’, ‘नॉइटस्ये क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’ आदी ठिकाणीही त्याने काम केलं आहे. ‘आयसीआयसीआय प्रू लाइफ स्टेज एश्युअर’ची जाहिरात करायची होती. हातात खूप कमी वेळ होता. त्या वेळी दत्ताद्रीने सुचवलेली कल्पना ग्राहकाकडून लगेच मान्य झाली. ती पहिलीच हटके जाहिरात अनेकांना आवडली. ‘सर्कल क्रिएशन्स’ या एजन्सीत त्याने व्हिज्युअलायझर म्हणून काम केलं. जाहिरातक्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे संतोष पाढी. त्यांच्या कामातून दत्ताद्रीला कायमच खूप काही शिकायला मिळाल्याचं, तो आवर्जून नमूद करतो. जाहिरात क्षेत्रातील अनुभवाबद्दल तो म्हणतो, इथे काम करताना वेळेचं महत्त्व मोठं आहे. ग्राहकाकडून सुरुवातीला ब्रीफ येतं. मग ते उत्पादन, त्याचा उपयोग, उपयोजिता, लोकांची मानसिकता, उत्पादनाच्या लाँचिंगची वेळ, त्या वेळचे कार्यक्रम, परिस्थितीचा अंदाज, अचूक निरीक्षणशक्ती हे सगळे मुद्दे जाहिरात करताना लक्षात घ्यावे लागतात. भाषा आणि स्केचिंगवर हुकूमत असावी लागते. हेडिंग, व्हिज्युअल्स, लोगो, फोटो हे सगळं काही मर्यादित व ठरावीक जागेत बसवणं, फाँटची निवड, फोटोग्राफिक ट्रीटमेंट, कॉम्प्युटर व मल्टिमीडियाचं ज्ञान ही कौशल्यं अपेक्षित असतात.

जाहिरात क्षेत्रातल्या नोकरीत तो कितीही व्यस्त असला तरी दत्ताद्रीला ‘ट्री गणेशा’ ही पर्यावरणस्नेही चळवळ वाढवायची आहे. भारतभर पोहोचवायची आहे. जाहिरातक्षेत्रात अधिक कल्पकतेने काम करायचंय, पुरस्कार पटकवायचेत. यासाठी घरच्यांचा कायमच पाठिंबा त्याला मिळतो. त्याच्या या उपक्रमाला स्वत: गणराजच भरघोस पठिंबा देवोत. आशीर्वाद देवोत हीच प्रार्थना!

viva@expressindia.com