जिद्दीच्या बळावर स्वप्नपूर्तीच्या दिशेनं सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट सांगतेय, फिनिक्स अ‍ॅरिझोनामधली प्रियांका.

अगदी लहानपणापासून मी चित्रपटांमध्ये अमेरिकेतली शूट्स पाहायचे तेव्हा मनोमन तिथं जावंसं वाटायचं. पृथ्वीचा गोल पाहताना भारतासोबत अमेरिकाही पाहिली होती. लहानपणापासून वडिलांमुळं कळत-नकळत एक्स्प्लोरिंगचा छंद जोपासला गेला. आई अभ्यासासाठी मागं लागायची तेव्हा आजोबांनी मी इंजिनीअर होईन, हे स्वप्न पहिलं नव्हतं. पण आज मी इंजिनीअर झालेय, हे पाहून त्यांना खूप आनंद झाला असता. माझे आजोबा म्हणजे स्वातंत्रसैनिक व्ही. जी. शिवदरे. ते दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि समाजसेवक होते. ते माझे आदर्श आहेत. करिअरच्या प्रवासात आलेल्या अडीअडचणींवर मात केल्यानं आत्मविश्वास अधिकच बळकट झालाय.
कॉलेज सुरू असतानाच घरच्यांना अंधारात ठेवून मी विविध प्रवेश परीक्षांची आणि चांगलं अ‍ॅकॅडमिक प्रोफाइल होण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू केली होती. घरच्यांना मी परदेशी जाणं कधीच पटणारं नव्हतं. वडिलांचा ठाम विरोध होता या गोष्टीला. त्यांच्या मते, भारतात पुष्कळ संधी उपलब्ध असून, बुद्धिमान माणूस शिकायचं तर कुठेही शिकतो. तर आईची इच्छा होती की, मी ‘आयआयएम’मधून एमबीए करावं. तिच्या समाधनासाठी उअळचा क्लास लावला. वडिलांच्या समाधानासाठी GATE परीक्षेची तयारी केली. स्वत:ची जिद्द म्हणून GREची तयारी केली. या प्रयत्नांत आजोबांची – आईच्या वडिलांची साथ लाभली. त्यांनी मला अमेरिकेतील विद्यपीठांत अर्ज करण्यासाठी आर्थिक आणि मानसिक पाठिंबा दिला. माझ्या प्रयत्नांना यश मिळून युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडात अ‍ॅडमिशन मिळाली. खूप विरोधानंतर व्हिसा क्लॅरिफाय होण्याची कागदपत्रं, स्पॉन्सरशिप लेटर मिळून अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीवर शिक्कामोर्तब झालं.
इथल्या कॉलेजची वेळ खूपच कमी असल्यानं स्वयंअध्ययनाला खूप वेळ मिळायचा. परीक्षेत थिअरॉटिकल प्रश्न नसल्यानं पाठांतराचा प्रश्नच यायचा नाही. विद्यापीठातर्फे आम्हाला चीटशीट करायला मान्यता होती. त्यानुसार आम्ही फॉम्र्युला लिहून आणू शकायचो. आपल्याला ज्या गोष्टी लक्षात नाही राहत, त्या सगळ्या लिहून आणू शकतो. कारण परीक्षेत बुद्धीची परीक्षा होणं गरजेचं आहे, स्मरणशक्तीची नाही. प्रोफेसरनी चार पानी चीटशीटला परवानगी दिल्यावर आम्ही समजायचो की, पेपर खूप अ‍ॅप्लिकेशन ओरिएंटेड नि अवघड असणारेय. मला तिथली लायब्ररी सिस्टीम खूप आवडायची. मी खूप वेळ लायब्ररीमध्येच असायचे. आयकार्ड दाखवून रूमची चावी मिळायची. त्या इंडिव्हिज्युअल स्टडीरूममध्ये बसून मस्त अभ्यास व्हायचा. मी अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीची नोटटेकर म्हणून काम केलं एका सेमिस्टरमध्ये. काही जण अपंगत्वामुळं वर्गात येऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी ऑनलाइन लेक्चर्स असली, तरीही प्रोफेसर शिकवताना काढलेल्या नोट्स मी त्यांना द्यायचे. नोट्समुळं कॉलेजच्या मिड टर्ममध्ये छान गुण मिळाल्यावर बऱ्याच जणांनी मला आभारप्रदर्शक ईमेल केले होते. आजही खूप एकटेपणा जाणवला की ते ईमेल्स वाचते. मला एकदा बरं वाटत नव्हतं, म्हणून मी कॉलेजला जाणार नव्हते, पण या मित्रमैत्रिणींना नोट्सची गरज आहे, हे जाणवल्यावर मी गेलेच. म्हटलं तर ही खूप छोटी गोष्ट आहे. पण माझ्या नोट्सचा फायदा काही जणांना झाल्याचं समाधान आहे.
फारसा इंडस्ट्री एक्सपिरिअन्स नसल्यामुळं मला इंटर्नशिप मिळवायला खूप कष्ट करावे लागले. मी शंभरहून अधिक इंटर्नशिपसाठी अर्ज केले होते. त्यातील १५-१७ कंपन्याचे तीन-तीन टेक्निकल इंटरव्ह्य़ू देऊन पदरी नकार आला. दिवसेंदिवस नैराश्य येत होतं. माझं क्षेत्र Signal Processing – electrical engineering आहे. त्यात तुलनेनं नोकरीची संधी खूप कमी असते, याची कल्पना होतीच. मी सगळ्यात कठीण विषय निवडले. रोज एकेका कंपनीचा नकार येत होता. स्वत:ला सिद्ध करायची, हीच वेळ आहे हे मनाशी पक्कं ठरवलं. मग रोज १२-१३ तास अभ्यास केला. इंटरनेटवरचे इंटरव्ह्य़ू क्वेश्चन्स, प्रोग्रॅम्स पालथे घातले. त्यासाठी रूममेट्सची खूपच मदत झाली. अखेरीस गोप्रो इन्क या कंपनीत निवड झाली. मी ब्रायन शंक यांच्या हाताखाली काम केलं. त्यांचा व्हिडीओ प्रोसेसिंगमध्ये horn -schunk नावाचा अल्गोरिदम प्रसिद्ध आहे. त्यांनी मॅसेच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडी केलेय. ते गोप्रोमध्ये रिसर्च डोमेनमध्ये आणि इंटेलिजंट सॉफ्टवेअर सिस्टीम्समध्ये डिरेक्टर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तीन महिने काम केलं. माझ्या इंटर्नशिपच्या काळात अ‍ॅक्सेलेरोमीटर, गायरोमीटर आणि जीपीएस डेटा हँडल करण्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन तयार केलं. मी गोप्रोचा फाइल फॉरमॅट हँडल आणि फॉरमॅट एक्स्चेंज करण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. गोप्रो सिग्नल प्रोसेसिंगचे अल्गोरिदम्स c, c ++  आणि  python मधून इम्प्लिमेंट केलं. माझं काम सॅन डिएगोमध्ये होतं आणि तिथं काम करणारी मी एकटी भारतीय होते. मी एका अमेरिकन कुटुंबासोबत राहत होते. अमेरिकन सहकाऱ्यांना भारतीय परंपरांबद्दल सांगायचे आणि ते मला वेगळ्या वेगळ्या अमेरिकन फेस्टिव्हल्सना आमंत्रित करायचे. घरी आल्यावर अमेरिकन रूममेटससोबत डिनर करायचे आणि त्यांना रोज एक भारतीय पदार्थ खाऊ घालायचे. इथं मला तांत्रिक गोष्टींसह अनेक प्रोफेशनल-सोशल गोष्टीही समजल्या. आठवणींची शिदोरी घेऊन मी सॅन डिएगोतून बाहेर पडले.
इंटर्नशिपनंतर तिसऱ्या सेमिस्टरला असताना माझी एका स्टार्टअप कंपनीसाठी निवड झाली. या कंपनीनं मला वर्षभर इंटर्नशिपची संधी दिली. आता त्याच मेडिकल डिव्हाईस कंपनीत मी R & D Algorithm Development engineer म्हणून रुजू झालेय. बऱ्याच लोकांना Obstructive sleep apnea  (झोपेत श्वसनाला त्रास होणं) हा विकार असल्याचं प्रमाण आढळून येतंय. त्याच्या निदानासाठी एक रात्र हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावं लागतं आणि पॉलीसोमोनोग्रामच्या साहाय्यानं झोपेचं मापन केलं जातं. यासाठी पेशंटला बरीच उपकरणं घालून झोपावं लागतं. त्यामुळं पेशंट खूप अस्वस्थ होतो. अमेरिकेत हे निदान खूप महागडं आहे. मी त्यावर संशोधन करत असून सिग्नल प्रोसेसिंगचे अल्गोरिदम्स वापरून हे निदान सोपं करणार आहे. म्हणजे रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार नाही. येत्या काही महिन्यांत या संशोधनाला यश आलं तर त्या पेपरवर पेटंट फाईल करता येईल.
मला प्रवासाची फारच आवड आहे. मी कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, नायगारा फॉल्स, फिलाडेल्फिया, बोस्टन, शिकागो वगैरे ठिकाणी फिरलेय. मला हायकिंग आणि कॅम्पिंग खूप आवडतं. भारतातही खूपदा कॅम्पिंगला गेले होते. इथं या आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजना खूप वाव मिळाला. रॉकी माऊंटन्स, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया, apachi sitgreevs, अ‍ॅरिझोना आदी ठिकाणी हायकिंगसाठी गेले होते. रोजच्या धावपळीतून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात राहायला खूप आवडतं मला. मन एकदम शांतावतं त्यामुळं. एकदा बीच कॅम्पिंगला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहताना खूप भारी वाटलं होतं. तिथून किती काळ पाय निघत नव्हता. ‘व्हीआयटी’मध्ये असताना फोटोग्राफीचा एक कोर्सही केलेला. इथल्या प्रत्येक ट्रिपमधले असंख्य क्षण कॅमेऱ्यात टिपलेत. गोप्रो कंपनीनं मला मस्त Herou  ब्लॅक अ‍ॅडव्हान्स मॉडेल भेट म्हणून दिलं. त्यात हायकिंग नि कॅम्पिंगचे अनुभव क्लिक केले. सॅन डिएगोत असताना रोज तासभर सर्फिग शिकायला जायचे. त्याचं रेकॉर्डिग गोप्रोमध्ये केलं. दर गुरुवारी गोप्रो लाईव्ह अवर असायचा. त्यात तुम्ही कॅमेरा घेऊन जी अ‍ॅक्टिव्हिटी कराल आणि फोटो काढाल, त्याची स्पर्धा व्हायची. मला त्यातल्या एका राऊंडमध्ये बक्षीसही मिळालेलं.
या तीन वर्षांत मी अधिकच मेहनती झालेय. आधी फारसा स्वयंपाक यायचा नाही, आता सगळं उत्तम करू शकते. माझ्या हातचं सांबार अनेकांना आवडतं. रोजचं घरकाम, ऑफिसहून परतल्यावर उरलेल्या कामांनंतर पुन्हा दोन तास कंपनीचं काम किंवा स्वअभ्यास करते. वेळेचं महत्त्व कळल्यानं मल्टिटास्किंग शिकलेय. लोकांची काळजी करायला आणि घ्यायला शिकले. घरच्यांची आठवण आल्यावर रडून मन हलकं करते. घरच्यांशी वेळात वेळ काढून बोलतेच. गेल्या डिसेंबरमध्ये भारतात येऊन गेले. पण पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा अमेरिकेला निघताना जास्त त्रास झाला. अमेरिकेत पर्सनल स्पेस एवढी आहे की, त्यात आपुलकी हरवून गेलेय.. पण मन घट्ट करावंच लागतं. इथं थोडा अनुभव घेऊन भारतात परतेन. आजोबांसारखंच मलाही काही तरी करायचंय समाजासाठी. आर्थिक परिस्थितीमुळं जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करायचाय. स्वत:चं स्टार्टअप सुरू करायचंय भारतात. खूप मनापासून पाहिजे असेल ते नक्की मिळतं. फक्त त्या दिशेनं प्रयत्न करण्यात कमी पडता कामा नाही.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!

– प्रियांका शिवदरे, फिनिक्स, यूएसए

(शब्दांकन- राधिका कुंटे)