गो ग्रीन हे जागतिक फॅशनचं या वर्षीचं सूत्र आहे. आपली भारतीय फॅशन तर पहिल्यापासून निसर्गाच्या जवळची आहे; पण मध्यंतरी आपण सिंथेटिकच्या प्रेमात होतो. आपल्या अस्सल कॉटनच्या कपडय़ाची किंमत आणि मेहनत कमी करण्याच्या प्रयत्नात यात रासायनिक प्रक्रिया आणल्या गेल्या आणि अस्सल देसी चीज महाग होऊन बसली. नैसर्गिक फॅशन हे तुमचं स्टाइल स्टेटमेंट असेल तर कमी खर्चात युक्तीने या गोष्टी करता येतात.

चीनमधील शिंटॅन गावाची ही गोष्ट. या गावाला ‘डेनिम कॅपिटल ऑफ वर्ल्ड’ हा बहुमान मिळालाय, कारण इथे सर्वाधिक डेनिम्सची निर्मिती होते. या गावातून एक नदी वाहते. सॅटेलाइटवरून या नदीचे फोटो पाहिले की, गडद निळाशार रंग दिसतो, पण हा एरवी नद्यांच्या पाण्याला असलेला निळा रंग नाही. हा रंग आहे या डेनिमच्या डायचा. प्रचंड प्रमाणात डेनिम डाय केल्यावर टाकाऊ  रसायने या नदीत नियमित सोडली जातात. त्याने या नदीला हा रंग मिळाला आहे. एके काळी सिल्करूटच्या वाटेवर येणारं हे गाव, सध्याच्या प्रदूषित शहरांच्या यादीत आघाडीवर आहे.

फॅशन आणि निसर्ग यांच्यातील संबंधांबद्दल नेहमीच बोललं गेलं आहे. वरवर लोभसवाण्या वाटणाऱ्या या क्षेत्राचे हात प्रदूषण, अस्वच्छता यामुळेही बरबटले आहेत. स्पष्टच सांगायचं झालं, तर फॅशन इंडस्ट्री हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रदूषण करणारं क्षेत्र आहे. कपडे ही जीवनावश्यक गोष्ट. त्यातून पर्यावरणाची इतकी हानी करत असू याचा विचारही एरवी आपल्याला शिवणार नाही. याच क्षेत्राची दुसरी बाजू पाहू.

‘पँटॉन’ ही रंगांना वैश्विक सूत्रात बांधणारी कंपनी. या कंपनीचं महत्त्व यासाठी कारण तिने प्रत्येक रंगाला – छटेला वैशिष्टय़पूर्ण आणि नेमकी ओळख दिली. ही ओळख क्रमांक किंवा नावाच्या स्वरूपात आहे. किरमिजी, डाळिंबी, लाल म्हणजे नेमका कोणता हा गोंधळ त्यामुळे कमी होतो. जगाच्या एका कोपऱ्यातून डिझायनर ‘चेरी रेड’ ढंल्ल३ल्ली 1797 सांगतो, तेव्हा दुसऱ्या देशातील त्याच्या कारागिराला नेमकं कळतं त्याला कोणता रंग – कोणती छटा अपेक्षित आहे. दरवर्षी ही कंपनी एका विशिष्ट रंगाला ‘कलर ऑफ द इयर’चा किताब देते. मग हा रंग वर्षभर कपडे, ज्युलरी, फर्निचर, इंटीरियरमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. अर्थात या निवडप्रक्रियेत वर्षभराचा अभ्यास, सामाजिक परिस्थितीचा अंदाज, लोकांचा कौल या सगळ्याचा विचार होतो. या वर्षांचा रंग आहे – ‘ग्रीनरी’ 15-0343. साधारणपणे ‘हिरवा’ म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी मध्यम गडद हिरवी छटा. झाडाच्या टवटवीत पानाचा रंग. हा रंग आहे हिरव्या निसर्गाचा, नेमकं ‘पँटोन’लाही हेच अपेक्षित होतं.

गेल्या काही वर्षांपासून ‘गो-ग्रीन’ ही संकल्पना जोर घेऊ  लागली आहे. आपल्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये नैसर्गिक घटकांचा अधिकाधिक समावेश करून घेण्याचा प्रयत्न जगभरातून होऊ  लागला आहे. ऑरगॅनिक फूड ही त्यातूनच आलेली चळवळ. अगदी आपल्याकडे मागच्या वर्षीपासून सुरू झालेला खादी कापडांचा ट्रेण्ड हाही याच बदलांचा परिणाम. नैसर्गिक कापड, त्यावर नैसर्गिक प्रक्रिया करून कपडे बनविण्याचा प्रयत्न गेली काही र्वष सातत्याने फॅशन इंडस्ट्रीमध्ये होत आहे. कित्येक ब्रँड्स यासाठी स्वत: कापड विणतात, त्यावर डाइंग, प्रिंटिंगची प्रक्रिया त्यांच्याच कारखान्यात होते. यातही कमीत कमी पाण्याचा वापर होईल याची विशेष खबरदारी घेतली जाते. ‘रिफॉर्मर्स’, ‘स्टाइलसेंट’ हे ब्रँड्स त्यांच्या वेबसाइटवर प्रत्येक कपडय़ावर किती पाणी वापरलं गेलं, याची माहिती देतात. ‘जी-स्टार रॉ’, ‘आय अ‍ॅम नॉट अ व्हर्जिन’ हे ब्रँड्स प्लास्टिकच्या बाटल्यांपासून डेनिम, ड्रेसेस तयार करतात. ऑरगॅनिक कॉटन, सिल्क, खादी हे कापड आता पाश्चात्त्य देशांना खुणवू लागलं आहे. भारतातसुद्धा असे प्रयोग सुरू आहेत. ‘11:11’, ‘एम इट’, ‘बोरो’, ‘काशा’ असे बरेच ब्रॅण्ड्स आहेत जे आवर्जून नैसर्गिक कापडापासून कपडे बनवितात. एरवीही बाजारात कॉटन, सिल्कचे कपडे मिळतात; पण या दोघांमधील फरक म्हणजे बाजारातील कॉटनच्या कपडय़ांवर बाकीची प्रक्रिया ही अनैसर्गिक पद्धतीने झालेली असते. कित्येकदा किमती कमी करण्याच्या उद्देशाने यात पॉलिस्टर मिसळलं जातं किंवा पॉलिस्टर सिल्कसारखं कापड पूर्णपणे कारखान्यात अनैसर्गिक पद्धतीनं बनविलं जातं.

ज्युलरीमध्येही असे प्रयोग चालतात. ‘जंगल ज्युलरी’ हा ब्रॅण्ड विविध फळांच्या – झाडांच्या बिया, धान्यांपासून दागिने आणि अ‍ॅक्सेसरीज बनवितो. प्रोसेसिंग न केलेले स्टोन, फॅब्रिक ज्युलरी असे विविध प्रयोग डिझायनर करत आहेत. प्राण्यांच्या कातडीपासून बनविलेल्या लेदरऐवजी कारखान्यात लेदर बनविलं जातं. त्यापासून शूज, बेल्ट, बॅगा बनविल्या जातात.

सध्या चाललेले कॉटन, खादी, सिल्क, नैसर्गिक डाइंग, प्रिंटिंग हे सगळं भारतासाठी नवीन नाही. आपल्या प्रत्येक राज्यात इक्कत, लहेरीया, बांधणी, यार्न डाइंग, ब्लॉक प्रिंटिंग अशा विविध नैसर्गिक डाइंग, प्रिंटिंगची पद्धती फार पूर्वीपासून होत्या; पण ते सगळं बाजूला सारून आपण डेनिम, लायक्रा, शिफॉन अशी अनैसर्गिक कापड स्वीकारली. मशीन्सवर तयार होणाऱ्या या कापडांच्या किमती कमी होत्या, कारण त्यावरचे कष्ट कमी होते. त्यावरील इतर प्रक्रियासुद्धा सोप्या आणि स्वस्तात होऊ  लागल्या. साहजिकच या कापडाच्या किमतीत मोठा फरक दिसला. आज फॅशन स्ट्रीटवर एखादा सिंथेटिक शर्ट १५० रुपयांत मिळतो, पण पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून गेलेला कुर्ता चार हजारांपर्यंत जातो. आता मूड आला की शॉपिंग होते. ट्रेण्ड बदलला की कपडे कपाटातून बाहेर पडतात, अशा वेळी कपडय़ांची प्रत हा मुद्दा बाजूला पडतो. आजही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने कलेक्शन्स बनविणाऱ्या या ब्रँड्सच्या किमती बऱ्याच महाग आहेत. त्यामुळे त्यांची खरेदी करताना विचार करावा लागतो; पण कधी तरी चार स्वस्तातले कुर्ते घेण्याऐवजी अशा स्वरूपाचा एक महागडा ड्रेस घ्यायला काय हरकत आहे? आणि केवळ महागडे ब्रॅण्ड परवडत नाहीत म्हणून उदास होण्याऐवजी तुम्हीही थोडय़ा जुगाडाने नॅचरली ट्रेण्डी होऊ  शकता.

  • प्रत्येक मोठय़ा शहरामध्ये खादी भाडार असतंच. या दुकानांमधून तुम्ही खादीचे छान ब्राइट रंगाचे कुर्ते, स्कर्ट, पँट घेऊ शकता. फंकी स्कार्फ, जॅकेटसोबत यांना टीमअप करा. कित्येक प्रदर्शनांमध्ये हातमागावर काम करणारे कारागीर येतात. त्यांच्याकडून एखादा हातमागावरचा दुपट्टा, स्कार्फ घेऊ  शकता. एखाद्या प्लेन ड्रेसवर छान दिसेल. या प्रदर्शनांना सुंदर पारंपरिक क्विल्टिंग, थ्रेड एम्ब्रॉयडरी केलेल्या पर्स, शूज विकायला असतात. या गोष्टी बोहो लुक देऊ  शकतात.
  • घरातल्या घरात जुनी बटन्स, स्टोन्स, चिंध्या यांच्यापासून मस्त ज्युलरी बनविता येते.
  • सिल्क साडय़ांचे ड्रेस शिवण्याचे प्रकार एरवीही होतात; पण हे ड्रेस रोज वापरता येत नाहीत. त्याऐवजी तुम्ही कॉटनच्या साडय़ांचे ड्रेस शिवू शकता. साडय़ांचे वन पीस ड्रेस, स्कर्ट, पलॅझो, जॅकेट मस्त दिसेल.
  • तुमच्या कपाटातील एखादं कपडा ट्रेण्ड गेला म्हणून काढण्याआधी तो कपडा बनविण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात घ्या. पुन्हा वेगळ्या स्वरूपात तो ड्रेस कसा वापरता येईल, याचा नक्कीच विचार करा.

viva@expressindia.com