मार्च एण्डिंग हा एकच शब्द किती जबाबदारी आणि तणाव आणतो. आपल्या आयुष्यातील कुठल्याही बिनकामाच्या गोष्टीला टाळण्यासाठी ‘मार्च एण्ड’  हे एकमेव कारण रामबाण उपायासारखं लागू पडतं. आपल्याला घरी यायला आज उशीर का झाला? या प्रश्नाचं उत्तर ‘मार्च एण्ड’. फळवाले- भाजीवाले यांना भाज्यांचे भाव का वाढले, असं विचारलं तरी  ‘मार्च एण्ड है साहाब, इतना भी आपको पता नाही?’ असं उत्तर मिळू शकतं. एकूणच हा मार्च एण्ड आपल्या वैयक्तिक जीवनाचे वाभाडे काढतो, पण फक्त वैयक्तिक जीवनाचेच नाही तर शैक्षणिक जीवनाचेसुद्धा! हा साधारण परीक्षा संपण्याचा किंवा काहींच्या परीक्षा सुरू होण्याचा कालावधी. दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर अशा अनेक धडकी भरवणाऱ्या परीक्षा या महिन्यातच येतात. या परीक्षांच्या निकालाने भर उन्हाळ्यात दिवे लावण्याची परंपरा अनादिकाळापासून सुरू ठेवली गेलेली आहे. त्यामुळे एकदा का निकाल लागला की आपण निकालात काढले जाण्याची शक्यता याच काळात सगळ्यात जास्त असते.

हे निकालात काढलं जाणं ‘आपण काय शिकतो आहोत’ यावर अवलंबून असतं. आपण दहावीत असाल तर पुढील सगळी सुट्टी ही ‘दहावीनंतर काय करावं?’ या ‘महत्त्वाचा टप्पा’ समजवणाऱ्या प्रश्नात जाते. या प्रश्नाचं उत्तर बहुतेक वेळा त्या पाल्याचे पालक, नातेवाईक, आप्त, इष्ट, ग्रामदेवता, ज्योतिषी, अतिउत्साही कोचिंग क्लासवाले हेच ठरवत असतात. त्या पाल्याला स्वत:चं मत बनवण्याचा अजिबात अधिकार नसतो. त्यातही आपली मुलं डॉक्टर किंवा इंजिनीअर नाही झाली तर सगळं जग दुर्धर आजारांनी- व्याधींनी त्रस्त होऊन जाईल किंवा अश्मयुगासारखं जंगलात राहायला जायची वेळ येईल असं प्रत्येक पालकाला वाटतं. त्यामुळे बहुतेक जण तेच ठरवतात. इतर कुठल्या कोर्सकडे जाणाऱ्यांना नातेवाईकांच्या लेखी किंमत नसते. त्यांच्या डोक्यात ‘अमका अमका अमेरिकेत जाऊन कसा सेटल झाला’ याच्या कर्तृत्व-कहाण्या असतात. त्यामुळे दहावीनंतरची ही अशी अवस्था बारावीपर्यंत सोसावी लागते. बारावीनंतर ‘खरा प्रवास’ सुरू होतो, असं (हीच लोकं) म्हणतात. त्यामुळे बारावी परीक्षेनंतरची सुट्टी साधारण दहावीनंतर जशी असते तशीच जाते. मात्र जे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतात, त्यांच्यासमोर ‘आयुष्यात आता पुढे काय?’ अशी फिलिंग असते. साधारण ही १५ वर्षे (मध्ये जे नापास झाले असतील त्यांनी तेवढी वाढवून बेरीज करावी) एकामागोमाग एक इयत्तेत गेले असल्याने कसलीच फिकीर नसते. भारतीय सिस्टीमप्रमाणे मुलांना स्वत:च्या करिअरबाबत विचार करण्याची संधी पदवीनंतर मिळते. कारण दहावी-बारावीनंतर पालकांनीच निर्णय घेतलेले असतात. त्यामुळे पदवी परीक्षेनंतर येणारा हा काळ भयावह असतो. जास्तीत जास्त मुलांच्या मनात ‘आपलं पुढे काहीच होऊ  शकत नाही’ हे याच काळात येतं. त्यामुळे येणारा उन्हाळा त्यांना घामेजून टाकणारा असतो. कुणी छोटे-मोठे जॉब्स करतं, कुणी आवडीचंच काम करायचं अशी ‘रिस्क’ घेऊन आयुष्याला सुरुवात करतं. त्यामुळे हा मार्च एण्ड जरी असला तरी नव्या बहराची कल्पना ‘एण्ड’ आणतो. नवीन सुरुवात होण्यासाठी जुने टाकावेच लागते.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

हा ‘वसंत’ ऋतू हे त्याचेच द्योतक आहे. पानगळ सरून गेली की नवा बहर देणारा हाच महिना. आयुष्याच्या विविध टप्प्यामधील पानगळही याच काळात संपते आणि खऱ्या अर्थाने नवी पालवी फुटण्याला प्रारंभ होतो. इथे आयुष्य संपत नसतं, इथून आयुष्य सुरू होत असतं. गुढीपाडवा नवी ऊर्जा आसमंतात उधळतो आणि तीच ऊर्जा वर्षभर आपल्यातील नावीन्याला प्रोत्साहन देते. अर्थात मार्चएण्डचा हा पडदा नाटकाचा शेवट नसून, नाटक सुरू होण्यापूर्वीचा तिसऱ्या घंटेच्या प्रतीक्षेत असलेला आरंभ आहे; जो दाखवतो पडद्यामागील उत्साह, पावलांची पळापळ, रंगभूषेवर फिरणारा शेवटचा हात आणि नीट ऐकलंत तर, काहीच काळात सुरू होणाऱ्या नाटकाच्या नांदीचे मंद सुस्वर तुम्हाला ऐकू येतील.

viva.loksatta@gmail.com