आवडीच्या पदार्थाचं पोषणमूल्य वाढवता येतं आणि तरीही ते तितकेच रुचकर लागतात. अशा हेल्दी रेसिपी सुचवणारं हे पाक्षिक सदर. खिमा-पाव आणि अंडाकरी हे पदार्थ पौष्टिक पदार्थाच्या यादीत कधीच न बसणारे; पण खवय्यांच्या यादीत कायम आघाडीवर. या पदार्थाची चव न घालवता त्यांचा हेल्दी स्कोअर कसा वाढवता येईल हे सांगणाऱ्या आजच्या रेसिपीज..

  • खिमापाव

इराण्याच्या हॉटेलात हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे खिमापाव. मांसाहारींसाठी खिमापाव म्हणजे कधीही झोडता येणारी मेजवानीच. खरं तर मटणाच्या खिम्याची ही हॉटेलात मिळणारी डिश पौष्टिक कशी होऊ शकेल, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल; पण ही ‘हाय प्रोटीन्स’ डिश कमी तेलात आणि लिमिटेड मसाले वापरून केली तर निश्चितच याचा हेल्थ स्कोअर वाढू शकतो. शिवाय मैद्याच्या पावाबरोबर खिमा खाण्याऐवजी गव्हाच्या पावाबरोबर खाल्ला तर निश्चितच त्याचं पोषणमूल्य वाढेल. हॉटेलमधली चमचमीत डिश म्हणजे भरपूर मसालेदार आणि तेलकट हा समज पुसून टाकणारी ही घरगुती डिश. तुम्ही वडापावचे चाहते असल्यास तुम्हाला हा खिमापाव नक्कीच आवडेल. चहाच्या वेळचा भरगच्च स्नॅॅक आयटेम म्हणून किंवा रात्रीच्या जेवणालासुद्धा खिमापाव करता येईल.

साहित्य : ५०० ग्रॅम बारीक केलेले मटण (खिमा), १ कप मटार, २ मोठे चमचे तेल, १ चमचा जिरं, एक ते दीड इंच आल्याचा तुकडा (बारीक चिरून घ्या), १० लसणीच्या पाकळ्या (ठेचून), २ हिरव्या मिरच्या (बारीक वाटून घ्या), ३ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून), ४ मोठे टोमॅटो (प्युरी करून घ्या), एक ते दीड चमचे धने पावडर, अर्धा चमचे जिरे पावडर, २ छोटे चमचे लाल तिखट, चवीपुरते मीठ, १ मोठा चमचा ताज्या पुदिन्याची पाने (बारीक केलेली), १ मोठा चमचा िलबाचा रस, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, ४ मोठे गव्हाचे पाव (होल व्हीट)

बनवण्यास लागणारा कालावधी – ४० मिनिटे

कृती : बारीक केलेले मटण एका मोठय़ा बाऊलमध्ये ठेवा. त्यात एक कप पाणी घालून कालवत असताना गुठळ्या फोडा. एका लांब दांडय़ाच्या नॉन स्टिक पॅनमध्ये (स्टिक वोक) तेल गरम करा. जिरं घाला आणि ते तडतडलं की, बारीक ठेचलेलं आलं-लसूण घालून लाल होईपर्यंत परता. हिरव्या मिरच्या घालून हलवा. कांदे घाला आणि तपकिरी होईपर्यंत परता. टोमॅटो प्युरी घाला आणि चार ते पाच मिनिटे परता. आता त्यात धने-जिरे पावडर घाला. लाल मिरची पावडरमध्ये थोडे पाणी घालून पेस्ट बनवा आणि त्यातील एक चमचा पेस्ट पॅनमध्ये घालून परता. दोन-तीन मिनिटानंतर तेल सुटायला लागल्यावर मीठ आणि बारीक केलेलं मटण त्यात घालून नीट हलवून घ्या. मटण शिजेपर्यंत आणि पाणी उडून जाऊन घट्ट ग्रेव्ही तयार होईपर्यंत शिजवा. पुदिन्याची पाने, िलबाचा रस आणि गरम मसाला पावडर घालून पुन्हा नीट हलवा. हिरवे मटार घालून परता आणि एक वाफ येऊ द्या. दोन-तीन मिनिटं शिजल्यानंतर गरमागरम खिमा गव्हाच्या पावासोबत सव्‍‌र्ह करा.

  • अंडाकरी

अंडय़ापासून बनणाऱ्या भारतीय पदार्थातली एक क्सासिक डिश म्हणजे एगकरी. नेहमीची अंडाकरी कधी पौष्टिक वाटली नसेल, पण या रेसिपीला हेल्दी ट्विस्ट देऊन ती बनवाल तर निश्चितच त्याचा हेल्दी स्कोअर वाढेल. पालकाच्या ग्रेव्हीत बनवलेली ही अंडाकरी गरमागरम भातावर तुपासहित वाढलीत तर चव तर वाढेलच, शिवाय एक पूर्णाहार ठरेल.

साहित्य: ४ अंडी (उकडून सोलून घ्या), २ मध्यम आकारांच्या पालकाच्या जुडय़ा (पानं निवडून ती गरम पाण्यात उकडून पालक प्युरी करून घ्या), २ छोटे चमचे तेल, २ छोटे चमचे आलं पेस्ट, ४ छोटे चमचे लसूण पेस्ट, ४ मध्यम कांदे (बारीक वाटून घ्या), ३ मध्यम टोमॅटो (प्युरी करून घ्या), अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड, चवीपुरते मीठ.

बनवण्यासाठी लागणारा कालावधी २० मिनिटे

कृती : तेल एका नॉनस्टिक पॅनमध्ये गरम करा आणि आलं-लसूण पेस्ट त्यात घाला. अर्धा मिनिट परता. मग त्यात बारीक केलेला कांदा घाला आणि सोनेरी रंग येईपर्यंत परता. नंतर टोमॅटो प्युरी घाला आणि तेल सुटू लागेपर्यंत परता. आता त्यामध्ये पालकाची प्युरी घाला आणि पाच ते दहा मिनिटे परता किंवा जोपर्यंत पालकाचा उग्र कच्चा वास जात नाही तोवर परता. मग यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने – जिरे पावडर आणि मीठ घाला. नीट मिक्स करून घ्या आणि दोन ते तीन मिनिटे परतत राहा. उकडलेली अंडी उभी कापा आणि या ग्रेव्हीमध्ये घाला. हळुवारपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स करा आणि दोन मिनिटे उकळू द्या. गरमागरम अंडाकरी भात किंवा रोटीबरोबर सव्‍‌र्ह करा.

(www.fitfoodie.in च्या सौजन्याने)