नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

व्यक्ती म्हणून आपण सगळेच वेगवेगळे असतो. प्रत्येकात काही खास बात असतेच, पण चॉकलेट खात क्रिकेटच्या मॅचमध्ये आपल्या मित्राची बॅटिंग पाहणारी ती, त्याने उंच चेंडू टोलावणं, बाद का सिक्सर या विवंचनेत हातात चॉकलेट धरून तिने प्रार्थना म्हणणं,त्याचं नॉटआउट राहणं आणि त्यानंतरचा तिचा हात फैलावत केलेला नाच हे सगळं पाहताना आपल्यालाही जाणवत राहतं कुछ खास है हम सभी में, कुछ बात है हम सभी में ! क्या खास है क्या बात है याचं उत्तर आपल्याला गवसतं तिच्या हातातल्या त्या जांभळ्या रॅपरमधल्या चॉकलेटमध्ये. डेरीमिल्कशी आपलं नातं त्याआधीपासून जुळलेलं आहे. जगभरात चॉकलेटची संख्या अगणित असताना नेमकं याच चॉकलेटमध्ये आपल्याला काही खास का गवसलं याची ही कहाणी.

१८२४ मध्ये जॉन कॅडबरी यांनी किराणामालाचं दुकान इंग्लंडमध्ये सुरू केलं. ड्रिंकिंग चॉकलेट हे त्या काळातील नवं आकर्षण होतं. जॉन स्वत: अशा प्रकारे ड्रिंकिंग चॉकलेट बनवून विकायचे. हळूहळू किराणामालापेक्षा याच विक्रीवर त्याने लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि व्यवसाय हळूहळू विस्तारला. १८६१ मध्ये जॉनने आपली मुलं रिचर्ड आणि जॉर्ज यांच्याकडे कारभार सोपवला. या दोघा भावांनी ‘कॅडबरी’ हा ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित करण्यात अफाट मेहनत घेतली. बॉर्नव्हिले फॅक्टरी आणि कॅडबरी हे नाव सर्वदूर पसरत होतं. ड्रिंकिंग चॉकलेटसह इतर अनेक उत्पादनं कंपनी तयार करत होती. पण ज्या उत्पादनामुळे कंपनीचं नाव अजरामर होतं तो क्षण येणं बाकी होतं. जॉर्ज कॅडबरी ज्युनियर याला १९०५ मध्ये कॅडबरीच्या उत्पादनात एक नवा प्रयोग करून पाहावासा वाटला. त्या काळात स्विस चॉकलेट, फ्रेंच चॉकलेट चवीने खाल्ली जात होतीच पण त्यातल्या कोकोच्या अधिक्याने त्यात कडवटपणा बऱ्यापैकी होता. जॉर्ज कॅडबरी ज्युनियरला मात्र हा कडवटपणा दूर करत असा चॉकलेटबार बनवायचा होता ज्यात दुधाचं प्रमाण खूप जास्त असेल आणि त्याप्रमाणे हा चॉकलेटबार अस्तित्वात आला ज्यात भूतकाळातील कोणत्याही चॉकलेटबारपेक्षा दुधाचे प्रमाण विलक्षण होते.

आता इथे महत्त्वाचा प्रश्न येतो उत्पादनाचे नाव काय ठेवावे? जॉर्जच्या डोक्यात हायलँड मिल्क, जर्सी अँड डेरी मिल्क अशी काही नावं घोळत असताना कॅडबरीच्या विविध उत्पादनांचे नियमित ग्राहक असणाऱ्या एका गृहस्थांच्या मुलीने एक नाव सुचवले – डेरी मिल्क. काही गोष्टी ‘क्लिक’ व्हाव्या लागतात. हे नाव जॉर्जला क्लिक झाले. कॅडबरीज डेरी मिल्क. चॉकलेटचे हे मिल्कफुल कॉम्बिनेशन लोकांना बेहद्द आवडले आणि डेरी मिल्क हा इंग्लंडमधील नंबर एकचा उत्पादक ब्रॅण्ड ठरला. १९२८ मध्ये डेरीमिल्कने ते सुप्रसिद्ध स्लोगन आणलं lass and a half. डेरीमिल्कमधल्या दुधाच्या मुबलक प्रमाणाची ती जाहिरात आजही तितकीच सुप्रसिद्ध आहे.

चॉकलेट म्हणजे दातांच्या आरोग्यास हानिकारक आणि दूध म्हणजे आरोग्यास पौष्टिक ही काही समीकरणं आपल्या डोक्यात पक्की असतात. त्यात glass and a half या स्लोगनने आणि कॅडबरीच्या रॅपरवरच्या चॉकलेटमध्ये ओतल्या जाणाऱ्या दुधाच्या ग्लासांच्या लोगोने हे समीकरण बदलायला निश्चितच मदत केली असणार. म्हणजे चॉकलेट खातोच आहोत पण त्यात किनई दूध भरपूर आहे बरं का! ही सोय किती चाणाक्षपणे या स्लोगन आणि चित्राने केली!

मुळात डेरी मिल्क म्हटलं की काही गोष्टी इतक्या चटकन डोळ्यासमोर येतात. जांभळं, मखमली रॅपर,आतला सोनेरी कागद, ती जगप्रसिद्ध कॅडबरी सिग्नेचर. या प्रत्येकामागे काही खास गंमत आहे. कॅडबरीचा लोगो ही रिचर्ड कॅडबरीचा मुलगा विल्यम कॅडबरी याची सही आहे जी आपल्या इतक्या ओळखीची झाली आहे. फक्त ती कुणाची तरी सही असावी हे डोक्यात नसते. तो जांभळा रॅपर १९१४  साली कॅडबरी कंपनीने राणी व्हिक्टोरिया हिच्या सन्मानार्थ आणला आणि तोच कायम ठेवला. वेगळ्या रंगाच्या रॅपरच्या कॅडबरीची आपण कल्पनाही करू शकत नाही.

१९०५ ते २०१२ कॅडबरीच्या चॉकलेटबारच्या आकारात कोणताही बदल नव्हता, मात्र बारचं वजन कमी करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये तो काहीसा मधोमध गोलाकार करण्यात आला. आज डेरी मिल्क हा जगभरात आवडीने खाल्ला जाणारा ब्रॅण्ड आहे. अमेरिकेच्या मॉन्डलेज कंपनीने( पूर्वीची क्राफ्ट फूड्स)कॅडबरी कंपनी २०१० मध्ये विकत घेतली. मात्र कॅडबरी या नावाचा महिमा जगभरात असा पसरला आहे की उत्पादनाचे नाव न बदलता त्यांनी पूर्वीचेच नाव कायम ठेवले.

कधी त्याचा रोमान्सशी संबंध जोडत तर कधी भारतीय मानसिकतेचा कुछ मिठा हो जाएचा आधार घेत हा ब्रॅण्ड नि:संशयपणे आपण आपलासा केला आहे. मधल्या काळात झालेल्या वादंगाचा कोणताही ओरखडा न उमटता चिल्ल्यापिल्ल्यांपासून प्रियकर व प्रेयसीपर्यंत सर्वाना खूश करण्यासाठी किती पटकन आपण डेरीमिल्कचा आधार घेतो. हेच या ब्रॅण्डचं यश आहे. चॉकलेट हे तणाव कमी करतं असं म्हणतात. जांभळ्या रंगाच्या आवरणाला दूर करत सोनेरी कागदातून बाहेर डोकावणारं हे चॉकलेट ‘आ चलके तुझे मैं लेके चलू कुछ ऐसे गगन के तले.. जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले..’ अशा वेगळ्या विश्वाची ग्वाही देतं. म्हणूनच ते भावतं.

viva@expressindia.com