‘ईगल’ नावाच्या बॅण्डचे ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ हे गाणे तीस-चाळीस वर्षे नुसते प्रसिद्धच नाही, तर गिटार शिकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाजवता येणे महत्त्वाचे असते. कोणतेही गाणे हे गाण्यासारखेच स्वरावलींनी बद्ध असले तरी त्याचे सांस्कृतिक मोठेपण पुढल्या पिढय़ांनी त्याला स्वीकारण्यात असते. दर पिढी या गाण्यावर इतकी वर्षे नादखुळी होण्यात स्वत:ला बुडवून टाकते, यामध्येच त्या गाण्यातील ताकद दिसून येते. १९७०-८०च्या दशकातील अमेरिकी तरुणाईची मानसिकता लक्षात घेऊन शहराविषयी आणि विकास, चैनीच्या अतिरेकी वापराबद्दल सांगणाऱ्या या गाण्याबाबत नवशिक्या गिटारवादकांपासून ते विविध निष्णात कलाकारांना भुरळ पडली आहे. या गाण्याची शेकडो व्हर्शन्स लोकप्रिय असली तरी  ‘यू टय़ुबो’त्तर कालखंडामध्ये या गाण्यावर विविध देशांतील प्रेम करणाऱ्यांचे व्हिडीओ खास पाहण्यासारखे आहेत.

या गाण्याचे स्पॅनिश व्हर्शन गमतीशीर झाले आहे. ‘जिप्सी किंग’ नावाच्या बॅण्डने या गाण्याचा वेग वाढवून त्याला नृत्यगीतामध्ये परिवíतत केले. ‘बिग लेबोवस्की’ नावाच्या चित्रपटामध्ये चित्रपटातील नायकाला सातत्याने कराव्या लागणाऱ्या संघर्षांला समर्पक बनलेले हे गीत आणि त्याचा व्हिडीओ एकरूप झाले आहेत. या चित्रपटात अभिनेता जेफ ब्रिजेसची सातत्याने उडणारी तारांबळ आणि समान नावामुळे त्याची होणारी अभूतपूर्व फसवणूक या वेगवान कथानकाला या गाण्याचे विचित्रसे रूप साजेसे आहे. या गाण्याच्या अरेबिक रूपामध्ये मोठाल्या तंतूवाद्यावर आणि ड्रम्सवर वाजविले जाणारे प्रकरणही फार छान आहे. चिनी पारंपरिक वाद्यांसोबत गिटार-ड्रम्सनी तयार केलेले ‘हॉटेल कॅलिफोर्निया’चे मांडरिन रूपही उपलब्ध आहे. तंतूवाद्यांसोबत फूकवाद्यांमधील वैविध्य आणि त्या वैविध्यातही ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ या गाण्याबद्दलचा यातला आदर पाहण्यासारखा आहे. भारतीय जगात कशाही बाबतींत मागे नसतात. त्यामुळे या गाण्याची संगीत विद्यालयांच्या कार्यक्रमांपासून ते कॉलेजमध्ये इम्प मारणाऱ्या गिटार वादकांपर्यंत व्हिडीओ आहेत. पण एक खास मेहनतीने बनविलेला व्हिडीओ आवर्जून अनुभवावा असा आहे. शोमबित दासगुप्ता या कलाकाराने भारतीय सितार, घटम, मृदंग, ढोलक यांचा वापर करून हे गाणे चक्क हार्मोनिका म्हणजेच माऊथ ऑर्गनवर वाजविले आहे. या गाण्याच्या वेडय़ांची वैशिष्टय़े ही की ते गाण्यातील सुरांवर जराही अन्याय करीत नाहीत. उलट त्यांनी तयार केलेल्या फ्युजनमधून आणखी श्रवणीय बाबी तयार होतात. शोमबित दासगुप्तांची माऊथ ऑर्गनची सुरावट पक्की आहेत. त्यांनी व्हिडीओ बनविणाऱ्याला दिलेल्या सूचना किंवा व्हिडीओ दिग्दर्शकाने केलेले दृश्यांचे जोडकामही गमतीशीर आहे. भारतीतील रस्त्यांवर दिसणाऱ्या विविधतेतील एकता इथे पाहायला मिळू शकेल. रेल्वे गाडी, शाळेत जाणारी मुले, नदी, तलाव, एखाद्या झू किंवा जंगलातील गेंडा या व्हिडीओमध्ये चित्रित झालेला दिसू शकेल किंवा निर्जन रस्त्यावरून जाणारी गुरं पाहायला मिळू शकतील. हाती लागेल ते फुटेज, छायाचित्रे यांची विचित्र सरमिसळ म्हणजे हा व्हिडीओ आहे. संगीत ऐकण्यासाठी तो गांभीर्याने घ्यायचा पण व्हिडीओ म्हणून अर्थ न लागणाऱ्या दृश्यमालिकांचे जोडकाम पाहिल्यासारखे वाटते. अर्थात अर्थ न लावताही हे गाणे फार सुंदर भासते. घटम आणि सितारचा परिणाम या गाण्याचे सौंदर्य आणखी खुलवितो.

बोलिव्हिया दक्षिण अमेरिकी राष्ट्रामध्ये या गाण्याचे पॅन फ्लूटवरील व्हर्शनही पाहावे. डोमिंगो मंडोजा या वादकाने या बासरीत हे गाणे वाजविण्यासाठी अक्षरश: जीव ओतला आहे.

थायलंडमधील चारपाच विद्यार्थ्यांनी एकमेकांची गंमत करीत सुरू केलेले हे गाणे साडेसहा लाखांहून अधिक हिट संख्येवर पोहोचले आहे. गिटार वाजविणारी आठ ते बारा वयोगटातील चारपाच मुले आणि त्यांच्याहून थोडी मोठी असलेली मुलगी या गाण्यात दिसतात.  गाणे सुरू होताच गाणे गाणाऱ्या मुलीमध्ये अस्सल कलाकार संचारतो. आजूबाजूच्या गिटार वादकांच्या चुळबुळीकडे दुर्लक्ष करून ती गाण्याला बरोब्बर पकडते. कुठे या गाण्याला रस्त्यावरच्या गिटारवादकाने वेगळा बाज दिलेला आढळतो, तर कुठे या गाण्यातील वाद्ये फक्त तोंडाच्या सहाय्याने वाजविलेली पाहायला मिळतात. एका समुद्र किनाऱ्यावरच्या हॉटेलमध्ये स्फुरलेल्या या गाण्याची जितकी व्हर्शन झालीत, तितकी आजवर कोणत्याही गाण्याची झालेली नाहीत. व्हिडीओबाबतही तसेच असल्याने कोणत्याही देशातील ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ त्या त्या देशाचे या गाण्याविषयीचे प्रेम व्यक्त करतानाच दिसेल.

viva@expressindia.com