अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. त्यामुळे अपयशानंतर मिळालेला विजय गगनात न मावणारा असतो. पण सतत विजय मिळत असेल आणि अचानक अपयश आलं तर ते पचवता येणं थोडं कठीण असतं. विजयाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खट्ट होऊ नका, या दोन्ही गोष्टी आपल्याला पूर्वी पुस्तकातून सांगितल्या जात आणि आता सकाळी येणाऱ्या व्हॉट्सअप संदेशांमधूनही चांगल्याच पाठ झाल्या आहेत. अशा संदेशांना आपण उठसूठ थम्सअप किंवा टाळ्या ठोकत असतो. परंतु खऱ्या आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मात्र आपण भूमिका न घेता भावनेच्या भरात वाहवत जातो. रविवारी झालेला भारत विरूद्ध पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यानंतर याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सर्वच बाबतीत एकमेकांचे कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांचे संघ जेव्हा जेव्हा समोरासमोर उभे ठाकतात तेव्हा त्या संघातील खेळाडू आणि दोन्ही देशांमधील नागरिकांसाठी देखील हा जीवनमरणाचा प्रश्न असतो. मदानावरील खेळपट्टीला सीमारेषेचं स्वरूप प्राप्त होतं आणि युद्धज्वर टीपेला पोहचलेला असतो. आपल्या देशात बॉलीवूडचे चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट या तीनही गोष्टींमधलं प्रत्येकाला कळतं आणि त्यावर मतप्रदर्शन करायचं असतं. त्यासाठी कुठलंही प्रशिक्षण किंवा अभ्यास त्यांना आवश्यक वाटत नाही. या विषयांमधलं सर्वाना सर्वच कळत असल्याने मोबाईलवर फास्ट फॉरवर्ड करून चित्रपट पाहणारा चित्रपटप्रेमी अवघ्या काही मिनिटांमध्ये चित्रपटाला टुकार ठरवून टाकतो, मतदानाच्या दिवशी पिकनिकला जाणारा मतदार निवडून आलेल्या उमेदवाराला पुढील पाच वर्ष शिव्या देत असतो आणि दाढीच्या दुकानात बसून फुकट रेडिओ ऐकणारे फलंदाजाला कोणता बॉल कसा मारायला हवा होता याचे सल्ले देत असतात.

गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर चाललेल्या हालचालीवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे एकमेकांना चुचकारण्याची एकही संधी कोणीच सोडताना दिसत नाही. मग ते मनोरंजन क्षेत्र असो किंवा खेळ. सत्तर वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या या दोन देशांमधील संबंध इतक्या वर्षांनंतरही सुधारण्याऐवजी अधिकच विकोपाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करण्याची भाषा करणाराही देशद्रोही ठरवला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक कारणांसाठी हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकतात. तेव्हाही संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही इतर देशांच्या तुलनेत सर्वाना उत्सुकता होती की भारत-पाकिस्तान कोणत्या तारखांना भिडणार. सामने दाखवणाऱ्या वाहिन्यांवरील जाहिरातीसुद्धा त्याचाच आधार घेऊन तयार करण्यात आल्या होत्या. दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्याने क्रिकेट चाहत्यांना तर आणखीनच चेव आला. रविवारी नेमकं काय करायचं हा प्रश्न मार्गी लागल्याने सगळीकडेच आनंदीआनंद होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतही भारत-पाकिस्तान भिडणार असल्याने दुग्धशर्करा योगच जुळून आला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या खेळांमध्ये कट्टर प्रतिस्पध्र्याना नामोहरम करण्यासारखा दुसरा आनंद काय असू शकतो? पण असं असलं तरी सर्वाना हॉकीपेक्षा सर्वाधिक रस होता तो म्हणजे क्रिकेटमध्ये. पण होत्याचं नव्हतं झालं आणि चॅम्पियन्सचा मुकुट प्रतिस्पध्र्याच्या डोक्यावर विराजमान झाला. खेळामध्ये हार-जीत होत असते, त्याचा खिलाडूवृत्तीने स्वीकार करायला हवा. पण रविवारी आपण ते विसरलो. इतके दिवस ज्या खेळाडूंचे आपण गुणगान गात होतो त्यांना बोल लावले. जिंकलो असतो तर लोकांनी रस्त्यावर उतरून विजयोत्सव साजरा केला असता आणि तो याची देही याची डोळा तो सर्वाना अनुभवता आला असता. त्यात रविवारी जगभर ‘फादर्स डे’ साजरा केला जात होता. त्यामुळे ‘बाप. बाप होता हे’ दाखवण्याची संधीदेखिल गमावल्याने लोकांचा संताप अनावर झाला. विजयासाठी तयार करून ठेवलेल्या संदेशांचं आणि सेल्फी कल्पनांचं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडला. फक्त सामान्य क्रिकेटप्रेमीच कशाला, अतिउत्साही चॅनेल्सनी टीआरपी वाढीसाठी दिवसभर केलेले विशेष शो, रेस्टॉरंटमध्ये मोठया स्क्रिन लावून केलेली जय्यत तयारी सगळ्यावरच विरजण पडलं. खरंतर हा फक्त खेळ होता, पण प्रत्येकाने त्याला जीवनमरणाचा प्रश्न करून टाकल्याने ते अपयश पचवता आलं नाही. दुसरीकडे त्याच कट्टर प्रतिस्पध्र्याना हॉकीत हरवल्याचा आणि इंडोनेशियन बॅडिमटन स्पध्रेत किदम्बी श्रीकांतने पटविलेल्या विजेतेपदाचाही आनंदही आपण मोठया दिलाने साजरा करू शकलो नाही. सर्वच लक्ष फक्त क्रिकेटवर केंद्रीत झाल्याने इतर खेळांचा खरंतर आपल्याला विसर पडला आहे त्याची अनुभती यानिमित्ताने पुन्हा एकदा झाली.

तमाम भारतीयाचं हॉकीप्रेम अचानक उफाळून आल्यानंतरही अनेकजण तो आपला राष्ट्रीय खेळ कसा नाही, याचंच स्पष्टीकरण देण्यात स्वारस्य मानत होते. क्रिकेटमधील पराभव समोर दिसायला लागल्यानंतर अनेकांनी त्याला ‘मॅच फििक्सग’चं लेबल लावलं. सोशल मीडियावर काश्मीरमध्ये भारताच्या प्रत्येक विकेटवर कसा जल्लोष साजरा केला जात आहे याचे व्हिडिओ आणि संदेश व्हायरल व्हायला लागले. पाकिस्तानी खेळाडूंची तर त्यांच्या नावावरून खिल्ली उडवली जात होतीच पण भारतीय खेळाडूंनाही टाग्रेट केलं जातंय. खेळातील अपयश काहीतरी शिकवून जात असतं आणि विजय प्रेरणा देत असतात. त्यामुळे यावेळी चॅम्पियन्स झालो नसलो तरी भविष्यात तो मुकुट आपल्या डोक्यावर नक्की विराजमान होईल. पण खरा प्रश्न आहे तो म्हणजे आपण विचारांनी चॅम्पियन्स केव्हा होणार याचा. पाकिस्तानी खेळाडू सरफराज अहमदच्या बाळाला भारतीय क्रिकेटपटू एम.एस.धोनीने उचलून घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. जो प्रतिस्पर्धी आणि दुष्मन यामध्ये फरक करता यायला हवा हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. गोष्टी खिलाडूवृत्तीने घेता आल्या तरच त्यातील मर्म टिकून राहिल नाहीतर कलुषित मनं फक्त विषच पसरवण्याचं काम करतील. सोशल मीडिया यामध्ये निर्णायक भूमिका बजावत आहे. त्यामुळे खेळ तर बाजूला पडेलंच पण आधीच दूर जाऊ लागलेल्या आणि आभासी जगतात एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या माणसांनासुद्धा या व्यासपीठावरूनही तोडून टाकू. शेवटी श्रीकांत आणि भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन. ज्यांनी खेळाला विजय मिळवून दिला आणि इतर खेळही तितकेच महत्त्वाचे आहेत याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

viva@expressindia.com