चायनीज खाद्यपदार्थ म्हटल्यावर आपल्यासमोर नेहमीची मंचुरियन, हाक्का, शेजवान आदी नावं येतात. प्रत्यक्ष चीनमध्ये खाल्लं जाणारं चायनीज हे खूपच भन्नाट आणि वेगळं असतं. तरीही इंडियन चायनीजमध्येही खास व्हरायटी हवी असेल, तर एकदा ठाण्यात चक्कर मारायला हवी..

खूप वर्षांपूर्वीचं ठाणं अगदी शांत होतं. आता हे वाक्य कोणत्याही उपनगराला लागू पडायला हरकत नाही, हा मुद्दा वेगळा! पण ठाण्याची गोष्ट काही वेगळी होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे ठाण्यातले तलाव. त्यातही ठाण्यातल्या मासुंदा तलावाभोवती ठाणेकरांचा अभिमान आणि अनेक आठवणी गुंफल्या गेल्या होत्या. घरची परिस्थिती बरी असेल, तर त्या काळी नव्याने सुरू झालेल्या तळ्याकाठच्या एखाद्या हॉटेलमध्येच जेवायचं.. याच तळ्याकाठी कदाचित ठाण्यातील पहिल्या चायनीज गाडीचा उगम झाला असावा, असं ठाण्यातले बुजुर्ग खवय्ये सांगतात.

खाबू मोशाय आणि चायनीज यांचे ऋणानुबंधही अशाच काळातले. याच तळ्याकाठी असलेल्या याच आद्य गाडीवर खाबूच्या इंडियन चायनीज खाण्याची सुरुवात अगदी लहानपणीच झाली होती. पूर्वी शाळेतल्या मुलांची ने-आण करण्यासाठी किंवा रुग्णवाहिका म्हणून वगैरे वापरायचे तशी मॅटॅडोर गाडी, त्या गाडीत आवश्यक ते बदल करून तिला पिवळा-लाल रंग देऊन ही गाडी सजवली होती. त्या गाडीच्या भोवती ठेवलेली वेताची रंगीबेरंगी स्टुलं, पिवळ्या-लाल बाऊल्स आणि ताटल्यांमध्ये दिले जाणारे ते नूडल्स आणि राईससारखे पदार्थ, तळ्यावरून त्या वेळी येणारी वाऱ्याची झुळुक.. पुढे पुढे मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या नाक्या-नाक्यावरच्या चायनीज गाडय़ांसमोर बसून खाबूने तो देशी-चिनी सरंजाम घशाखाली रिचवला. पण काही दिवसांपूर्वी खाबूने या ठाण्यातच, त्याच तळ्याकाठच्या एका हॉटेलमध्ये बसून खाल्लेल्या चायनीज फूडने खाबूच्या मनाचा ताबा घेतला. देशी पद्धतीचं असं चायनीज खूपच क्वचित नशिबात येतं.

ठाण्यातल्या प्रसिद्घ गडकरी रंगायतनकडे पाठ करून उभे राहिल्यावर उजवीकडे वळून चालायला सुरुवात करायची. मिनिटभरात दिसणाऱ्या सर्कलला भेदून नजर समोर टाकली की एका उतरणीवर ‘चॉपस्टिक्स’ असा बोर्ड दिसतो. हेच ते आनंदाचं ठिकाण! वीकएण्डला या हॉटेलात संध्याकाळी आठनंतर आलात, तर थांबायची तयारी ठेवायला हवी. अन्यथा या हॉटेलमध्ये जागा मिळण्यास तशी अडचण येत नाही. तुम्ही जातीचे खवय्ये असाल, तर या हॉटेलचं मेन्युकार्ड बघून तुम्हाला काही प्रश्न पडलेच पाहिजेत आणि न लाजता ते प्रश्न वेटरला विचारता यायला हवेत. म्हणजे, ‘ऑयस्टर सॉस आणि पॅकिंग राइस यांच्यात नेमका फरक काय’ इत्यादी इत्यादी.. पण या हॉटेलचं मेन्युकार्ड खूप वेगळं आणि समृद्ध आहे. इथली सूप्स चाखून बघायलाच हवीत, अशी आहेत. त्यातही खाबूची वैयक्तिक आवड म्हणजे कॅ्रबमीट सूप किंवा सीफूड क्लिअर सूप! ही दोन्ही सूप्स निव्वळ भन्नाट आहेत. माशांमध्ये ज्यांना चिंबोऱ्या (अभागी शाकाहारी समाज ज्याला खेकडे म्हणतो) आवडत असतील, त्यांनी हे सूप नक्कीच प्यायला हवं. खेकडय़ाच्या नांगीमध्ये दडलेलं मांस किती चविष्ट असतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. हे सूप वेटरने टेबलवर आणून ठेवायच्या आधीच, आपली ऑर्डर आता तयार होऊन येत आहे, याची वर्दी तो चिंबोरीचा घमघमाट देतो.  त्या वेळी होणारी मनाची अवस्था अवर्णनीय आहे. तीच गोष्ट सीफूड क्लिअर सूप पितानाची! कॅ्रबमीट सूपमध्ये फक्त चिंबोरी पदरी पडते. सीफूड सूपमध्ये तर चिंबोरी, पापलेट, सुरमई, कोलंबी अशा अनेक माशांचे छोटे छोटे तुकडे सुपात गुण्यागोविंदाने नांदत असतात आणि भूक वाढवण्याचं काम करतात.

या हॉटेलात शाकाहारींसाठीही खूप पर्याय असले, तरी खाबू थोडासा मांसाहाराकडे जादा झुकणारा आहे. या हॉटेलच्या अपेटायझर्समध्येही मांसाहारी पदार्थ खाबूने खूपच चाखून बघितले आहेत. त्यातील खाबूची वैयक्तिक आवड म्हणजे चिकन पट्टाया! चिकन ब्रेस्ट आडवं कापून त्यात चीज भरून तो पदार्थ श्ॉलो फ्राय करून मसाल्यासह कसा लागेल.. तुम्ही कल्पना करत आहात, त्यापेक्षा हा पदार्थ खूपच भन्नाट आहे. उत्तम शिजलेलं चिकन आणि त्यात मेल्ट झालेलं चीज.. आहाहाहाहा.. त्याशिवाय बॉन रेड चिकन नावाचा पदार्थही असाच चविष्ट आहे. ड्राय रेड ग्रेव्हीमध्ये केलेला हा पदार्थ थोडासा गोडसरपणाकडे झुकणारा आहे. या हॉटेलात आणखी खाण्यासारखा पदार्थ म्हणजे नूडल्स रॅप्ड चिकन! अनेकदा मदिरेसह चकणा म्हणून किंवा दोन पदार्थ येण्यादरम्यानच्या काळात भूक शमवण्यासाठी म्हणून आपण फ्राइड नूडल्स तोंडात टाकत असतो. इथे तर चिकनच्या तुकडय़ाभोवती नूडल्स उत्तम गुंडाळून त्या तळून सॉससह देतात. हा पदार्थ दिसायलाच इतका आकर्षक असतो की त्याचं प्रथम दर्शन प्रेमात पाडतं. दर्शनाएवढाच त्याचा अनुभवही खूपच छान आहे.

हे एवढे स्टार्टर्स खाताना मेनकोर्ससाठी पोटात जागा ठेवायलाच हवी. कारण या हॉटेलमध्ये ग्रेव्हीसह मिळणारे राइस आणि नूडल्सही उत्तम आहेत. त्यात क्रिस्पी चिकन राईसपासून ते थेट कॅ्रबमीट पॉट राईसपर्यंत अनेक पदार्थाचा समावेश आहे. यातल्या जवळपास सर्वच डिश उत्तम आहेत. त्यातही खाबूची वैयक्तिक आवड म्हणजे क्रॅबमीट पॉट राइस आणि थाई बेझिल राइस! पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे पदार्थ तुम्ही खायलाच हवेत. त्यानंतरच्या प्रत्येक वारीत चिकन क्रिस्पी राइस, पॅन रोस्ट विथ राइस, चिली ऑएस्टर राइस, मलेशियन पॉट राइस आदी पदार्थाचा आस्वाद घेता येईल. तशी किंमतही रास्त आहे, त्यामुळे अगदी दोन जण पोटभर जेवायचं ठरवलं, तरी ५०० रुपयांच्या आसपासच बिल होतं.  देसी चायनीजमध्ये मन्चुरियन, ट्रिपल शेजवान,  हाक्का नूडल्स वगैरे तेच तेच खाऊन कंटाळला असाल, तर या हॉटेलचा मेन्यू एकदा तरी ट्राय करायलाच हवा.

कुठे  : हॉटेल चॉपस्टिक्स, ठाणे</p>

कसे जाल : ठाणे स्टेशनला उतरून रिक्षा पकडल्यावर रिक्षावाल्याला गडकरी रंगायतनला न्यायला सांगा. त्याच्या पुढे असलेल्या सर्कलला रिक्षा सोडा. समोरच चॉपस्टिक्स दिसेल. चालण्याची आवड असेल, तर ठाणे पश्चिमेकडे बाहेर पडल्यानंतर बसगाडय़ांसाठी बांधलेल्या उड्डाण पुलाच्या खालून चालायला सुरुवात करा. एम.एच हायस्कूल दिसल्यानंतर पुढील सिग्नलला डावीकडे वळून सरळ चालत राहा. रस्ता संपतो तिथे तुम्हाला चॉपस्टिक्स दिसेल.