हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

प्रवास कोणताही असो आपली साधी अपेक्षा असते, तो सुखरूप व्हावा, तो निवांत व्हावा. पण काही वेळा असे अनुभव येतात की प्रवास म्हणजे एक वैतागवाडी बनून जाते. असा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. मात्र त्यातून एखादी अधिक चांगली प्रवासी सेवा सुरू करावी असा विचार  सगळ्यांना सुचत नाही. एखाद्यालाच असा जुगाड करून पाहावासा वाटतो आणि तो यशस्वीही होतो. ओला कॅब सव्‍‌र्हिसचं भारतभरात विणलेलं जाळं याच यशस्वी स्टार्टअपची कहाणी आपल्याला सांगतं.

तरुण वयात काहीतरी वेगळं करायची एक झिंग असते. भाविश अगरवाल या आयआयटी मुंबईतून बीटेक झालेल्या तरुणाकडेही ती होती. शिक्षण झाल्यावर भाविशने दोन वर्षे मायक्रोसॉफ्ट रिसर्चसारख्या कंपनीत काम केलं. त्या दरम्यान दोन पेटंट आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये तीन पेपर्स प्रसिद्ध करण्याइतपत त्याची प्रगती झाली होती. पण काहीतरी वेगळं करण्याची झिंग त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. याच काळात त्याने एक ऑनलाइन सव्‍‌र्हिस सुरू केली. या सव्‍‌र्हिसमार्फत हॉलिडे आणि टूर प्लॅनिंग केलं जाई. पण एका नव्या स्टार्टअपचं बीज भाविशच्या मनात रुजायला कारणीभूत ठरला प्रवासाचा एक अनुभव.

काही कारणानिमित्त भाविश बंगळूर ते बांदीपूर असा प्रवास करत होता. त्यानं एक कार बुक केली. प्रवास सुरू असताना कारचालकाने मध्येच गाडी थांबवून भाविशकडे जादा पैशांची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर चालकाने सरळ सरळ प्रवास थांबवायची धमकी दिली. शाब्दिक चकमकीनंतर भाविश गाडीतून उतरला आणि उर्वरित प्रवास त्याला बसने करावा लागला. या अनुभवाने वैतागलेल्या भाविशच्या मनात विचार आला की प्रवासाकरता आपल्याकडे एखादी पद्धतशीर व्यवस्था का नसावी? माझ्यासारखेच असे अनेक प्रवासी असतील ज्यांना हा त्रास सहन करावा लागत असेल. आपल्या आयआयटीमधल्या ज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञानाच्या जोडीने आपल्याला काही करता येईल का? हा प्रश्न त्याला पडला. त्याचं उत्तर म्हणून जन्माला आली ओला कॅब सव्‍‌र्हिस.

आपल्या हॉलिडे आणि टूर प्लॅनिंगच्या ऑनलाइन सव्‍‌र्हिसला हायटेक कॅब सव्‍‌र्हिसमध्ये बदलायचा निर्णय भाविशने घेतला. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीतली नोकरी सोडून असा निर्णय घेणं कोणत्याही मध्यमवर्गीय घरात हाहाकार माजवण्यासाठी पुरेसं असतं. भाविशच्या घरी वेगळी परिस्थिती नव्हती. आता इतकी चांगली नोकरी सोडून हा काय ट्रॅव्हल एजंट होणार आहे का? असा प्रश्न पालकांना पडला. मात्र भाविशच्या व्यवस्थित नियोजनाने सुरू झालेल्या या व्यवसायाला जेव्हा पहिलं फंडिंग मिळालं तेव्हा मात्र त्याच्या मनातील शंका दूर झाली. ऑगस्ट २०१० मध्ये भाविशने आपल्या मायक्रोसॉफ्टमधल्या नोकरीला रामराम ठोकला. नोव्हेंबरमध्ये त्याच्याच विचारांचा अंकित भाटी हा आयआयटी एमटेकपर्यंत शिक्षण झालेला भागीदार त्याला मिळाला आणि टॅक्सी विश्वातलं एक नवं पर्व सुरू झालं. स्पॅनिश भाषेत ‘होला’ म्हणजे हाय किंवा हॅलो. त्यातला एच सायलेंट असल्याने उच्चार होतो ‘ओला’. दोन हजार दहा सालच्या अखेरीस भाविश आणि अंकित यांनी प्रवाशांना प्रवासाच्या नव्या पर्वात हाय हॅलो करत बोलावलं आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीला, मनमानी भाडे आकारणीला कंटाळलेल्या प्रवाशांनी उत्तम प्रतिसादात या दोघांना ‘ओला’ केलं. ‘चलो निकलो’ या टॅगलाइनला प्रतिसाद देत खरंच प्रवासाची वाट धरली.

या टॅक्सी सेवेसाठी स्वत:च्या गाडय़ा खरेदी न करता जी मंडळी त्यांची वाहनं भाडय़ाने देत होती किंवा ज्यांची स्वत:ची टॅक्सी होती अशांना या दोघांनी सेवेत समाविष्ट केलं. कारचालक निवडताना त्यांनी विशेष पारखून माणसं निवडायचं ठरवलं होतं. टॅक्सी सेवा आणि तंत्रज्ञान यांची हातमिळवणी करत ऑनलाइन किंवा अ‍ॅपवरून कार बुकिंग होऊ  लागलं. सेवेबद्दल थेट प्रतिक्रिया, कारचालकाबद्दल सूचना किंवा सेवेचा दर्जा ठरवण्याचा अधिकार प्रवाशांना देण्यात आला. भाडे आकारणीत पारदर्शकता, विविध प्रकारे भाडे देण्याची सोय, मिनी प्राइम, लक्झरी गाडय़ांची आवश्यकतेप्रमाणे उपलब्धता यामुळे शंभर शहरांत ‘ओला’ची सेवा विस्तारली. प्रत्येक सफरीनुसार कारचालक ‘ओला’ला कमिशन देणार आणि उरलेली रक्कम त्याची अशा पद्धतीत दोघांचाही फायदा होता. आज ‘ओला’कडे अशी चाळीस लाख वाहनं दिमतीला आहेत.

भाविशचं उद्दिष्ट फक्त टॅक्सीपुरतं मर्यादित नव्हतं. ऑटोरिक्षाच्या भाडय़ापेक्षाही कमी दरात प्रवास हा त्याचा हेतू असल्याने रिक्षावाल्यांशी हातमिळवणी करून लवकरच ओला कॅबप्रमाणे ओला ऑटोही अवतरली. या सगळ्या विस्तारात उत्तम सेवेची हमी असली तरी काही वेळा काही मानवी चुका किंवा सेवेत कसूर असे किस्सेही ऐकायला मिळतात, पण तरी ‘ओला’वरचा ग्राहकांचा विश्वास कायम आहे.

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी एके ठिकाणी म्हटलंय की तरुणांनी स्वप्नं पाहायला हवीत. स्वप्नामुळे माणूस त्या दिशेने विचार करतो आणि विचारातून कृती होते. भाविश आणि अंकित हे विधान प्रत्यक्षात आणताना दिसतात. २०१५ मध्ये पाच हजार अमेरिकी डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या या कॅब सेवेने भाविश आणि अंकित यांना देशातील सर्वात तरुण श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवून दिले. या दोघांच्या उदाहरणावरून एकच वाटतं की स्वप्नं जरूर पाहायला हवीत, इतरांना ती कितीही वेडीबागडी वाटली तरीही स्वप्नांची सफर करायलाच हवी. अगदी  ‘ओला’सारखीच!

viva@expressindia.com