न्यूझीलंडमध्ये स्वत:चा योगा स्टुडिओ  चालवणाऱ्या गौरी अजिंक्य हिच्याविषयी..

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे योगपद्धतीचा! भारतीय संस्कृतीची पाळंमुळं जशी खोलवर रुजली गेली आहेत, त्याचप्रमाणे योग संस्कृतीच्या धाग्यादोऱ्यांनी आपली मुळं परदेशात घट्ट करण्यास सुरुवात केली आहेत. त्यात महत्त्वाची भूमिका बजावते आहे न्यूझीलंडची गौरी अजिंक्य शिवलकर.

परदेशातील अनेकांना हे प्राचीन भारतीय उपचार विश्वासार्ह वाटत आहेत. परदेशातील लोकांना योगाचं मुळापासून शिक्षण देऊन या शास्त्राचा प्रसार करण्याचं काम काही योगगुरू करीत आहेत. यामध्ये एक तरुण आणि मराठी मुलीचं नावही महत्त्वाचं आहे. हे नाव म्हणजे गौरी अजिंक्य आणि तिने न्यूझीलंडमध्ये सुरू केलेला ‘योगा स्टुडिओ’.

गौरी अजिंक्य शिवलकर मूळची मुंबईची! वयाच्या दहाव्या वर्षीच तिची पहिली योगगुरू – तिची आई आणि आजीकडून तिने योगशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे या योगशास्त्राची आवड निर्माण झाली. तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर ती लोणावळा येथे ‘कैवल्यधाम’मध्ये ‘योगा अँड व्हॅल्यू एज्युकेशन’ विषयात डिप्लोमा करावयास गेली. अ‍ॅडव्हान्स प्राणायाम हा प्रकारही तिने ओ. पी. तिवारी यांच्याकडून शिकून घेतला. याच ‘कैवल्यधाम’मध्ये तिने योगविषयक कार्यात ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून सहा र्वष काम पाहिलं. भारतीय नौदल आणि लष्कराच्या तळांवर जवानांना त्यांच्या काही कार्यक्रमांतर्गत योग शिकवायचं कामही तिने केलं. आयआयटीमध्येही योग प्रशिक्षणाचे धडे तिने दिले. याशिवाय अनेक खेळाडूंना खेळासोबतच योगशास्त्राचं शिक्षण त्यांच्या भाषेत द्यायला सुरुवात केली. दरम्यान, तिचं न्यूझीलंडमध्ये जाणं झालं. या परक्या देशात आल्यावरही तिने आपली योगोपासना सोडली नाही. ‘स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रिक्रिएशन’ याविषयी रीतसर शिक्षण घेऊन त्याचा योगाशी संबंध जोडायचं ठरवलं. कारण तिचं योगविषयक ज्ञान तिला वाटायचं होतं. पुढे न्यायचं होतं.

सुरुवातीला गौरीने न्यूझीलंडमध्ये अनेक व्यायामशाळा आणि हेल्थ क्लब्समध्ये वैयक्तिक प्रशिक्षक आणि योग शिक्षक म्हणून मार्गदर्शन केलं. न्यूझीलंडमध्ये ‘योगा’ हा फिटनेस रुटीनचा भाग व्हावा यासाठी तिने प्रयत्न केले. लोकांना योगाची सवय व्हावी, यासाठी तिने सतत प्रयत्न केले. योग प्रशिक्षक म्हणून काम करतानाच आपला स्वत:चा योग स्टुडिओ स्थापन करायचा विचार तिने केला. नेपिअर शहरात आता गौरीचा स्वत:चा स्टुडिओ आहे. अनेक विदेशी नागरिकांना तिने योगाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं आहे. योगाचं महत्त्व, त्याच्या पद्धती याबाबतचं मार्गदर्शन तिथं होतं. ‘न्यूझीलंडमध्ये योगाविषयी प्रेम आहे. पण फार वरवरचा अभ्यास हे लोक करतात. योगशास्त्राचा मुळापासून अभ्यास या लोकांनी करावा यासाठी स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. इथल्या लोकांचा योगाच्या बाबतीतला अनुभव हा फारच आश्वासक आणि आनंददायी वाटतो. योगाने फक्त शारीरिक नाही तर आंतरिक शुद्धीसुद्धा होते, त्यामुळे लोकांना तो आवडतोय, असं पाहताना जाणवतं. मी केवळ योगच नाही, तर संस्कृत, योगिक टेक्स्ट आणि त्यामागची फिलॉसॉफीदेखील शिकवते,’ गौरी सांगते. गौरी गेली सात र्वष न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहे. पण अजूनही भारतात येऊन योगप्रसाराच्या कार्यात हातभार लावावा असं तिला मनोमन वाटतं.                                                                                                            योग ही एक प्रकारची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा एक स्रोत होण्याचं काम गौरी करतेय. भारतीय योगविद्येची ऊर्जा मुंबईची लेक स्वबळावर परदेशात पाय रोवू पाहतेय, याहून दुसरी वाखाणण्याजोगी गोष्ट नाही

सौरभ नाईक