पिस्तूल नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या राही सरनोबतने आपली वाटचाल लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर गेल्या सोमवारी उलगडली. नेमबाजीच्या खेळासाठी आवश्यक मानसिक कणखरता, एकाग्रतेचं महत्त्व विशद करताना राहीची विचारांची परिपक्वता अनुभवायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरची अव्वल नेमबाज असल्याने सराव, स्पर्धाचं भरगच्च वेळापत्रक आणि त्याच वेळी सरकारी अधिकारी म्हणून राही कार्यरत आहे. अवघ्या दहा वर्षांत नेमबाजीच्या क्षितिजावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या कोल्हापूरच्या या लाडक्या लेकीला अरुंधती जोशी आणि पराग फाटक यांनी बोलतं केलं. नेमबाजीची सुरुवात, स्पर्धाचे अनुभव, अवघड टप्पे, लक्ष्य याविषयी राहीशी झालेल्या दिलखुलास गप्पांची शब्दचित्रं..

‘न’ नेमबाजीचा
दहावी झाल्यानंतर नेमकं काय करायचं ते ठरवलं नव्हतं. मुळात काही करायचं असतं हेच ठाऊक नव्हतं. आठवी आणि नववीमध्ये ‘एनसीसी’मध्ये होते. तिथे नेमबाजीशी ओळख झाली होती. माझी दहावीची परीक्षा झाल्यावर त्याच सुमारास २००६ साली तेजस्विनी सावंतला राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकं मिळाली. तिच्याविषयी कोल्हापूरच्या पेपरमध्ये खूप लिहून आलेलं. ‘एनसीसी’मध्ये नेमबाजी केलेली होती. ते कंटिन्यू करावंसं वाटलं. म्हणून रेंजवर जाऊन तर बघू या असा विचार होता. तेजूदीदी (तेजस्विनी सावंत) आणि मी शेजार शेजारच्या गल्लीत राहात होतो. ती करू शकते, आपण किमान पाहू या तरी. दहावीनंतर दोन- तीन महिने सुट्टी असते, त्याच कालावधीसाठी शूटिंग करू या, असा विचार करून रेंजवर गेले. दोन-तीन महिनेच करायचं आहे, मग रायफलचं एवढं सामान कशाला विकत घ्यायचं म्हणून पिस्तूल प्रकार निवडला.

2स्कोअरिंगचा घोळ आणि पहिलं मेडल
फेब्रुवारीत दहावीची परीक्षा संपली, मला पहिलं मेडल ऑक्टोबरमध्ये मिळालं. परीक्षा संपल्यावर आठवडाभरात रेंजवर गेले होते. ऑक्टोबपर्यंत मी एकही गोळी मारली नव्हती. गोळ्यांशिवाय सराव केला होता. लक्ष्य आहे असं समजून शूटिंग करायचं. ज्याचा आजही सराव करते. एवढे महिने मी एकही गोळी चालवली नव्हती. कधी वाटलं नाही की गोळी चालवून बघावं. अजित पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. त्यांनी सांगितलं नाही, मी विचारलं नाही. पिस्तूल हाताळायला मिळतेय याचं अप्रूप होतं. पुढच्या पाच दिवसांत पुण्याला बालेवाडीला मॅच आहे, असं सरांना कळलं. जेमतेम पाच दिवस सराव केला. बालेवाडीचं स्टेडियम आणि रेंजही तेव्हा जुनी होती. वरच्या मजल्यावरती जलतरण तलाव होता. तिथून पाणी झिरपून खाली यायचं, ही अवस्था. मॅच झाल्यावर आपले किती लक्ष्यवेध अचूक झालेत हे आपण पाहू शकतो. मी सहज सरांना विचारलं-माझा स्कोअर कसा झालाय? ‘२७०, ४०० पैकी म्हणजे खूप खराब मॅच झाली. तू जा घरी. तू स्टेट चॅम्पियनशिपसाठीसुद्धा पात्र ठरू शकलेली नाहीस’, असं सरांनी सांगितलं. पुण्यात आत्यांकडे राहिले होते. त्यांच्या घरी गेले. संध्याकाळी सरांचा फोन आला. ‘तुला मेडल मिळालंय’. मगाशी तुम्ही म्हणालात, खराब झाली मॅच म्हणून असं म्हणताच ते म्हणाले, ‘अगं गुण मोजता पण येत नाहीत तुला? २७० नव्हे ३४० होते ४०० पैकी.’ मी कमीत कमी स्कोअर पकडला होता. लागून लागून किती लागेल असा विचार केला होता. मग राज्यस्पर्धेत रौप्यपदक मिळवलं. स्पर्धा खेळत गेले, पदकं मिळवत गेले.

शस्त्रं आमच्यासाठी पवित्र!
एवढा चांगला गेम असताना लोक शस्त्रास्त्रांनी मारामारी का करतात असा प्रश्न पडतो. आम्ही वेपन्सच्या सहवासात रोज असलो तरीसुद्धा शस्त्रांची दुसरी हिंस्त्र बाजू फार कमीवेळा आमच्या मनात येते. आमच्यासाठी हा सर्वस्वी खेळ आहे. बंदूक हातात आहे म्हणून शिकार करायची आहे किंवा आतंकवाद फैलावायचा अशा विचारांचा संबंधच येत नाही. शस्त्र हा सामायिक मुद्दा आहे. पण शस्त्रामागची माणसं वेगळी आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यांच्याशी कुठंच रिलेट करत नाही. हातात बंदूक आहे तर याला मारु असं कधीच वाटत नाही, जरी त्या माणसाचा कितीही राग येत असला तरी. असं काही केलं तर तो खेळाचा अपमान होईल. वेपनचा अपमान असेल. या गोष्टी आमच्यासाठी एवढय़ा पवित्र आहेत की त्यांना खाली पडू देत नाही, पाय लागू देत नाही, व्यवस्थित ठेवतो, खूप सांभाळतो, जपतो. नकारात्मक बाजू कधीच मनात येत नाही.

माहौल ऑलिम्पिकचा!
लंडन ऑलिम्पिकचा अनुभव घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये माहौल शंभर टक्के खेळाचा असतो. डायनिंग हॉल आणि ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये सगळे खेळाडू एकत्र असतात. उसैन बोल्ट, मायकेल फेल्प्स, सेरेना विल्यम्स असे दिग्गज सभोवताली असतात. तेव्हाच तुम्हाला स्पेशल वाटायला लागतं. या लोकांमध्ये वावरतोय, म्हणजे आपण कोणी तरी आहोत हे जाणवतं. कॉन्फिडन्स येतो. यांच्यापुढे आपला कसा टिकाव लागणार या विचाराने दडपणही येतं. माझ्याकडे मीडियाचं लक्ष आहे. चांगलं परफॉर्म करायचं आहे. हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे- या सगळ्यांचं प्रेशर येणं साहजिकच आहे. पण शेवटी माझ्या मॅचमध्ये टेक्निक फॉलो करायचं आहे, हे बेसिक विसरून चालणार नाही.

इच्छा तेथे मार्ग
नेमबाजीत कारकीर्द नक्कीच घडवता येऊ शकते. माझ्याकडे पैसे नाहीत, मग मी नेमबाजी कशी करणार, हा विचार बदलायला हवा. पैसे लागतातच पण पहिल्याच दिवशी लाखभर रुपये खर्च करावे लागत नाहीत. अकादमी आहेत, प्रायव्हेट कोचेस आहेत, शासनाच्या स्कीम्स आहेत. जिथे वेपन्स वापरायला मिळतील. त्याचा फायदा घेऊ शकतो. क्रीडा प्रबोधिनी हा शासनाचा उपक्रम आहे. मी पहिलं वर्ष त्यांच्यांकडची वेपन्सच वापरत होते. माझं स्वत:चं वेपन नव्हतं. अख्खं किट त्यांचंच होतं. मी टप्प्याटप्प्याने साहित्य विकत घेतलं. पहिल्या इंटरनॅशनलच्या वेळेला विशिष्ट शूज घेतले. माझ्याकडेही पहिल्या दिवशी, पहिल्या वर्षभरात काहीही नव्हतं. तुम्ही फोकस्ड असाल तर मार्गही अनेक सापडतात. चांगले लोक भेटतात. आज मला गरज आहे, मी चार लोकांना विचारते, त्यातला एक जण मदतीसाठी उभा राहतो. पण ती चौकसबुद्धी पाहिजे. विचारण्याची, माहिती करून घेण्याची क्षमता अंगी असायला हवी. कॉम्पिटिशन्स खेळत राहायला हव्या. सराव वेगळा असतो. मॅचचा अनुभव सर्वस्वी वेगळा असतो. मॅचला जाऊन पैसे घालण्यापेक्षा प्रॅक्टिसच करू या असा अप्रोच चुकीचा आहे. मॅचमध्ये सहभागी झाल्याशिवाय काहीच मिळणार नाही. अनुभव नाही आला तर पुढे कशी वाटचाल करणार? प्रगतीपण करू शकत नाही.

अडचणी झाल्या रुटीन
शस्त्रास्त्रं ने-आण करताना भारतातच अडचणी येतात. बाकीच्या देशांत सोपी प्रोसेस आहे. युरोपीयन देशांमध्ये शस्त्रांची ने-आण करणं सुलभ आहे. तिथे एक सर्टिफिकेट आम्हाला मिळतं आणि ते ट्रेन, बस, एअर ट्रॅव्हल- कुठेही चालतं. कोणी अडवत नाही. तिथला एअरपोर्टवरचा पोलीस वेपन उघडून बघत नाही. त्याला सर्टिफिकेटबद्दल खात्री असते. आपल्या इथं प्रत्येकाला वेगवेगळी माहिती असते. रिक्वायरमेंट वेगळी असते. आमचा चाळीस जणांचा संघ असतो, साहजिकच पन्नास, साठ वेपन्स असतात. एवढय़ा वेपन्स पाहूनच अधिकारी घाबरतात, त्या कशा पाठवायच्या असा त्यांना प्रश्न पडतो. म्हणूनच मॅचच्या आधी पाच तास आम्ही एअरपोर्टवर पोहचतो. पोहचलं की बसून राहायचं, आमचे मॅनेजर वाटाघाटी करतात. खूप गोष्टी सुरू असतात. पण त्याबद्दल तक्रार नाही. कारण आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत आपणच ओरडत असतो. पण कोणी त्यादृष्टीने काम करत असेल तर आम्हाला त्यांना सहकार्य करणं अत्यावश्यक आहे. परदेशात जाण्यासाठी विमान पकडण्याची आमची ठिकाणं ठरलेली आहेत- मुंबई किंवा दिल्ली. किमान या दोन एअरपोर्टवर प्रशिक्षित अधिकारी नेमणं गरजेचं आहे, असं मात्र वाटतं. या खरं तर बेसिक गोष्टी आहेत, याने आमचे बरेच प्रश्न सुटू शकतात. फक्त कस्ट्म्स नाही तर एअरलाइन्सवाल्यांशीही अडचणी येतात. वेपन आणि अ‍ॅम्युनिशन एकत्र ठेवा सांगतात. मग आम्ही एकत्र ठेवतो. नंतर कोणीतरी वेगळं ठेवायला सांगतो. एकवाक्यता नसते. खूप गोंधळ असतो. नियम सतत बदलत असतात. अपडेशन होत नाही. असोसिएशनला बदलांची माहिती दिली जात नाही. कम्युनिकेशन प्रॉब्लेम जाणवतो. पण हे सगळं रुटीन झालं आहे.

‘माइंड’ इट..
नेमबाजी हा माइंड गेम आहे. त्यासाठी मन सक्षम लागतं. माझी विचारसरणी पहिल्यापासून अशीच आहे. खेळामुळे ती अधिक चांगली झाली. उपजत काही गोष्टी होत्या आणि काही मी आत्मसात केल्या. या खेळासाठी विशिष्ट विचारसरणी असणं गरजेचं आहे. समजा नसेल तर तयार करणं आवश्यक. आपले समज, गैरसमज चुकीचे आहेत हे मान्य करणं, त्यात बदल करणं, त्याची सवय होणं ही मोठी प्रोसेस आहे. आपले विचार चुकीचे आहेत हे मान्य करायलाच काही जणांना खूप वेळ लागतो. काही लोक तयार होत नाहीत. डोकं रिकामं ठेवलं तर कोणतेही विचार येऊ शकतात. त्यामुळे मनात ठरावीक विचार येऊ द्यायचे असं ठरवावं लागतं. माइंड ऑक्युपाइड ठेवणं गरजेचं आहे. काय करायचं नाही यावरच आपण बोलत असतो पण काय करायंच यावर चर्चाच होत नाही.

3पुरेपूर कोल्हापूर!
कोल्हापूर छोटं शहर आहे आणि ते मुंबई-पुण्यासारखं गर्दीने ओसंडून जाऊ नये. आहे तसंच रहावं असं वाटतं. कोल्हापूरला खेळाचं कल्चर आहे. कोल्हापुरात शाळेत बरेच खेळ असतात. खेळांना तेवढा वेळ देता येतो. अभ्यासापेक्षा खेळांचं वातावरण जास्त होतं, आहे. त्यामुळे शालेय पातळीवर खेळाकडे लक्ष देताना मी काही वेगळं करतेय असं नव्हतं. कोल्हापूरकरांसाठी मी केलं ते सर्वसामान्य होतं. मुलीही तेवढय़ाच खेळतात, अभ्यास सोडून खेळतात. कोल्हापूरसाठी हे साहजिक आहे. पण मेट्रो शहरात असते तर कदाचित नेमबाजीचा विचार एवढय़ा गांभीर्यानं केला नसता. माझे इतर मित्र-मैत्रिणी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात आले, त्यांनी शिक्षण सोडून वेगळा विचार कधीच केला नाही. त्याला कारणीभूत ते वातावरण असतं- शहराचं किंवा एकंदरीत समाजाचं.

महिलाराज!
संयम, स्वत:वरचं नियंत्रण आणि समंजसपणा- हा मुलींचा, स्त्रियांचा बेसिक स्वभावधर्म आहे. त्याच नेमबाजीच्या मूलभूत गरजा आहेत. शूटिंग करताना या स्किल्सचा फायदा होतो. महाराष्ट्रातली मुलं नेमबाजीत का नाहीत याचं ठोस कारण सांगता येणार नाही. पण मुलं आर्मी, नेव्ही, एअरफोर्सकडे वळतात. सव्‍‌र्हिसेसमध्ये मुलं प्रभावीपणे पुढे येतात. कदाचित तिथे त्यांना फॅसिलिटीज मिळतात, सेटल होता येतं. नेमबाजीमध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णकन्या आहेत त्या खूप जास्त सिन्सिअर आहेत. अंजली भागवत, सुमा शिरुर, तेजस्विनी सावंत. सगळ्यांमध्ये एक मुद्दा सामाईक आहे. एवढय़ा वर्षांनंतरही खेळाप्रती त्यांची पॅशन आणि कमिटमेंट कायम आहे. आमची ही प्रेरणास्थानंच मजबूत आहेत. सो मुलींना आदर्श जास्त उपलब्ध आहेत. मुलांपुढे तसं काहीच नाही.

सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शनच
मी शूटिंग सुरू केलं तेव्हा मोबाइल फोनचा वापर कॉल करणे आणि घेणे यापुरता मर्यादित होता. तेव्हा मोबाइलपासून दूर राहायला कष्ट नव्हते. आता मोबाइल ऑफलाइनवर असेल तरी खूप गोष्टी असतात. नवीन मुलं एक शॉट मारतात आणि मधल्या वेळात मोबाइलवर खेळत असतात. हे फार त्रास देणारं आहे. हे लोक कसं काय शूटिंग करतात असा प्रश्न पडतो. एखादा विषय डोक्यात आला, त्याला बाजूला करणं आणि पुन्हा शूटिंगला जाणं ही अवघड गोष्ट आहे. स्वत:वर तेवढा कंट्रोल असल्याशिवाय हे जमू शकत नाही. नवीन मंडळींचं आश्चर्य वाटतं. मी रेंजवर गेल्यावर मोबाइल बॅगेत टाकते आणि सराव झाल्यावरच बाहेर काढते. या गोष्टींनी फार फरक पडतो. तुमच्या मनाचा ताबा, नियंत्रण आवश्यक आहे. आपण खूप लोकांना रोजच्या रोज भेटतोय, सोशलायझिंग, नाइट आऊट या सगळ्याचा परिणाम सापेक्ष आहे. आपलं शेडय़ूल बदलणार असेल तर परिणाम होतो, त्यानुसार योग्य निर्णय घ्यावा.

शूटिंगदरम्यानचं ‘मेडिटेशन’
खेळाला एकाग्रता गरजेची आहे. सेल्फ कंट्रोल अत्यावश्यक आहे. शिस्त आवश्यक आहे. सहा वाजता उठायचं, सातला पळायला जायचं अशी शिस्त नव्हे. रेंजवर गेल्यावर मोबाइल बंद म्हणजे बंद ही शिस्त. रेंजवरून बाहेर पडल्यावर मजा म्हणजे मजा. मग पुन्हा नेमबाजीचा विचार नाही. मेडिटेशन शूटिंगला उपयोगी ठरतं हे खरं. पण कशा प्रकारचं मेडिटेशन उपयोगी हे पुन्हा व्यक्तिसापेक्ष. ‘शूटिंग इन द प्रेझेंट’ हे मेडिटेशन आहे. डोळे बंद करून वीस मिनिटे बसलो म्हणजे एकाग्रता नव्हे. शूटिंग करताना वर्तमानात राहिलात तर अर्थ आहे. शूटिंग करायचं आहे म्हणजे काय- पैसा मिळवायचा आहे, मेडल्स मिळवायची आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे. हे क्लिअर हवं. काय साधायचं आहे हे ठरलेले हवं. मला विचाराल तर मला टेक्निकली फिट व्हायचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान वीस वर्षांची कारकीर्द घडवायची आहे. अचिव्ह करायचं म्हणजे काय करायचं हे डिसाइडेड हवं. दहा वर्षांपूर्वी देखील मला या गोष्टी क्लिअर होत्या, पण त्या क्लिअर होत्या याची जाणीव उशिराने झाली. मला टेक्निकली फिट व्हायचंय आणि माझी इम्प्रूव्हेंट कधीच थांबता कामा नये.

सकारात्मक बदलाचा संथ वेग
मी खेळायला लागल्यापासून नेमबाजीच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत गोष्टी बदलल्या आहेत. पण त्यांचा वेग खूप कमी आहे. भारतासारख्या एवढय़ा मोठय़ा देशात चारच इलेक्ट्रॉनिक रेंज आहेत. जशा रेंजवर आम्ही परदेशात खेळतो तशा रेंज आपल्या देशात हाताच्या बोटावर आहेत. छोटय़ाशा स्वित्र्झलडसारख्या देशात शंभर अत्याधुनिक रेंज आहेत. हा फरक मोठा आहे. आपल्या शहरातच फॅसिलिटी नसेल तर उठून दुसऱ्या शहरात जायला हवं हे पटवून घ्यायला हवं. सर्वसामान्यपणे नेमबाजीसारख्या खेळासाठी असा विचार होताना दिसत नाही. नेमबाजीला सुरुवात करू शकतो, पण विशिष्ट लेव्हलाला जायचं असेल तर खर्च वाढत जातो. राष्ट्रकुल, आशियाई अशा देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्पर्धाआधी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला जातो. बऱ्यापैकी प्रमाणात मदत मिळते. कोटय़वधी रुपये उपलब्ध करून दिले जातात. क्रीडा मंत्रालयातर्फे प्रॉयॉरिटी स्पोर्ट्समध्ये हॉकी पहिल्या तर नेमबाजी दुसऱ्या स्थानी आहे. नेमबाजीसाठी सरकारच सर्वाधिक पैसा देतं.

नेमबाज अर्जुन!
अर्जुनाला जसं केवळ लक्ष्यच दिसायचं, तसं आमचंही असतं. पण गेल्या दहा वर्षांत अनुभवानं, प्रशिक्षणानं लक्ष्य दिसण्यात फरक पडलाय- पूर्वी टार्गेटपण दिसायचं. मात्र प्रशिक्षक अ‍ॅनाटोली यांनी सांगितलं की टार्गेट बघायचंच नसतं. ते स्थिर असेल असं नाही. ते रेफरन्ससाठी वापरायचं. साइट्स पाहायच्या असतात. जे तुझ्या हातात आहे ते बघ. साधं सोपं तत्त्व. अर्जुनासारखीच आमची अवस्था होते. पाहिजे तेच दिसतं. बाकीचं दिसत नाही.

परदेशाचं आकर्षण नाही!
२५ मीटर पिस्तूल शूटिंग हे आऊटडोअर इव्हेंट आहे, त्यामुळे वातावरणाचा फरक पडतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या निमित्ताने सातत्याने परदेशात जावं लागतं. पण मला परदेशात जाण्याचं कधीच आकर्षण नव्हतं. जर्मनीतील स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं, पण देश बघण्यापेक्षा रेंज कशी आहे, रेंजवर लाइट असतील का, झोप पूर्ण होईल का, यावरच भर असायचा. देश पाहणं, भटकणं याकडे लक्षच नसतं. अझरबैजानसारख्या नावाच्या देशात स्पर्धा होती. विचित्र देशात मॅच आहे हे कळलं की त्या देशाला गुगलवर शोधते. स्पर्धेदरम्यान तिथलं वातावरण कसं असेल याचा अंदाज घेते. किती तासांचा डिफरन्स आहे हे जाणून घेते. स्पर्धेसाठी त्या देशात गेल्यावर पाहण्याची ठिकाणं कोणती आहेत हे डोक्यात नसतं, त्याने फरक पडत नाही.

इच्छाश्रवणी
कानावर पडलेलं काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही याबाबतही मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं. मनावरती ताबा असलेला शूटर असेल तर त्याला गोंगाटाने फरक पडत नाही. मागे कुणी गप्पा मारत असेल तर आम्ही ठरवून ते ऐकायला येऊ देऊ देत नाही. कानावर पडणं आणि पर्टिक्युलरी ऐकणं यात फरक असतो. कोचशी डिस्कस करून विचारांचा फ्लो ठरवला जातो. ही एकाग्रता साधण्याची प्रोसेस व्यक्तिसापेक्ष आहे. तसं शूटिंगचं कोणतंही टेक्निक व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो. अनुभवाने, चर्चेने हे कळतं. मॅच चांगली झाली किंवा का झाली नाही यातून निष्कर्ष काढावे लागतात. ही रोजची प्रोसेस आहे. कधीच संपत नाही.

4

यशाची व्याख्या
ट्रेनिंगमध्ये मी टेक्निक फॉलो करते. प्रत्येक शॉट आयडियल ट्रेनिंगप्रमाणे लागला तर ते माझ्यासाठी यश आहे. तेच माझं उद्दिष्ट असतं. साठही शॉट टेक्निकप्रमाणे झाले तरच ते यश. अडीच श्वास घ्यायचं ठरवलं तर तेवढाच यायला हवा, तिसरा श्वास आला तरी गडबड. आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ वर्षांची यशस्वी कारकीर्द असावी. जसं माझं ट्रेनिंग होतंय, तशीच कामगिरी मॅचमध्ये व्हावी. मेडल मिळणं, न मिळणं वेगळा मुद्दा. ऑलिम्पिकला जाणं हेच अल्टिमेट ध्येय. खेळ निवडण्यामागेही कारणं असतात. आवडतो म्हणून, प्रसिद्धी म्हणून, मेडल्स मिळावीत म्हणून, नोकरी मिळेल, पैसे मिळतील म्हणून. यात चुकीचं काहीच नाही. साहजिक आहे. पण ते अंतीम ध्येय असू नये. हे सगळे तुमच्या परफॉर्मन्सचे परिणाम असायला हवेत. परफॉर्मन्सच अल्टिमेट असायला हवा. शूटिंग चांगलं झालं तर या गोष्टी आपोआप येतात. साहजिकपणे मिळतात. म्हणून मला शूटिंग चांगलं करायचं आहे. माझ्या पालकांना बरेच लोक विचारायला येतात- तुम्ही मुलीला कसं वाढवलंत, कशी शिस्त लावली वगैरे. माझ्या आईने आवडतं ते खायला दिलं. स्वातंत्र्य दिलं. तुला पाहिजे ते कर असं ती आजही सांगते. माझ्या बाबांनी एकच गोष्ट सांगितली की- जेव्हा तू टेन्शन घेशील, रडशील तेव्हा तुझं शूटिंग बंद होईल. मी मॅच खराब झाली तरी रडत नाही. पालकांना सांगावंसं वाटतं की, मुलांना निदान आयुष्याची दोन र्वष तरी असं स्वातंत्र्य द्या. अशी दोन र्वष द्या की तो वेळ त्यांचा आणि त्यांना हवं असेल ते करू शकतील. यश मिळो, न मिळो महत्त्वाचं नाही. पैसे जातील वाया. पण तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे करू दिलं नाही असं वाटायला नको.

डाएट आणि बरंच काही
नेमबाजांसाठी खास डाएट असं काही नाही, पण साखर आणि मीठ हार्टबिटवर परिणाम करतात. मॅचच्या किमान पंधरा दिवस आधी, साखर, मीठ वरून घेऊन खाणं टाळते. आईस्क्रीम, चिप्स टाळते. कॉफी, ब्लॅक कॉफी, डार्क कॉफी या गोष्टीही हार्टबिटवर परिणाम करतात. स्पर्धेआधी हार्टबिट इम्पॅक्ट करणारं काहीही नको. माझ्या मते नेमबाजी सुरू करण्याचं योग्य वय १५ ते १६ वर्षांचंच आहे. दहावी झाल्यानंतर योग्य वेळ. मैदानी खेळात श्रम असतात, शारिरीक हालचाली जास्त असतात. शूटिंगमध्ये बराच काळ ठरावीक पोझिशनमध्ये उभं राहावं लागतं. हाडांची वाढ पूर्ण झाल्यानंतरच हे योग्य आहे. शिवाय या खेळाचा करिअर स्पॅन खूप मोठा असू शकतो. त्यामुळे आधी अन्य खेळ खेळून घ्यावेत आणि मग नेमबाजीला सुरुवात करावी.

अधिकारी बरेच मिळतील पण राही एकच आहे..
मी सध्या पुण्यात महसूल उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे. मला ही नोकरी २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीमुळे मिळाली आहे, परंतु कागदोपत्री २०१४च्या राष्ट्रकुल वेळेस मिळाली. मध्ये चार वर्षे मध्ये गेली. कारण तेव्ही मी ग्रॅज्युएट झालेली नव्हते. पुण्यात मी नोकरीवर जाते तेव्हा अर्धा तास हाच विषय असतो की शूटिंग कसं सुरू आहे- प्रॅक्टिस कशी आहे, ऑलिम्पिकला जाणार आहे की नाही? काही हवंय का? माझा प्रशिक्षण कालावधी सुट्टय़ा वगळून दोन वर्षांचा आहे. सुट्टय़ा धरून चार-पाच वर्षांचाही होईल. आत्तापर्यंत दहा अधिकाऱ्यांकडे प्रशिक्षणाच्या निमित्ताने गेली असेन. त्यांनी हेच सांगितलं तू फक्त शूटिंगच कर. आम्हाला अधिकारी खूप मिळू शकतात पण राही सरनोबत, ऑलिम्पियन एखादीच मिळू शकेन. तू तिकडेच राहा. लक्ष केंद्रित कर. काही मदत लागली तर सांग. ऑफिसमधल्या प्रत्येकाचं मत हेच की, मी ऑलिम्पिक खेळायला हवं. सो नोकरीमुळे खेळाकडे दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

5दुखापती आणि पराभव..
पराभवाची अ‍ॅनॅलिसिस- टेक्निकल आणि मेंटल असं होतं. काही विचारांनी डिस्टर्ब केलं असेल तर मेंटल ट्रेनिंगकडे जातं, नाहीतर टेक्निकल ट्रेनिंगकडे जातं. २०१५ वर्ष असं आहे की, मी एकही आंतरराष्ट्रीय पदक पटकावलं नाही. कामगिरी सर्वसाधारण झाली. २०१४ मध्ये मी उंचावरून पडले. उजव्या हाताला लागलेलं. हाच हात शूटिंगसाठी वापरते. मे महिन्यात पडले आणि जुलै महिन्यात कॉमनवेल्थ स्पर्धा होती. फ्रॅक्चर आहे हेच पंधरा-वीस दिवसांनी कळलं. फ्रॅक्चर घालायचा कालावधी निघून गेला. स्लिंग लावलेलं. कॉमनवेल्थला गेले तेव्हा हात सरळ नव्हता. लागल्यामुळे सरळ होऊ शकत नव्हता. तरीपण मॅच खेळले. मॅच खराब झाली. फायनलमध्ये अजून चांगलं करायचंय या उद्दिष्टाने गेले आणि गोल्ड मिळालं. हात बरा होतोय पण इंज्युरी कायम होती. एशियन गेम्सला कांस्य मिळालं. स्लिंग लावल्यामुळे हात पूर्ण सरळ होत नव्हता. मसल्स लूझ झालेले. त्यामुळे शॉट मारण्यात टेक्निकल चेंज झालेले. एका शॉटला पंधरा सेकंद घेत होते, ते आता सात-आठ सेकंदांवर आणलं. बदल केला. वर्ल्डकप खेळले. या कालावधीत हात बरा झाला. पुन्हा एकदा १५ सेकंदांकडे शॉट्स झुकायला लागले. अजून दोन वर्ल्डकप गेले. बऱ्याच चांगल्या मॅचेस गेल्या. दुखापतींसारख्या अडचणी येतातच. तेव्हा वाटतं नको खेळायला. पण रेंजवर जात नाही त्याच दिवशी सगळ्यात जास्त वाईट वाटतं. तेच प्रेरणा देतं.

योग्य माणसं निवडणं महत्त्वाचं..
खेळ, वैैयक्तिक आयुष्य, ऑफिस हे सहज मॅनेजेबल नाहीये. लग्न कधी करणार हा प्रश्न समोर असतो. वेळच नाही लग्न करायला अशी परिस्थिती असते. ऑलिम्पिकसारखी स्पर्धा असेल तर लग्नासाठी वेळच नाही. अंजूदीदी (अंजली भागवत), सुमादीदी (सुमा शिरुर) यांचं लग्नानंतर करिअर डेव्हलप झालंय. त्यांना चांगली माणसं मिळाली आहेत. लग्न झालं की करिअर संपलं असं नाही, तुम्ही कसे लोक निवडता त्यावर डिपेंड आहे.
काऊन्सेलिंग करू शकते
नेमबाजीमुळे मानसिक प्रगल्भता येते. आमचं प्रशिक्षणच असं झालेलं असतं की, विशिष्ट प्रकारची विचारसरणी तयार होते. रिअ‍ॅक्शन टाइम कमी होतो. एखादी वाईट घटना घडली, शूटर्सकडे वेळ असतो, ते हायपर होत नाहीत चटकन. टेन्शनची गोष्ट असेल तरी आम्ही त्याचं तडकाफडकी टेन्शन घेत नाही. अनुभव, सवय यांनी हे अंगी बाणलं जातं. माझ्या क्षेत्राव्यतिरिक्त लोकांना मी म्हणूनच मदत करू शकते, मेन्टॉर सॉर्ट ऑफ काम करू शकते. कोणी काही प्रॉब्लेम घेऊन आलं तर हा प्रॉब्लेम आहे हे समजवावं लागतं स्वत:ला, मग सोल्यूशन देऊ शकते. वीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर नेमबाज एक वेगळाच माणूस असतो. खूप चांगला मेन्टॉर होऊ शकतो. कानावर पडलेलं काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही याबाबतही मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं. मनावर ताबा असलेला शूटर असेल तर त्याला गोंगाटाने फरक पडत नाही.
खेळामागचा विचार उलगडला
आंतरराष्ट्रीय पातळीवरची नेमबाज म्हणून राही सरनोबतनं खूप लहान वयात नाव कमावलं. तिला यशदेखील झटकन मिळालं. नेमबाजी हा एकाग्रतेचा खेळ. या खेळात त्याचाच कस लागतो. त्यासाठी खेळाडूचा विचार, जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन आणि खेळाप्रती असलेलं प्रेम महत्त्वाचं, हे व्हिवा लाउंजमध्ये झालेल्या राहीच्या मुलाखतीतून समोर आलं. एका यशस्वी खेळाडूचा प्रवास आणि त्यामागचा त्याचा फोकस्ड दृष्टिकोन या निमित्ताने कळला, अशा भावना मुलाखतीनंतर उपस्थितांनी व्यक्त केल्या. यापैकी काही निवडक प्रतिक्रिया.
संकलन – लीना दातार, छाया – मानस बर्वे


7सकारात्मक दृष्टिकोन भावला
मला राहीकडून खूप चांगल्या टिप्स तर मिळाल्याच, पण त्यासोबत नेमबाजीतील बदल, ऑलम्पिकचं विश्व, तिला घरून मिळणारं पाठबळ हे ऐकून प्रेरणासुद्धा मिळाली. चांगला सराव आणि राहीसारखा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर पुढे जाऊन आपणसुद्धा हे करू शकतो हे मला तिचं बोलणं ऐकून जाणवलं.
– तेजल सावंत

 

8एकाग्रतेचं महत्त्व
मला कार्यक्रम खूप छान वाटला. इतक्या लवकर आणि इतकं मोठं यश मिळूनही इतर प्रलोभनांना न भूलता राहीनं खेळातील एकाग्रता ढळू दिली नाही. हा माइंड गेम आहे, हे समजून तिनं सराव केला, तिची एकाग्रता, खेळाप्रती आवड हे खूप भावलं. कोणताही खेळ असू दे त्यात तुमचा फोकस असणं गरजेचं आहे आणि एकाग्रतेचं महत्त्व राहीच्या बोलण्यातून समजलं आणि खूप काही शिकायला मिळालं.
– अक्षय गावडे

 

9राहीमुळे प्रेरणा मिळाली
नेमबाजी हे एक अतिशय वेगळं क्षेत्र. दहावीनंतर या खेळाचा सराव सुरू करूनही राहीने किती लवकर यश मिळवले ते ऐकून कौतुक वाटलं. त्यासाठी केलेले कष्ट आणि आपल्या कामावरचं तिचं प्रेम या सगळ्यामुळे त्याचं फळ तिला पदकरूपानं मिळालं. राहीमुळे आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचं इन्स्पीरेशन मिळालं.
– सरिता कोकरे

 

10नेमबाजीतले बारकावे समजले
आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. राहीचा कर्तृत्वाचा आलेख खरच कौतुकास्पद आहे. नेमबाजीचा खेळ व्यवस्थित समजला. त्यातले बारकावे कळले. एवढय़ा लहान वयात राहीने जे यश मिळवलंय ते सोपं नाही. आज तिला ऐकून नक्कीच एक जिद्द मिळाली. एका नवीन क्षेत्राबद्दल माहिती मिळाली. लोकसत्तेचे मनापासून आभार.
– सायली फोडकर

 

11क्रीडाविषयक प्रगल्भता आदर्शवत
राहीची साधी राहणी आवडली. गप्पांमध्ये तिचं सहज मिसळून जाणं भावलं. कमी वयात इतकं यश संपादन केल्यानंतरही तिचे पाय जमिनीवर असणं, तिची खेळातली एकाग्रता, खिलाडूवृत्ती, स्वत: कुणीतरी स्पेशल आहोत असं न समजणं आणि ‘स्पोर्ट्स’ मधली प्रगल्भता या तिच्या गुणांमुळे तिच्याच पिढीतल्या आमच्यासारख्या कुणालाही ती आदर्श वाटावी अशीच आहे.
– ऐश्वर्या तोंडसे

 

12थक्क करणारं माइंड ट्रेनिंग
पिस्तूल शूटिंगविषयी यापूर्वी मला काहीच माहिती नव्हती. आजच्या गप्पांमधून त्याविषयीचे बारकावे उलगडत गेले. सरावाने तिने मनावर मिळवलेली पकड, चांगली कामगिरी करण्यासाठी विशिष्ट पद्धतीनेच विचार करण्याची सवय या गोष्टी थक्क करणाऱ्या होत्या.
– प्रगती दांडेकर