मुंबईतील इराणी हॉटेलांची नामशेष होत चाललेली संस्कृती पाहिली की, खाबू मोशायच्या पोटात आणि हृदयात कालवाकालव सुरू होते. पण अशा निराशेच्या अवस्थेत प्रलयातल्या पिंपळपानावर तरंगणाऱ्या त्या बालकासारखं एक नवंकोरं इराणी हॉटेल, ‘कॅफे इराणी चाय’, खाबू मोशायला माहीमच्या एका गल्लीत दिसलं आणि खाबू मोशायच्या जिवात जीव आला.

इराणी हॉटेलं आणि मुंबई व मुंबईकर यांचं नातं खूप जुनं आहे. मांसाहाराचा श्रीगणेशा किंवा याबाबतीत आपण ‘अलिफ बे’ म्हणू हवं तर.. याच इराणी हॉटेलातील मटण सामोशाबरोबर झालेली एक पिढी आज पेन्शनीत निघण्याच्या मार्गावर असेल. या पिढीबरोबरच बदलत्या काळात ही इराणी हॉटेलंही पेन्शनीत निघाली आणि एक एक करत अल्लाघरी गेली. काही सणसणीत अपवाद आहेत, पण ते नियम सिद्ध करण्यापुरतेच. एकेकाळी मुंबईचा वेगही कमी होता. त्या वेळी या इराणी हॉटेलांचा डामाडौल बघण्यासारखा होता. एक कप स्पेशल चाय आणि बनमस्का किंवा खिमा किंवा आम्लेट एवढय़ा ‘दौलती’भोवती समानशीलांचा अड्डा जमवून तासन् तास गप्पा मारण्याइतका वेळ त्या वेळी मुंबईकराकडे होता आणि तो वेळ सार्थकी लावणारी इराणी हॉटेलंही नाक्यानाक्यांवर होती. आता त्या इराणी हॉटेलांच्या जागी उभी राहिलेली ‘रिफ्रेशमेण्ट सेंटर्स’ बघून खाबू मोशाय ‘हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली’ असं म्हणत एक सुस्कारा सोडतो.
22

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

पण गेल्या आठवडय़ात खाबू मोशायच्या आयुष्यात भाग्याचा दिवस उजाडला. आपल्या असंख्य उद्योगांपैकी एका उद्योगाच्या निमित्ताने खाबू मोशाय माहीम भागात कडमडला होता. अर्थात बाबू खवय्या बरोबर होताच. काम संपल्यावर मग पोटातल्या आतडय़ांना काम द्यावे, या उद्देशाने खाबू आणि बाबू दोघंही माहीमचे रस्ते पालथे घालत होते. मांसाहार प्रिय असणाऱ्यांना माहीम भागातील अनेक हॉटेलं माहीत असतील. खाबू-बाबू या जोडगोळीनेही या हॉटेलांमध्ये जाऊन यज्ञकर्म केले आहे. पण काही तरी नवे खायचे, या हेतूने दोघे निघाले. मुंबईहून अंधेरीकडे जाताना माहीमचा पॅरेडाईज सिनेमा गेला की, पुढल्या सिग्नलला उजवीकडल्या गल्लीत वळायचं. या सिग्नलला डाव्या हाताला एक दर्गा आहे. या गल्लीत वळल्यावर कनोसा स्कूल म्हणून एक प्रसिद्ध शाळा आहे. या शाळेच्या समोरच खाबू मोशायला ‘कॅफे इराणी चाय’ हे हॉटेल दिसलं. म्हणजे पहिले दिसली ती, हॉटेलबाहेर ठेवलेली आरामखुर्ची! ही आरामखुर्ची बघूनच खाबूने हॉटेलवाल्याच्या सिम्बॉलिझमला दाद दिली. ही केवळ उदरभरणाची जागा नोहे, हे समर्पकपणे दाखवणाऱ्या त्या हॉटेलवाल्याचं कौतुक करत खाबू-बाबू आत शिरले.
आत शिरताच क्षणी खाबू थेट जुन्या मुंबईत पोहोचला. लंबक असलेलं लाकडी घडय़ाळ, सगळीकडे लावलेले मोठमोठे आरसे, संगमरवरी टेबलांसारखी टेबलं, त्याच त्या पांढऱ्या कपबश्या, लाकडी खुच्र्या.. सगळा इंतजाम अगदी थेट होता. काऊंटरवरच्या गोळ्यांच्या आणि चॉकलेटच्या काचेच्या गोल बरण्यांसकट! खाबू मोशायची ऑर्डर तिथेच ठरली.
खाबू मोशायने ऑम्लेट मागवलं आणि तोपर्यंत तोंड चालू ठेवायला म्हणून बनमस्का मागवला. बनला भरभरून लावलेला मस्का आणि त्यामुळे बनच्या गोड आणि मस्क्याच्या खारट चवीने जिभेवर उतरलेला स्वर्ग, यांमुळे खाबूची अमृतानंदी लागलेली टाळी ऑम्लेटच्या घमघमाटानेच मोडली. इथलं ऑम्लेट बहुधा सुदृढ अंडय़ांच्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या अंडय़ांपासूनच बनवत असावेत. कारण इतकं छान फुगलेलं ऑम्लेट आणि त्याला अंडय़ाचा एकप्रकारचा उग्र वास नाही, हे पाहून खाबूला कमाल वाटली. पण हे ऑम्लेट करताना त्यात थोडंसं दूध टाकतात, ही माहिती देत बाबूने त्याच्या ज्ञानात भर टाकली. ऑम्लेट चवीला उत्तम होतं, हे सांगायची गरजच नाही.
23
त्यानंतर आलेला खिमाही खाबूची दाद घेऊन गेला. मसाल्यांनी मटणाची चव सांभाळली आहे, कुठेही मसाले भावखाऊ होत नाहीत आणि त्यावर लिंबू पिळल्यावर वेगळाच रस तयार होऊन तो अन्ननलिकेतून पोटापर्यंतच नाही, तर थेट मनापर्यंत झिरपत जातो आणि मेंदूला एका छान सुप्तावस्थेत नेतो. हा खिमा बनमस्क्याबरोबर खायला खूप छान लागतो. एवढय़ात खाबूचं लक्ष मेन्युकार्डवरील इराणी चिकन नावाच्या पदार्थाकडे गेलं. हा पदार्थ मागवून खाबू पुन्हा वातावरणाची दखल घ्यायला लागला. तर तिथे लिहिलेल्या एका बोर्डाने खाबूचं लक्ष वेधलं. या बोर्डावर हॉटेलमध्ये काय काय करण्यास मनाई आहे, याची यादीच लिहिली होती. त्यात काऊंटरवरच्या माणसाशी बोलू नका, हे वाक्य वाचून खाबूला आपण पुण्यात तर नाही ना, अशी शंका आली. पण एकंदरीत इराणी चिकन येईपर्यंत छान मनोरंजन झालं.
हे इराणी चिकन म्हणजे मस्त शिजवलेलं चिकन एका छान मीडियम स्पाईसी ग्रेव्हीबरोबर देतात. हादेखील बनमस्क्याबरोबर खाण्याचा पदार्थ आहे. बटरची चव या चिकनला खूप छान संगत करते आणि एक सुंदर गाणं तयार होतं. या सगळ्यानंतर चहाऐवजी काही पाचक मिळालं, तर बरं, या विचाराने खाबूने मेन्युकार्ड बघितलं. तर तिथे आइस्क्रीम सोडा, रासबेरी वगैरे पेय बघून खाबूको बचपन के दिन याद आ गए.. खाबूने एक आइस्क्रीम सोडा आणि एक रासबेरी मागवून थेट बिल द्यायला सांगितलं. दोन खिमा, दोन ऑम्लेट, एक इराणी चिकन, आइस्क्रीम सोडा आणि रासबेरी आणि भरमसाट बनमस्का या सगळ्याचं बिल फक्त सहाशे रुपये झाल्याचं पाहून खाबूचा खिसा खूश झाला आणि हरवलेला मित्र चिरतरुण होऊन गवसल्याचं समाधान घेऊन खाबू मोशाय त्या इराणी हॉटेलातून भरल्या हृदयाने आणि पोटानेही बाहेर पडला.

हॉटेल इराणी चाय
कसे जाल : माहीम स्टेशनला उतरल्यावर पश्चिमेला बाहेर पडून कनोसा हायस्कूल कुठे, असं विचारत जा. त्या शाळेसमोरच हे इराणी हॉटेल आहे. मुंबईहून गाडीने येणार असाल, तर पॅरेडाइज सिनेमाच्या उजव्या हाताला गेल्यानंतर पुढल्या सिग्नललाच उजवीकडे वळा. लगेचच उजव्या हाताला कॅफे इराणी चाय दिसेल.