गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

उपलब्ध सामग्री कमी असली की गरीब राष्ट्रांमध्ये नेहमीच पर्यायी स्वस्त आणि मस्त गोष्टी तयार होतात. आफ्रिकी राष्ट्रांमध्ये पत्र्याच्या डब्यांना लाकूड बांधून केलेल्या गिटार आदिवासी जमातींमध्ये लोकप्रिय आहेत. बासरी आणि ड्रम्ससाठीही या संपूर्ण खंडातील अनेक देशांमध्ये घरगुती वस्तूंमधून पर्याय निर्माण केले जातात. पण प्रगत राष्ट्रांमधील अधिकची उपलब्ध सामग्री योग्यरीत्या वापरून संगीतवाद्ये तयार करणारेही मोठय़ा प्रमाणावर आहेत. अशा कल्पक मेंदूंच्या कलाकृती गेल्या काही वर्षांमध्ये यू टय़ूबवर लोकप्रिय झाल्या आहेत. इटालियन संगीतकार अ‍ॅलेक्स मसारी याचे यूटय़ूबवरील अनेक व्हिडीओ प्रसिद्ध आहेत, ते इलेक्ट्रिक गिटारसारखे तीन तारांचे वाद्य वाजविल्यामुळे. इलेक्ट्रिक गिटार वाजवितानाही अनेक व्हिडीओ आहेत, पण सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडीओंमध्ये तीनतारीवरील वादन आहे. हे तीनतारी इलेक्ट्रिक वाद्य बनविले आहे वाइन बॉक्सपासून. रिकाम्या लाकडी खोक्याला बंद करून त्याला गिटारचा फ्रेटबोर्ड जोडून तयार करण्यात आलेल्या या वाद्याचा आवाज इलेक्ट्रिक गिटारसारखाच आहे. सहा तारांची गिटार किंवा चार तारांच्या मेंडोलिनऐवजी या माणसाने वाद्याचे वेगळेपण ठसावे म्हणून तीन तारा वापरल्या आहेत. ऑइल कॅनपासून गिटार कशी बनविता येते, त्याचे देशोदेशीचे अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत. नुसते गिटार बनविणेच नाही, तर त्याचे उत्तम वादनही त्या त्या मेकर्सनी करून दाखविले आहे.

विंटरगाटन नावाचा एक स्विडिश संगीत समूह आहे. त्यांनी पारंपरिक आणि आधुनिक वाद्यांना एकत्र जोडून मार्बल मशीन नावाचे एक विचित्र वाद्य तयार केले आहे. या वाद्याला वाजविण्यासाठी त्यांनी दोन हजार गोटय़ा वापरल्या आहेत. ताल आणि सूर अशा दोन्ही वाद्यांचा त्यात मिलाफ करण्यात आला आहे. हे वाद्य वाजवताना पाहणे हादेखील गमतीचा प्रकार आहे. ठिबकसिंचनाच्या शेतीच्या यंत्रणेसारखे दोन हजार गोटय़ांचे नियोजन या वाद्याला सूरमयी बनवून सोडते. या वादकाने या वाद्याची निर्मिती प्रक्रिया, त्यातून सूर जुळविण्याची पद्धती यांचाही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबत आणखी काही लहान इलेक्ट्रॉनिक वाद्ये तयार केली आहेत. जी वाजविणे आणि त्यांना पाहून त्यांचा विचार करणेही अवघड वाटावे.

अमेरिकेतील ब्लू मॅन नावाचा बॅण्ड हा त्यांच्या पाइप वाद्यांपासून तालवाद्यांसाठी ओळखला जातो. ही तिळ्यांची जोडी गेली तीसेक वर्षे इमारतींना वापरल्या जाणाऱ्या जाडजूड प्लास्टिक पाइप्सपासून तालनिर्मिती करीत आहे. त्यांचा चेहरा दिसत नाही. तो त्यांनी पूर्णपणे निळ्या मुखवटय़ांनी एकसारखा रंगवलेला असतो. निर्विकारपणे या तिळ्यांचा पाइपवादनाचा खेळ किंवा प्रदीर्घ परफॉर्मन्स चालतो आणि त्यांना पाहाय-ऐकायला तुफान गर्दी जमते. हे कलाकार इतके नावाजले होते, की त्यांच्यावर अनेक जाहिरातीही तयार झाल्या होत्या. प्रेक्षक त्यांचे पाइपवाद्य नेहमीच पसंत करतात. या पाइपवादकांपासून प्रेरणा घेऊन अनेक स्ट्रीट आर्टिस्टनी आपले स्वतंत्र पाइपवाद्य तयार केले आहे. दिसायला विचित्र असणाऱ्या या पाइपवाद्यांमधून तयार होणाऱ्या बीट्स ऐकाव्यात अशाच आहेत. एक व्हिडीओ आहे एका कॉलेजवयीन ड्रमवादकाचा. त्याने ड्रम्सऐवजी रंगांचे मोठे रिकामे डबे घेतले आहेत. या व्हिडीओत त्याचे अद्भुत कौशल्य पाहून थक्क झालेले रस्त्यावरील नागरिकही पाहायला मिळतात. त्याने वर्दळीच्या रस्त्यातील एक जागा निवडून या डब्यांची स्थिती पक्की केली आहे. या व्यक्तीला खऱ्याखुऱ्या ड्रम्स वाजविण्याचे प्रचंड मोठे कौशल्य अवगत असल्यामुळे त्याचे डब्रेडमवादन अफलातून बनले आहे. ज्यांना करवत ही लाकूड कापायचे अवजार म्हणूनच माहिती आहे, त्यांच्यासाठी एक वेगळी माहिती. करवत हे युरोपात गेली कित्येक शतके वाद्य म्हणूनही वापरले जाते. त्याला विशिष्ट दिशेत वाकवून व्हायोलिनचा बो फिरविला, तर सुखावणारा आवाज निघतो.  विश्वातल्या कणाकणात संगीत असते, हे नुसते तोंडदेखले बोल नाहीत. ही गोष्ट सिद्ध करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय आहे. त्याने घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून १०० हून अधिक वाद्ये तयार केली आहेत. जगभरातील वाद्यनिर्मिती आणि तिचा योग्य वापर यांच्या माहितीचा खजिना यूटय़ूबवर मिळू शकतो. त्यातून नवे वाद्य बनविण्याची कल्पनाही स्फुरू शकते.

https://www.youtube.com/watch?v=3WxuIDu7V00

https://www.youtube.com/watch?v=IvUU8joBb1Q

https://www.youtube.com/watch?v=mFfe4ZRQOH8

https://www.youtube.com/watch?v=-0gED3rn2Tc

https://www.youtube.com/watch?v=fLlAxq5TaL4

https://www.youtube.com/watch?v=Kmft674XPC0

https://www.youtube.com/watch?v=c__xzSfQA5g  

viva@expressindia.com