‘मायक्रोसॉफ्ट’मधली नोकरी, ‘ह्य़ुमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन’सारख्या हटके विषयातला अभ्यास आणि तो करतानाच जपलेली चित्रकलेच्या सर्जनात्मक आवड.. याविषयी सांगतेय युनिव्‍‌र्हसिटी ऑफ मिशिगनची जाई.

हाय फ्रेण्ड्स, मला शिक्षण आणि नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रांतांत राहायला मिळालंय. बाबा फॉरेस्ट ऑफिसर असल्यानं त्यांची महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बदलीच्या जागी आम्ही गेलो. बाबांनी केंद्र सरकारच्या एका संशोधन संस्थेत प्रतिनियुक्ती स्वीकारल्यानं आठवी ते दहावी राजस्थानात जोधपूरला गेलो. तिथं ‘सीबीएससी’चा अभ्यासक्रम असल्यानं आईला थोडं टेन्शन आलेलं. पाचवीपासूनच संस्कृत असल्यानं महिन्याभरात तीन वर्षांची संस्कृतची पुस्तकं आणून अभ्यास करावा लागला. वर्गात मराठी भाषिक नसल्यानं आणि नववीच्या मॅडममुळं माझं इंग्रजी चांगलंच सुधारलं. दहावीनंतर पुण्याला परतलो.

त्याआधी मुंबईला असताना चौथीत चित्रकलेत मार्क्‍स मिळविण्यासाठी क्लास लावला होता. मार्क्‍स चांगले मिळाले नि मला लागली चित्रकलेची गोडी. मग पेंटिंग करत राहिले. कॉलेजला गेल्यावर पेंटिंगवर लक्ष एकाग्र केलं. जलरंगातील चित्र रंगवायला शिकले पुण्याचे प्रा. सचिन नाईक यांच्याकडं. तेव्हापासून जलरंगांतला रस वाढला. त्यानंतर काही वर्षांत माझी चित्रकला अधिकाधिक बहरली. नंतर अभ्यासाच्या रेटय़ात चित्रकला बऱ्यापैकी मागं पडली. आई-बाबा मला सतत प्रोत्साहन देतात चित्रं काढायला. माझ्या चित्रांत मुंबई, हैद्राबाद आणि आता अ‍ॅन आर्बर आदी ठिकाणांची झलक दिसते. चित्रकला चांगली असल्यानं तू आर्किटेक्चरला का जात नाहीस, असे अनाहूत सल्ले मला मिळाले. पण मी कॉम्प्युटर सायन्सच घ्यायचं मनोमन ठरवलेलं. वैद्यकीय शिक्षणाच्या मर्यादित जागा आणि आवड नसल्यानं तो मार्ग माझा मीच बंद केला होता. बारावीला बोर्डात चांगले गुण पडले, पण ‘सीईटी’मध्ये समाधानकारक गुण न मिळाल्यानं ‘सीईओपी’त (कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे) जमलं नाही. घराजवळच्या ‘कमिन्स कॉलेज’मध्ये प्रवेश मिळाला. तिथल्या एका उपक्रमात नकळत ओढली गेले. मेक अ डिफरन्स (मॅड) या स्वयंसेवी संस्थेला वंचित मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी मुलं-मुलींची गरज होती. मी कुणाला कधी शिकवलं नव्हतं. पण अनुभव घेऊ , म्हणून त्यांना जॉइन झाले. दर रविवारी शिवाजीनगरच्या मुलांच्या आणि कर्वे संस्थेच्या मुलींच्या शाळेत जाऊन इंग्रजी शिकवू लागले. त्यामुळं एका वेगळ्याच जगाची ओळख झाली.

माझ्या मावसबहिणी आणि सीनिअर्सचं पाहून कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांला असताना ‘एम.एस.’ करायला अमेरिकेत जायचे विचार घोळू लागले. त्यादृष्टीनं ‘जीआरई’ दिली. मार्क खूप भारी नसले तरी चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळण्याइतके नक्कीच होते. माझ्या शेवटच्या वर्षांच्या प्रोजेक्टचा विषय होता ह्य़ुमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन. त्यातली गती पाहून ‘एम.एस.’साठी हाच विषय घ्यायचा निश्चित केलं. दरम्यान, कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये अनपेक्षितपणं आमच्या कॉलेजमधल्या तिघींची मायक्रोसॉफ्टमध्ये निवड झाली, त्यात मीही होते. कॉम्प्युटर क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपनीतल्या कामाचा अनुभव मिळणं आणि नुकत्याच पदवीधर झालेल्यांच्या दृष्टीनं भारी ठरणाऱ्या पॅकेजचा विचार करून मी एम.एस.चा विचार दोन र्वष पुढं ढकलला. पहिल्यांदाच नोकरीसाठी दूर हैद्राबादला राहावं लागणार होतं. घर शोधण्यापासून ते सामानाची व्यवस्था लावण्यापर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागल्या. हैदराबादला नव्या भागात राहात असल्यानं तेलुगू भाषा येत नसली तरी फारसं अडलं नाही. दोन वर्षांत तीनदा घर बदलण्यासकट सगळ्या गोष्टींत पटाईत झाल्यानं अमेरिकेत गेल्यावर फारसं वेगळं वाटलं नाही. मायक्रोसॉफ्टमध्ये जॉइन झाल्याच्या सुमारासच आमची टीम फॉर्म झालेली. ओपन वर्क कल्चर होतं. अधिकांशी तरुणाईचा भरणा असल्यानं टीम एनर्जेटिक होती. स्टार्टअप कल्चरसारखे सगळे एकाच लेव्हलला आणि अ‍ॅक्सेसेबल असायचे. कामाची वेळ फ्लेक्झिबल होती. ऑफिस कॅम्पस खूप चांगला होता. कर्मचाऱ्यांसाठी जिम वगैरे सुविधा होत्या. तिथल्या सायकलिंग, मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मायक्रोसॉफ्टच्या व्हिज्युअल स्टुडिओ टीममध्ये मी होते. आमची टीम त्यांच्या ऑनलाइन व्हर्जनवर काम करायची.
दरम्यान, एम.एस.साठी चांगल्या विद्यापीठांचा शोध घेऊन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. एम.एस.साठी फक्त ‘जीआरई’चे गुण विचारात घेतले जात नाहीत, तर ‘एसओपी’ही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामध्ये त्या विद्यापीठातच प्रवेश का घ्यायचाय, तुमच्या अभ्यासविषयात नेमकं काय करायचंय, हे सगळं व्यवस्थितपणं मांडावं लागतं. ‘एसओपी’सोबत त्या क्षेत्रातील प्राध्यापक, मॅनेजर्सची शिफारसही जोडावी लागते. ‘एसओपी’साठी बरीच मेहनत, लिखाण, पुनर्लिखाण करावं लागतं. काही काळानं चार विद्यापीठांतून होकार आला. मग अमेरिकेत गेलेल्या मित्रमंडळींचा सल्ला, मिशिगन विद्यापीठानं देऊ केलेली स्कॉलरशिप आदींचा विचार करून युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन आर्बर निवडलं. स्टुडण्ट कन्सेशन मिळतंय, म्हणून व्हिसा होण्यापूर्वीच विमानाची तिकिटं काढून झाली. अ‍ॅन आर्बरमध्ये राहणाऱ्या सीनिअर मुलींशी सोशल मीडियावरून संपर्क साधल्यानं राहण्याची सोय झाली. गुगल मॅपच्या साहाय्यानं आमचं विलो अपार्टमेंट, कॉलेज वगैरे ठिकाणं व्हच्र्युअली फिरून घेतली.

ह्य़ुमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करता येऊ शकतात. त्यात अजून साचेबद्धपणा आलेला नाहीये. त्यामुळं मी काम करण्यासाठी हेच क्षेत्र निवडणं पसंत केलं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये प्रोग्रॅमिंग झाल्यावर सॉफ्टवेअर इम्पिलिमेंट केलं जातं नि प्रॉडक्ट तयार केलं जातं. पण सॉफ्टवेअर डेव्हलपिंगपर्यंतची जी प्रोसेस असते, त्याला ह्य़ुमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन म्हणतात. त्यातील रिसर्चमध्ये सव्‍‌र्हे, मार्केटिंग आणि फिडबॅकचा समावेश असतो. मानवी वापरासाठी उपयुक्त ठरणारी प्रॉडक्ट तयार करणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी विविध घटक आणि कल्पनांचा वापर करून प्रॉडक्ट तयार केलं जातं. या क्षेत्राचं महत्त्व अलीकडं कंपन्यांना कळायला लागलंय.

इथल्या शिक्षणाची पद्धत एकदम वेगळी आहे. अटेंडन्ससह अभ्यास, प्रोजेक्ट्स, ग्रुपवर्क, होमवर्कचे गुण विभागले जातात. अभ्यासात स्वातंत्र्य दिलं जातं. खूप स्पर्धात्मक वातावरण असतं. कोर्सची निवड विद्यार्थ्यांना करता येते. ऑनलाइन कम्युनिटीज हा माझ्या आवडत्या विषयांपैकी एक. त्याचे प्रोफेसर आम्हाला प्रत्यक्ष जीवनातली उदाहरणं द्यायचे. ऑनलाइन कम्युनिटी जॉइन करून त्यावरून आम्हाला निरीक्षणं, संशोधन, चर्चा करायला लावायचे. त्यामुळं अभ्यासाचं बर्डन वाटायचं नाही. काही प्रोफेसर बोअर किंवा केवळ पुस्तकी बाजाचे होते. पण बरेच प्रोफेसर उत्साही इन्थुझिअ‍ॅस्टिक नि एनर्जेटिक आहेत.

पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये फारसं काही नॉनअ‍ॅकॅडमिक करायला मिळालं नाही. हे सेमिस्टर खूप हेक्टिक असतं. इथं स्कॉलरशिप लंचच्या वेळी स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थी आणि स्कॉलरशिप देणारी मंडळी भेटतात. त्या वेळी आपल्या डोनरशी संवाद साधून त्यांचे आभार मानता येतात. त्यासाठी आम्हाला थँक्यू लेटर लिहायला सांगण्यात आलं होतं. मी ते पत्र आधी टाइप केलेलं. पण नंतर शाई पेनानं ते लिहिलं. इतरांसारखी प्रिंटआऊट नसल्यानं, हाती लिहिल्यानं त्यांना ते खूप आवडलं. यानिमित्तानं दरवर्षी पाच जणांना भाषणाची संधी मिळते. त्यात माझाही समावेश होता. भारतात असताना एखादी तरी परदेशी भाषा शिकावी, असं प्रकर्षांनं जाणवल्यानं स्पॅनिश शिकले. इथं स्पॅनिश ही दुसरी भाषा आहे. अभ्यासाच्या व्यवधानांमुळं स्पॅनिशचा अजिबात सराव नव्हता. आता सराव करायला लागलेय. कधी तरी त्याचा नक्कीच फायदा होईल. या फिल्डमध्ये आवश्यक असणारी http://www.jaeeapte.com  ही वेबसाइट तयार केली. सध्या मी युनिव्हर्सिटीच्या डिजिटल एज्युकेशन अ‍ॅण्ड इनोव्हेशन लॅबमध्ये यूएक्स डिझाइनर म्हणून इंटर्नशिप करतेय. यूएक्स डिझाइनर हा युजर आणि कंपनीतला दुवा असतो. माझं काम एज्युकेशन टेक्नॉलॉजीशी निगडित आहे.

मित्रमंडळींसोबत ट्रेकिंग, स्टारगेझिंग, कॅम्प्िंाग, हाइकिंग अशा आवडत्या आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. ग्रॅण्ड कॅननसह अनेक ठिकाणी फिरलो. अभ्यासामुळं फारसा वेळ नाही मिळत फिरायला. जवळच्या जॅक्सन या छोटय़ा शहरात प्रोजेक्टसाठी गेल्यावर थोडी जुन्या वळणाची म्हातारी माणसं भेटली. आमच्याविषयी खूप उत्सुकता वाटल्यानं त्यांनी जाम गप्पा मारल्या होत्या आमच्याशी. अ‍ॅन आर्बरमधले लोक सुसंस्कृत आहेत. विद्यार्थ्यांसोबत वावरताना, बोलताना त्यांना फारसं वेगळं वाटत नाही. ही लोकं खूप विनयशील आहे. सतत ‘थँक्यू’ म्हणतात. आता ही सवय मलाही लागलेय.

युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यायला म्हणून मी आले, तेव्हा एक भारी किस्सा घडलेला. शिकोगाला खूप कडक तपासणी होते असं ऐकलं होतं. तिथं रॉ फूड आणि फळं न्यायला परवानगी नाहीये, हे स्पष्टपणं सांगितलं गेलेलं. उतरायच्या आधी तासभर विमानात सॅण्डविच दिलेले. मी व्हेज घेत होते. विमानातही ते विचारून सव्‍‌र्ह करायचे. पण मुक्कामाला पोहोचण्याआधी त्यांनी प्रत्येकाच्या हातात सॅण्डविच दिले. विचारलं नाहीच. ते व्हेजच असेल असं मला वाटलं. ते मी अर्ध खाऊन पर्समध्ये ठेवून दिलं. इमिग्रेशनमध्ये गेल्यावर तिथला तगडा कुत्रा हुंगायला लागला. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला तसं विचारलंही. मी नाही म्हटलं. मग तिनं पर्स चेक करायची परवानगी घेऊन चेक केल्यावर तिला ते चिकन सॅण्डविच आढळलं. मी माहिती नव्हतं सांगितलं आणि सगळी कथा ऐकवली. मग तिनं इमिग्रेशन फॉर्मवर तसं लिहिलं नि माझी सुटका झाली. तसं झालं नसतं तर? अंहं.. विचारच करवत नाही..

जाई आपटे, अ‍ॅन आर्बर
(शब्दांकन : राधिका कुंटे) 
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com