फॅशनेबल राहण्याच्या, सुंदर दिसण्याच्या काही साचेबद्ध कल्पना प्रचलित आहेत. अशा ठोकळेबाज संकल्पनांना छेद देत अगदी कोणीही आपलीशी करू शकेल, अशी फॅशन सध्या रॅम्पवर झळकते आहे. कम्फर्टेबल आणि इकोफ्रेण्डली हे दोन शब्द आजच्या फॅशनमध्ये महत्त्वाचे ठरत आहेत. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्येही हेच दिसलं. फॅशनमधून लिंगभेद, वर्णभेद मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, तशी सौंदर्याची ठोकळेबाज परिभाषा मोडीत काढणारी फॅशन पुढे आली.

वर्षांतून दोन वेळा साजरा होणारा देशातील महत्त्वाचा फॅशन सोहळा म्हणजे लॅक्मे फॅशन वीक. नामवंत डिझायनर्सबरोबर सेलेब्रेटींच्या मांदियाळीमुळे हा फॅशन सोहळा नेहमी चर्चेत असतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत हा सोहळा पार पडला. समर रिसॉर्ट कलेक्शनमध्ये नेहमी दिसणारे व्हायब्रंट रंग या वेळी नव्हते. त्याऐवजी सौम्य, पेस्टल शेड्स बहुतेक डिझायनर्सनी वापरल्या होत्या. फॅशन शो म्हणजे उंच, देखण्या मॉडेल्सनी सादर केलेले अंगासरशी घट्ट बसणारे कपडे, हाय हिल्स आणि गडद मेकअप अशा संकल्पना मनात असतात. या सगळ्याला छेद देणारी फॅशन या वेळी दिसली. वापरायला सुटसुटीत, कोणीही आपलीशी करू शकेल अशी किंवा काही तरी सांगू पाहणारी स्टेटमेंट फॅशन या वेळी दिसली. फॅशन रॅम्पवरच्या मॉडेल्स वेगळ्या होत्या आणि फॅशन शोच्या थीम्समधूनही पारंपरिक सौंदर्यकल्पनांना छेद देण्यात आला.

फॅशन जगतात नवनवे बदल पाहायला मिळतात आणि त्यात प्रयोगशीलता आढळून येते, पण सर्वसामान्य व्यक्तींपासून फॅशन रॅम्प काहीसा दूर असतो. फॅशन रॅम्पवरची फॅशन प्रॅक्टिकल नसल्याची चर्चा नेहमी होते. या वर्षी मात्र फॅशन जगात सामान्यांनाही कशा पद्धतीने सामावून घेता येईल याचा विचार डिझायनर्सकडून केला गेला. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीक  समर रिसॉर्ट २०१७ मध्ये ‘टॅग फ्री’ हा शो सादर करण्यात आला. रंग, रूप, उंची, बांधा, लिंग, वय यांचा फॅशनशी काहीही संबंध नाही. प्रत्येकासाठी फॅशन खुली असते यावर आधारित हा शो सादर  होता. क्षितिज कांकरिया या फॅशन स्टायलिस्टने या शोसाठी स्टायिलग केले. बॉडीज, ध्रुव कपूर, म्यिुनिकु, राजेश प्रताप सिंग, रॉ मँगोज, संचित आणि सुकेत धीर या लेबल्सचे आऊटफिट्स ‘टॅग फ्री’ या शोमध्ये सादर केले गेले.  कम्फर्टेबल आणि इकोफ्रेण्डली हे दोन शब्द या वेळच्या फॅशनमध्ये आघाडीवर आहेत. यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक-२०१७’ मध्ये डिझायनर नौशाद अली याने कॉटन आणि सिल्क साडय़ांपासून आपलं कलेक्शन तयार केलं. नौशाद म्हणाला, ‘भारतीय स्त्रिया साडीशी लगेच कनेक्ट होतात. या सगळ्या भावना लक्षात घेऊन मी साडीपासून माझं कलेक्शन बनवलं. माझ्या कलेक्शनमध्ये मी कॉटन आणि सिल्क साडय़ा वापरल्या. त्यापासून मी वेस्टर्न आणि तरीही साडीची नजाकत टिकून राहील, असे आऊटफिट्स बनवले. अनेक वर्षांपासून आपल्या विणकरांनी जी पद्धत वापरली आहे तेच माझ्या कलेक्शनमधून मी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या टेक्स्टाइल्स जतन करण्याचा प्रयत्न मी केला आहे.’

इको फ्रेण्डली फॅशन

कॉटन, खादी, लिनन, मल अशा टेक्स्टाइलना फॅशनेबल समजले जात नाही. कारण पाश्चिमात्य जगातील फॅशनमध्ये यांचा वापर होत नाही. गाऊन्स, मॅक्सी ड्रेसेस यासाठी नेहमी शिफॉन, सॅटिन, जॉर्जेट किंवा तत्सम सिंथेटिक फॅब्रिकला प्राधान्य दिलं जातं. मोठय़ा समारंभांना किंवा पाटर्य़ाना या अशा कृत्रिम धाग्यापासूनचेच फॅब्रिक्स वापरले जातात. पण गेल्या काही वर्षांत देशी कापडाचा वापर करून आधुनिक कपडे बनवणारे डिझायनर्स वाढले आहेत. सस्टेनेबल फॅशन या नावाने हे डिझायनर्स ओळखले जातात. यंदा काही डिझायनर्सनी पर्यावरणपूरक फॅशनचा पुढचा टप्पा गाठत जुन्या कापडापासून नवीन कलेक्शन सादर केलं. भारतीय पारंपरिक टेक्स्टाइल नवीन स्वरूपात सादर झालं. मेखला चादोरसारख्या पारंपरिक आसामी टेक्स्टाइलचा देखणा प्रयोग यंदा लक्षात राहणारा होता. डिझायनर नौशाद अली याने पारंपरिक पाचवारी साडय़ांपासून संपूर्ण वेस्टर्न कलेक्शन तयार केलं होतं. पद्मजा कृष्णन हिने आपल्या कलेक्शनमध्ये चरख्यावर बनवल्या गेल्या फॅब्रिकचा आपल्या कलेक्शनमध्ये उपयोग केला होता.

सौंदर्याची परिभाषा मोडण्याचे प्रयत्न 

लॅक्मे फॅशन वीकच्या समारोप सोहळ्यात डिझायनर अनिता डोंगरे यांनी साधी तरीही क्लासी डिझाइन्स सादर केली. या ग्रॅण्ड फिनालेची शो स्टॉपर करीना कपूर खान होती. बाळाला जन्म दिल्यानंतर ४३ व्या दिवशी ती रॅम्पवर उतरली होती. तिच्या ऑफव्हाइट आउटफिटला साजेसा आणि तेवढाच मेकअप करीनाने वापरला होता, हे विशेष. आई झाल्यांनतर तिच्यात झालेले शारीरिक बदल झाकण्यासाठी कोणत्याही पद्धतीने मेकअप किंवा स्टायलिंग नव्हतं. नॅचरल लुक होता. ‘झिरो फिगर’साठी ओळखल्या जाणाऱ्या करीनाने या वेळी मात्र गोबरे गाल आणि बाळंतपणानंतर काहीसं सुस्तावलेलं शरीर या आपल्या बदलांसकट रॅम्पवॉक केला. तिच्या या धाडसाचं, आत्मविश्वासाचं कौतुक झालं. याआधीच्या फॅशन वीकमध्येही म्हणजे ऑगस्ट २०१६च्या विंटर फेस्टिव्ह सीझनच्या समारोप सोहळ्यात डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांचा लेहेंगा घालून गरोदर करीनाने बेबी बम्प आत्मविश्वासाने मिरवले होते. उंच, सडपातळ, धारदार नाक, टपोरे डोळे, रुंद कपाळ, लांबसडक केस अशी चेहऱ्यावरची लहानसहान फीचर्स पारंपरिक सौंदर्याची लक्षणं मानली जातात. परंतु या वर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये यातील अनेक सौंदर्याच्या ठोकताळ्यात न बसणाऱ्या ईशान्येकडील राज्यातील मॉडेल्सनीसुद्धा रॅम्प गाजवला.

सुडौल बांध्याच्या संकल्पनेला नवीन वळण

या वर्षी प्लस साइझ मॉडेल शोदेखील पाहायला मिळाला. गेल्या सीझनला ‘ऑल’ या प्लस साइझ क्लोदिंग ब्रॅण्डचे आउटफिट्स रॅम्पवर झळकले होते. कोणत्याही बांध्याच्या व्यक्तीला वापरता येतील, असे कपडे या वेळी रॅम्पवर पाहायला मिळाले. अंगासरशी घट्ट बसणाऱ्या डिझाइन्सऐवजी मोकळी-ढाकळी सैलसर डिझाइन्स या वेळी जास्त होती. अशी डिझाइन्सही अत्यंत कलात्मक पद्धतीने बनवण्यात आली. त्यासाठी लेअरिंगचा पुरेपूर वापर यात करण्यात आला होता. त्यामुळे कुठल्याही अंगयष्टीच्या स्त्रियांना चांगली दिसतील अशी ही डिझाइन्स होती. मी बारीक असते तर असे फॅशनेबल कपडे घातले असते, असं आपल्याकडे अनेक जणींना वाटतं. फॅशनची साचेबद्ध कल्पना त्यामागे असते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न या डिझाइन्समधून दिसला. भडक रंग जाड व्यक्तींना शोभून दिसत नाहीत असा समाज आहे. या वर्षी कपडय़ांच्या लाइट आणि पेस्टल शेड्स रॅम्पवर जास्त पाहायला मिळाल्या. तरीही त्याबरोबरीने काही व्हायब्रण्ट फॅशन एलिमेंट्स त्या फॅशनमध्ये सामावलेले होते.

लिंगभेदापलीकडची फॅशन

जगातील पहिला जेंडर न्यूट्रल मॉडेल पीटर नित्का लॅक्मे फॅशन वीकच्या या सीझनच्या निमित्ताने प्रथमच भारतीय फॅशनजगात दिसला. पीटर वीमेन्स आणि मेन्स वेअर अशी दोन्ही कलेक्शन्स सादर करतो. लोकसत्ता व्हिवाशी बोलताना पीटर म्हणाला, ‘लिंगाधारित भेदभाव मोडीत काढण्याचा माझा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रोफेशनप्रमाणे मॉडेलिंगमध्येही लिंगभेद, वंशभेद, वर्णभेद असता कामा नयेत. माझी शारीरिक उंची प्रस्थापित पुरुष मॉडेल्सएवढी नाही, त्यामुळे माझी इच्छा असूनही मी मॉडेलिंग करू शकेन का याविषयी साशंक होतो. पण एका श्रीलंकन फोटोग्राफरने केलेल्या शूटनंतर मी जेंडर न्यूट्रल असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी अभिमानानं माझं वेगळेपण मिरवायला लागलो.’ पद्मजा कृष्णन, जया भट्टा आणि रुची त्रिपाठी या डिझायनर्सच्या कलेक्शनसाठी पीटर नित्काने रॅम्प वॉक केला.

पीटरप्रमाणे नेपाळी मॉडेल अंजली लामा हिने यंदाचा फॅशन वीक गाजवला. अंजली ट्रान्सजेंडर आहे. ‘टॅग फ्री’ या इनिशिएटिव्हसाठी अंजलने रॅम्प वॉक केला. ‘एलजीबीटी’ कम्युनिटीनं या बदलांचं स्वागत केलं आहे.

एकेकाळी ‘झीरो फिगर’मुळे गाजलेल्या करीना कपूर खानने बाळाला जन्म दिल्यानंतर ४० व्या दिवशी कामाला सुरुवात केली. ग्रॅण्ड फिनालेला डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनसह शो स्टॉपर म्हणून ती उतरली तेव्हा बाळंतपणानंतर  सुस्तावलेलं शरीर, गोबरे गाल लपवण्याचा अजिबात प्रयत्न तिच्या स्टायलिंगमध्ये नव्हता. प्रामाणिक,  सुटसुटीत, इको फ्रेण्डली बंधमुक्त फॅशन हीच यंदाची वैशिष्टय़ं होती.

viva@expressindia.com