तीन देशांच्या तीन तऱ्हा. विभिन्न संस्कृती, जीवनशैली, भन्नाट निसर्गसौंदर्य या आगळ्या अनुभवविश्वातले काही क्षण वेचतेय, सिंगापूरची सायली जोशी.

आठवतेय मला दुबईतली ती डेझर्ट सफारी. गुडुप अंधार नि भोवताली फक्त शांततेचा आवाज. सहज लक्ष गेलं आकाशाकडे नि मी पाहातच राहिले. मुंबईकर असल्यानं हा अनुभव कधीच घेतला नव्हता. आकाश ताऱ्यांनी कसं खच्चून भरलं होतं.. तो क्षण अविस्मरणीय ठरला. आता विचार करताना वाटतंय की, कदाचित ते तारे आपल्याला आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्यायला तर सांगत नसतील ना.. की नकळतपणे मी ते फॉलो करतेय..

एनएम कॉलेजमधून बॅचलर्स इन कॉमर्स केलं. पुढं ‘सीए’च्या अभ्यासात फारसा रस वाटला नाही. त्यामुळं एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटमधून मास्टर्स इन ग्लोबल मॅनेजमेंट- इन्व्हेस्टमेंट बँकिंग अ‍ॅण्ड वेल्थ मॅनेजमेंट (फायनान्स) केलं. या कोर्सदरम्यान मला तीन देशांत राहण्याची संधी मिळाली. पैकी सिडनी आणि दुबईत चार महिने राहिले आणि सध्या मी सिंगापूरला राहतेय. तोपर्यंत मी मुंबईत घर-कॉलेज आणि अभ्यासाच्याच विश्वात रमलेले होते. या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांमुळं मी स्वत:बद्दल नव्यानं विचार करायला, संवाद साधायला, शेअरिंग करायला शिकले. लहानपणापासून वाचनाची आवड असली, तरी आपण कधी लिहू शकू, असं वाटलं नव्हतं. पण इथं राहायला आल्यावर एकटेपणा वाटला नि मनातले विचार शब्दांतून मांडू लागले. हे लिखाण अनेकांना आवडायला लागलं. मात्र गेल्या वर्षभरात कामाच्या व्यापामुळं फारसं काही लिहायला वेळ नाही मिळालाय.

8अनुभवानं मी नवीन ठिकाणी महिनाभरात आत्मविश्वासपूर्वक अ‍ॅडजस्ट व्हायला शिकलेय. सिंगापूरमध्ये गेलं दीड वर्ष राहतेय. इंटर्नशिपदरम्यान माझं काम आवडल्यानं मला सेंट जेम्स प्लेस वेल्थ मॅनेजमेंटमध्ये जॉब मिळालाय. दुबईच्या पहिल्याच परदेशवारीमुळं मी खूप एक्साइट होते. सुरुवातीला ते मॉर्डन दिसलं, तसं ते नाहीये. त्याच्या अंतरंगात डोकावलं तर ते त्यांच्याकडची गरिबी जगापासून लपवताहेत, असं जाणवतं. तिथं स्थानिक लोक २०-२५ टक्के असून बाकीचे बाहेरचे आहेत. त्यामुळं स्थानिक वेगळे दिसून येतात. स्थानिक स्त्रिया बुरख्यात वावरतात. बाकीच्यांना एवढं रिस्ट्रिक्शन नाही. शिक्षणाची गोडीही सगळ्यांना लागलेय. मुंबईत आम्ही क्वचित कधी नॉनव्हेज खायचो, पण आता मला ते आवडायला लागलंय. दुबई ही खवय्यांसाठी पर्वणीच आहे जणू. तिथले कबाब, नान आणि हमसचं कॉम्बिनेशन मला फार आवडलं. सिंगापूरच्या खाद्यसंस्कृतीशी मात्र सुरुवातीला अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ गेला. सिडनी मात्र सर्वाधिक आवडलं. युरोपीयन फिल येतो. लोक खूप फ्रेण्डली वाटले. ते एवढे रिलॅक्स्ड वाटले की, जणू त्यांना कुठं पोहोचायची घाई नाही. तिथं आऊटडोअर कल्चर जाणवलं. हवामान खूप छान नि अतिप्रचंड नॅचरल ब्युटी आहे. तिथली चार दिवसांची गावचा खासा फिल देणारी ट्रिप खूपच भारी होती.

सिंगापूर आता मला आपलं घरच वाटायला लागलंय. या छोटय़ा शहरात मला खूप सेफ वाटतं. रात्री फिरताना वगैरे भीती वाटत नाही. तिथं कटाक्षानं सगळ्या नियमांचं पालन केलं जातंच. मी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतेय. इथलं वर्क कल्चर खूप चांगलं आहे. शिस्त- वेळेच्या पालनाप्रमाणेच फॅमिली टाइम आणि वर्कलाइफ बॅलन्सला खूप महत्त्व दिलं जातं. हा ब्रिटिश नि सिंगापूर संस्कृतीचा प्रभाव असावा. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच एफिशिएंट असल्यानं मला प्रचंड आवडतेय.

इथल्या तरुणाईला इंग्रजी येत असलं तरी म्हाताऱ्या चायनीज दुकानदारांना इंग्रजीचा फारसा गंध नाही. अशाच एका हॉटेलमध्ये चायनीज डिश ऑर्डर करताना आमची पंचाईत झालेली पाहून एक तरुण चायनीज मुलगी आमच्या मदतीला धावली होती. इथं आपल्यासारखी एकत्र कुटुंबव्यवस्था आहे. सिंगापूरमध्ये फिटनेसला खूपच महत्त्व दिलं जातं. जॉगिंग करणं कुणीच चुकवत नाहीत. त्यासाठी चांगली सोयही उपलब्ध आहे. लोक अगदी मोजूनमापून खातात.

 

रोजच्या धावपळीतही काही वेळा मात्र घरची फारच आठवण येते मला.. विशेषत: कुठं आई-मुलगी एकत्र पाहिल्यावर किंवा सणावाराला.. मग पटकन सोशल मीडियाचा आधार घेते. आठवडय़ाला फुरसतीत गप्पा होतातच. आमच्या कोर्सदरम्यान अनेकांशी ओळखी झाल्या होत्या. त्यापैकी इथं जॉब करणाऱ्या आमचा छान ग्रुप तयार झालाय. सध्याचा जॉब माझा स्टेपिंग स्टोन म्हणून खूप छान असला, तरी इथं सेटल व्हायचं नाहीये. भारतात परतायचं की दुसऱ्या देशात संधी मिळाली तर जायचं का, याचा अजून विचार केलेला नाहीये. बघू या काय ठरतंय ते.. पाऊलो कोएलोनं लिहिलंच आहे की, In magic – and in life – there is only the present moment, the now.”

(शब्दांकन- राधिका कुंटे)

 

‘ती’चं विश्व, ‘ती’चं अवकाश, ‘ती’चं करिअर, ‘ती’चा ध्यास.. त्यासाठी तिला घरापासून दूर जावं लागतं. देशी-परदेशी.. आपल्या अनुभवांची टिपिकल चौकट ओलांडताना कोणकोणते अनुभव बांधते ती गाठीशी? कशी वावरते, राहते परक्या प्रांतात.. कशी अॅडजस्ट करते त्या संस्कृतीत स्वत:ला.. काय काय जाणवतं तिला.. ते या सदरातून वाचायला मिळणार आहे.

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘हो धरिला परदेस’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com