संवादातून झंकारला नृत्याविष्कार

मोठा वाद्यवृंद, झकपक वेषभूषा, ठळक रंगभूषा, अगदी घुंगरूदेखील नसताना ‘तिचा’ तो नृत्याविष्कार रंगला. मनमोकळ्या गप्पांमधून नृत्याभिनयाचे विविध पैलू उलगडत गेले आणि या नृत्यसंवादातून एका वेगळ्या वाटेवरच्या यशस्वी करिअरची ओळखही झाली. निमित्त होते गेल्या मंगळवारी (दिनांक १२ जुलै) पाल्र्यात रंगलेल्या लोकसत्ता व्हिवा लाउंजचे. प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस या मुक्त संवादाच्या निमित्ताने नृत्यप्रेमाविषयी भरभरून बोलली. देश-विदेशातील नृत्य सादरीकरणाचे तिचे अनुभवही तिने मांडले.
अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी शर्वरीशी संवाद साधला.
या नृत्यसंवादातून टिपलेले काही शब्दरूपी नूपुरमणी..
लावणी असो वा आयटम साँग.. कुठलंच नृत्य सवंग नसतं, त्याचं प्रदर्शन सवंग असू शकतं. शृंगार हा नृत्यातला एक भाव आहे; तो नृत्यातील भावापुरताच मर्यादित असावा. नृत्यात सवंगता येऊ शकते ती वेशभूषेतून. नृत्यप्रदर्शन करायचंय की अंगप्रदर्शन हे आपलं आपण ठरवायचं.

माझं नृत्य हीच ध्यानधारणा
एकदा एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून मेडिटेशनसाठी एका कार्यक्रमाला गेले. सुदर्शनक्रिया करताना तिथले गुरुजी सूचना देत होते. एकाग्रतेसाठी सगळे विचार दूर ठेवा. मेंदूला स्वयंसूचना द्या, असं सांगून भौतिक गोष्टींपासून लांब जा, विचारांकडे तटस्थपणे पाहा अशा सूचना देण्यात आल्या. त्या मेडिटेशननंतर मला खरंच खूप शांत वाटलं. पण अगदी तसंच माझ्या रियाजानंतर वाटतं हे लक्षात आलं. जेव्हा मी सकाळी तासभर तत्कार करते, माझा पदन्यास सुरू असताना माझं सगळं लक्ष तालाकडे असतं, समेवर असतं. मग आज माझ्या मुलाला शाळेत सोडायला कधी जायचंय, स्वयंपाकाची बाई आली नाही तर काय.. वगैरे दुसरे कोणतेही विचार यायला संधीच नसते. या भौतिक गोष्टींकडे दुर्लक्ष आपोआप होतं. माझ्यासाठी माझी नृत्यसाधना हेच माझं मेडिटेशन, हीच माझी ध्यानधारणा आहे, हे तेव्हा लक्षात आलं.

सर्व गुण उपजत नसतात
प्रत्येक माणसाला उपजतच तालाची-लयीची जाण असेल असं नाही. नृत्यामध्ये आवश्यक लालित्य जन्मजात असेल असं नाही. काही जणांमध्ये ही लय, हे लालित्य नैसर्गिकच असतं. त्यांना ताल समजतो, सम कळते, पण त्यांचा अभिनय तेवढा पक्का असेल असं नाही. त्यांचा चेहरा तेवढा बोलका असेल असं नाही. नृत्याला आनुषंगिक गुण प्रत्येकामध्ये कमी-जास्त प्रमाणात असतात. आपल्यात जी कमतरता आहे ती रियाजानं भरून काढली पाहिजे. जे कमी आहे, त्यावर मेहनत घेतली पाहिजे, हे माझ्या गुरूंनी शिकवलं. माझ्याबाबतीत बोलायचं तर संगीतावर उत्स्फूर्तपणे प्रकट होणं माझ्यात होतं. गुरूंनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे त्यात लालित्य निर्माण झालं. मला लय-तालाचं उत्तम ज्ञान नव्हतं. त्यावर जास्त मेहनत घेतली. अजूनही घेते आहे. तालाचं ज्ञान घेण्यासाठी सध्या तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडेदेखील आणखी सखोल शिक्षण घेतेय.
भपकेबाज नृत्याची लोकप्रियता दुर्दैवी
लोकांची अभिरुची खूप झपाटय़ाने बदलत चालली आहे. चकचकीत, ग्लॅमरस ते सगळं हल्ली हवं आहे. चकचकीत स्टेजवर समूह नृत्यात ५० जण एकसारखे नाचताहेत. भपकेबाज कॉस्च्युम्स घातलेल्या पुढच्या एका नर्तकाने त्या एवढय़ा झगझगाटात काहीही केलं तरी भव्य वाटतं. या नृत्यातली एक तरी स्टेप लक्षात राहते का? सगळा मिळून परिणाम आपल्या लक्षात राहतो आणि तो भव्य असतो, पण पोकळ असतो. हे दुर्दैवी आहे. सशक्त नृत्य लक्षात राहायला हवं, त्यासाठी कशाला हवी आहे प्रॉपर्टी, कॉस्च्युम्स आणि हा भपकेबाजपणा? मला एका चॅनेलसाठीच्या कार्यक्रमामध्ये नृत्य करायला बोलावलं होतं. शिवाजी महाराजांच्या संदर्भातील काव्यावर नृत्य होतं, त्यातला छोटा तुकडा मला करायचा होता. कवी भूषणाचं काव्य नृत्यातून दाखवता येईल असं होतं. मी त्यातल्या साहित्याचा विचार करत मनात कल्पना करत होते. प्रत्यक्षात मला त्या कोरिओग्राफरनं केवळ त्या संगीताच्या तालावर मोजक्या चार स्टेप्स करायला सांगितल्या. सगळा भर भव्य सेट, कॉस्च्युम्स, समूहनृत्य आणि म्युझिकचा ठेका यावर होता. काव्याचे शब्दच नव्हते त्यात. एवढय़ा चांगल्या काव्याला नृत्यातून दाखवण्याचा दृष्टिकोनच नव्हता. कुणाला साहित्य ऐकायचंच नव्हतं. या भपकेबाजपणाचं वाईट वाटतं.

2

‘मोर’पण भिनावं लागतं..
‘कथक’ ही मैफलीत रंगणारी नृत्यशैली असल्यामुळे यातला अभिनय तरल असतो. पण हल्ली मैफलींचं स्वरूप बदललं आहे. मोठय़ा महोत्सवांमध्ये चार-आठ हजार प्रेक्षकांसमोर कला सादर करायची असते. बाजूला मॉनिटर लावलेले असतील, तरीही थोडा ठळक अभिनय करावा लागतो. शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकापर्यंत अभिनयातून संवाद पोचवायचा असेल तर हे आवश्यक असतं. माझ्या गुरु पंडिता रोहिणी भाटे हे खूप छान समजावून सांगायच्या.. तुला मोर दाखवायचा असेल तर मोराचा पिसारा, डोक्यावरचा तुरा, चोच हे मुद्रांमधून तू दाखवशीलच, मात्र तुझ्या अंगात ते ‘मोर’पण भिनलं पाहिजे. एकदा ते भिनलं की नुसत्या डोळ्यांनीही तो प्रेक्षकांना दाखवता येईल.

वर्क- डान्स – लाइफ बॅलन्स
नृत्य, क्लास, रियाज, घर असं सगळं एकत्र सांभाळायची वेळ येते तेव्हा आपण कशासाठी किती आणि कसा वेळ देणार आहोत हे ठरवावं लागतं. नृत्याच्या क्षेत्रात वयाचीसुद्धा मर्यादा येते. त्यामुळे मिळालेल्या वेळाचा अधिकाधिक उपयोग करून घेणं गरजेचं आहे. इतर वर्किंग वीमेनप्रमाणे मीदेखील प्रेग्नंट असताना सहाव्या महिन्यापर्यंत रियाज करत होते आणि अगदी नवव्या महिन्यापर्यंत क्लासमध्ये शिकवतसुद्धा होते. मुलगा चार महिन्यांचा असताना मला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं होतं. तिथे माझा दीड तासाचा सोलो परफॉर्मन्स होता. हा दौरा दीड-दोन र्वष आधी ठरलेला. त्यामुळे लवकरात लवकर रियाज सुरू करता यावा.. नॉर्मल डिलीव्हरी व्हावी अशी प्रार्थना करत होते, मात्र सीझर झालं. बाळाच्या जन्मानंतर अगदी काहीच दिवसांत पुन्हा हळूहळू रियाजाला सुरुवात केली. बाळाला समोर ठेवून त्याच्याशी बोलत, त्यालाच बंदिशीचे बोल ऐकवत, त्याला गुंतवून ठेवत रियाज करायचे, जेणेकरून त्याला आई दिसतही राहायची आणि माझ्या रियाजातही खंड पडत नसे.

करिअरच्या अनेक वाटा..
नृत्यशास्त्रात पदवी घेतली म्हणजे तुम्ही नर्तक होता असं नव्हे. नर्तक होण्यासाठी वेगळी साधना लागते आणि डिग्रीसाठी वेगळा अभ्यास. नृत्याच्या क्षेत्रात केवळ सादरीकरण महत्त्वाचं असा समज असतो, पण हे खरं नाही. करिअरचे अन्य मार्गही खुले आहेत. तुम्ही नृत्यशिक्षक- प्रोफेसर होऊ शकता. आता मुंबईत तर आहेतच.. पुण्यात नृत्यातील पदवी देणारी तीन विद्यापीठं आहेत. याशिवाय तुम्ही नृत्यसमीक्षक होऊ शकता. खूप कमी नृत्यसमीक्षक सध्या महाराष्ट्रात आहेत. नृत्य बघणारे आणि त्यावर लिहिणारे पुष्कळ आहेत. पण लिहिण्यापूर्वी आम्हालाच ते नेमकं काय केलं ते विचारतात. आम्हीच आमच्याबद्दल सांगितलं तर नृत्य चांगलं की वाईट ही समीक्षा कोण करणार? नृत्य शिकलेला माणूस त्याबद्दल लिहील तेव्हा त्याला नृत्यातल्या संज्ञा, सादरीकरणातलं डावं-उजवं समजेल. याशिवाय उत्तम डान्स फोटोग्राफर होऊ शकता. नृत्याचे फोटोग्राफ्स काढणं सोपं नाही. नृत्य समजणाऱ्या मुलीला नृत्यांगना समेवर कधी येणार हे बरोबर माहिती असतं. नृत्याचे सगळे बारकावे माहीत असलेली व्यक्तीच प्रत्येक मुद्रा कॅमेऱ्यात टिपू शकते.
नृत्याच्या कार्यक्रमांसाठी प्रकाशयोजना करणारे सध्या बहुतेक नाटकवाले असतात. त्यांना संगीताला प्रतिसाद द्यायचं कळतं. तो संगीताच्या प्रेमात असतो. संगीत जर कुठे करुणरस दर्शवणारं वाजत असेल, तर त्याला वाटतं.. करुण भाव म्हणजे लाइट्स डीम हवेत. पण चेहऱ्यातून आणि डोळ्यातून भावना दाखवत असेल, तर तिचे डोळे दाखवणे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे नृत्य कळणाऱ्याला समजू शकतं आणि डोळे दिसतील असे लाइट्स तो देतो. लाइट डिझायनर जर डान्सर असेल तर तिला बरोबर माहिती असतं की, चेहऱ्यावरचे भाव किती महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी लाइट कसा हवा. कॉस्च्युम डिझायनर, लाइट्स डिझायनर, समीक्षक, छायाचित्रकार असे अनेक मार्ग नृत्यशिक्षणानंतर खुले होतात.

रिअ‍ॅलिटी शोमुळे भवितव्य घडत नाही
शास्त्रीय नृत्याचा रिअ‍ॅलिटी शो ही खूप लांबची गोष्ट आहे. शास्त्रीय नृत्यासाठी थोडा स्लॉट मिळाला, तरी पुष्कळ आहे. इनसिंकसारखा अपवाद वगळता आपल्याकडे हल्ली तेवढंही होत नाही. मी एका नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोचं परीक्षण केलं आहे. त्यातून कुणाचं भवितव्य घडतं असं मला वाटत नाही. तिथे स्पर्धकांना वेगवेगळ्या थीम्समधून जायला लागतं. एकीला दादा कोंडके थीम दिली होती. एखादी ग्रेसफूल डान्सर या थीमच्या राऊंडला कमी पडली म्हणजे ती चांगली डान्सर नाही, असं होत नाही. एखादीला शास्त्रीय नृत्य चांगलं येईल तर दुसरीला आयटेम साँग जमेल. नेमकं कुठल्या नृत्यातलं सौंदर्य यातून दिसतं हे मला कळत नाही. नियमित रियाज, आपल्या नृत्यावरची निष्ठा आणि त्याचा घेतलेला ध्यास यामुळे नृत्यात करिअर घडवू शकता, रिअ‍ॅलिटी शोमधून नव्हे.

18गुरूंनी रचला करिअरचा पाया
मी शाळेत होते, तेव्हा नृत्यात करिअर वगैरे करावं असं वाटण्याएवढा लोकांचा दृष्टिकोन व्यापक झालेला नव्हता. पण मी अकरावी-बारावीत गेले तेव्हा पुणे विद्यापीठात शास्त्रीय नृत्य विषयात बी.ए. करण्याची सोय उपलब्ध झाली होती. त्यांनी गुरुकुल पद्धत ठेवली होती. तुम्ही ज्या गुरूंकडे शिक्षण घेताय, त्यांच्याकडूनच प्रॅक्टिकल्स करून घ्यायची मुभा होती. त्यामुळे तुमची शैली, घराणं न बदलता तुम्हाला थिअरी-प्रॅक्टिकल दोन्ही करून घेण्याची चांगली सोय होती. माझ्या गुरू रोहिणीताई या अभ्यासक्रमाच्या पॅनलवर होत्या. नृत्य समृद्ध करण्यासाठी सौंदर्यशास्त्र, नाटय़शास्त्र शिकल्याचा फायदा होईल आणि संगीत रत्नाकरसारखा ग्रंथ तुम्ही तसा वाचायला जाणार नाही, यासाठी तो अभ्यासक्रमच करायला हवा, हे गुरूंनी सांगितलं. त्यांनी आमच्यासाठी ही वाट सुकर करून दिली. पण त्यांना मात्र कथक रुजवण्यासाठी त्यांना त्यांच्या काळात फार कष्ट करायला लागले होते. १९४७ मध्ये पुण्यातच नाही, तर महाराष्ट्रातली पहिली शास्त्रीय नृत्याची संस्था माझ्या गुरू पंडिता रोहिणी भाटे यांनी सुरू केली, तेव्हा शिकण्यासाठी मुली याव्यात यासाठीदेखील त्यांना प्रयत्न करावे लागले होते. लोकांचा दृष्टिकोन बदलावा लागला. हे मनोरंजन नसून नृत्यसाधना आहे, हे समजावून सांगताना लोकांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं. त्यांनी धाडसी पाऊल उचलल्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की, पुण्यात जवळपास प्रत्येक गल्लीत नृत्याचा क्लास आहे. एवढा आमच्यासाठी मार्ग सुकर झाला.

काही कलाकारांना अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगप्रमाणे गोष्टी सोडून द्यायला आवडतं. मला मात्र समजावून द्यायला आवडतं, कारण शास्त्रीय नृत्य केवळ क्सासपर्यंत राहून चालणार नाही, ते मासेसपर्यंत न्यायचं असेल तर थोडं अधिक समजावून सांगायला माझी तयारी असते.

भावना युनिव्हर्सल असतात..
अष्टनायिका हे भावनांचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. अष्टनायिका या आठ वेगवेगळे भाव दर्शवणाऱ्या व्यक्ती आहेत. मात्र तेच भाव, त्याच भावना पुरुषांच्याही मनात येऊ शकतातच. भावना या सगळ्या प्रदेशात, सगळ्या संस्कृतीत सारख्याच असतात. एखाद्या स्त्रीचा नवरा तिच्यापासून लांब गेला असेल तर तिला वाटणाऱ्या विरहभावना या कुठेही गेलं तरी तितक्याच तीव्र असणार. पतीच्या विरहाने जशी स्त्री व्याकूळ होऊ शकते तसा पुरुषही होऊ शकतोच की! त्यामुळे अष्टनायिका हे भावनांचं केवळ प्रतीक आहे. नृत्यांतून ते प्रकट करता येतं, एवढंच. अष्टनायिकांमुळे अभिनयात मदत झाली असं म्हणता येणार नाही, कारण अभिनय हा परिस्थितीनुसार येतो.
घराण्याच्या चौकटीत राहून प्रयोग
कथक नृत्यात बनारस, लखनौ आणि जयपूर अशी तीन महत्त्वाची घराणी आहेत. प्रत्येक घराण्याचं नाव त्यातील दिग्गजांनी मोठं केलेलं आहे. आताच्या काळात सगळी घराणी हळूहळू एकत्र होत चालली आहेत. दोन अभिजात अशा शैली एकत्र करून वेगळी शैली निर्माण करणं ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे; मात्र आपल्या संस्कृतीला संपूर्ण बाजूला सारून शास्त्रीय नृत्यात पाश्चिमात्य नृत्याची सरमिसळ करणं म्हणजे प्रयोग नव्हे. दोन घराणी एकत्र करून प्रयोग करताना प्रयोग करणाऱ्याला दोन्ही घराण्यांचं सखोल ज्ञान आणि समज असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे रंगमंच, साऊंड, लाइट्स आणि इतर तांत्रिक बाबी बदलत चालल्या आहेत त्यानुसार आपल्याला आपल्या नृत्यातही बदल करणं गरजेचं आहे. आताच्या काळाशी सुसंगत, वेळेचं भान ठेवत हे बदल करावे लागतात. पण हे बदल म्हणजे कलेशी तडजोड नसावी. तंत्रज्ञान हे नृत्यासाठी आहे, नृत्य तंत्रज्ञानासाठी नव्हे.

कलेतून ऊर्जा
आजकाल अनेक विद्यर्थिनी दहावी किंवा बारावी आहे म्हणून क्लास सोडतात. एकदा दहावी-बारावी झाली की, कॉलेजमध्ये नवीन शिखरं दिसायला लागतात, त्यामध्ये नृत्य मागे पडतं. हे मागे पडलेलं नृत्य वयाच्या अशा टप्प्यावर पुन्हा खुणावायला लागतं की, क्लास सोडून अनेक र्वष झालेली असतात आणि पुन्हा सुरू करणं म्हणजे अगदी अ ब क ड पासून सुरुवात करावी लागते. त्यापेक्षा नृत्याची संगत न सोडणं अधिक श्रेयस्कर नाही का? कोणत्याही कलेतून आपली एकाग्रता वाढते, नवीन ऊर्जा मिळते. दहावी-बारावीच्या वर्षी वेळ जातो म्हणून नृत्य थांबवण्याऐवजी त्याला जाणूनबुजून थोडा वेळ द्यायला हवा.

पुरुष नर्तक कमी का?
अनेकदा पुरुष नर्तकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुरुष नर्तकांची संख्या काहीशी कमी आहे. कथक नृत्यातील लालित्य हे एक कारण त्यासाठी असू शकेल. काही वेळा लालित्यपूर्ण नृत्य करणाऱ्या पुरुष नर्तकाला नावंसुद्धा ठेवली जातात. त्यामुळे अनेक मुलं आवड असूनही कथककडे वळत नाहीत. पण पुरुषांच्या शरीरयष्टीला शोभेल अशा पद्धतीने आणि ताकदीने कथक नृत्य साकारलं जाऊ शकतं. याची कित्येक उदाहरणं आहेत. पंडित बिरजू महाराज यातलं अग्रणी नाव. उत्तर हिंदुस्तानात तर पुरुष नर्तकांची संख्याच जास्त आहे.

कलाप्रदर्शन की अंगप्रदर्शन ?
लावणी किंवा अगदी आयटम साँग हेसुद्धा नजाकतीने करता येतं, ते तसंच व्हायला हवं. अंगप्रदर्शन करायचं नसून नृत्यप्रदर्शन करायचंय हे पक्कं असलं की, आयटेम साँगलादेखील डिग्निटी येऊ शकते. ज्यावेळी एखादी शास्त्रीय नृत्य शिकलेली मुलगी लावणी किंवा अगदी आयटम साँग सादर करते तेव्हा तिच्या नृत्याला आपोआपच एक दर्जा प्राप्त होतो. शृंगार हा एक भाव आहे; मात्र त्याचं प्रमाण फक्त भावापुरतंच मर्यादित असावं. त्यात सवंगता येते ती आपल्या वेशभूषेतून. शास्त्रीय नृत्य शिकल्यामुळे आपोआपच कलेप्रति असलेला आदर, पावित्र्य – वागण्यात, बोलण्यात आणि विचारात भिनतं. आपोआपच आपल्या सादरीकरणात ते उतरतं आणि नृत्याला एक डिग्निटी येते. आपल्याला आपली कला प्रोजेक्ट करायची आहे की आपलं शरीर हे शेवटी ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.

‘ऑपेरा हाऊस’चं स्टँडिंग ओव्हेनश
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅनबेरा शहराचं नियोजन करणारा वॉल्टर ग्रीफिनच्या स्मरणार्थ असलेल्या एका कार्यक्रमात मला नृत्य सादर करायचं होतं. त्यासाठी त्यांना वॉल्टर ग्रीफिनच्या आयुष्याशी संबंध सांगणारं नृत्य हवं होतं. ग्रीफिन हा भारतात लखनौमध्ये एका ग्रंथालयाच्या डिझाइनसाठी आला असताना अन्नातून विषबाधा होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. आता या पाश्र्वभूमीवर भारतीय नृत्य कसं दाखवायचं हा प्रश्न होता. ग्रीफिनला भारताच्या अध्यात्माबद्दल प्रचंड आदर आणि आत्मीयता होती, त्यामुळे मी माझी सुरुवातीची वंदना त्याला रिलेट केली. मग झाशीच्या राणीचा गतभाव करताना त्याच्या कामातल्या डेडिकेशनशी ते जोडून घेतलं. अखेरीस कृष्णाचा प्रसंग दाखवताना वृंदावनातून मथुरेला गेलेला कृष्ण आणि त्याने जाताना मागेही न वळून पाहिल्याबद्दल गोपिकांची असलेली तक्रार याला वॉल्टर ग्रीफिनचं कामानिमित्त भारतात येणं आणि परतण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होणं हे कनेक्ट केलं. या माझ्या सादरीकरणानंतर सर्व प्रेक्षकांनी मला उभं राहून दाद दिली. ऑस्ट्रेलियामध्ये एका दिवसात माझे तीन शो होते आणि तिन्ही कार्यक्रमांना स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. ऑस्ट्रेलियामधील ऑपेरा हाऊस हे अत्यंत कलाप्रेमींसाठी प्रतिष्ठेचं स्थान. तिथे परफॉर्म करायला मिळणं हे खूप कौतुकाचं मानलं जातं. आतापर्यंत केवळ तीन भारतीयांना तिथे परफॉर्म केलं आहे – ए. आर. रेहमान, आशा भोसले आणि तिसरी मी ! हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला स्वत:च्या कलेचा, देशाचा आणि संस्कृतीचा प्रचंड अभिमान वाटला. तिथल्या सादरीकरणानंतरही प्रेक्षकांनी उभं राहून दाद दिली.

आवर्तन पद्धतीचा प्रभाव
परदेशात सगळीकडे समूहनृत्याची पद्धत आहे. ज्यात ताल आणि मनोरंजन या गोष्टी तर मिळतात, परंतु मन:शांती समूहनृत्यातून मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडची सोलो डान्सची पद्धत त्यांना त्यांच्या पद्धतीपेक्षा वेगळी वाटली तरीही अंतिमत: तीच त्यांना अधिक भावते. आपल्या संस्कृतीत असणाऱ्या तालाच्या आवर्तन पद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो आणि त्यांची मन:शांतीकडे वाटचाल सुरू व्हायला मदत होते. आपल्या संगीताची ती जादू आहे की, नृत्याविष्काराचा केवळ दृश्य परिणाम नाही तर टोटल इम्पॅक्ट म्हणूनच पाहिला जातो. सुरुवातीला सोलो परफॉर्मन्स त्यांना निश्चितच वेगळा वाटतो मात्र शेवटी त्यातूनच संपूर्ण रसनिष्पत्ती होते.

परदेशातला ‘शास्त्रीय’ आग्रह
परदेशात नृत्य सादरीकरणाच्या अनुभवाबद्दल सांगायचं, तर तिथले प्रेक्षक खूप सजगपणे नृत्य बघायला येतात. तिथे मला सादरीकरणासाठी विचारणा केली जाते, तेव्हा ‘प्युअर क्लासिकल कथक’चा आग्रह धरला जातो. याउलट आपल्याकडे कॉर्पोरेट्समध्ये नृत्याचा कार्यक्रम ठरत असेल तर पहिला प्रश्न असतो की, तुम्ही फ्युजन काय करता? बॉलीवूडच्या गाण्यांवर कथक करणार का? खूप कमी लोक शास्त्रीय नृत्य प्युअर फॉर्ममध्ये बघायला येतात. परदेशांतील कलाप्रेमी लोकांना भारतीय संस्कृतीविषयी जिज्ञासा आहे. त्यांना कुतूहल असल्या कारणाने पारंपरिक, शास्त्रोक्त तेच बघायची इच्छा आहे. ते पाहताना त्यांना वेगळ्याच जगात गेल्याची अनुभूती येते. तिथल्या सादरीकरणानंतरचा प्रतिसादही त्यामुळे वेगळ्या प्रकारचा असतो. तो कसा घ्यायचा हेच कळत नाही. तिकडच्या लोकांचा आपल्या संस्कृतीचा, देवादिकांचा, परंपरांचा आपल्यापेक्षा अधिक अभ्यास आहे आणि त्यांना ते समजून घेण्यात अधिक रस आहे. नृत्यापूर्वी त्यांना थोडं अधिक समजावून सांगावं लागतं हे नक्की. म्हणजे अर्धनारीनटेश्वर करत असेन, तर आपल्या प्रेक्षकांना त्याच्या रूपाची कल्पना असते. तिकडे परफॉर्म करताना मात्र मला त्याचं रूप नृत्यातूनच सोदाहरण स्पष्ट करावं लागतं. तसं केल्यानंच ते त्यांच्या डोळ्यापुढे येऊ शकतं.

नृत्यामुळे स्टॅमिना वाढला
‘भटकंती’ या मराठीतल्या पहिल्या ट्रॅव्हल शोचं अँकरिंग मी करायचे त्या वेळी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र दाखवायचा होता. आपला महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा, चढ-उतारांचा त्यामुळे ब्रेक शारीरिक कष्ट करावे लागणार होते. या सगळ्यात नृत्याच्या रियाजामुळे कमावलेला स्टॅमिना मला उपयोगी पडला. एकदा रायरेश्वर पठारावर शूटिंग सुरू असताना.. शेवटच्या टप्प्यात एक शिडी लावली होती. खाली बघितलं की अडीचशे फूट दरी होती. आमची १० जणांची टीम होती आणि त्यात मी एकटीच मुलगी होते. ती शिडी पार करून वर गेले. शूटिंग संपवलं आणि खाली आले त्या वेळी आमचे गाडी चालक शिडीकडे बघून म्हणत होते.. कुणी लेडी-बिडी असेल तर कठीणच आहे.. मी त्यांना विचारलं.. अरे मग मी कोण आहे? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि हशा पिकला.

डोन्ट डायल्युट युअर आर्टफॉर्म
समोरचा प्रेक्षक तुमच्या नृत्यशैलीबद्दल अजाण असेल तेव्हा त्याच्यासाठी आपली कला पातळ करू नका, तर त्याचं बोट धरून त्याला तुमच्या पायरीवर आणा. तुमच्या कलेची पायरी उतरू नका. प्रेक्षकांना समजावं म्हणून चित्रपटगीत निवडण्याऐवजी मी माझी शास्त्रीय नृत्याची बंदिशच सादर करते, मात्र त्यातील अर्थ, मुद्रा, ताल, लय, भाव प्रेक्षकांना विशद करते. त्यांना समजेल अशा भाषेत रिलेट करायला सांगते. प्रेक्षकांना समजत नाही या सबबीखाली आपल्या कलेचं मोल कमी करू नका. प्रेक्षकांना समजावून कसं द्यायचं हे आपलं कौशल्य आहे. ते कौशल्य आत्मसात केलं तर प्रेक्षकांना आपोआप हे आवडायला लागेल.

प्रेक्षक तसा परफॉर्मन्स
जेव्हा मी खजुराहो महोत्सवासारख्या ठिकाणी नृत्य सादर करते तेव्हा मला त्यांना ‘खंडजाती’ म्हणजे काय ते समजावून सांगावं लागत नाही, मात्र जेव्हा मी कोणत्याही शहरात, सामान्य प्रेक्षकांसमोर सादर करते तेव्हा मला ते समजावून सांगावं लागतं. त्याच्या मात्रा, लय, ताल, अर्थ, पाश्र्वभूमी सगळंच सांगावं लागेल. अगदी छोटय़ा शहरांतही मी परफॉर्म केलेलं आहे. तिथे याहूनही सोपं करून सांगावं लागतं. तिथल्या प्रेक्षकांना शास्त्रीय नृत्य बघायची सवय नसते. शास्त्रीय म्हणजे क्लिष्ट असं त्यांना वाटतं. कारण प्रेक्षकांना एक तर लावणी किंवा भजन यापलीकडे तिसरं काही माहीत नाही तिथे मला त्यांना तालात गुंतवून ठेवणं हेच आव्हान असतं. मी तिथे सांगते.. डोळे मिटून तत्कार ऐका. एखादी कथा, एखादी धून त्यात सापडतेय का बघा.. बंदिश सांगताना व्यावहारिक उदाहरणं देते. गावामध्ये देवळामध्ये परफॉर्मन्स असतो, तेव्हा बंदिशींच्या शब्दांमध्ये, नादामध्ये कथा दिसतेय का बघायला सांगते. यामुळे ते बंदिश लक्षपूर्वक ऐकतात. तो नाद त्यांच्याच भिनतो. त्यांना तालाशी स्वत:ला रिलेट करायला शिकवावं लागतं. त्यांच्या अंगात ताल भिनलेला असतोच, मात्र त्यांना आपल्या परफॉर्मन्सवरून काही सुचायला लागलं की, त्यांचं लक्ष आपल्या नृत्यात राहतं. सामान्य प्रेक्षकांना थोडा शास्त्रीयनृत्याचा आधार दिला की, त्यांना ते आवडायला आणि समजायलाही लागतं. काही कलाकारांना अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगप्रमाणे गोष्टी सोडून द्यायला आवडतं. मला मात्र समजावून द्यायला आवडतं, कारण शास्त्रीय नृत्य केवळ क्सासपर्यंत राहून चालणार नाही, ते मासेसपर्यंत न्यायचं असेल तर थोडं अधिक समजावून सांगायला माझी तयारी असते.

5

‘वी हॅड टिअर्स..’
मी ऑस्ट्रेलियामध्ये झाशीच्या राणीचा गतभाव सादर केला होता. आपला इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यांना तो माहिती असण्याची शक्यता कमी होती. मी नृत्यातून झाशीच्या राणीच्या लढाईच्या वेळचा प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला. राणी एका क्षणी पाठीवर बांधलेलं बाळ दासीकडे देऊन युद्धात पुढे जायला सज्ज होते, असा प्रसंग दाखवला. त्या वेळी मी बाळाला शेवटचं बघतानाचा भाव नृत्यातून दर्शवला. कार्यक्रमानंतर दोन ऑस्ट्रेलियन स्त्रिया आत येऊन म्हणाल्या, ‘बाळाला बघताना तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ‘वी हॅड टिअर्स इन अर आइज..’ अशी कौतुकाची थाप मला विशेष वाटली. एखादी आई शेवटचंच बाळाला बघते ही भावना त्यांना इतिहास माहिती नसूनदेखील पोचली. भावना युनिव्हर्सल असतात, हेच त्यातून दिसलं. अशी दिलखुलास कौतुक करण्याची वृत्ती परफॉर्मन्सला ऊर्जा देते.

यूटय़ूबवरून कथक प्रशिक्षण
अगदी सुरुवातीपासून शिकताना कथक नृत्य यूटय़ूबवरून शिकता येणार नाही. ते गुरूकडून प्रत्यक्षच शिकायला हवं. हाताच्या पोझेस कशा असल्या पाहिजेत हे प्रत्यक्ष शिकविल्याशिवाय जमूच शकत नाही. ज्यांचं बेसिक पक्कं झालं आहे ते यूटय़ूबद्वारे किंवा व्हिडीओद्वारे शिकू शकतात. परदेशी स्थायिक झालेले नृत्यसाधक बेसिक नॉलेज असेल तर तंत्रज्ञानाच्या मदतीने गुरूकडून असं मार्गदर्शन घेऊ शकतात.

वाहावत जाणार नाही..
बिनधास्त चित्रपटात सिलेक्ट झाले हे सांगायला आणि गुरूंची परवानगी घ्यायला रोहिणीताईंकडे गेले. त्यांना सगळे प्रेमानं बेबीताई म्हणत. त्यांच्या पायाशी बसून त्यांना सगळी कथा ऐकवली आणि विचारलं.. ‘बेबीताई, करू ना?’ त्यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मग तेवढय़ाच शांतपणे एवढंच म्हणाल्या.. ‘हं. कर.’ त्यांनी शांतपणे दिलेल्या होकारात कुठे तरी माझं नृत्य सुरू राहण्याबद्दल साशंकता आणि काळजी दोन्ही होती. दहा-बारा र्वष ज्या मुलीवर मेहनत घेतली, ती या ग्लॅमरच्या दुनियेत वाहवत तर जाणार नाही ना, ती क्षेत्र बदलणार.. ही त्यांची काळजी त्यांच्या डोळ्यांतून आणि चेहऱ्यावरून मी ओळखली. त्या वेळीच त्यांनी न मागताही मी त्यांना वचन दिलं, ‘नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे. चित्रपटसृष्टीत वाहावत जाणार नाही.’ मला आनंद आहे, मी हे आश्वासन आजपर्यंत पाळलं. ‘बिनधास्त’नंतर अनेक चांगल्या भूमिकांसाठी विचारण्यात आलं. ‘अवंतिका’ या गाजलेल्या मालिकेत मला मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आलं. कारण मी त्यांच्या ‘पेशवाई’मध्ये मस्तानी साकारली होती. पण मला दैनंदिन मालिका नको होती. डेली सोप केली की, सकाळी ९ ते रात्री ९ एवढा वेळ अभिनयाला द्यावा लागतो. दीड-दोन र्वष एक मालिका चालते. मी तेव्हा हे केलं असतं तर दररोज टीव्हीवर दिसले असते, प्रसिद्धीबरोबर ‘सुपाऱ्या’ही मिळाल्या असत्या. पण मला रात्रीची झोप नक्की लागली नसती. कारण नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे. शास्त्रीय नृत्य सुरू ठेवायचं असेल तर किमान रोजचे दोन तास तुमचे पाय चालायला लागतात. तेवढा रियाज आवश्यक असतो. दैनंदिन मालिकांच्या शेडय़ुलमध्ये मला तो वेळ मिळाला नसता. मी ते कटाक्षाने टाळलं, नाही तर मी माझ्या नृत्यापासून दूर गेले असते.

आईमुळे नृत्याकडे वळले..
आईला स्वत:ला नृत्याची आवड होती. तिच्या काळात नृत्याला तेवढं पोषक वातावरण नव्हतं आणि आजोबांनी आईला नृत्य शिकायची परवानगी दिली नाही. तिच्या मनात सुप्त इच्छा होती नृत्य शिकण्याची. माझ्यातले नृत्यगुण तिला लहानपणी दिसले असावेत. कारण अडीच वर्षांची असल्यापासूनच मी स्वत:भोवती गोल गिरक्या घेत असायचे.. असं आई सांगते. माझ्या आईने माझा हा नृत्याकडे असलेला कल ओळखून नृत्य शिकायला पाठवायचं ठरवलं. माझ्यासाठी सगळ्यात भाग्याची गोष्ट म्हणजे आईनं त्या वेळी गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्य शिकायला पाठवलं. या गुरूंमुळेच मला नृत्याची सखोलता कळली.

नृत्यातला अभिनय आणि अभिनेत्रीचं नृत्य
आपल्या अभिनेत्री नृत्यकुशल असतात हे खरं, पण प्रत्येक अभिनेत्रीला नृत्य आलंच पाहिजे याची सध्याच्या काळात तरी गरज नाही. मात्र प्रत्येक नृत्यांगनेला अभिनय येणं अनिवार्य आहे. नृत्याचा ‘अभिनय’ हा अविभाज्य घटक आहे. कथक नृत्यातला अभिनय आणि कॅमेऱ्याला अपेक्षित अभिनय खूप जवळ जाणारा आहे. कथक ही नृत्यशैली तुलनेने सर्वाना समजायला सोपी आहे, कारण यात केला जाणारा अभिनय हा लोकाभिमुख असतो. त्यामागे काही ऐतिहासिक कारणं आहेत. कथक ही उत्तर हिंदुस्थानी नृत्यशैली आहे. त्यावर मंदिर परंपरेपेक्षा मोघलांच्या स्वाऱ्यांमुळे झालेला परिणाम मोठा आहे. या उलट दक्षिण भारतीय नृत्यशैलींमध्ये मंदिर परंपरा बराच काळ शाबूत राहिली. कथकला राजाश्रय घ्यावा लागला आणि राजांच्या मनोरंजनासाठी कथक नृत्यशैली वापरली गेली. कथकच्या विकासात या गोष्टीचा परिणाम झाला आणि ही मैफलीत रंगणारी नृत्यशैली झाली. सहजपणे समजेल अशा पद्धतीचे हावभाव व अभिनय यांचा अंतर्भाव त्यात झाला. दक्षिण भारतीय नृत्यशैलींमध्ये सांकेतिक अभिनय आहे. नाटय़शास्त्राला धरून हा अभिनय असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी हस्तमुद्रांमधून व्यक्त होतात.

6

शास्त्रीय नृत्याची ताकद
स्पीकमॅके या संस्थेसाठी मी काम करते. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्याची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक कलाकारांसमवेत ही संस्था काम करते. मुलांसमोर मी एक बंदिश नेहमी सादर करते. गोकुळात छोटा कृष्ण लोणी चोरायला येतो. गुपचूप लोण्याची हंडी फोडतो आणि खाणार एवढय़ात यशोदा येते आणि त्याला पकडते. नृत्याभिनयातून हे बघताना मुलं हरखून जातात. टाळ्या वाजवतात. तेव्हा मी त्यांना हे नक्की आवडलं का, असं विचारते आणि त्यांचा हो ऐकल्यावर सांगते.. सध्या आपलं सगळं संगीतविश्व चित्रपटसंगीताने व्यापलं आहे. ‘बीडी जलायले..’ आपण आवडीनं ऐकतो. पण ‘मुन्नी बदनाम.’ येतं तेव्हा आधीचं विसरतो.. मग ‘चिकनी चमेली’ येतं आपण ‘मुन्नी’ विसरतो. कारण या गाण्यानं तात्पुरतं मनोरंजन होतं, मग गाणं विस्मृतीत जातं. मी जी ठुमरी सादर केली ती २०० र्वष जुनी आहे.. हे ऐकल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं. हीच शास्त्रीय संगीताची, शास्त्रीय नृत्याची ताकद आहे. हे करून दाखवते तेव्हा मुलांना जास्त पटतं.

तालांचा विकास
पूर्वीच्या काळी नृत्य ही देवळांमध्ये भक्तिभावाने होत असत. मात्र राजाश्रयामुळे मनोरंजन हे त्याचं उद्दिष्ट बनलं. त्यामुळे नर्तकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. मंदिर परंपरेत केवळ भक्तीरसाने भारलेलं नृत्य हे एकमेकांना मागे टाकण्याच्या हेतूने आक्रमकपणे केलं जाऊ लागलं. मंदिरात केवळ साथीला असणारा ताल मग नृत्याचा प्रमुख भाग बनला. तालाच्या मात्रा वाढल्या, लय वाढली, वेग वाढला. हे प्रेक्षकांना सांगून त्या तालाशी त्यांना एकरूप केलं की, नृत्याची तांत्रिकता समजणं सामान्य प्रेक्षकांना सोपं जातं.

सुरुवात कधी करावी?
हल्लीची पिढी खूपच हुशार आहे. ही जनरेशन फास्ट आहे. त्यामुळे साधारण साडेपाच-सहा वर्षांच्या मुलाला किंवा मुलीला शास्त्रीय नृत्य शिकवायला हरकत नाही. किमान डावा पाय- उजवा पाय याचं गणित डोक्यात बसल्याशिवाय हे नृत्य शिकता येणार नाही आणि त्यात गोंधळ उडाला तर मग नाचाचा आनंद मिळणार नाही. मग मुली दांडय़ा मारायला लागतात आणि आधी क्लास आणि मग नृत्यच सुटतं. म्हणून किमान साडेपाच-सहा वर्षांच्या मुलीला तिच्या वयाला समजेल असं शिकवणारी गुरू पाहिजे. या वयात बॉलीवूड डान्स शिकायला गेलेल्या मुलीला तीन तासांत एक गाणं यायला लागतं. कथक नृत्य शैली कळण्यासाठीच तीन र्वष लागतात. त्यामुळे शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी पेशन्स हवा.

 

– संकलन : वेदवती चिपळूणकर, प्राची परांजपे