फॅशन ही कधीकाळी जस्ट वुमन्स थिंगहोती. मात्र या संकल्पनेला छेद देत मेन्स फॅशनवर काम करणारे आणि त्यात खूप विचारपूर्वक बदल करून ट्रेण्ड्स आणणारे डिझायनर्स रॅम्पवर आपलं कलेक्शन सादर करू लागले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने केवळ पारंपरिक कपडय़ांनाच फॅशन म्हणून प्राधान्य देण्यापेक्षा तरुण डिझायनर्सनी पुरुषांसाठी सादर केलेल्या हटके कलेक्शन्सची झाँकी..

बाजारात येणाऱ्या फॅशनचा आधार हा मुख्यत: फॅशन वीकमध्ये सादर होणारे कलेक्शन्स हाच असतो. आणि हे लक्षात घेता यंदा ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये साहिल अनेजासारख्या डिझायनरने केवळ मेन्स कलेक्शन सादर केलं होतं. साहिलच नाही तर अझा काझिंगमेई, अजय कुमार, मनीष अरोरा आणि वेंडेल रॉड्रिक्स अशा नव्या-जुन्या डिझायनर्सनी आपल्या कलेक्शनमध्ये मोठय़ा प्रमाणावर मेन्स फॅशनचा अंतर्भाव केला होता. जुनी साचेबद्ध रंगसंगती, प्रिंट्स, फॅब्रिक याच्यापलीकडे जाऊ न नवीन ‘ट्रेण्ड्स’ सेट करण्यात हा सीझन बहुतांशी यशस्वी ठरला होता. त्यामुळे या फॅशनचा प्रभाव हा दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या वर्षांअखेरीच्या काळात फार महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच सणावारालाही कुर्ता पायजमा एवढा एकच पर्याय निवडण्यापेक्षा नवं काही शोधण्यावर तरुणांचा भर दिसून येतो आहे.

गेल्याच आठवडय़ात आमिर खानने गुलाबी रंगाची पँट घातल्यामुळे समाजमाध्यमांवर एकच गहजब झाला. आमिरसारखी गुलाबी रंगाची पँट घालून वावरणाऱ्याला काही लाखांचे इनामही गमतीत का होईना जाहीर झाले. मात्र सध्या सेलिब्रिटीच नाहीत तर सर्वसामान्य तरुणांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे कपडे वापरून पाहण्याकडे कल वाढतो आहे. केवळ खादी, कॉटन, अशा प्रकारची फॅब्रिक न वापरता यावेळी मेन्स फॅशनमध्ये बांधणी सिल्क, सी थ्रू फॅब्रिक्स अशा फॅब्रिकचा वापर केला गेला आहे. फेस्टिव्ह फॅशनसाठी वेल्वेट कपडय़ाचा मोठय़ा प्रमाणावर कलेक्शनमध्ये वापर केला गेला. पुरुषांचे कपडे म्हणजे त्यात फार काही रंग नसण्याची परंपरा जाऊ न त्यात फ्रेश कलर्स, पेस्टल शेड्स, सटल कलर्स अशा रंगांचाही मोठय़ा प्रमाणावर वापर होतो आहे. संपूर्ण प्लेन कपडय़ाऐवजी फ्लोरल प्रिंट्स, टेक्स्चर्ड फॅब्रिक, बोल्ड स्ट्राइप्स अशा गोष्टींनी मेन्स फॅशनला अधिक इंटरेस्टिंग बनवलं आहे. मेन्स फॅशनसाठी काही ठरावीक रंगांपर्यंत मर्यादित न राहता सगळ्या रंगांच्या सगळ्या शेड्सचा वापर डिझायनर्सनी केला असल्याने हे कलेक्शन सध्या बाजारात लक्ष वेधून घेत आहे.

पुरुषांचे कपडे म्हणजे शर्ट, टी-शर्ट, कुर्ता आणि पॅंट, फार तर कुर्त्यांवर एखादं जॅकेट यापलीकडे पारंपरिक फॅशन कधी गेली नाही. मात्र हळूहळू फॅशन विश्वातला हा लिंगभेद कमी कमी होतो आहे. फॅब्रिकसोबत आऊ टफिटमध्येही अनेक प्रकार डिझाइन झाले, मार्केटमध्ये आले आणि लोकांनीही ते उचलून धरले. लॅक्मेच्या या मोसमातही अनेक डिझायनर्सनी डिझाईन केलेला लूज धोती पॅंट्स हा बॉटममधला प्रकार ट्रेण्डसेटर ठरला. बॉटम्स लेयरिंग ही काहीशी नवीन संकल्पना मेन्स फॅशनमध्ये येऊ  घातली आहे. स्कर्टसारख्या दिसणाऱ्या बॉटमसोबत लूज पॅंट किंवा धोती पॅंटवर ओव्हरलॅप फॅब्रिक ओव्हरलॅप करून स्कर्टसारखा दिसणारा बॉटम हे या सीझनमधलं सर्वाधिक ‘हिट’ डिझाईन ठरलं आहे. हूडीज, ओव्हरसाइज ओव्हरकोट्स हे आता सेट झालेले ट्रेण्ड्सही मोठय़ा प्रमाणावर दिसून येतायेत. थ्री पीस आऊ टफिट्स हा सगळ्या डिझायनर्सनी फॉलो केलेला कॉमन ट्रेण्ड होता. कपडय़ांना ठिकठिकाणी पॉकेट्स आणि हँगिंग बेल्ट्स, बकल्स या एक्स्ट्राजनी डिझाइन्सना अधिक उठाव आणला जातो आहे.

केवळ कपडे नव्हे तर अ‍ॅक्सेसरीजचासुद्धा विशेषत्वाने विचार केला गेलेला दिसून आला. हेड गीयर्सचा मोठय़ा प्रमाणावर अंतर्भाव डिझाइन्समध्ये करण्यात आला आहे. शूजवरही कपडय़ाप्रमाणे प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरी करून घेतली जाते. फे स्टिव्ह कलेक्शनमध्ये तर शूजवर किंवा जूतीवर एम्ब्रॉयडरी करून ते आऊ टफिटसोबत जुळवत तसं कलेक्शनही उपलब्ध केलं जात आहे. ‘पुरुषांच्या कपडय़ात व्हरायटी असते वाटतं बायकांसारखी’ ही पुलंनी केलेली कोटी कालबाह्य होईल की काय अशी परिस्थिती निर्माण करणारी चौकटीबाहेरची डिझाइन्स पुरुषांच्या फॅशनमध्ये आलेली आहेत आणि त्याचा ते सर्रास दिमाखाने वापरही करू लागले आहेत!

viva@expressindia.com