या गणेशोत्सवात पारंपरिक आणि त्याबरोबर वेस्टर्न फॅशनने लक्ष वेधून घेतले. पारंपरिक दागिने म्हटलं की, डोळ्यासमोर येतात भारतीय संस्कृतीतील विविध आभूषणे. दागिने हा विषय केवळ स्त्रियांचा असं वाटत असेल तर जरा थांबा. स्त्रियांचं सौंदर्य वाढवणारे दागिने आता पुरुषांच्या पुरुषत्वाला एका नव्या अर्थाने सुशोभित करत आहेत. यावर कदाचित विश्वास बसत नसेल, पण हे अगदी शतप्रतिशत खरं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर कानातल्या डुलांचं घ्या.. इअर स्टड्स म्हणा हवं तर. कर्णभूले, कुडय़ा, रिंगा, मोती हे स्त्रियांचे दागिने आता इअर स्टड्स म्हणून पुरुषांची शान वाढवायला लागले आहेत. पूर्वी स्त्रियांच्या आभूषणांमध्ये ठळक दिसणारी नथ किंवा नथनी आता आता वेगळ्या रूपात पुरुषांनाही शोभून दिसतेय.  कर्णफुलांनंतर आता हा नवीन प्रयोग फॅशन जगतात केला जात आहे.

कानात भिकबाळी, कपाळावर चंद्रकोर या गोष्टी आता तरुण मराठी घरांमध्येही सर्रास दिसू लागले आहेत. ही जुनीच परंपरा. पण कानानंतर आता नाकात घालण्याच्या आभूषणांवर प्रयोग केले जाताहेत. मध्यंतरी एका नियतकालिकासाठी अभिनेता रणवीर सिंगने फोटो शूट केलं होतं, तेव्हा त्यानं घातलेली नथनी बरीच गाजली. आता तोच प्रयोग लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरदेखील झाला. आपल्याकडे नव्याने प्रस्थापित होणारी ही नथनी अमेरिकेत ७०च्या दशकात प्रचलित होती. प्रसिद्ध अमेरिकन गायक टय़ुपॅक शेकरने घातलेली खडय़ाची चमकी (स्टड) आपण कसे विसरू शकतो. आता बॉलीवूडमधले रणवीर सिंग, आयुषमान खुरानासारखे काही  कलाकार हा प्रयोग करत आहेत.

सामान्य जनतेमध्ये या फॅशनकडे पाहण्याचे दृष्टिकोन तसे अनेक आहेत. मुलांनी केस वाढवणं, वेगवेगळ्या रंगांचे कानातले घालणे आणि आता मुलींप्रमाणे नाकात नथनी घालणं अनेकांना रुचत नाही. मागच्या पिढीमध्ये तर या सगळ्याबद्दल एकजात नाराजीचा सूर दिसतो. तरीही अशी फॅशन हटके म्हणून लवकर आत्मसात केली जाते, असं दिसतं. युनिसेक्स फॅशनचा हा एक भाग आहे.

या नवीन नोज रिंग फॅशनविषयी मॉडेल पराग नारिंग्रेकर याच्याशी संवाद साधला. परागने स्वत एका फोटोशूटसाठी आणि रॅम्पवरदेखील नथनी घातलेली आहे.   मुळात हे असं मुलींची फॅशन मुलांनी किंवा याच्या विरुद्ध फॅशन बघायला मिळणं नवीन नाही. आपल्याकडे तर लहापणी मुलांना मुलींप्रमाणे कानातले आणि पायात वाळे घालण्याची पद्धत आहे.  मुलींनी मुलांप्रमाणे सुटसुटीत कपडे घालायला लागून तर जमाना झाला. तरीही युनिसेक्स फॅशन पुरुषांच्या बाबतीत काही नवीन पायंडे पाडत आहे. नोज रिंग हा त्यातला एक भाग.

‘मी या फॅशनकडे व्यावसायिक पद्धतीने पाहतो. मी स्वत: दररोजच्या आयुष्यात अशा प्रकारे नथनी घालणं पसंत करणार नाही. मात्र फॅशन मॉडेलिंग हे माझं काम आहे आणि मुळात या फॅशनमध्ये गैर काही नाही. माझं माझ्या कामावर प्रेम असल्याने अशा फोटोशूटसाठी नथनी घालायला माझी मुळीच हरकत नसते,’ असं फॅशन मॉडेल पराग नारिंग्रेकर सांगतो.

‘आपला समाज या बाबतीत अजून तितकासा प्रगत नाहीये. अमुक एक फॅशन मुलांची आणि दुसरी मुलींची असं ठरून गेलेलं आहे. त्यामुळे अशी नवी फॅशन करू पाहणाऱ्यांना कदाचित ते तितकं सोपं वाटत नसेल. मात्र माझं प्रोफेशनच असं आहे की, माझे आई बाबा मला या गोष्टीमध्ये पूर्ण सहकार्य देतात. हे माझं काम आहे आणि आम्ही सतत वेगळे वेगळे प्रयोग करतो. माझ्या फॅशन जगतातल्या मित्रमैत्रिणींप्रमाणेच या जगाशी संबंध नसलेले माझे मित्रमैत्रिणीही मला अशा प्रयोगांसाठी खूप प्रोत्साहन देतात. इतकचं नाही तर अगदी तोंडभरून कौतुकही करतात.’

या आगळ्यावेगळ्या फॅशनकडे आपण कसं बघतो यावर त्याचं सौंदर्य अवलंबून आहे. शेवटी कोणतीही फॅशन किती आत्मविश्वासाने निभावतो, हे महत्त्वाचं. आत्मविश्वास असेल तर व्यक्तिमत्त्व सुंदरच दिसतं.

एखादा मुलगा इअर स्टड्स, नथनीसारख्या फेमिनाइन फॅशन अ‍ॅक्सेसरी आत्मविश्वासाने मिरवत असेल तर काहीच वावगं नाही त्यात. हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. माझ्या मते फॅशन म्हणजे अशा गोष्टी ज्या घातल्याने तुम्हाला आनंद मिळतो. मला रोजच्या आयुष्यात नथनी घालणं आवडणार नाही. रॅम्पवर  मात्र एक प्रयोग म्हणून अशा नवीन गोष्टी करायला मला आवडतं.

– पराग नारिंग्रेकर, मॉडेल

-तेजल चांदगुडे