लग्नघरातली सगळी कामं आपुलकीनं करणारा नारायणपु.लंच्या लेखणीतून अजरामर झाला. घरचं कार्य मानून राबणारे नारायण आजच्या काळात दुरापास्त झाले असले तरी, आता डिजिटल नारायण बनून मोबाइल ॅप्स मदतीला येत आहेत.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू होण्याचा काळ. एखाद्या लग्नप्रसंगाची तयारी करण्याची वेळ आली की, होणारी लगबग आपण आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात कधी ना कधी अनुभवली असेलच. लग्नाच्या व्हेन्यूपासून मेन्यूपर्यंत, शॉपिंगपासून डान्सिंगपर्यंत, मेकअपपासून ड्रेसअपपर्यंत, तसंच लग्नाआधीच्या एंगेजमेंटपासून रिसेप्शन ते हनिमूनपर्यंत.. हुश्श्श्श! असं सारं काही सांभाळता सांभाळता खूप दगदग होते. सध्या तर घरातलं मनुष्यबळ कमी आणि कामं जास्त असं प्रकरण आहे. अगदी लहानातली लहान गोष्ट जरी या प्लॅनिंगमधून सुटली तरी, मनात रुखरुख राहते. त्यामुळे मोठय़ा गोष्टीपासून लहान-सहान गोष्टींपर्यंतचं व्यवस्थित प्लॅनिंग असावं यासाठी हल्ली वेडिंग प्लॅनर्सची मदत घेतली जाते. इव्हेंट मॅनेज करणाऱ्या छोटय़ामोठय़ा संस्था या कामाची जबाबदारी घेतात, पण तशी बक्कळ किंमतही त्यासाठी मोजावी लागते. बहुतेक वेडिंग प्लॅनर्सकडे त्यांचे काही निवडक प्लॅन्स तयार असतात. आपण बजेटनुसार प्लॅन निवडू शकतो. पण बजेट कमी असेल तर अन्य पर्याय सुचवण्याऐवजी ते नको असलेल्या गोष्टी कमी करण्याचाच पर्याय देतात. कारण त्यांचे प्लॅन्स तयार असतात. आपल्याला त्या प्लॅनबाहेरची सोय हवी असेल किंवा काही वेगळी गरज असेल तर जास्तीचे पैसे मोजण्यावाजून गत्यंतर नसतं. पण थेट आपल्या गरजेनुसार लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींचं विविध पर्यायासहित प्लॅनिंग करता यावं यासाठी डिजिटल मार्ग अवलंबायला हरकत नाही. लग्नकार्यात मदतीसाठी वेगवेगळी सेवा पुरवणारी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स अक्षरश: मुठीत आली आहेत. त्यातील काही निवडक वेडिंग प्लॅनिंग अ‍ॅप्सबद्दल..

  • घरातील लग्नकार्य म्हणजे घरातल्या सगळ्यांच्या सुखाच्या क्षणांना आयुष्यभरासाठी साठवून ठेवता येईल अशी संधी. ही संधी योग्य आणि किफायतशीर दरात साधता यावी म्हणून अर्बनक्लॅप (UrbanClap) हे अ‍ॅप सेवा पुरवितं. वधूचा शृंगार, मेहंदी यासाठीचे कलाकार, ब्युटिशियन यांची दरासकट माहिती यावर मिळते. याशिवाय प्री-वेडिंग फोटोशूट, डीजे नाइट, लाइव्ह म्युझिशिअन या सेवादेखील अ‍ॅपद्वारे पुरविल्या जातात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार व्हेंडर शोधू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या व्हेंडरला तुमची मागणी पोचवून त्याच्याकडून दरपत्रक मागवू शकता.
  • लग्नघर म्हटल्यावर चार पाहुणे घरी येणार. म्हणजे आपण लगेच घर आवरायला घेतो. पाहुणे यायच्या आधी घर आवरायचं आणि लग्नसोहळा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा घर पूर्ववत स्वच्छ करण्याचं कामही मागे लागतं. अशा वेळी होम क्लिनिंगची सेवा देणारी अ‍ॅप्स कामी येतात. या अ‍ॅप्समुळे होम क्लिनिंगसाठी एका क्लिकवर पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
  • आजकाल वरातीत घोडीवर बसून नवरदेव येत नाही, बसलाच तर मानापुरता थोडा वेळ बसतो. नाही तर वरासाठी आलिशान कारमधून वरात येणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. ही वरातीची गाडी मर्सिडिज किंवा स्कोडा असेल तर.. ही सेवा आणि सोयदेखील मोबाइल अ‍ॅप्स देतात. या महागडय़ा आलिशान बडय़ा गाडय़ा हवा तितका वेळ भाडय़ाने घेता येऊ शकतात. हे काररेण्ट तासावर असल्याने लग्नाच्या जामानिम्यात बजेटमध्ये बसू शकतं. कार्झऑनरेण्टसारखी (Carzonrent) अ‍ॅप्स यासाठी मदतीला येतात. घर आणि लग्नाचं ठिकाण दूर असेल तर वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी आता दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. नातेवाईकांना नेण्या-आणण्याची काळजी करायचीही गरज उरत नाही. MYles सारखी अ‍ॅप्स सेल्फ ड्रिव्हन कार भाडय़ाने देतात. वेडिंग सीझनसाठी विशेष सवलतही देऊ करतात.
  • लग्नाचं घर आहे म्हणजे सजावट तर आलीच. लग्नमंडपाची, स्टेजची सजावट म्हणजे तर जिव्हाळ्याचा विषय. आपल्या स्वप्नातला मंडप सजतो तशी रचना असावी अशी आपली सुप्त इच्छा असते. त्यासाठी छोटय़ा-मोठय़ा कित्येक गोष्टींची आठवण, सोय करावी लागते. वेड मी गुड (Wed Me Good) हे अ‍ॅप अशा अनेक सुविधांचे पर्याय देतं, शिवाय अनेक सजावटीच्या कल्पनाही देतं. वेगवेगळ्या लग्नांचे फोटो डाऊनलोड करून त्यापासून प्रेरणा मिळू शकते. शिवाय महत्त्वाच्या गोष्टींचा विसर पडू नये म्हणून चेकलिस्ट द्यायचं कामही करतं. व्हॉट अ शादी या अ‍ॅपवर अशीच वेगवेगळ्या विक्रेत्यांची, कलाकारांची माहिती, त्यांच्या दरांसहित मिळू शकते. फोटोग्राफर, फुलांची सजावट करणारे, रांगोळी काढणारे अशा अनेकांची माहिती सहज एका टॅपसरशी मिळू शकते.
  • लग्नसोहळ्यात नातेवाईक, आप्त आणि मित्रपरिवार यांना आपण जिव्हाळ्याने सामील करून घेत असतो. किती तरी नव्या पद्धतीने त्यांना निमंत्रण देता येतं. अशीच एक हटके पण सोयीची निमंत्रण पद्धत घेऊन आलंय शादीसागा (Shaadi Saga) हे अ‍ॅप. या अ‍ॅपमार्फत लग्नासंबंधी सगळी आवश्यक माहिती आप्तांपर्यंत पाठवता येते. आपल्या लग्नाचं निमंत्रण छानशा फॉरमॅटमध्ये तयार करून स्मार्टफोनद्वारे सगळ्यांना पाठवू शकतो. आपल्या सगळ्या आप्तजनांची एक व्हच्र्युअल चेन बनवून लग्नातील प्रत्येक तयारीचे अपडेटसुद्धा दूरस्थ नातेवाईकाला देता येतात. फोटोसहित हे निमंत्रण तयार करून ‘लग्नाची गोष्ट’ आपण आपल्या आप्तजनांपर्यंत पोहोचवू शकतो. या अ‍ॅपमध्ये व्हेंडर्सची यादी नसून एक प्रकारे हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच आहे. प्रत्येकाच्या परफेक्ट वेडिंगचे फंडे वेगवेगळे असतात. ‘वेडिंग प्लॅनिंग अ‍ॅप्स’च्या मदतीने त्या परफेक्ट प्लॅनिंगपर्यंत नक्की पोचता येतं. कमीत कमी त्रासात आपल्यापर्यंत माहिती आणि कामाची माणसं पोचतात. सो या डिजिटल नारायणांचा शोध घेण्यासाठी वेडिंग प्लॅनिंग अ‍ॅप्स धुंडाळायलाच हवीत.