गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

भारतीय चित्रपटांनी आपल्या प्रेक्षकांना किती गंडवावे याची आद्यकालापासूनची उदाहरणे अनंत असली, तरी सर्वात गमतीशीर आहे, ते नायकांच्या वाद्यनिपुणतेचे दाखले देणारी अभिनयाची भीषण अवस्था. नायक हा इसम नायिकेभोवती पिंगा घालत सूरसुसंगत चेष्टा करण्यात पटाईत असावा आणि त्याच्या हाती कोणतेही वाद्य आले की तो निष्णात वादक अंगात संचारल्यासारखा वागावा हा नियम अचानक कुणी रूढ केला, याचा अभ्यासच व्हायला हवा. तो होण्याआधी, शम्मी कपूर यांनी गिटार घेऊन ‘बार बार देखो’ गाण्यात नृत्याचा अजब बाज आणि चेहऱ्याचा जो विचित्र प्रकार करून दाखविला आहे, त्यावर ओझरती नजर टाकणे आवश्यक आहे. त्यातील वाद्यांच्या तारा खाजविण्यात लक्षात येणाऱ्या गमतीमुळे अध्र्या गाण्यातच त्यांनी गिटारसंन्यास घेतला आहे. साठोत्तरी नायकांची बंडखोरी ही हाती गिटार घेऊन ती प्रेक्षकांच्या डोळ्यांवर धूळ फेकण्यात गेली. गिटार हे तंतूवाद्य इतरांच्या तुलनेत सोपे असले तरी सहजसाध्य नाही. अखंड मेहनत, एकाग्रता, सातत्यता आणि मनगट-खांद्याला करू द्यायचा व्यायामयोग यांचा मेळ बसवून त्यावर हुकमत मिळविता येते. सुरू करून कित्येक महिने मूलभूत शिक्षण पूर्ण करण्यात जातात, तेव्हा कुठे फ्रेटबोर्डवर बोटे फिरण्यात आणि चार बोटांचा वापर करून बारकॉर्ड्स वाजविण्याची क्षमता अंगी येते. वर्षांनुवर्षांच्या मेहनतीने ते वाजविण्याची कला आत्मसात करता येते. भारतीय चित्रपटातील अत्यंत व्यग्र नायक गिटार हाती आली की तारा खाजवून अद्भुत, अवीट गोडीचा दैवी वगैरे स्वर काढताना दिसतात. असे असले तरी भारतात गिटार खरेदी-विक्रीचा व्यवहार आणि हे वाद्य शिक्षणाची इच्छा ही गेल्या पिढीपर्यंत भारतीय चित्रपटांमुळे घडलेले प्रकरण आहे. नायकाला हुकमती गिटार वाजवताना पाहून भारतात अनेक गिटारिस्ट घडले आहेत. फक्त ते गिटार वाजवू लागल्यानंतर त्यांचा भारतीय नायकांच्या गिटार वादनावरील विश्वास उडाला आहे, हे खरे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट सिनेमा जाऊन भारतीय चित्रपट जेव्हा इस्टमन कलर झाला, तेव्हाच्या गाण्यांची ही काही उदाहरणे आहेत. आजच्या पिढीला गिटार या वाद्याविषयी  आणि त्याच्या वादनाविषयी यूटय़ूब माध्यमावर बरीच माहिती आहे. हे वाद्य शिकविणाऱ्या अनेक टय़ुटोरिअल्स आणि प्रात्याक्षिके तेथे उपलब्ध आहेत. त्यामुळे या गाण्यातल्या नायक वादकांनी केलेल्या वादनाची शैली त्यांनी अभ्यासावी. इतरांनी आपल्या आवडीच्या गीतामध्ये नायकांनी गिटार खाजविण्याची जी लाजवाब अभिनयक्रीडा केली आहे, त्याचा नुसता आस्वाद घ्यावा.

‘कर्ज’ नामक चित्रपटात ऋषी कपूर यांनी जगप्रसिद्ध ‘एक हसीना थी’ गाण्यातील गिटारप्रयोग करताना तोंडाचा जो अवघड भाव आणि तल्लीनतेचा अभिनय केला आहे, त्याला तोडच नाही. गिटार खर्जात वाजते, तेव्हा त्यांचा हात उंचीच्या स्वरावर असतो. आणि कॉर्ड वाजविण्याची क्रिया दाखविली जाते, तेव्हा गिटारवर प्लकिंग सुरू असते. पण याहून विनोदी प्रकार ‘हम किसीसे कम नही’ गाण्यातील नायकाने करून दाखविला आहे. ‘चाँद मेरा दिल, चांदनी हो तुम’ हे गीत गिटारसह गात रोबोटिक नृत्याच्या नव्या प्रकाराला नायकाने बॉलीवूडमध्ये जन्म दिला आहे. आकर्षक गिटारपेक्षा लक्ष्यवेधी इथले वादननृत्य झाले आहे. हा अद्भुत पदन्यास नव्याने पाहाच. ‘यादो की बारात’ या सिनेमातील गिटार सूर बरसात म्हणजे त्या वर्षीचा सर्वोत्तम अभिनय प्रकार असावा. या गाण्यातल्या सुरुवातीची वादनक्रीडा फक्त तो नायकच वाजवू जाणे. नायिकाही यात पिछाडीवर नव्हत्या हे दाखविणारे ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’ हे गाणे उदाहरणदाखल घ्या. नायिकेच्या अंगुलीकौशल्याचे आणि सोबत नृत्य करण्याचे अवघड काम थक्क करून सोडणारे आहे. दुसऱ्या कडव्यात गिटार नायकाच्या हातात जाते. त्यामुळे नायक-नायिका एकाच गिटारक्लासला जात असावेत, अशी आपली उगाच खात्री होते. डिस्को डान्सर चित्रपटात मिथून चक्रवर्तीदादा यांचे गिटारचाळे कुणी आज करू धजावणार नाही. भारतात इलेक्ट्रिक गिटार आजतागायत अशी कुणी वाजवू शकलेले नाही. १९९२ नंतरच्या चित्रपटांमध्ये नायक-खलनायक ओळखणे जेव्हा चेहऱ्यांवरून अवघड बनायला लागले, तेव्हा हाती गिटार असलेली व्यक्ती म्हणजे नायक आणि बंदूक असलेली व्यक्ती म्हणजे खलनायक, असे समीकरण होते. गिटार या वाद्याचे विडंबन बॉलीवूडइतके कुणी केले नसावे. आमिर खान, शाहरूख खान यांची गिटारशक्ती पहावी आणि भरपूर हसून घ्यावे. ओ. ओ. जानेजाना नामक गाण्यात सलमान खानने इलेक्ट्रिक गिटारमधून आकुस्टिक गिटारचा आवाज काढून दाखवून वादनाचा जो विश्वविक्रम प्रेक्षकांसमोर करून दाखविला आहे, त्याला कशाची सरच नाही. बीग बी अमिताभ बच्चन यांनी एका विलक्षण डबल गिटार वाजवत पियानिका या वाद्याचा आवाज काढून दाखविला आहे. सारेच अवघड आणि अशक्य असे आहे ते. असे असले तरी गिटार वाजविणारा नायक भारतीय सुजाण-चाणाक्ष प्रेक्षकांना आवडतो. गिटार वादनातील खरे हिरो मात्र कायम पडद्यामागेच राहतात.

viva@expressindia.com