आई आणि मुलीच्या नात्यातलं अंतर हल्ली कमी होतंय आणि दोहींच्यात मैत्रीचं नातं फुलतंय. पण तरीही मुलगी वयात येते, तेव्हा आईशी खटके उडतातच. कारणं कितीही क्षुल्लक असली, तरी एकमेकींना समजून न घेणं ही ‘त्या’ नाजूक वळणावरची खरी गुंतागुंत आहे.

‘काय गं? ही अशी एका शब्दात उत्तरं का देतेयस?’.. ‘काही नाही. मूड ठीक नाहीये..’ नंतर पहिलीच्या आलेल्या रिप्लाय वर दुसरीने मेसेज आलेला कळूनही लगेच रिप्लाय केला नाही. दुसऱ्या ताईंचा मूड ठीक नसायला वरवर पाहिलं तर अगदी साधं कारण होतं. हल्ली नेहमीचंच झालेलं! आईशी क्षुल्लक गोष्टींवरून ‘वाजणं’ हे काही आज पहिल्यांदा घडत नव्हतं.

israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

‘होऽऽ येतेऽऽ दोन मिनिटांत.’ असं दोनदा ओरडून सांगितल्यावरही मातोश्रींनी हाका मारणं थांबवलं नव्हतं. त्यामुळे फोनवर सारखं सारखं ‘एक मिनिटं होल्ड कर हं’ म्हणताना संवादाची लिंक तुटत होती. शेवटी आईचा तारसप्तकात लागलेला आवाज ऐकून फोन ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हतंच! फोन ठेवून चिडून बाहेर आलेल्या तिला खरंतर आईच्या या अवाजवी चिडण्याचं कारणच उमगेना. घडय़ाळाने रात्री ११ वाजल्याचे टोले देऊन तिच्या मनातला गोंधळ लगेचच दूर केला. त्यानंतर मग तिला जास्तच राग आला आणि नेमका त्याच वेळी आईने तिच्या समोर प्रकट होत दिलेला ‘तो’ एक नकोसा लुक.. कुठलीही इमोटीकॉन दाखवून एक्स्प्रेस न करता येण्याजोगा ! ‘या’ लुकचं पेटंट केवळ या माऊलीकडेच! आता ‘हा’ लुक म्हणजे काय हे निदान आजच्या तरुण मुलींना तरी सांगणे न लगे. तरी इतरांच्या माहितीसाठी ही बुद्धीला झेपतील तेवढी दिलेली स्पष्टीकरणं – संताप, अगतिकता, कुठून या मुलीला जन्म दिला, स्वतचं हित कशात आहे कधी कळणार या पोरीला.. अशा टिपिकल ‘मातृ’सेन्ट्रिक काळज्या आणि कुठल्याही मुलीच्या आकलनक्षमतेला न झेपणारी इन्सल्टिंग वाटावी इतपत तुच्छता! हे असं सगळं त्या एकाच लुकमध्ये सामावलेलं असतं. सरतेशेवटी मुलगीच कशी बेपर्वाईने वागतेय..

2तिला कशी तिच्या भविष्याची चिंता अजिबातच नाही. हा असा निष्कर्ष सूचित करणारा एक लांब उसासा ऐकला की, आपण हार मानणे आणि आई असलेल्या त्या खोलीतून काढता पाय घेणे हे असंच काहीतरी मुलींना करावंसं वाटतं. समजा अशी आत असताना जर मुलगी कुणाशीतरी फोनवर बोलतेय असं आईच्या लक्षात आलं. की नेमकं काहीतरी खासगी किंवा अतिमहत्त्वाचं पलीकडल्या व्यक्तीशी बोलायचं असताना ही हमखास तिथे घुटमळणार! त्यात पलीकडला कुणीतरी ‘तो’ आहे असं लक्षात आलं की, अगदी स्पष्ट नाही तरी अप्रत्यक्षपणे काहीतरी बोचरं बोलणार! सरळ सरळ म्हणावं काय वाटतंय ते.. उगीच काहीतरी नको त्या शंका मनात घोळवणाऱ्या आईचा अशा वेळी राग येणार नाही तर काय? या सगळ्यात एखाद्या मैत्रिणीची आई ‘कूल’ असते.. आमच्या पिढीला पटण्याजोगी! मुलीला माफक मोकळीक देणारी.. तिच्या तारुण्यसुलभ बदलांशी मैत्री करू पाहणारी! मग आमच्यावर त्यांच्या पिढीच्या ‘डूज अॅण्ड डोण्ट्स’ लादणाऱ्या मातांना हे का उमजू नये?
घरात काम न करणाऱ्या कुणा दुसरीला उद्देशून ही एकविसाव्या शतकातली आईसुद्धा ‘तुझं सासरी कसं होणार?’ असे उद्गार काढते. यावर मुलीनं नेमकं कशा प्रकारे रिअॅक्ट होणं अपेक्षित आहे? अपवाद म्हणून काही कुटुंब वगळल्यास मुलामुलीतला भेदभाव घराघरांत थोडय़ाफार अंशी आहेच, तो असा! त्यामुळे हे मुलगी- सासर- कामं असं त्रराशिक आहे ते अजूनही तितकंच ठाशीव, ठरलेलं वाटतं. का करावीत फक्त मुलींनीच कामं? असा स्वाभाविक प्रश्न विचारला की त्यावर आईकडे उत्तर नसतंच! वर ‘उलट उत्तरं देतेस’ असं म्हणून तिच्या आविर्भावातून कुठेतरी मुलीला गिल्ट देण्याचा प्रयत्नही असतो. हे सगळं मुलीला कंटाळवाणं आणि पेशन्स टेस्ट करणारं वाटू लागतं एका क्षणी !
गर्दीतून स्वत:ला पुढेपुढे ढकलत ट्रेनचा प्रवास करून घरी आल्यानंतर फोन सायलेंटवर ठेवण्यावरून ही चुकीच्या सवयींचा सगळाच पाढा वाचायला सुरुवात करते. फोन उचलला नाही म्हणून आईला काळजी वाटणं स्वाभाविक आहे.. हे मुलीला कळतं. पण इतक्या साध्या गोष्टीचा कीस का पाडतेस म्हणून मुलगी काही चिडून बोलली की, ‘सदानकदा हिची चिडचिड सुरूच! हिला काही बोलायचं नाही. आपण मात्र हिला हवं तसंच करू द्या..!’ हा आमच्या सात्त्विक चिडचिडीवर घराघरांतून फसफसणारा उद्गार! आमच्या चिडचिडीचे दिवसभरातले अनेक संदर्भ, कारणं आम्ही आमच्यापाशीच ठेवलेली असतात याची एक किरकोळ दखल घेतली जायला हवी ती बहुतेक वेळा कुठे घेतली जाते? आमचीही उलघाल होतंच असते की.. घरात.. घराबाहेर.. नव्यानेच जाणिवांना पंख फुटू लागलेले असतात. स्वप्नांना झळाळी आलेली असते. कधीतरी अगदी क्षुल्लक काहीतरी घडलं की आमच्या जाणिवा खुरटतात. स्वप्नं कोमेजतात! तो सगळा ड्राइव्ह आमचा आम्ही ओढून नेत असतो.. कुणालाही त्याची बित्तंबात लागू न देता! मनावरून असं व्यक्त न करता येण्याजोगं ओझं आम्ही वागवतो तेव्हा कुणीतरी मैत्रीपूर्ण साद घालावी; त्या आधारात सोबतीची एक खात्रीलायक आश्वस्तता असावी असं वाटण्यात आम्ही तरी कुठे चुकतो? अशा वेळी समजून न घेणारी आई कधी काळी आमची सगळ्यात जवळची मैत्रीण होती हे वाटणंच नॉस्टेलजियाचा भाग होऊन गेलेलं असतं! समोर बसलेल्या तिला मात्र आमच्या आत चाललेल्या या वादळाची सुतराम कल्पना नसते.

आई-मुलीच्या नात्यातलं हे भलतंच नाजूक वळण! तसं दोघींसाठीही.. पण मुलगी सध्या अनुभवत असलेला प्रचंड गुंतागुंतीचा त्रास आईने यापूर्वी काही वर्षांपूर्वी अनुभवलेला असतोच. पिढीनुसार मुलीच्या गरजा बदललेल्या असल्या तरी समजून घेणे ही मूळ गरज तशीच कायम असते. या समजून घेण्यात मुलीला आवश्यक ती स्पेस देणं, तिच्या नव्या बिनधास्त दृष्टिकोनाला न डावलता त्याचं सकारात्मक स्वागत करणं या उपगरजा मात्र पुन्हा बदललेल्या आहेत. अर्थात, हा समजुतीचा आशावाद कितपत बाळगायचा हे एकमेकींच्या बेसिक टेम्परामेंटवर अवलंबून !

वादास कारण की..
दोन पिढय़ांमधलं अंतर, बदलत्या अपेक्षा, त्यातून होणारे मतभेद, वाद हा प्रत्येक पिढीत नवा वाटणारा (प्रत्यक्षात नवा नसलेला) विषय. आई आणि मुलीच्यातलं मानसिक अंतर कधी नव्हे एवढं हल्ली कमी होतंय, कारण वयात येणाऱ्या मुलीची आई मैत्रीण होऊ पाहतेय. तरीही एका ठरावीक वयात वाद होतातच. कारणंही क्षुल्लक. पण ‘घरोघरी त्याच परी’ या म्हणीनुसार वादविवाद ठरलेले. घरातल्या पसाऱ्यापासून ते कपडय़ांपर्यंत आणि हातातल्या मोबाइलपासून गल्लीतल्या मित्रापर्यंत कुठलंही कारण वादाला तोंड फोडतं. आईशी कुठल्या कारणावरून ‘वाजतं’ असं तरुण मुलींना विचारल्यावर ही कारणं पहिल्या दहांत आली.

  • रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरणं, (मोबाइलवर खेळणं हा आईचा शब्दप्रयोग!)
  • सोशल नेटवर्किंग साइट्सवर रेंगाळणं,
  • (तिच्या मते)आक्षेपार्ह भाषा असलेले रिअॅलिटी शो पाहणं,
  • उलट उत्तरं देणं,
  • वेळेवर घरी न येणं, उशीर होणार असेल तर तसा फोनदेखील न करणं,
  • हुल्लडबाजी करणं, (म्हणजे काय न कळे !)
  • फॅशन, ट्रेण्ड फॉलो करण्यासाठी (फॅशनचा नाद -आईचा शब्द) सतत पैशांची उधळण,
  • घरगुती कामाचा आळशीपणा,
  • मित्र-मैत्रिणींना प्राधान्यक्रम आणि हॉटेलिंग, पार्टी, फ्रेंड सर्कल यामध्ये प्रचंड वेळ, पैसा घालवणं,
  • सततचं बाहेरचं खाणं.– लीना दातार
    (संकलन : सायली पाटील)