गोठवणारी थंडी, सायकलवरून फिरणं आणि डच जीवनशैलीशी जुळवून घेण्याच्या अनुभवांबद्दल सांगतेय, नेदरलँड्सच्या आइनहोवेनमधली मृण्मयी.

हाय फ्रेण्ड्स, आज थोडासा वेळ आहे हातात, तर म्हटलं.. ऑफिसला जायच्या आधी गप्पा मारूया. मी मूळची पुणेकर. माझं शालेय शिक्षण कर्नाटक हायस्कूलमध्ये झालं. डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून इंटिरीअर डिझाइनिंगचा तीन वर्षांचा कोर्स केला. लग्नाआधी फग्र्युसन कॉलेज रोडला न्यूक्लिअस डिझाइन स्टुडिओमध्ये इंटिरीअर डिझायनर म्हणून अडीच र्वष जॉब करत होते. इंटिरिअर डिझाइनिंग करता करता मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमधून तीन र्वष बी.कॉमही केलं. मला पहिल्यापासूनच इंटिरीअर डिझाइनिंगची खूप आवड होती. पण आईच्या मताला मान देत बी.कॉमही केलं. पुढं नवऱ्याकडून -सिद्धेशकडून कळलं की, इंटिरीअरला नेदरलॅण्डमध्ये फारशी संधी नाहीये. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनला फॉरेन ट्रेड हा वर्षभराचा कोर्स केला.

मी नेदरलँड्समध्ये येऊन दोन र्वष झाल्येत. लग्न ठरायच्या आधीच सिद्धेश भारतात येऊन गेलेला असल्यानं लगेच सुट्टी मिळणं कठीण होतं. म्हणून आईबाबांसोबत मी त्याला बघायला नेदरलँड्सला आले. तेव्हा इथली कडाक्याची थंडी, सायकलिंग करणं आणि कामाला कुणी मिळणार नसल्यानं सगळ्या गोष्टी स्वत:च कराव्या लागतील, या तीन महत्त्वाच्या बाबींची कल्पना त्यानं दिली होती. आता इथं भारतीयांचं प्रमाण वाढलंय. आधी आम्ही फिरताना मराठी सर्रास बोलायचो, जे कुणाला कळायचं नाही, पण आता सांभाळून बोलायला लागतं. सिद्धेशच्या ऑफिसमध्ये मराठी माणसं नाहीत, पण भारतीय आहेत. माझ्या ऑफिसमध्ये अधिकांशी डच आणि टर्किश, पोलंड, रुमेरियन, अफगाणी लोक आहेत.

आताशा मी डच शिकायला सुरुवात केलेय. थोडासा उशीरच झालाय, कारण इथले लोक थेट डचमध्येच संवाद साधायला सुरू करतात. आपण इंग्लिश बोललो, तरी ते फार चांगलं इंग्लिश बोलत नाहीत, पण तुटक बोलायचा प्रयत्न करतात. लंच ब्रेकच्या वेळी सहकारी गप्पा मारतात ते पटकन डचमध्ये बोलतात. मग थोडं एकटं पडल्यासारखं वाटतं. इंग्लिश बोलायला ते फारसे राजी नसतात. माझ्या डचच्या क्लासमधल्या शिक्षिका आणि सहविद्यार्थी खूप चांगले आहेत. त्यामुळं बरंच प्रोत्साहन मिळतंय नि आणखी शिकावंसं वाटतंय. ही भाषा तशी अवघड आहे. उच्चार करताना थोडं कठीण जातंय. डच शिकल्यावर इंग्लिश विसरशील, तसं करू नको, असा सल्ला अनेकांनी मला दिलाय. पण मला वाटतं, थोडीशी मराठीशी जवळीक साधणारी आहे ही भाषा.

इथे आल्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी मला नोकरी मिळाली. इंटिरीअर डिझाइनिंगसाठी खूप अर्ज केले होते. पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग लॉजिस्टिक, मॅनेजमेंट वगैरे क्षेत्रात नोकरी शोधायला लागले. ‘झारा’मधून कॉल आल्यावर दोन राउंड इंटरव्ह्य़ू होऊन निवड झाली. गेली सव्वा र्वष मी ‘झारा वुमन क्लोदिंग’मध्ये असिस्टिंग स्टॉक मॅनेजर म्हणून काम करतेय. स्टॉकरूममध्ये हँगिंग, फोल्डिंग, सॉर्टिंग, प्रॉक्डटची आवक-जावक नोंदणं आदी कामं करावी लागतात. हे काम थोडं हेक्टिक असलं तरी इथं लोकांना खूप कमी नोकऱ्या मिळतात. त्यामुळं मला आहे ती नोकरी घालवायची नाहीये. थोडा अनुभव गाठीशी जमा झाल्यावर दुसरा जॉब शोधता येईल. आमचं ऑफिस कल्चर एकदम छान आहे. सुरुवातीला सहकाऱ्यांशी फारसं बोलणं व्हायचं नाही, कारण मला डच यायचं नाही. आता माझं तुटक डच आणि त्यांचं तुटक इंग्लिश असा संवाद साधला जातोय. एक किस्सा आहे नेदरलँण्डमधला. इथल्या डेंटिस्टची ट्रीटमेंट हा खूप वेगळा अनुभव होता. ट्रीटमेंट खूप महाग आहे, हे माहिती होतं. त्यासाठी आधी अंदाजे खर्च मागावा लागतो आणि ते सांगतात. त्यांनी सांगितलेला खर्च ठीक वाटला. मग रुट कॅनल केलं नि जवळपास दोन लाख दहा हजार रुपयांचा खर्च झाला. नंतर मी इतरांना विचारल्यावर साधारण तितकीच रक्कम होत होती. असो.

5सिद्धेश इथंच शिकल्यानं त्याचे मास्टर्सच्या वेळचे मित्र आणि त्यांची कुटुंबं असा २०-२५ जणांचा ग्रुप आहे. सिद्धेशच्या ऑफिसमधले सहकारी वयानं थोडेसे मोठे असले तरी तोही एक चांगला ग्रुप झालाय. माझ्या सहकाऱ्यांच्या ग्रुपला भारतीय पदार्थ खायला आवडत असल्यानं त्यांना आवर्जून घरी बोलावते. आमच्या या भेटीगाठी एवढय़ा आहेत की पुढल्या दोन महिन्यांचे वीकएण्ड बुक्ड आहेत. मध्यंतरी आम्ही वीसजणं जर्मनीला गाडीनं गेलो होतो. त्याखेरीजही आम्ही भरपूर फिरलो, त्यापैकी स्वित्र्झलड मला खूपच आवडलं. मला तिथं परत जायला आवडेल. इथंही फिरण्यासारख्या खूप जागा आहेत. ‘सिलसिला’पासून आपल्याकडं फेमस झालेलं सुंदरसं टय़ुलिप गार्डन आहे क्युकेनहॉफला. एप्रिल ते मेपर्यंतच बहरणाऱ्या या फुलांचा ‘किती काढशील फोटो..’ अशी आपली भारल्यागत स्थिती होते. कल्पकतेनं केलेली सुरेख मांडणी नि लक्षवेधी रंगसंगतीचं हे ताटव्यांचं सौंदर्य आम्ही निरखतच राहिलो होतो. zaanse schaans (झांसेस स्कान्स)मध्ये डच जीवनशैलीचं दर्शन घडवणारं गाव जतन करण्यात आलंय. तिथल्या पवनचक्क्या, शूज मेकिंग फॅक्टरी, चीज मेकिंग फॅक्टरी वगैरे गोष्टी बघण्यासारख्या आहेत. Madurod (माडुरोडॅम)ची फॅमिली ट्रिप लख्खपणं आठवणीत राहिलेय. नेदरलँड्समधल्या जागांचं आयकॉनिक मिनिएचर तिथं मांडण्यात आलंय. त्यापैकी इथल्या वाहतूक व्यवस्थेच्या मिनिएचरमध्ये- बोट, ट्रेन्स, गाडय़ा, लॉरीज आणि अगदी विमानंही असून ती फिरती आहेत. Times (किंडरडाइक)मधल्या पवनचक्क्या आणि म्युझिअममुळं त्या काळातल्या समाजाची कल्पना येते. या पवनचक्क्या व्यवस्थितपणं जतन करण्यात आल्यात. त्यापैकी एकीत शिरून आम्ही त्यातल्या यांत्रिक गोष्टींची माहिती करून घेतली होती. एरवी नेदरलँड्समध्ये तीन-चार मजल्यांवर इमारती दिसत नाहीत. पण रॉटरडॅममध्ये भल्या मोठाल्या स्कायेस्क्रेपर्स बघायला मिळतात. अॅमस्टरडॅम तर भरगच्च गर्दी आणि प्रवाशांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहेच.

डच लोक त्यांच्या थेट बोलण्यासाठी ओळखली जातात. डच प्रचंड शिस्तप्रिय आणि कुटुंबवत्सल आहेत. इथली स्वच्छता लक्षणीय असून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं रात्री दहापर्यंत चालू असतात, बाकीची संध्याकाळी सहालाच बंद होतात. ओव्हरटाइम नाहीये, पण कामाच्या वेळी कटाक्षानं कामच केलं जातं. लोकं सायकलवरून सगळीकडे फिरतात. मुलांना सायकलवरूनच शाळेत सोडलं-आणलं जातं. अगदी आज्जी-आजोबाही सायकलिंग करतात. पुण्यात मला सायकलची बिलकूल सवय नव्हती. त्यामुळं सुरुवातीला सायकल चालवताना कठीण गेलं होतं. आता तो सवयीचा भाग झालाय. काही जण स्टेशनपर्यंत सायकलनं जाऊन ती पार्क करतात. काही फोल्डिंगची सायकल ट्रेनमधून घेऊन जातात. बरेच जण एअरपोर्टला जाताना सायकलवरून व्हिल्सची बॅग ओढत नेतात. इथं पार्किंगचं भाडं खूपच असून रोड टॅक्स गाडीनुसार बदलतो. त्यामुळं लोक सायकलिंगलाच प्राधान्य देतात. वेगळा सायकल ट्रॅक असून तो सुरक्षित आहे. आम्हाला जिमसाठी वेगळा वेळ मिळत नसला, तरी सायकलिंगमुळं आपोआप व्यायाम होतोच. सायकल खूपच महाग आहेत इथं. बाकी काही नाही, पण सायकलचीच चोरी होते. इथं आल्या आल्या हे सायकलप्रेम पाहून मी चकितच झालेले नि सगळं कॅमेऱ्यात टिपून ठेवलं.. आता मीच त्या सायकलप्रेमींपैकी एक झालेय.

इथले लोक तसे थोडे कंजूसच असतात. उदाहरणार्थ- कुणी पार्टीला बोलावलं तरी प्रत्येकानं स्वत:चा खर्च करायचा. त्यावेळी म्हटलं जातं- लेटस् गो डच. इथं भारतीय रेस्तराँ नाहीत. आहेत ती थेट अॅमस्टरडॅमला. त्यामुळं घरीच स्वयंपाक करावा लागतो. आम्ही सकाळी ऑफिसमध्ये जेवताना त्यांची खाद्यसंस्कृती थोडीशी स्वीकारलेय. उदाहणार्थ सॅलड, ब्रेड्स, चीज, सँण्डवीच, पास्ता वगैरे असा लंच आम्हाला चालतो. या लोकांच्या रात्रीच्या जेवणात स्टॅम्पॉट म्हणजे आपल्या पावभाजीसारखी डिश असते. मसाले फारसे नसतात. मटार सूप त्यांना खूपच आवडतं. डेझर्टमध्ये तिरामिसू, कस्टर्ड वगैरे असतात. रात्री आम्ही आपलंच जेवण करतो. हे मी सांगतेय खरं, पण पुण्यात मला स्वयंपाकाची अज्जिबात सवय नव्हती. इथं येऊन पुरणपोळीपासून ते पिझ्झापर्यंत सगळं करता यायला लागलंय. इथं वेळ मिळेल तसा ड्रॉइंग, पेंटिंग, डुडलिंगचा छंद जोपासतेय. गेल्या दोन वर्षांत मी खूप स्वावलंबी झालेय. सगळ्या व्यावहारिक गोष्टी आणि घरगुती दुरुस्तीची कामं हाताळणं जमतंय. नोकरीसह घरकामाचा तोल चांगला सांभाळता येतोय. हा देश अतिशय सुरक्षित आहे. पोलीस पेट्रोलिंग पुष्कळ असतं. कायदा-सुव्यवस्था खूप कडक आहे. सध्या पाचेक र्वष इथंच राहायचा बेत आहे. आता मला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय. खूप अवघड परीक्षा आहे. बघूया काय होतंय ते.. आता निघते.. मैं चली, मैं चली, देखो सायकल की गली..
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com

– मृण्मयी वेलणकर पटवर्धन
आइनहोवेन, नेदरलँड्स
( शब्दांकन : राधिका कुंटे)