मुग्धा गोखले केळकर पेनसेल्व्हानिया, यू.एस.

‘फोब्र्ज’च्या ‘थर्टी अंडर ३०’च्या यादीत स्थान मिळवणारी तरुण संशोधक, औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनाइतकंच कलाक्षेत्राला आपलंसं करत, ज्ञानाचा समन्वय साधत, आपल्या करिअरचा आलेख अधिकाधिक उंचावणारी अमेरिकेतली मुग्धा उलगडतेय, तिच्या अनुभवांची शिदोरी..

परवा सोशल मीडियावर एक मैत्रीण कनेक्ट झाली. एकमेकींची विचारपूस करता करता वेळ कसा गेला कळलंच नाही. तिचं म्हणणं होतं की, मी तिच्याशी शेअर केलेल्या गोष्टी खूप ‘सही’ होत्या. त्या शेअर करायलाच हव्यात मी सगळ्यांशी.. म्हणून ‘विदेशिनी’च्या माध्यमातून त्या आठवणी तुमच्याशी शेअर करतेय. आत्ताही आठवतंय.. भारतातून नुकतेच परतलो होतो आम्ही. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ‘ती’ आनंदाची बातमी कळली, तेव्हा आम्ही न्यूयॉर्कमधील मित्रमंडळींकडून घरी परतत होतो. विमानतळावर असताना ‘फोब्र्ज ३० अंडर ३०’च्या संदर्भात ईमेल आला. आधी क्षणभर विश्वासच बसला नव्हता. छोटीच्या विमानप्रवासाचं थोडं टेन्शन होतंच. आम्हीही थकलो होतो. रात्री उशिरा घरी पोहचलो. बरीच व्यवधानं होती, त्या क्षणाला! दुसऱ्या दिवशी ही छान बातमी आई-वडील व सासू-सासऱ्यांना कळवली. माझ्या इथल्या मार्गदर्शकांना कळवलं. हळूहळू ती बातमी आणि त्याचं महत्त्व सिंक होत गेलं.

‘फोब्र्ज थर्टी अंडर ३०’च्या यादीत माझं नाव आलं होतं. प्रत्येक क्षेत्रातील टॉप ३० जणांच्या नावांची ही यादी असते. ती दर वर्षी एकदा प्रसिद्ध होते. त्यासाठी कुणी तरी तुमचं नामांकन करावं लागतं. आपल्याला त्या व्यक्तीचं नाव कळत नाही. नामांकनानंतर ‘फोब्र्ज’तर्फे संपर्क साधला जातो. आपलं काम, संशोधनासह त्या त्या क्षेत्रांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. हजारो अर्जामधून त्या क्षेत्रातील दिग्गज परीक्षक मंडळी अंतिम यादीसाठी ३० जणांची निवड करतात. हेल्थकेअर कॅटेगरीच्या यादीत माझं नाव असल्याचं कळवणारा तो ई-मेल होता. ‘फोब्र्ज’च्या यादीमध्ये नाव येणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मानली जाते. ‘फोब्र्ज’ हे जगभरात नावाजलं जाणारं मॅगझिन आहे. या यादीतल्या निवडक लोकांचं समिट दर वर्षी भरवलं जातं. यंदा ते बॉस्टनमध्ये आहे. पण सुट्टीअभावी मला तिथं जायला जमेल असं दिसत नाहीये.  फोब्र्जच्या यादीपर्यंतचा माझा प्रवास सांगते आता.

मी मूळची ठाण्याची. मुंबई विद्यापीठातून बी.फार्म. झाले. वडील ‘डीआरडीओ’मध्ये शास्त्रज्ञ असून आई हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधली नावाजलेली गायिका आहे. घरी विज्ञान-कला क्षेत्रातलं वातावरण असल्यानं केवळ अभ्यास एके अभ्यास अशी अट कधीच नव्हती. लहानपणापासून आईकडं गाणं शिकलेय. मी संगीतविशारद असून भरतनाटय़मही शिकलेय. वडिलांसारखा विज्ञानाकडं ओढा होताच. आजी शिक्षणक्षेत्रात होती आणि आजोबांना विज्ञानाची आवड होती. फार्मसीचे बरेच पर्याय चाचपडल्यानंतर अमेरिकेत बरेच जण जातात, असं ऐकलं होतं. मनाशी होतं की, असं काही काम करावं, ज्याचा सगळ्यांना उपयोग होईल. उदाहरणार्थ- प्रत्येक औषधाचे चांगले-वाईट परिणाम असतात. आपण औषध घेताना त्याचा जास्त विचार करत नाही किंवा डॉक्टरांशीही सगळ्या त्रासांबद्दल बोलत नाही. असं संशोधन भारतात झालेलं मला आढळलं नाही. मग युनिव्हर्सिटी ऑफ अरकान्स फॉर मेडिकल सायन्सेसमध्ये मी ‘फार्मास्युटिकल इव्हॅल्युएशन अ‍ॅण्ड पॉलिसी’ या विषयात ‘एम.एस.’साठी अर्ज केला. तो मंजूर होऊन स्कॉलरशिपही मिळाली. एक ठरावीक पेनकिलर अमेरिकेत खूप घेतली जाते. त्या अनुषंगानं सुरुवातीचं संशोधन होतं. लोक क्रोसीनसोबत ही पेनकिलरही घेतात. पण ती ठरावीक प्रमाणाच्या वर घेतली गेल्यास लिव्हर फेल्युअरचा त्रास होऊ  शकतो. त्यामुळं हा प्रश्न हाताळावासा वाटला. या गोळीचा वापर किती, ओव्हरडोस होतोय का, आदी प्रश्नांची उत्तरं इन्शुरन्स डेटाच्या साहाय्यानं शोधायचा प्रयत्न केला. याला ‘ऑब्जर्झव्हेशनल रिसर्च’ म्हटलं जातं. या क्षेत्रात संशोधनाची ही सर्वमान्य पद्धत आहे. थेट औषधं देत नसलो तरी डेटाच्या साहाय्यानं औषधांच्या परिणामांचं आम्ही संशोधन करतो.

दरम्यान मला जाणवलं की, हा अभ्यास करताना स्टॅटिस्टिकल टेक्निक्स खूप वापरावी लागतात. ती नीट न वापरली गेल्यास ही उत्तरं नीट मिळत नाहीत. त्यामुळं ठरवलं की पीएच.डी.च्या ट्रेनिंगमध्ये ही स्किल्स पक्की करायची आणि मग ते अप्लाय करायचं. मग युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामध्ये संबंधित प्रोग्रॅम मिळाला. तिथंही स्कॉलरशिपसह अ‍ॅडमिशन मिळाली. माझं संशोधन पीएच.डी.च्या अनुषंगानं सुरू झालं. माझं संशोधन औषधांचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) यावर आहे. बऱ्याचदा रोगनिवारण करणाऱ्या औषधांचे साइड इफेक्ट्स पटकन लक्षात येत नाहीत. अनेक र्वष औषधं वापरल्यावर हे परिणाम कळतात. माझं संशोधन डायबेटिसवरील (मधुमेह) औषधांवर आहे. एका नवीन डायबेटिसच्या औषधानं स्वादुपिंडाचा कर्करोग (pancreatic cancer) होतो अशी शंका काही वर्षांपूर्वी होती. आमच्या टीमनं दाखवून दिलं की, ही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण असा परिणाम होत नाही. साधारण दोन र्वष हे संशोधन मॉडर्न स्टॅटिस्टिकल मेथड वापरून मी केलं. pancreatic cancer  हा खूप घातक रोग असल्यानं पेशंट आणि डॉक्टरांना या संशोधनामुळं थोडासा दिलासा मिळाला. या संशोधनासाठी मला बरेच पुरस्कार मिळाले. त्यानिमित्तानं अनेक मुलाखती घेतल्या गेल्या. पीएच.डी.चा कालावधी साडेचार वर्षांचा होता.

सायंटिफिक कॉन्फरन्सच्या निमित्तानं नेटवर्किंग वाढवायची संधी मिळाली. माझ्या डायबेटिस नि पॅनक्रियाटिक कॅन्सरवरील संशोधनावर मला ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ सादर करायची संधी मिळाली. हजारो ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट’मधून ‘बेस्ट स्टुडण्ट मेथड्स अ‍ॅबस्ट्रॅक्ट अ‍ॅवॉर्ड’ मला मिळालं होतं. अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांशीही संपर्क झाला. संशोधनासोबतच लोकांशी संवादही साधायला मिळाला, आताही मिळतोय. पीएच.डी.नंतर गेले तीन महिने GlaxoSmithKline अर्थात जीएसकेमध्ये Manager, Epidemiology R&D  म्हणून जॉब करतेय. इथं मी श्वसनसंस्थेशी संबंधित (रेस्पिरेटरी ड्रग्ज)औषधांचं संशोधन करतेय. या संशोधनाचा उपयोग भारतामधील पेशंटना व्हावा या दृष्टीनं माझे प्रयत्न सुरू आहेत. संशोधन चालू असताना एक विद्यर्थिनी म्हणून मला मीडिया कव्हरेज वगैरे गोष्टी ऐकून माहिती होत्या. त्यांचा अनुभव नव्हता. माझा पेपर प्रसिद्ध झाल्याचा दिवस माझ्या कायमच लक्षात राहिला. कारण काही जाणकारांकडून आणि मीडियाकडून ईमेल्स आले की, तुमचं संशोधन चांगलं आहे, तुम्हाला आमच्याशी बोलायला वेळ आहे का? अगदी शास्त्रीय भाषेत या संशोधनाबद्दल सांगितलं तर सर्वसामान्यांना कळणार नाही. त्यामुळं सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगावं लागलं. लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नि आत्मविश्वास वाढवणारे चांगले अनुभव आले. गाईडनी आणि कंपनीनी कायमच प्रोत्साहन दिलं.

दोन्हीकडच्या शिक्षण पद्धतींचा विचार करता भारतात पाठांतरावर अधिक भर होता. इथं मात्र ‘का?’ असा कारणाचा विचार करण्यावर भर दिला जातो. पाठांतरापेक्षा समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. योग्य आकलन झाल्यावर त्या ज्ञानाचा उपयोग होऊ  शकतो. ते मला आवडलं, तरी भारतीय शिक्षण पद्धतीमुळं माझं काही नुकसान झालं, असं मला नाही वाटत. उलट बराच फायदा झाला. परीक्षेत बहुतांशी वेळा भारतीय विद्यार्थी टॉपर्स असायचे. कारण त्यांनी ‘व्हॉट’ आणि ‘व्हाय’ या दोन्हींचा अभ्यास केलेला असतो. त्यांच्यातील एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट थोडंसं हवंच. इथं लोकसंख्या कमी असल्यानं स्पर्धात्मकताच नाहीये. त्यामुळं इथले विद्यार्थी सगळं इझिली घेतात, पण एशियन लोकांमध्ये स्पर्धात्मकता आढळते. दोन्ही शिक्षणपद्धतींत चांगले-वाईट परिणाम आहेतच. आमची छानशी टीम आहे. कामाच्या वेळी काम करावंच लागतं, पण त्यात थोडीशी फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते. ते काम वेळेत आणि जबाबदारीनं पूर्ण करावं लागतं. त्यामुळं वर्षांच्या लेकीला- मायराला सांभाळायला थोडंसं सोयीचं होतं. तिच्या जेवणापासून ते तिला डे-केअरमध्ये ने-आण करण्यापर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात नवरा-निखिलचा सर्वतोपरी पाठिंबा असतो. आमचं लग्न झालं तेव्हा पीएच.डी.चं तिसरं वर्ष चालू होतं. भारतात माहेरी आई-वडील नि आजोबा तर सासरी सासू-सासरे, आजीआजोबा नि दीर-वहिनी आहेत. या सगळ्यांनी कायमच सपोर्ट केलेला आहे.

आम्ही नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहत होतो, तेव्हा मी गाण्याचे क्लास घ्यायचे. नृत्यही सुरू ठेवता आलं. बरेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता आले. मला जॉब लागल्यापासून आम्ही पेनसिल्व्हानिया स्टेटमध्ये शिफ्ट झालोय. इथं रुळायला थोडा वेळ लागेल. अजूनही कधीकधी ‘होमसिक’ वाटतं, पण ठीक आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात तसं होतं. या गोष्टींशी डील करावं लागतंच.. अजून घर लावणं, मुलीचं डे-केअर वगैरे गोष्टी सेट होताहेत. निखिलला कामानिमित्तानं बरंच ट्रॅव्हल करावं लागतं. घरी आम्ही दोघीच असताना थोडीशी धावपळ होते. पण कामाचा आनंदही मिळतो. माझ्या कॉन्फरन्स युरोप आणि अमेरिकेत आलटूनपालटून असतात. फिरस्ती खूपच आवडत असल्यानं आम्ही बार्सिलोना, आयर्लण्ड वगैरे ठिकाणी फिरलो. हवाईला निखिल कामानिमित्तानं गेला होता, तेव्हा त्याच्यासोबत गेले होते. चित्रपटातलं न्यूझीलंड पाहून वाटलेलं की, मोठय़ा पडद्यावरच ते खूप भारी दिसत असेल. पण खरोखर फारच सुंदर देश आहे तो. अगदी डिव्हाइन. एकदम शांत, निवांत. एकूणच फिरस्तीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्यांचा आहार-विहार, निसर्गसमृद्धी अनुभवायला मिळते.

सध्या मी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामध्ये अ‍ॅडजंक्ट असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे. नोकरीपेक्षा संशोधन करणं, मुलांना शिकवणं या वेगळ्या गोष्टी असतात. त्याची मला आवड होती. शिकवताना आपणही बऱ्याच गोष्टी शिकतो. या कामात इंडस्ट्री आणि अ‍ॅकॅडमिक्समध्ये काही कोलॅबरेशन होऊ  शकतं का, त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत. कारण अमेरिकेत कोलॅबरेशनवर खूपच भर देतात. पुढं मायरा मोठी झाल्यावरही केवळ अभ्यास एके अभ्यास हेच लक्ष्य न ठेवता, तिला जे आवडेल ते तिनं करावं, असं मला वाटतं. त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. भारतात मी खूपच प्रोटेक्टेड लाइफ जगले. मध्यमवर्गीय आयुष्यात अंथरूण पाहून पाय पसरावेत, ही शिकवण कायमच मिळाली. ती आयुष्यभर पुरणार आहे. एकटी राहायला लागल्यावर जबाबदारी वाढली. स्वयंनिर्णय घेताना वेळेचं व्यवस्थापन करायला शिकले. अधिक संयमाने विचारपूर्वक बोलणं शिकले. दुसऱ्यांचाही विचार करायला लागले. बऱ्याचदा असं होतं की, जॉबमध्ये आपण फार अडकून बसतो. पण आवडतं काम चालू ठेवायचंय. सध्या अनुभव घेऊन मग ठरवायचंय की, मला इंडस्ट्रीत अधिक रस आहे की अ‍ॅकॅडमिक्स अधिक आवडतंय. मायराला क्वालिटी टाइम द्यायचाय. पुढं इथं स्थायिक व्हायचं की परतायचं ते अजून ठरलेलं नाही..तूर्तास तुमच्याशी केलेल्या या शेअरिंगमुळं मनाला आणखी उभारी मिळाली आहे, हे मात्र नक्की.

मुग्धा गोखले केळकर पेनसेल्व्हानिया, यू.एस.

(शब्दांकन- राधिका कुंटे)    

मुग्धा गोखले केळकर पेनसेल्व्हानिया, यू.एस.