गेल्या २० वर्षांचा अनुभव, दोन हजारांहून जास्त गाणी, अनेक दिग्गज संगीतकार, गायक कलाकारांसोबतचे अनुभव आणि वैशाली सामंतचं स्वत:चं सूरसंचित.. ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये रसिकांना भेटली गाण्यातली नव्हे तर गप्पांमधली सुरेल वैशाली. तिला बोलतं केलं होतं, स्वाती केतकर-पंडित आणि रेश्मा राईकवार यांनी. गप्पांमध्ये तिने सहज म्हणून गायलेली गाणी आणि तिचं दिलखुलास बोलणं श्रोत्यांच्या मनात घर करून गेलं. वैशालीने सांगितलेली तिच्या गाण्याची गोष्ट..

कोरसमधून सुरुवात

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

आमच्या पाल्र्यात ‘आम्ही पार्लेकर’ नावाचं एक मासिक निघतं. त्याचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये मी गात होते. हा कार्यक्रम ऐकायला सुरेश वाडकर आणि श्रीधर फडके आले होते. तेव्हा श्रीधरजींनी मला त्यांच्या एका गाण्यासाठी कोरसमध्ये गायला बोलावलं. माझ्यासाठी ती मोठी संधी होती. गात असताना स्टुडिओतल्या साऊंड रेकॉर्डिस्ट बाबा यांनी मला सांगितलं, ए लडकी तू पीछे हो जा तेरी आवाज बहोत शार्प है. मी मागे झाले, पण ते काय बोलतायत ते फार काही कळलं नाही. मला इतकंच कळलं की स्टुडिओमध्ये गाण्याचं, माइकमध्ये गाण्याचं एक तंत्र असतं. ते आपल्याला शिकायला हवं. अशी मी अनेक गाणी कोरसमध्ये गायले. असंच एका गाण्याच्या वेळी मी सुरेश वाडकरांना काचेच्या पलीकडे सोलो गाताना पाहिलं. तेव्हाच मीही कुठेतरी ठरवलं, आता कोरसमध्ये खूप गायन केलं, आता आपण काचेच्या त्या बाजूला जायचं. सोलो गाणं गायचं. मग मी अत्यंत नम्रपणे श्रीधरजींना म्हणाले, तुमच्यामुळे मला स्टुडिओत येण्याची, गाण्याची संधी मिळाली. त्याबद्दल खूप धन्यवाद, पण आता मला कोरसमध्ये गायचं नाही, आता मला माझं गाणं गायचं आहे. मला माझा अनुभव घेऊन बघायचा आहे.

‘..दाजिबाच्या आधीची वैशाली

खरंतर ‘ऐका दाजिबा’ हे गाणं २००३मध्ये आलं, या गाण्याने मला नक्कीच स्टार बनवलं. पण त्याआधी सात र्वष मी या क्षेत्रात काम करत होते. मला घरून गाण्याची कुठलीच पाश्र्वभूमी नव्हती. केवळ माझी आवड म्हणून या क्षेत्राकडे वळले. सुरुवातीला तर माइकसमोर उभं राहून कसं गावं याचंही ज्ञान नव्हतं. पण अनुभवानेच ते शिकवलं. मी सुरुवातीच्या काळात कोरसपासून ते सोलोपर्यंत अनेक गाणी गायली. त्यात अगदी लावण्यांपासून गवळणीपर्यंत अनेक प्रकार गायले. ग्रामीण बाजाची गाणी गायली. तेव्हा मी अमुकच गाईन आणि तमुक नाही, असा विचारही केला नाही. अक्षरश जे मिळेल ते मी तेव्हा गात होते. त्या ७ वर्षांच्या अनुभवाचं फळ म्हणूनच की काय एक दिवस ‘..दाजिबा’ माझ्याकडे आलं.

आईची काळजी, नवऱ्याचा पाठिंबा

मी विलेपार्ले इथल्या एका मध्यमवर्गीय घरातून आलेली आहे. आमच्या घरात कुणीच गात वगैरे नव्हतं. मला गाण्याची आवड होती. मी गाणं शिकतही होते, पण अभ्यासामुळे त्यात खंड पडला होता. अशात गाण्यात करिअर वगैरे लांबच्याच गोष्टी होत्या. मी ‘फिशरी सायन्स’ या विषयात एम.एस्सी. केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर माझं लग्न झालं. त्यानंतर मी ठरवलं की मला आता गाण्यातच पूर्णवेळ करिअर करायचं आहे. गंमत म्हणजे माझा हा निर्णय ऐकून आई-बाबा खूप काळजीत पडले. म्हणजे मला ते जमेल का, त्यात कुणी ओळखीचंही नाही. शिवाय सगळंच बेभरवशाचं करिअर. त्यामुळे त्यांची काळजी सार्थच होती. पण माझा नवरा आणि सासूबाई दोघांनीही कोणत्याही शंका न काढता अगदी मनापासून मला पाठिंबा दिला. साथ दिली. करिअर सुरू झाल्यावरही आई-बाबा आणि नवरा, सासूबाई यांचा पाठिंबा कायम राहिला. खरंतर वाढताच राहिला. पण आई नेहमी म्हणायची, वैशाली गातेस वगैरे ठीक आहे, पण अशोक पत्कींकडे गायलीस ना तर खरं मानेन. तुझी गाणी गाजायला हवीत. तिचं हे म्हणणं, माझ्या डोक्यात पक्कं बसलं. मी उत्तमोत्तम संगीतकारांकडे स्वतचं गाणं गायचा निश्चय केला. आईच्या या बजावण्यामुळे कधीही डोक्यात हवा गेली नाही.

योग्य वेळी नकार हवाच

मी सुरुवातीच्या काळात चिक्कार गाणी गायली. शक्यतो मी कुणालाच नाही म्हणू शकायचे नाही. मग कुणाला दुखवायचं नाही म्हणून वाईट गाणीसुद्धा गायले. पूर्वी स्टुडिओत गेल्यावर हातात गाणं यायचं. मग शब्द नाही आवडले तरी गावं लागायचं. पण आता मी तसं करत नाही. आधी शब्द मागवून घेते ते आवडले तरच गाते. नाहीतर नम्र शब्दांत नकार देते. दाजिबा, कोंबडी, छमछम या गाण्यांनंतर मला तशाच प्रकारच्या साँगकरता विचारणा झाली पण मला त्याच त्या कोशात अडकायचं नव्हतं. त्यामुळे मी काही वाह्य़ात गाण्यांना स्पष्टपणे नाही सांगितलं. कारण योग्य वेळी नकार दिला नाही तर लोक आपल्याला गृहीत धरतात, असं माझ्या लक्षात आलं.

माठाला गेला तडा

मला स्वत:ची गाणी करायची आहेत या एकाच उद्देशाने सलग चार र्वष मी मिळतील ती गाणी गायली होती.  याच काळात ‘सुमित म्यूझिक’साठी मी गवळणींचा एक अल्बम रेकॉर्ड केला. मी ते विसरूनही गेले होते. पण त्या अल्बममधली  ‘माठाला गेला तडा’ ही गवळण ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय होत होती. मला त्याची कल्पनाही नव्हती. जवळपास सहा महिन्यांनी सुमित म्यूझिकचे सुभाष परदेशी मला येऊन भेटले, माझ्या हातावर दहा हजार रुपये ठेवले(१९९९मधले दहा हजार)आणि म्हणाले, आता ही गाणी तुम्ही दुसरीकडे गायची नाहीत हं. आता तुम्ही ‘सुमित म्यूझिक’सोबत करारबद्ध झालात. मला आधी काहीच कळलं नाही. पण त्यानिमित्ताने मला या क्षेत्रातील गणितांची ओळख झाली. तेव्हाच मला लक्षात आलं की, शहरातलं आपलं जगणं, आवडी फार वेगळ्या आहेत. ग्रामीण भागातला एक मोठा वर्ग आहे, जो त्याच्या वेगळ्या आवडी अगदी स्वच्छंदपणे जपतो.

गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा

मी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. सुरुवातीला दातार गुरुजी, नंतर ज्योत्स्ना मोहिले आणि त्यानंतर सलग सहा-सात र्वष पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे मी शिकले. ते स्वत: नागपूरचे होते. ते मला कायम म्हणायचे, वैशाली आपला प्रवास नागपूर-मनमाड-नागपूरइतकाच मर्यादित ठेवायचा नाही. आपल्या कक्षा कधीही मर्यादित ठेऊ नको. त्या कायम वाढवायला हव्यात. याचप्रमाणे मला कानसेन बनवलं ते पाल्र्यातल्या कार्यक्रमांनी. इथे मी मंदिरातल्या गाण्याच्या कार्यक्रमांपासून ते थेट डिस्को दिवानेपर्यंत सगळं काही ऐकलं. त्यामुळे मला सगळे संगीतकार आवडतात. मात्र गाण्याला काहीतरी अर्थ असायला हवा.

पहिला प्लेबॅक

इंडस्ट्रीमध्ये गायकांचे दोन प्रकार असतात, फिल्मी आणि नॉन-फिल्मी. मी पहिल्यापासून नॉन-फिल्मी या प्रकारात मोडते. मी पहिल्यांदा चित्रपटासाठी गायले तेव्हा अलका कुबल खूप गाजत होत्या आणि मला त्यांच्यासाठीच एक गाणं गायचं होतं. नंदू होनप यांनी मला हा पहिला चित्रपट दिला होता. आधी मला अगदी सोपं वाटलेलं ते गाणं गायला लागल्यावर त्यातल्या जागा कळायला लागल्या. त्या गाण्यात एका ठिकाणी ‘इश्श’ वगैरे करून लाजायचं होतं आणि ते काही मला जमेना. तेव्हाच मला नंदूजींनी सांगितलं की, अशी भीड बाळगून चालणार नाही, असं करायचं असेल तर आत्ताच घरी जा. पडद्यावर जी अभिनेत्री दिसणार आहे तिचा तू आवाज आहेस, तिच्या भावभावना तुला दाखवायच्या आहेत. हे लक्षात ठेव.

माझं स्वत:चं गाणं

प्रशांत लळित या माझ्या संगीतकार मित्राच्या वडिलांचा स्टेज शो होता. त्या शोमध्ये मी काही गायले होते. मला काकांनी खूप छान शिकवलं, शोसुद्धा चांगला झाला. पण तेव्हा मला लक्षात आलं की, या येणाऱ्या टाळ्या, माझ्या नाहीत, हे कौतुक माझं नाही. तर जे मूळ गायक, संगीतकार होते, त्यांचं आहे. मला स्वतला टाळ्या मिळवायच्या तर स्वतचं गाणं गायला हवं. तेव्हा मी सागरिका, व्हिनस, टी-सिरीज या सगळ्यांकडे गात होते. सागरिका म्यूझिकच्या सागरिका बाम यांनी मला आर्टिस्ट म्हणून लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ती गाणी ‘माझी’ असणार आहेत या गोष्टीनेच मला खूप ‘बाप’ वाटलं.

मी गीतकार कशी झाले?

अवधूत, मी आणि सागरिका तिघं अल्बमसाठी काम करत होतो. तीन अल्बमचं काँट्रॅक्ट होतं. तिसऱ्या अल्बममध्ये सहा गाणी होती. तीन महिने झाले तरी अवधूतला काहीच सुचत नव्हतं. ‘न सुचणं’ यासारखं दुसरं आजारपण नाही कलाकारासाठी! शेवटी कंटाळून मीच त्याला म्हटलं, थांब मीच काही विचार करते नि मग गुणगुणायला सुरुवात केली. एखाद-दोन ओळी सुचल्या, त्या मी रेकॉर्ड करून ठेवल्या आणि नंतर पूर्ण काही सुचल्यावर मी ते सागरिकाला ऐकवलं. तिलाही ते आवडलं आणि आम्ही तेच रेकॉर्ड केलं. तिथून माझ्या गीत लिहिण्याची सुरुवात झाली. मात्र त्या वेळी मी अवधूत काय विचार करेल, तो काय शब्द रचेल या विचारांनी गाणं केलं होतं. तसंच ‘गलगले निघाले’च्या वेळी अजय-अतुल कसा विचार करतील त्या दृष्टिकोनातून विचार करून मी गाणी लिहिली होती. हळूहळू स्वत:च्या विचारांची शब्दरचना करायला लागले.

एक पाऊल पुढे

माझे बाबा मला नेहमी सांगायचे की जे मिळवलं आहे, जे शिकून झालं आहे, त्याच्या एक पाऊल पुढे जा. मी आत्तापर्यंत जेजे गायले होते, त्यातून अनेक गायनप्रकार राहिले होते. मग मी विचार केला, कुणीतरी येईल आणि मला गाणं देईल, असं कशाला? मी स्वतच अभ्यास करून संगीतकार, गीतकार, व्हायचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेने त्यात मला यशही आलं. अशा प्रकारे नवीन प्रयोग करण्याचा माझा अभ्यास सुरू असतो.

लिपसिंक की खरी गायकी?

आजचा प्रेक्षक हुशार आहे, त्याला जाहीर कार्यक्रमातसुद्धा कलाकार खरं गातोय की लिपसिंक करतोय ते कळतं. त्यामुळे मी कधीही या गिमिकच्या फंदात पडत नाही. जर कधी कार्यक्रमाच्या ठिकाणची संगीत व्यवस्था चांगली नसेल, तर मी प्रेक्षकांना खरंखरं सांगते, की मी गाणार नाहीये हे गाणं लावणार आहे, पण मी खोटं बोलत नाही. जस्टिन बिबरसारख्या पॉप कलाकाराने लिपसिंक केल्याने मध्ये मोठी खळबळ माजली होती पण साधी गोष्ट आहे, इतक्या उडय़ा मारून कोण गाऊ शकेल. अनेक रॉक आणि पॉप कॉन्सर्टमध्ये लोक गाणं ऐकायला नाही तर कलाकाराला पाहायला येतात.

पण जेव्हा प्रेक्षक खरंच गाणं ऐकायला आलेला असतो तेव्हा कलाकाराने त्याला खोटं सांगून, तंत्रज्ञानाने त्याची दिशाभूल करणं बरं नव्हे. काही गाणी जशी रेकॉर्ड झालेली असतात, तशीच त्या स्टेजवर गाणं शक्य नसतं. उदा. ए आर रेहमानची गाणी. या गाण्यात साऊंड रेकॉर्डिस्टची कमाल आहे. त्यामुळे गाण्याचं मिक्सिंग हे त्याचं वैशिष्टय़ं असतं. ते स्टेजवर तसंच्या तसं गाता येत नाही.

सध्या मी वैशाली सामंत अनप्लग्ड नावाचा कार्यक्रम करते. यात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वाद्यं वाजत नाहीत. कृत्रिम आवाज नसतो. वादकांचा संच रंगमंचावर असतो. जे तिथे लाइव्ह गाणं वाजवतात.

तेथे कर माझे जुळती!

कोणत्याही क्षेत्रातले दिग्गज हे ‘बापमाणूस’ का असतात ते मला त्यांच्यासोबत काम केल्यावर कळलं.  संगीतकार म्हणून अनेक मोठमोठय़ा व्यक्तींना भेटल्यावर, गायकांचं कामाप्रती असलेलं समर्पण पाहिल्यावर मला हे जाणवलं. त्यातला एक अनुभव सांगते, सावित्रीबाई फुलेंवर एक सिनेमा येतो आहे. यातील एका गाण्यासाठी खुद्द गानसरस्वती लतादीदींकडून मी एक गाणं गाऊन घेतलं आहे. या एका गाण्यासाठी लतादीदी येतील का, अशी मला शंका होती. त्यातही माझ्यासारख्या नवीन संगीतकारासाठी त्या गातील का, अशी भीतीही होती. पण दीदी आल्या. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिगच्या आधी दोन तास आधी येऊन बसल्या. माझ्याशी गाण्याबद्दल चर्चा केली. आवाजात जडत्व येऊ नये, म्हणून त्या काही न खातापिता आल्या होत्या. आज इतक्या मोठय़ा पदाला पोहोचल्यावरही, इतकं वय असतानाही दीदींचं ते गाण्यासाठी काहीही करण्यास तयार होणं, मला आतून खूप हलवून गेलं.

दुसरा किस्सा आहे, आशा भोसलेंचा. या बाई म्हणजे चिरतरुण आहेत, खरोखरच. त्यांना संगीतातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. नवं तंत्रज्ञान, बदल सगळ्याबद्दल बाई अद्ययावत असतात. ‘डबस्टेप’ हा प्रकार पाश्चिमात्य जगात माहितीचा आहे. पण आपल्याकडे त्यावर फारसे प्रयोग किंवा काम झालेलं नाही. पण आशाताईंना या प्रकाराचीही इत्थंभूत माहिती होती.

तसंच उदाहरण उषा उत्थुप यांचं. ‘खो-खो’ या चित्रपटाचं शीर्षकगीत त्यांनी गायलं आहे. रेकॉर्डिगला आल्यावर त्यांनी गाण्याची रिहर्सल केली. त्यातल्या न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजून घेतले, गाण्याबद्दल माझ्याशी पुरेशी चर्चा केली, मगच त्या गायल्या.

‘केसरी टूर्स’चे केसरी पाटील आणि सुनीता पाटील यांच्या समवेत वैशाली सामंत

बालपण जपा

लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोवर बंदी आणावी, असं विधान मध्यंतरी एका दिग्दर्शकाने केलं होतं. पण मला वाटतं, अशा शोमधून मुलांमधल्या प्रतिभेला चांगलं व्यासपीठ मिळतं. त्यामुळे त्या शोवर बंदी आणू नये तर पालकांची ही जबाबदारी राहील की त्यांनी आपल्या मुलांना स्पर्धेत कशा प्रकारे उतरवायचं. मुलांना जोपर्यंत त्या कलेची मजा घेता येतेय, त्याचा ताण येत नाही तोपर्यंतच ती स्पर्धा ठेवावी. चॅनेलनेसुद्धा त्यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. शोच्या संपूर्ण टीमने तर मुलांप्रमाणेच त्यांचं शेडय़ुल आखायला हवं. सारेगमप लिटिल चॅम्पच्यावेळी आम्ही असंच केलं होतं. संपूर्ण कार्यक्रम हा मुलांच्या वेळापत्रकानुसार आखला होता.

आवडीचं गाणं

माझं आवडीचं गाणं कोणतं, असं मला लोक अनेकदा विचारतात. पण असं एक सांगता येणार नाही. अनेक गाणी मला आवडतात. कधी कधी एखादं दमदार गाणं रेकॉर्ड केल्यावर डोक्यातून जातच नाही. तीच धून मनात रेंगाळत राहते. तेव्हा ते गाणं आवडतं. गाणं कुठच्याही प्रकारचं असो, ते मनाला भावलं की आवडतं. मी अनेक प्रकारची गाणी गायले पण पूर्णत: शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं गायची संधी अजून मिळाली नाही.

हिंदीत प्रवेश

कोणत्याही गाण्याच्या आधी त्याचा म्युझिक ट्रॅक बनतो. त्यावेळी मुख्य गायकाला न बोलावता दुसऱ्या कुणाकडून तरी ते गाऊन घेतलं जातं. म्हणजे दुसरा गायक तात्पुरत्या रेकॉर्डिगकरिता, डबिंगकरिता येतो. शब्द कसे वाटतायत, गाणं ऐकायला कसं वाटतंय, गाण्यातल्या जागा बरोबर बसतील की नाही, अशा गोष्टींची प्राथमिक चाचणी म्हणून या गोष्टी केल्या जातात. नंतर मुख्य गायक येऊन ते गाणं गाऊन जातो. तो डमी ट्रॅक गायलेल्या गायकाला कायम आशा असते की, आपलाच आवाज यांना आवडेल आणि ते आपलंच गाणं कायम ठेवतील वगैरे वगैरे. तर असंच मीही एका सिनेमसाठी डमी ट्रॅक गायले होते. जेनेलिया आणि रितेशच्या ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातील एका गाण्यासाठी ‘चित्रा’ या हिंदीतल्या गायिका आवाज देणार होत्या. तो डमी ट्रॅक मी गायले होते. पण नंतर संगीतकार विजू शहा यांना माझाच आवाज आवडला आणि त्यांनी तोच फायनल ठेवला. तेच माझं पहिलं हिंदी गाणं होतं.

गाणं हीच माझी ताकद

कलाकारासाठी त्याची कला हेच सर्वस्व असतं. मला नुकताच याचा अनुभव आला. एके ठिकाणी माझा कार्यक्रम ठरला होता. पण मला अचानक खूप ताप आल्याने मी ४ दिवस अ‍ॅडमिट होते. आयोजक फार घाबरले होते, कारण सगळी तिकिटं विकली गेली होती आणि कार्यक्रम ऐनवेळी कॅन्सल करणं, शक्य नव्हतं. मी खूप विचार केला आणि कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे गेले, त्यांना म्हणाले, प्लीज मला आज दिवसभरासाठी जाऊ द्या. मी कार्यक्रम संपल्यावर पुन्हा येऊन अ‍ॅडमिट होईन. त्यांनी हो नाही करत शेवटी परवानगी दिली. कार्यक्रम झाला आणि आश्चर्य म्हणजे मी ठणठणीत झाले.

आम्ही कलाकार रसिकाच्या एका कौतुकाच्या थापेसाठी जगत असतो. प्रेक्षकांनी शाबासकी दिली, दाद दिली की आम्हाला हजारो पुरस्कार मिळवल्याचा आनंद होतो.

गाणं आणि खाणं

गाण्यानंतर मी आता खाण्याकडेही वळले आहे. मी आणि माझ्या तीन मैत्रिणी आम्ही मिळून पिझ्झा बॉक्स नावाचा एका फूड ब्रँड चालवतो. आमची चौघींची ओळख आमच्या मुलांमुळे झाली. त्यांना शाळेतून घरी घेऊन येता-जाता पिझ्झा बॉक्सची कल्पना सुचली. इतर अनेक भारतीय कंपन्यांमध्ये आमचा पिझ्झा दिमाखाने उभा आहे. पाल्र्यामध्ये गेली ३ र्वष आम्ही हा ब्रँड उभा करतोय. त्याच्या आजवर ३ शाखासुद्धा निघाल्या आहेत.

कुणीतरी येईल आणि मला गाणं देईल, असं कशाला? मी स्वतच अभ्यास करून संगीतकार, गीतकार, व्हायचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेने त्यात मला यशही आलं. अशा प्रकारे नवीन प्रयोग करण्याचा माझा अभ्यास सुरू असतो.

वेगळे क्षण अनुभवले

‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच उपस्थित राहिलो. वैशाली सामंत ज्याप्रमाणे म्हणाल्या की, शाळा, महाविद्यालयातल्या शिक्षणाच्याही पलीकडे एक शिकवणारं जग आहे, तिथे अनेक नवे आणि ज्ञानदायी क्षण अनुभवायला मिळतात.  आज ‘लोकसत्ता व्हिवा’मध्ये मला असेच आगळे क्षण अनुभवायला मिळाले, त्याबद्दल खूप आभार लोकसत्ताचे. तरुणांना प्रेरीत करणारे, असेच आणखी कार्यक्रम लोकसत्ताने आयोजित करावेत.

चेतन वरणे

विनम्र स्वभाव आवडला

‘लोकसत्ता’चा ‘व्हिवा लाउंज’ नेहमीच आपल्याला काही तरी देऊन जातो. मला स्वत:ला गाण्यामध्ये रस आहे.  वैशाली सामंत यांचा सांगितीक प्रवास ऐकल्यानंतर मला आणखी प्रोत्साहन मिळाले. त्यांचा विनम्र स्वभाव,  मेहनत करण्याची तयारी आणि कोणत्याही परिस्थितीवर मात करून यशस्वी होण्याची जिद्द फार भावली.  लोकसत्ताचे  आभार.

सलोनी माळकर

क्षमतेचा योग्य उपयोग

आपल्याकडे क्षमता असेल तर आपण प्रचंड मेहनत करून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो, याचं चालतं बोलतं उदाहरण वैशाली ताईंच्या रुपाने भेटलं.  त्यांचे सूर तर आवडतातच पण त्यांचं दिलखुलास बोलणंही आवडलं. नेहमीप्रमाणेच आजचा ‘व्हिवा लाउंज’ केवळ तरुणांनाच नव्हे तर सगळ्यांनाच प्रोत्साहित करणारा होता.

अर्चना वाघमारे

संगीतमय वातावरणाची जादू

आजच्या ‘व्हिवा लाउंज’मध्ये वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजाने संगीतमय वातावरण निर्माण झाले. आपल्या आवडीच्या कामामध्ये समरस होऊन ते प्रभावीपणे पूर्ण करणं तर त्यांच्याकडून शिकलोच पण आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीला नाही म्हणण्याची गोष्ट त्यांनी सांगितली तीही विशेष भावली. आत्मविश्वासाने नकार देण्याचं महत्त्व पटलं. त्यांच्या सुरातली गाणी ऐकताना तर धम्माल आली.

मिथिला शेटे

अनुभवाचे धडे

‘लोकसत्ता’मुळे वैशाली सामंत यांना भेटायची इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या एकूणच कारकीर्दीतून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आयुष्यात अनेक निरनिराळे प्रसंग येतात. त्यांना कसे सामोरे जायचे हे लक्षात आले आणि त्याचे धडेही गिरवायला मिळाले. त्यांच्याकडून मिळालेले हे अनुभवाचे धडे पुढे निश्चितच आमच्याही आयुष्यातही उपयोगी पडतील यात काही शंका नाही. हातात नीट काम नसताना, कुणीही गॉडफादर नसताना त्यांनी हार न मानता जे कष्ट केले, त्याला दाद द्यावी, तितकी कमी आहे.

निनाद पेडणेकर

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आवडला

‘लोकसत्ता’चा हा ‘व्हिवा लाऊंज’चा कार्यक्रम फारच उत्कृष्ट झाला. जीवन कसे जगायचे, तसेच आपल्या ध्येयाप्रति वाटचाल करत कसे पुढे जायचे हे समजले. तसेच आयुष्याकडे गंभीरपणे न पाहता अगदी आनंदाने पाहिले पाहिजे जे त्यांच्या अनुभवातून शिकता आले. वैशाली सामंत यांनी आजपर्यंत जशी ध्येयकेंद्रित वाटचाल केली, आपले आयुष्य घडवले ते पाहता त्यांच्याबद्दलचा आदर दुपटीने वाढला. त्यांनी अत्यंत मोकळेपणाने आपली मतं फार उत्कृष्टपणे मांडली. आयुष्यात न डगमगता पुढे जात राहिलं पाहिजे हा त्यांनी सांगितलेला विचारही मनापासून पटला.

यशवंत पवार

आत्मविश्वास महत्त्वाचा

मी पहिल्यांदाच हा कार्यक्रम बघायला आलो होतो आणि मला कार्यक्रम खूपच आवडला. इतक्या सुंदर कार्यक्रमाबद्दल ‘लोकसत्ता व्हिवा’चे आभार. वैशाली सामंत यांच्याकडून कमालीच्या आत्मविश्वासाने त्यांचं वावरणं लक्षात राहील. कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी शिक्षणासोबतच तुमचा आत्मविश्वास तितकाच महत्त्वाचा असतो. हे मला चांगल्या पद्धतीने त्यांच्या अनुभवातून समजून घेता आलं आहे.

ऋषभ सावंत

शिखर गाठण्याचे रहस्य

वैशाली सामंत या खूप प्रेरणादायी वाटल्या. कितीही मोठं झालं तरी आपण जमिनीवरच राहायचं असतं, ही त्यांनी सांगितलेली गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवेन. करिअर करताना कशी एक एक पायरी पूर्ण करत जायचं आणि शिखर गाठायचं हेही मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं.

अभिषेक पाबरेकर

पॅशनची खरी व्याख्या कळली

मला असं वाटतं की,  वैशाली सामंत यांच्याबरोबरच्या गप्पांचा हा सगळा कार्यक्रमच प्रेरणादायी होता.  त्यांनी फिशरी सायन्समधून मास्टर्स केलं आहे आणि तरीही त्या गायनाच्या क्षेत्राकडे वळल्या, हे ऐकून आश्चय  वाटले. त्याचबरोबर आपल्याला जे करायचं आहे त्याबद्दल ठाम निर्णय घेण्याची त्यांची वृत्तीही खूप भावली. एकीकडे मास्टर्स केलेलं असताना कशाचाही विचार न करता त्यांनी जे त्यांना मनापासून आवडतं त्या क्षेत्राचा स्वत: शोध घेतला, त्यात प्रवेश केला आणि त्या क्षेत्राची कुठलीही पाश्र्वभूमी नसताना त्यांनी त्यात कारकीर्द घडवली हा त्यांच्या आयुष्याचा प्रवास खूप भावनिक वाटला. पॅशन जपणं काय असतं हे वैशाली सामंत यांच्याकडून शिकायला मिळालं.

राजेश्वरी पटवर्धन

आपली आवड जपण्याचा कानमंत्र

हा कार्यक्रम मला खूप आवडला. एखाद्या क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्राची आवड असणं महत्त्वाचं आहे. आपली आवड जपण्याचा हा कानमंत्र मला वैशाली सामंत यांच्याकडून मिळाला. तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करताना बाकीच्या गोष्टीसुद्धा येणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याचा नक्कीच वापर मला माझ्या करिअरसाठी होईल.

सिड गोरुले

संकलन : वेदवती चिपळूणकर, तेजश्री गायकवाड