गौरी येऊन गेल्या असल्या तरी आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेला श्री गणेश अजून वास्तव्य करून आहे. त्यामुळे त्याला निरोप देईपर्यंत त्याचा पाहुणचार करण्याची आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतरांनाही खिलवण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यासाठी रोजच्या नैवेद्याला काही वेगळे रूप देत केलेल्या काही नवीन पदार्थाची पाककृती ‘व्हिवा’ने खास तुमच्यासाठी आणली आहे.

बोरा सउल

साहित्य : तांदूळ (बोरा) १ वाटी, तूप  २ टेबलस्पून, वेलची, दालचिनी, तमालपत्र.

कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन ४ ते ५ तास भिजवून ठेवावे. एका कढईत तूप घालावे. मंद गॅस ठेवावा. वेलची व दालचिनी मंद तुपात परतून घ्यावी. शेवटी तमालपत्र घालावे. मग त्यात तांदूळ घालून त्यात दीडपट पाणी घालावे. मधून मधून ढवळून घ्यावे. भात चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. तांदूळ पूर्ण शिजल्यावर तो ब्राऊन होईल. अशा प्रकारे हा बोरा सउल तयार होईल. तो दही व गुळासोबत सव्‍‌र्ह करावा.

उपवासाचे मोदक

साहित्य : साबुदाणा- एक वाटी, शिंगाडा पीठ- एक वाटी, एक चमचा तूप, चिमूटभर मीठ, एक वाटी पाणी.

सारणासाठी : दोन नारळाचा चव, गूळ किंवा साखर निम्मे, अर्धा कप दूध किंवा खवा, काजू कापलेले.

कृती : दूध, साखर, गूळ, खोबरे एकत्र शिजवा. गार झाल्यावर त्यात काजू, वेलदोडे पूड घाला. पाणी, मीठ, साबुदाणा, शिंगाडा पीठ एकत्र शिजवून घ्या. उकडीला गॅसवर वाफ आणा. पारीत सारण भरून मोदक वाफवून घ्या.

छेना लाडू

साहित्य : दूध, पिठी साखर, मिल्क पावडर, गुलाब इसेन्स, मीठ, बदाम व पिस्ता, चांदी वर्ख, केशर.

कृती : सर्वप्रथम दूध उकळत ठेवून त्यात लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्या. त्यातील पाणी काढून चोथा मोकळा करून घ्या. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, मिल्क पावडर, गुलाब इसेन्स, मीठ, पिस्ता व बदाम घालून एकत्र मळून घ्या. नंतर त्याचे लाडू वळा व चांदी वर्ख लावा. लाडवावर केशर घालून लाडू सव्‍‌र्ह करा.

गुलकंद बर्फी

साहित्य : १/२ वाटी गुलकंद, १ १/२ वाटी  साखर, २ वाटय़ा ओले खोबरे खवलेले, १/४ वाटी मिल्क पावडर, १ टीस्पून तूप ग्रीसिंगसाठी.

कृती : प्रथम एक जाड बुडाची कढई किंवा पातेले घ्या व साखर, खोबरं एकत्र करून शिजत ठेवा. तळाला लागणार नाही याची काळजी घेऊन सतत हलवत राहा. नंतर मध्यावर आले की गुलकंद मिसळा व हलवत राहा. आता मिश्रण कडेने सुटायला लागले व गोळा झाले की मिल्क पावडर घालून हलवा. तूप लावलेल्या ताटात गोळा काढा. वाटीने किंवा प्लास्टिक कागदवर घालून हाताने मिश्रण थापून सारखे करा. वर सुरीने आडव्या-उभ्या रेषा मारून ठेवा. गार झाल्यावर वडय़ा काढा.

बीटाचा हलवा

साहित्य : मध्यम आकाराचे दोन बीट, १ वाटी  साखर, १ कप  सायीसह दूध, वेलची पावडर, ड्राय फ्रुट्स आवडीप्रमाणे, १ टेस्पून  तूप.

कृती : सर्वप्रथम बीट स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्याची  साल काढून घ्यावी व ते बारीक किसून घ्यावे. किस हाताने दाबून त्यातील रस पिळून काढावा. आता गॅसवर पॅन ठेवून त्यात सर्वप्रथम तूप घालावे. त्यावर किसलेला बीट टाकून परतावा. परतून साधारण मऊ  झाल्यावर त्यामधे दूध घाला व आटेपर्यंत शिजवा. शेवटी साखर घालून ती बीटात विरघळेपर्यंत हलवा. आता तयार हलव्यामध्ये वेलची पूड व ड्रायफ्रुट्स घाला आणि बीटाचा हलवा सव्‍‌र्ह करा.

टीप : पिळून काढलेला रस टाकून न देता मीठ-मिरपूड घालून तो सूपसाठी वापरावा.

पंचखाद्य

साहित्य : गूळ, लाह्य, भाजलेले शेंगदाणे, डालिया, सुक्या खोबऱ्याचे काप.

कृती : सर्वप्रथम एका कढईत एक वाटी गूळ घेऊन तो पूर्णपणे वितळवून घ्यावा. गूळ वितळल्यावर लगेच त्यात शेंगदाणे, लाह्या, डालिया व सुक्या खोबऱ्याचे काप घालून ते एकजीव करावे.

सुकरुंडे

साहित्य : १ वाटी मूग, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी तांदळाचे पीठ, वेलची पूड, मीठ, तेल.

कृती : प्रथम मूग शिजवून त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. गूळ घालून आटवून कोरडे करावे. वेलची पूड घालावी. मध्यम आकाराचे गोल गोळे करावे. तांदळाच्या पिठात चवीपुरते मीठ घालून पातळसर भिजवावे. त्यात पुरणाचे गोळे बनवून बटाटा वडय़ाप्रमाणे तळावे.

खिरापत

साहित्य : एक वाटी सुके खोबरे (किसलेले), एक चमचा खसखस (भाजून व कुटून), दोन चमचे मनुके, ५० ग्रॅम खारिकेचे बारीक तुकडे, ५० ग्रॅम खडीसाखर, अर्धी वाटी पिठीसाखर, एक वाटी कणिक, एक चमचा साजूक तूप, ७-८ वेलदोडे  पूड करून.

कृती : खोबरे किसून मंद हाताने चुरून घ्यावे. १ चमचा साजूक तुपात कणीक भाजावी. एका परातीत खोबरे, खसखस, मनुका, खारीक, खडीसाखर एकत्र करून त्यात भाजलेली कणीक, वेलदोडे पूड व पिठीसाखर मिसळावी.

टीप : कणीक, पिठीसाखर वा वेलदोडे पूड न घालतासुद्धा खिरापत करता येते.

गव्हारव्याची खीर

साहित्य : २ वाटय़ा गव्हाचा जाड रवा, एक खवलेला नारळ, २ वाटय़ा चिरलेला गूळ,  ३ वाटय़ा दूध, अर्धी वाटी तांदूळ, लवंग, खसखस पूड, वेलदोडय़ाची पूड, जायफळ.

कृती : गव्हाचा रवा व तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत. तूप गरम करून त्यात लवंग टाकाव्यात व त्यावर धुतलेला गव्हाचा रवा टाकून परतावा व ४ वाटय़ा पाणी घालून शिजवावे. शिजवलेला रवा घोटून घ्यावा. एका जाड भांडय़ात शिजवलेला रवा, गूळ, खसखस पूड, वेलदोडय़ाची पूड, जायफळ पूड एकत्र करून शिजवून घ्यावे. चांगला शिजला की खवलेला नारळ मिसळावा व खाली उतरवावा. मिश्रण कोमट झाले की त्यात ३ वाटय़ा गरम दूध मिसळावे व खीर सव्‍‌र्ह करावी.

चॉकलेट पनीर मोदक

साहित्य : अर्धा कप ताजं पनीर, अर्धा कप दूध पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप पिठीसाखर, २-३ चमचे तूप, अर्धा चमचा वेलचीपूड, केशर, किसलेले चॉकलेट (आवडीप्रमाणे), किसलेले ओले खोबरे (आवश्यकतेप्रमाणे)

कृती : किसलेले चॉकलेट आणि किसलेले खोबरे एकत्र करून बाजूला ठेवा. पनीर मऊ  होईपर्यंत मळून घ्या. एका कढईमध्ये पनीर, दूध पावडर, दूध, केशर घाला व व्यवस्थित ढवळा. नंतर त्यात तूप घाला व मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवा. आता गॅस बंद करा व मिश्रण थंड होऊ  द्या. नंतर हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्या. त्याच्या गोडपणाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार साखर घाला. नंतर मोदकाच्या साच्यात हे मिश्रण घाला. जेव्हा मोदक तयार  होईल तेव्हा स्टीमर वर मलमलचा कपडा ठेवून त्यावर हे मोदक १५-२० मिनिटे ठेवून शिजू द्या. थंड झाल्यावर सव्‍‌र्ह करा.

मितेश जोशी viva@expressindia.com