न्यूडया शब्दाला लाभलेला तिटकाऱ्याचा स्वर हा काही नवा नाही. स्वत:च्या कामावर, दिसण्यावर आत्मविश्वास नसला की वेगवेगळ्या स्वरूपाच्या मेकपच्या बुरख्यामागे मूळ स्वरूप लपवण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात होत असतो. त्याला पॅकेजिंगच्या गोंडस नावाखाली विकलं जातं. पण फॅशन क्षेत्रात नेमकं हेच नागडेपण साजरं करण्याकडे कित्येकांचा कल आहे. त्यातूनच न्यूडचा ट्रेंड जोर धरू लागला आहे.

न्यूड शेड्स या फॅशन, ब्युटी क्षेत्राला काही नव्या नाहीत. आपल्या त्वचेच्या रंगाशी मिळत्याजुळत्या क्रीम ते ब्राऊन रंगामधील शेड्स या वर्गात येतात. त्याला गरजेनुसार थोडीशी गुलाबी, मरून किंवा लाल रंगाची छटा दिली जाते. पण मूळ रंग मात्र त्वचेचा असतो. ब्युटी क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास फाऊंडेशनच्या बाबतीत सुरुवातीला न्यूड शेड्सचा वापर सर्वाधिक होई. कोणताही मेकप करण्यापूर्वी चेहऱ्याला एक समान टोन देऊन ब्लॅक सर्कल, सुरकुत्या, डाग लपवण्याचं काम फाऊंडेशन करतं. त्यामुळे हे फाऊंडेशन त्वचेच्या रंगाशी मिळतंजुळतं असणं गरजेचं असतं. आता एका क्षणासाठी जगभरातील स्त्रियांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. त्यात किती तरी विविधता आढळून येईल. त्यात प्रत्येक वयानुसार, कामानुसार आणि जीवनशैलीनुसार प्रत्येकीच्या चेहऱ्याच्या रंगात बदल होतो. अशा वेळी काही मोजक्याच चार-पाच शेड्स या स्त्रियांसाठी पुरेशा ठरूच शकत नाहीत. त्यामुळे समस्त ब्युटी कंपन्या दर वर्षी जगभरातील स्त्रियांच्या स्किन टोनशी साधम्र्य साधणाऱ्या शेड्स बनवत असतात. अर्थात आज आपल्या लेखाचा विषय फाऊंडेशन किंवा त्याच्या शेड्स नाहीत. मात्र फाऊंडेशन ही तर फक्त न्यूड शेड्सच्या जन्माची किंवा सर्वमान्य होण्याची सुरुवात होती. त्यानंतर त्याचा झालेला विस्तार ही खरं तर थक्क करणारी गोष्ट आहे.

कपडय़ांमध्ये याआधी शेपवेअर, इनरवेअर म्हणून न्यूड शेड्स वापरल्या जात होत्या. त्यांचा उद्देश अगदी साधा होता. पारदर्शक कपडय़ांमधून शरीराचा (बेढब) आकार दिसू नये आणि इनरवेअरचा रंगही दिसू नये. थोडक्यात इथेही लपछपीचा खेळ आलाच, पण आता तो तेवढय़ापुरताच उरलेला नाही. कोणत्याही कपडय़ांच्या दुकानात जा, डिझायनर कलेक्शन पाहा त्यात या न्यूड शेड्सचा वापर आवर्जून केलेला असतो. ज्वेलरी, ब्युटी, कपडे, अ‍ॅक्सेसरी प्रत्येक भागात न्यूड शेड्स आवर्जून वापरल्या जात आहेत. ब्रायडल कलेक्शन्समध्ये तर या शेड्स आवर्जून वापरल्या जातात. त्यांची सुरुवात जरी समान बेस देण्यापासून झाली असली, तरी आज न्यूड शेड्स फोकसमध्ये आहेत आणि त्यामागे केवळ क्रेझ एवढाच मुद्दा नसून अशा शेड्स स्वीकारण्यामागे एक विचारसरणीसुद्धा कारणीभूत ठरतेय हे विशेष. अर्थात, मगाशी म्हटल्याप्रमाणे न्यूड शेड्सचा वापर आतापर्यंत काही गोष्टी लपवण्यासाठीच करण्यात येत होता. पण सध्या मेकपमध्येही चेहऱ्यावरचे डाग लपवण्यासाठी नाही तर खास न्यूड मेकपला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. कपडय़ांमध्ये क्रीम, ब्राऊन अशा न्यूड शेड्सना सध्या मिळणाऱ्या पसंतीमागचं सगळ्यात सोप्पं कारण म्हणजे या रंगांची सहजता. मेकपच्या बाबतीतच बोलायचं झाल्यास सध्या मेकपमध्ये स्मोकी आय, लिप आर्टपर्यंतचा मोठा पल्ला गाठला गेला आहे. अगदी नेहमीच्या मेकप साहित्याचाही वापर खोटा चेहरा बनवण्यासाठीच केला जातो. या सगळ्या रंगरंगोटीत व्यक्तीचं मूळ स्वरूप कुठे तरी लपलं जातं. कित्येकदा गोरं दिसण्याच्या अट्टहासापायी स्किनटोनपेक्षा फिकट रंगाचा मेकप केला जातो. अगदी अलीकडच्या काळापर्यईत डार्क ब्राऊन स्किनटोन असलेल्या स्त्रियांसाठी फाऊंडेशन बनविण्यातच येत नव्हतं. त्यांनी फिकट रंगाच्या शेड्स वापरायच्या हेच कळत-नकळत कंपन्यांकडून सुचवलं जात होतं. याला लोकांची मानसिकताही तितकीच जबाबदार ठरली. अगदी आपल्याकडे मुलीला ‘सावळं’ म्हणण्याची पाळी येऊ  नये म्हणून लग्न जुळवण्यासाठी देण्यात येणाऱ्या फॉर्ममध्येही ‘व्हिटिश’ म्हणजे गव्हाळ रंगाची असा नवाच स्किनटोन विभाग तयार करण्यात आला आणि त्यात त्यांना काही चुकीचंही वाटलं नाही. पण हळूहळू स्त्रियांना या शर्यतीत आपलं मूळ स्वरूप कुठे तरी मागे पडत असल्याची जाणीव होऊ  लागली आणि त्यातूनच जास्त गडद मेकप करण्याऐवजी साधा न्यूड मेकप करण्याकडे त्या वळू लागल्या आहेत. ऑफिस, फॉर्मल मीटिंगमध्ये तर अति मेकप टाळल जातो. अशा वेळी न्यूड मेकप मदतीला येतो. न्यूड मेकपसोबत ब्राइट किंवा गडद लिप कलर किंवा आय मेकपसुद्धा सुंदर दिसतो. त्यामुळे उगाच अतिभडक मेकप करण्याऐवजी अशा प्रकारचा साधा लुक स्त्रियांना पसंत पडू लागला आहे. कित्येक जणी याही पलीकडे वयानुसार चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या, डाग लपवण्याऐवजी मिरवण्यावर भर देऊ  लागल्या आहेत. केस डाय करण्याची धडपड करण्यापेक्षा पांढरे केस मिरविण्यामागेही हीच मानसिकता आहे.

राहता राहिला विषय कपडय़ांचा. तर कपडय़ांमध्ये न्यूड शेडची हीच सहजता त्याचं महत्त्व वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. जाडेपणा, अतिबारीकपणा, उंची लपवण्यासाठी उभे पट्टे, आडवे पट्टे, जड कापड, पातळ कापड असे एक ना धड प्रयोग करण्यापेक्षा न्यूड शेड्स शरीराची मूळ कमनीयता फोकसमध्ये आणतात. त्यामुळे आपलं ‘मूळ’ दिसणं साजरं करता येतं. त्यात न्यूड शेड ड्रेससोबत वेगवेगळ्या रंगांचे श्रग, लेगिंग, जॅकेट, स्कार्फ वापरून किती तरी प्रयोग करता येतात. त्यामुळे नवनव्या फॅशन्सना खूप वाव मिळतो. न्यूड शेडमधील बॅग, शूजचीसुद्धा गोष्ट अशीच आहे. त्यामुळे हल्ली या शेड्सना मोठी बाजारपेठ मिळाली आहे. कधी तरी बदल म्हणून नेहमीचे शेड्स वापरण्याऐवजी तुमच्या स्किनटोनपेक्षा एक शेड गडद टी-शर्ट जीन्सवर घालून बघा. सोबत छानसा श्रग किंवा चेक्स शर्ट वापरता येईल. अर्थात न्यूड शेड वापरताना अति घट्ट कपडे, स्किन टोनला जुळणारी शेड वापरणं टाळा. तसेच अति चमचमत्या लायक्रा लेगिंगचा प्रयोगही टाळा. कारण कुठेही हे कपडे जितके सुंदर दिसतात तितकेच ओंगळवाणे दिसू शकतात. त्यामुळे न्यूड शेड्स वापरून फॅशन करताना सर्वसाधारणपणे ही काळजी नक्की घ्या.

viva@expressindia.com