प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर हल्ली ओसीडीही संज्ञा बऱ्याच वेळा ऐकू येतेय. आम्हाला ओसीडीआहे, असं अनेक सेलेब्रिटी जाहीरपणे मान्य करताहेत. ओसीडी म्हणजे नेमकं काय? हॉलीवूड सेलेब्रिटींकडून ही लाट आपल्याकडे आली असेल काय? आम्ही नीटनेटकं राहतो हे सांगण्यासाठी ओसीडीचा वापर केला जातोय की काय?

काही दिवसांपूर्वी ‘दंगल’च्या निमित्ताने एका कार्यक्रमात अमिर खान आणि दोन्ही ‘दंगल गर्ल्स’- फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा – आपापले अनुभव सांगताना बोलण्याच्या ओघात म्हणाल्या की, आम्हाला ‘ओसीडी’ आहे. कित्येकांना हे ऐकल्यावर हे प्रकरण काय असतं असा प्रश्न पडला असेल. खरंतर आपल्या सगळ्यांना काही ना काही सवयी असतात- काही गोष्टी विशेष पद्धतीने आणि पुन:पुन्हा करण्याच्या सवयी. हीच सातत्यपूर्ण सवय जेव्हा मनाला अस्वस्थ करते आणि त्यावर मनाचं नियंत्रण राहात नाही तेव्हा त्याला म्हणतात ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओ.सी.डी.). या मुलाखतीत या दोघींपैकी एकीने सांगितलं –

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Benefits of Beetroot
वसंत ऋतूत दररोज खा बीट..! जबरदस्त फायदे वाचून थक्क व्हाल
Can Maida Stick To Your Intestine Guts Experts Weigh In How To Include Maida In Your Daily Diet To Avoid Digestion Issues Blood Sugar
मैदा आतड्यांमध्ये चिकटून बसतो का? तज्ज्ञांनी सोडवला वाद; सांगितलं, आहारात मैदा कसा समाविष्ट करावा
Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी

‘समोरच्या टेबलावरची पुस्तकं व्यवस्थित त्यांच्या आकारानुसार लावून ठेवलेली नसतील, तर मला त्रास होतो, मी अस्वस्थ होते आणि स्वतच ते काम करते.’ दुसरी म्हणाली की, ‘मला कुठलाही पृष्ठभाग स्वच्छ नसेल तर तो साफ करण्याची सवय आहे.’ ओसीडी हा मानसिक आजार आहे. पण गेल्या काही महिन्यांत अनेक प्रसिद्ध लोकांच्या या भल्या-बुऱ्या सवयींबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा करताना ‘ओसीडी’ ही संज्ञा वापरली गेली आहे.

विद्या बालनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘स्वच्छता नसेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. कुठल्याही टेबलावर किंवा दरवाजावर किंचित जरी धूळ दिसली तरी मी हातात फडकं घेऊन लगेच साफ करायला उठते. नाहीतर दिवसभर मला ती अस्वच्छता जाचत राहते.’       कुणाला सतत हात धुण्याची सवय तर कुणाला वारंवार कुलूप ओढून बघून खात्री करण्याची सवय. आपल्या आसपासदेखील कित्येक लोकांना अशी अतिरेकी स्वच्छतेची आस असते, स्वतचाच नाही तर दुसऱ्यांचाही पसारा सहन होत नाही. ते लगेच अस्वस्थ होतात. कुणाला दुसऱ्याची हस्तांदोलन करण्याची भीती वाटते तर कुणाला ठरावीक पद्धतीनेच कप, भांडी, पुस्तकं लावलेली आवडतात. एकावर एक रचून ठेवता येणाऱ्या वस्तू सतत विस्कळीत करून पुन्हा क्रमाने लावण्याचा चाळा काही जणांना असतो. काही माणसं सतत हात धुवत राहतात. ही मानसिक अस्वस्थतेची लक्षणं आहेत आणि यालाच हल्ली ओ.सी.डी. असं म्हटलं जातंय.  कित्येकांना तर अगदी भांडी मांडणीत सजवण्यापासून ते कपडय़ावर सुरकुती न पाडणे इथपर्यंत वेगवेगळे ओ.सी.डी.असू शकतात.

यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला असता अशी माहिती समजली की, या सगळ्या सवयी ओ.सी.डी.ची लक्षण नाहीत. पण काहींच्या बाबतीत सवयींमधून आलेली अस्वस्थता टोकाला जाते आणि अशा गंभीर, सातत्यपूर्ण सवयींनाच वैद्यकीय भाषेत ओ.सी.डी. मानण्यात येते. व्यवस्थित असणारी गोष्ट देखील सातत्याने पाळत ठेवून नीट करत राहणं, बेभान होऊन विशिष्ट हरकती पुन:पुन्हा करणं किंवा अगदी नकळत आपसूक सवयीनुसार त्या गोष्टी घडणं अशी ओ.सी.डी.ची लक्षणं आहेत. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा आपल्या आयुष्याला आकार देत असतात मात्र ओ.सी.डी. असलेल्या व्यक्तींचा बाकीच्यांना त्रास देखील होतो. कधीतरी आळसात दिवस घालवू इच्छिणाऱ्यांना किंवा दररोज आपापल्या वेळेप्रमाणे काम करणाऱ्यांना अशी माणसं आसपास असल्यास त्यांच्या सततच्या सूचनांचा आणि लुडबुडीचा त्रास होतो. एकंदरीतच काय तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्रासदायक असतो, मग ओ.सी.डी. असो वा सामान्य माणसाचा अस्ताव्यस्तपणा.

ओ.सी.डी.मध्ये वयानुसार फरक दिसून येतो. लहान मुलं आणि मोठय़ा माणसांमध्ये दिसून येणाऱ्या ओ.सी.डी.मध्ये त्यांच्या बुद्धीच्या वाढीनुसार आणि समजूतदारपणानुसार फरक दिसून येतात. कित्येकदा हा विलक्षण प्रकार आपल्या अंगी असला तरी आपल्याला जाणवून येत नाही मात्र काळानुसार तो वाढत जाऊ  शकतो. ओ.सी.डी. असणाऱ्या व्यक्ती सतत अस्वस्थ असतात. निराश, हताश असताना त्यांच्या सवयी प्रकर्षांने दिसून येतात. या सगळ्या प्रकाराचा अर्थातच जवळच्या इतर माणसांवरदेखील परिणाम होतो आणि त्यातून ओसीडीमुळे येणारं नैराश्य आणखी वाढतं.

ओसीडी कोणत्याही प्रकारचा असो, पण त्यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं. अशा व्यक्तींना त्यांच्यातल्या अशा सवयी किंवा हरकती बदलण्यास मदत करणंही गरजेचं. पण सगळ्यात महत्त्वाचं मनावरचा ताबा आणि ताण व्यवस्थापन. आपल्याला आवडीची गोष्ट मीड बूस्टर म्हणून केली पाहिजे आणि एखाद्या सवयीच्या नको इतके आहारी जात आहोत असं वाटलं तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा कौन्सेलरचा सल्ला निश्चितच घ्यायला हवा.

ऐकावं ते नवलच

  • डेव्हिड बेकहॅमला सगळी पुस्तकं आणि पत्रकं त्याच्या खोलीतल्या खणात व्यवस्थित लावण्याची सवय आहे. फ्रीजमधले कोल्डड्रिंक्सचे कॅनही ठरावीक पद्धतीने, सिमेट्रीतच ठेवायला लागतात. एखाद्या दिवशी दोनऐवजी तीन कॅन फ्रीजमध्ये आले तर रचना बिघडते म्हणून तो चक्क तो फेकून देतो.
  • अभिनेत्री कॅमेरून डियाझ हिला दाराच्या कुलुपांना नि फिरत्या नॉबला हात लावायला किळस वाटते. ती सतत त्यांची सफाई करत राहते आणि नंतर सातत्याने हात स्वच्छ धुते. या ओ.सी.डी.मुळे तिला हाताऐवजी कोपराने दार उघडायची सवय लागली आहे.
  • मायकल जॅक्सन म्हणे मेकअप न धुता रात्री झोपायचा. प्लॅस्टिक सर्जरीनंतर त्याला बदललेल्या चेहऱ्याची सवय झाली की त्याने मेकअप न धुता झोपण्याला पसंती दिली.
  • बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरला गोष्टी जागाच्या जागी नसतील तर लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. अर्थात हे ओ.सी.डी.च्या अंगाने तितकंसं जात नसलं तरी त्याला या गोष्टी अस्वस्थ करतात. विद्या बालनला म्हणे धुळीचा एखादा कण जरी दिसला तर ती स्वत: कापड घेऊन घरात धूळ साफ करायला घेते आणि त्यात तिचं सातत्य असतं.
  • डॉनाल्ड ट्रम्प यांनीदेखील एका मुलाखतीमध्ये हस्तांदोलन करताना भीती वाटते, असं सांगितलं होतं. जंतूसंसर्ग होईल अशी त्यांना भीती वाटते. याच कारणाने लिफ्टमधलं तळमजल्याचं बटण दाबायलाही ते कचरतात.

होय, आम्हालाही आहे ओसीडी

आम्हाला ‘ओसीडी’ आहे असं सांगणाऱ्या सेलेब्रिटींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अनेक प्रसिद्ध, आपापल्या क्षेत्रात दिग्गज व्यक्तींना हा मानसिक आजार होता, असं म्हणतात. मायकल जॅक्सन, अल्बर्ट आइनस्टाइन, चार्ल्स डार्विन, निकोला टेस्ला यांना वेगवेगळ्या गोष्टींचे ओसीडी होते. सध्याच्या सेलेब्रिटीजपैकी हॉलीवूडस्टार लिओनार्दो डी कॅप्रियो, कॅमेरून डियाझ, स्टार फूटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, अगदी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील अशा विचित्र सवयींचे गुलाम असल्याचे सांगतात. आपल्या बॉलीवूड सेलेब्रिटीजमध्ये आमिर खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, फरहान अख्तर, विद्या बालन यांना ‘ओसीडी’ असल्याचं प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झालंय.

ओसीडीबद्दल अनेक गैरसमज आहेत. ओसीडी आहे की नाही हे ठरवण्यासाठी पद्धतशीर वैद्यकीय चाचण्या आणि परीक्षण महत्त्वाचं असतं. निव्वळ इंटरनेट किंवा छापून येणाऱ्या माहितीवरून ओ.सी.डी. असण्याचं स्वयंघोषित निदान करण्यावर लोकांचा भर असतो. कधी कधी केवळ फॅशन म्हणून ओसीडी असल्याचं सांगितलं जातं. अर्थातच हे चूक आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असणं, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं किंवा एखाद्या गोष्टीकडे अति लक्ष दिल्याने चलबिचल निर्माण होणं हे ओसीडीपेक्षा फार वेगळं आहे. हल्ली या सेलेब्रिटींच्या स्वयंघोषित निदानांमुळे या आजाराबद्दल जनमानसांत बरीच माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल अवेअरनेस नक्की वाढतोय पण त्याबरोबर गैरसमजही पसरत आहेत.

डॉ.ज्योती सांगळे, मानसोपचारतज्ज्ञ (एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, पवई.)

viva@expressindia.com