साबण खरेदी करायचा असेल तर तुम्ही काय करता? दुकानात जाऊन, तुम्हाला हवा असलेला साबण निवडायचा, पसे भरून साबण घरी घेऊन यायचा. पण तेच जर दुकानात गेल्यावर तुमच्यासमोर वेगवेगळे जिन्नस मांडलेले असतील आणि त्यातून तुमच्या आवडीचे जिन्नस, रंग, सुवास निवडून साबण तयार करून दिला तर? तोही तुम्हाला हव्या त्या आकारात. ऐकायला ही कल्पना खुळचट किंवा घरच्याघरी साबण तयार करण्याचा एक प्रयोग वाटू शकतो. इंटरनेटच्या गुहेत डोकावून पाहिल्यास आज काही मोजक्या वेबसाइट्स तुमच्या पसंतीचे साबण बनवून देतात. लवकरच तुमच्या आसपासच्या दुकानात ही संकल्पना आली तर आश्चर्य वाटायला नको. हे फक्त साबणाच्याच बाबतीत शक्य आहे अं, नाही. हल्ली ‘कस्टमायझेशन’ म्हणजेच ग्राहकाच्या पसंतीची वस्तू बनवून देणं ही संकल्पना सध्या बाजारपेठेमध्ये रुळू लागली आहे. कपडे, शूज, दागिने इथपासून घडय़ाळ, मोनोग्रम्स स्टॅम्प, कागदी स्टेशनरी, अगदी सायकलपर्यंत प्रत्येक गोष्ट तुमच्या पसंतीनुसार बनवून मिळू लागल्या आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला बाजारात तंगडतोड करायचीही गरज नाही. फक्त तुमचा लॅपटॉप घ्या, काही क्लिक्स करा.. तुमची वस्तू तुमच्या दारात हजर!

आपल्या पसंतीनुसार कपडे बनवून घेण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार आहे. बाजारातून आवडीचं कापड घेऊन, ते टेलरला शिवायला द्यायचं. त्यावर आपल्या पसंतीची एम्ब्रॉयडरी स्वत: करायची किंवा करवून घ्यायची याचा इतिहास तयार कपडय़ांच्या दुकानांपेक्षा जुना आहे. सध्या टी-शर्ट्स, गंजी, टाय यावर आपल्या पसंतीचं िपट्र करून घेण्याकडे तरुणाईचा कल आहे. विशेषत: पार्टी, ट्रिप्सच्या वेळी याची मागणी जास्त असते. त्यात हळूहळू टोट बॅग, मग्ज, कोस्टर, उश्यांची कव्हर्स, चादर, टॉवेल अशा वस्तूंचा समावेश होऊ लागला. यातून पर्सनलाइज गिफ्िंटगची मोठी बाजारपेठ तयार होऊ लागली आहे. एखाद्याला बाजारातून खरेदी केलेली भेटवस्तू देण्यापेक्षा त्यांचे फोटो, आवडतं वाक्यं असलेल्या अशा वस्तू देणं कुतूहलाचं ठरू लागलं आहे. मग त्यातूनच फोटो छापलेले केक आले. ऑफिसमध्ये एकसारखं पेन, नोटपॅड, लिफाफा वापरण्यापेक्षा स्वत:चा लोगो असलेली स्टेशनरी बनवली जाऊ लागली. सध्या तुमच्या पसंतीची ज्वेलरी बनवून देणाऱ्या काही वेबसाइट्ससुद्धा आल्या आहेत. यात पेंडंट, ब्रेसलेट, अंगठीवर तुम्हाला हवं असलेलं नाव, डिझाईन बनवून मिळतं. ‘टोटेटेका’, ‘मोनपर्स’ यांच्या वेबसाइटवर तुमच्या पसंतीची पर्स बनवून मिळते. ‘शूज ऑफ प्रे’, ‘टॅलँस डोर’सारख्या वेबसाइट्सवर तुमच्या पसंतीचे हिल्स बनवून मिळतात. यात अगदी हिल्सच्या प्रकारापासून त्याचा रंग, कापडही निवडायची संधी ग्राहकाला मिळते. ‘ट्रेक’ या सायकल ब्रॅण्डच्या वेबसाइटवर तुम्हाला हवी तशी सायकल बनवून मिळते. घराच्या सजावटीच्या अनेक वस्तू उदाहरणार्थ घडय़ाळ, कोस्टर, चॉिपग पॅड, टेबल लॅम्प, पोस्टर आणि बरंच काही तुमच्या पसंतीनुसार बनवून मिळतं. इतकंच काय तर लहान मुलांची खेळणी, कपडे, गिफ्टही पर्सनलाइज करून देणाऱ्या ऑनलाइन कंपन्या आहेत.

या सगळ्यामध्ये आता सौंदर्य क्षेत्राचीही भर पडते आहे. आपल्या त्वचेच्या रंगाचं फाऊंडेशन बाजारात मिळणं किती कठीण आहे, हे प्रत्येक स्त्रीला ठाऊक असतं. बऱ्याचदा फाऊंडेशनची शेड थोडी फिकट किंवा गडद असते. त्यामुळे चेहरा पांढराफटक किंवा टॅन दिसतो. यावर पर्याय म्हणून ‘क्युरोलॉजी’ कंपनीच्या वेबसाइटवर तुमच्या चेहऱ्यानुसार फाऊंडेशन बनवून मिळतं. तुम्हाला फक्त योग्य प्रकाशात फोटो काढून कंपनीच्या वेबसाइटवर टाकायचे असतात. या फोटोनुसार फाऊंडेशनची शेड बनवली जाते. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर मुरूम, डार्क सर्कल्स, सुरकुत्या असतील तर त्यानुसार फाऊंडेशनमध्ये विटॅमिन टाकले जातात. पुढच्या वेळी फाऊंडेशन मागवताना तुम्ही तीच शेड मागवू शकता किंवा चेहऱ्यात सुधार झाला असल्यास नवी शेड बनवून घेऊ शकता. फाऊंडेशनप्रमाणेच लिपस्टिक हीदेखील स्त्रियांची जिवाभावाची गोष्ट. पण याची शेड निवडतानासुद्धा बरीच कसरत करावी लागते. त्यातही ग्लॉस आणि मॅट फिनिशचा गोंधळ असतोच. ऑस्ट्रेलियातील ‘द लिप लॅब’ या ब्रॅण्डच्या दुकानात ग्राहकाला असंख्य रंगांमधून त्यांच्या पसंतीचे रंग निवडायची मुभा मिळते. त्याचप्रमाणे दोन किंवा अधिक रंगांची सरमिसळ करून त्यांच्या पसंतीची शेड पंधरा मिनिटांत तयार करून देतात. ‘फाइंिडग फर्डिनंड’ या वेबसाइटवर हीच प्रक्रिया घरबसल्याही करता येते.

आपल्या प्रत्येक वस्तूला आपल्या आवडीनिवडीत रचून देण्याची ही सगळी प्रक्रिया सांगायला अगदी गमतीशीर आणि उत्सुकता वाढवणारी आहे. कधी तरी हे प्रयोग करताही येतील. पण मुळात हा पर्सनल टचचा घाट घातला जाण्यामागचं मूळ हे ‘ग्राहकराजा’ या संकल्पनेकडे जातं. ‘मी सगळ्यांपेक्षा वेगळा दिसलो पाहिजे. बाजारात चार जणांकडे आहे तेच मी का वापरू?’, या अट्टहासातून अशा मागणीचा जन्म होतो. अर्थात या सगळ्या प्रक्रियेसाठी थोडे जास्तच पसे मोजावे लागतात. पण ते मोजायचीही ग्राहकांची तयारी असते, कारण तुमच्याकडची डिझाइन किंवा वस्तू इतरांकडे नसेल याची खात्री आणि त्याचा आनंदही त्यामागे असतो. त्यात बऱ्याचदा या वस्तूंसाठी घराबाहेर पडण्याची गरजही नसते. काही क्लिक्समध्येच वस्तू घरी येते. त्यामुळे आपसूक ग्राहक या प्रयोगांना पसंती देतात. सध्याचा ऑनलाइनचा ट्रेण्ड लक्षात घेता पर्सनलाइज वस्तू विकणाऱ्या वेबसाइट्सची संख्या वाढते आहे. यात एका दृष्टीने विक्रेत्याचाही फायदा असतो. वेबसाइट किंवा स्टार्टअपमध्ये पर्सनलाइज वस्तू मागणीनुसार पुरवता येत असल्याने जादा समान भरून ठेवावं लागत नाही. डिझाइन ग्राहकाकडून आल्यामुळे साहजिकच प्रतिस्पध्र्यापेक्षा स्वत:ची वस्तू वेगळी असणार याची निश्चिती त्यांना मिळते. पर्सनलाइज वस्तूंमध्ये एकदा ग्राहक वस्तूच्या दर्जाबाबत समाधानी झाल्यास तो पुन्हा पुन्हा त्या वेबसाइटवर येतो किंवा इतरांना जायला सांगतो, हेही आत्तापर्यंतच्या निरीक्षणावरून सिद्ध झालंय. तसंच एखादा कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीचा ब्रॅण्ड पर्सनलाइज वस्तू बनवत असेल, तर त्यांच्या डिझायनरला ग्राहकाच्या पसंतीचा अंदाजही सहजपणे येतो. याचा फायदा ब्रॅण्डचे मुख्य कलेक्शन वाढवण्यासाठी होतो. त्यामुळे साहजिकच ब्रॅण्ड्ससुद्धा या प्रयोगाला पसंती देतात. अर्थात हा ग्राहकांचा ‘पर्सनल टच’ असल्याने या अशा प्रयोगांमध्ये ग्राहकांची आवड पहिली जपली जाते आणि ब्रॅण्डला त्यांच्या प्रसिद्धीचं आयतं माध्यम मिळतं. दोन्हीकडून ‘विन विन’ परिस्थिती असल्याने हा नाद आता वाढत चाललाय!

viva@expressindia.com