गदिमांनी लिहिलेल्या या ओळींमध्ये खूप मोठा अर्थ दडला असला, तरी खाबू मोशायला पाणीपुरीच्या एका ठेल्यावर त्यातील खाद्यार्थ सापडला. प्रत्येक घडय़ात भरलेलं वेगवेगळ्या चवीचं पाणी आणि त्या प्रत्येक पाण्याची एक अनोखी लज्जत.. खाबू मोशायला नव्या वर्षांतील पहिल्याच महिन्यात काहीतरी नवे गवसले.

खाबू मोशायच्या खाद्यजत्रेत मिटक्या मारत, कधी हाताची पाचही बोटे चाटत, तर कधी स्स्स्स्स्ऽऽ आहाहाऽऽ असे उसासे टाकत सहभागी झालेल्या सगळ्या खवय्यांना खाबू मोशायचा वालेकुम अस्सलाम! गेल्या वर्षीपासून खाबू मोशायने तुम्हाला मुंबई आणि परिसरातील वेगवेगळ्या खाद्यालयांची सर घडवली. आता नव्या वर्षांतल्या पहिल्या भेटीतही खाबूच्या पोटबंधूंना आणि पोटमत्रिणींना काहीतरी झक्कास द्यायच्या इराद्याने खाबू मोशाय अनेक दिवस परेशान होता. खाबूने आपल्या सगळ्या पंटरना कामाला लावलं होतं. बाबू खवय्या, फ्राइड मन्या, हसन बदा, चमन ढोकळा, खादाड बुचकी सगळेच जण खाबूची ही फर्माईश पूर्ण करण्यासाठी नाकपुडय़ा सज्ज ठेवून आणि जिभेचे स्नायू परजून चांगल्या पदार्थाचा माग काढत होते. अखेर खाबू मोशायची ‘पोट्टमत्रीण’ खादाड बुचकी त्याच्या मदतीला आली.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

खादाड बुचकी खाण्याच्या बाबतीत तशी शौकीन नाही, पण तिला खाद्यजत्रेतले वेगवेगळे प्रवाह नक्कीच कळतात. कपडे खरेदीच्या निमित्ताने आपल्या बचकभर मत्रिणींबरोबर मुंबईतल्या अनेक गल्ल्या तुडवण्याचा तिचा बायोडाटा भलताच स्ट्राँग असल्याने तिला अनेक गल्ल्यांच्या टोकाला मिळणाऱ्या अनेक गोष्टींचीही माहिती आहे. या वेळी खादाड बुचकीने खाबूला सध्या मुंबईत फॉर्मात असलेल्या एका पदार्थाबद्दल माहिती दिली. पदार्थ तसा नेहमीच्या खाण्यातला. पण सध्या त्यातही मुंबईकरांनी व्हरायटी आणायला सुरुवात केली. पदार्थ आहे पाणीपुरी!

आता तुम्ही म्हणाल, पाणीपुरीत असं काय वेगळं आहे? तर मेरे प्यारे मित्रों, तीच तर खरी गंमत आहे. खादाड बुचकीने दिलेल्या इंटेलनुसार सध्या मुंबईत वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचं पाणी वापरून ही पाणीपुरी विकायची टूम निघाली आहे. सध्या घाटकोपर पूर्वेकडे स्टेशनच्या बाहेरच एक पाणीपुरीवाला अशा वेगवेगळ्या फ्लेव्हरमधल्या पाणीपुरी विकतो. कामाच्या धबडग्यात खाबूला घाटकोपरला उतरणं जमलं नाही. मग कामाच्या निमित्तानेच खाबू मुलुंडला गेला असता मुलुंडच्या प्रसिद्ध महात्मा गांधी रस्त्यावर एका ठेलेवाल्याकडे खाबूला चिनीमातीच्या मोठय़ा बरण्या दिसल्या.

चिनी मातीच्या या बरण्या बघून खाबू नॉस्टॅल्जिक झाला. खाबूच्या लहानपणी त्याने स्वत:च्या आणि आसपासच्या अनेक घरांमध्ये चिनी मातीच्या या बरण्या बघितल्या आहेत. झाकणाच्या टोकाला पिवळसर रंगाच्या आणि त्याखाली पूर्ण पांढऱ्या अशा या बरण्यांमध्ये खाबूची आज्जी किंवा त्यावेळच्या सगळ्याच आज्ज्या लोणचं, मुरंबा, वाळवलेले पापड, मिरगुंडं, कुरडय़ा वगरे गोष्टी भरून ठेवत. लाकडाच्या मांडणीत अगदी वरच्या किंवा अगदी खालच्या फळीवर ठेवलेल्या या बरण्या आनंदाचं निधान होत्या.. तर मुलुंड पश्चिमेला भटकत असताना या चिनी मातीच्या बरण्या पाहून खाबू मोशायची पावलं आपसुकच त्या दिशेने वळली. प्रत्येक बरणीच्या दर्शनी भागावर पुदिना, लसूण, जिरा, िलबू, हजमा हजम आणि रेग्युलर अशा चिठ्ठय़ा चिकटवल्या होत्या. बरण्यांच्या मागे एका भांडय़ात भिजवलेली खारी बुंदी आणि पाणीपुरीच्या पुऱ्या असा सरंजाम होता. आली पंचाईत! खाबूला सगळेच फ्लेव्हर्स चाखून बघायचे होते. तो पाणीपुरीवालाच खाबूच्या मदतीला धावून आला. प्रत्येक फ्लेव्हरची एक पाणीपुरी खाऊन शेवटची पाणीपुरी आवडेल त्या फ्लेव्हरची घे, हे शब्द ऐकल्यावर खाबूला त्याच्या त्या प्रसंगावधानाची दाद द्यावीशी वाटली.

खाबूने सज्ज होऊन शर्टाच्या बाह्य़ा कोपरापर्यंत खेचल्या आणि त्या पाणीपुरीवाल्याने दिलेला द्रोण हातात घेतला. पहिले जिरा फ्लेव्हर असलेल्या बरणीत त्या इसमाने एक ओगराळं टाकलं. (ओगराळं म्हणजे काय, हे तुमच्या आजीला किंवा आईला विचारायला हवं. वरण वगरे वाढायला खोलगट बुडाचा डाव वापरतात, त्याला ओगराळं म्हणतात. खवय्यांना हा तपशील माहीत असेलच. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष करावं.) त्या ओगराळ्याच्या बुडाशी भोक होतं. त्या भोकातून पडणारं पाणी तो पुरीवाला पुरीत सोडत होता. स्वच्छतेच्या विचित्र कल्पना उराशी बाळगून पाणीपुरी खायला येणाऱ्यांसाठीची ही नामी शक्कल बघून खाबू मोशायने मनातल्या मनात कौतुकाची मोठी पावती फाडली. त्यानंतर त्या इसमाने लसूण फ्लेव्हरचं पाणी खाबूच्या पुरीत सोडलं. लसणाचा इतका छान झणका शेवटचा बहुधा खाबूने त्याच्या आईने केलेल्या अंबाडीच्या भाजीला दिलेल्या लसणाच्या फोडणीच्या वेळीच घेतला होता. लसूण फ्लेव्हरची ही पाणीपुरी खाबूच्या घशाची चौकशी करूनच पुढे गेली. त्या लसणाच्या चवीचं वर्णन करण्यासाठी ‘अप्रतिम’ या शब्दाखेरीज खाबूकडे दुसरा शब्द नाही. त्यानंतर त्या महाशयांनी पुदिना फ्लेव्हरचं पाणी पुरीत टाकलं. हा फ्लेव्हर काही खाबूला फारसा रुचला नाही. आता लेमनची वेळ होती. ते पाणी पुरीसकट रिचवताना खाबूला मस्त झिणझिण्या आल्या. हजमाहजम नावाचा फ्लेव्हर राहिला होता. या फ्लेव्हरच्या नावामुळेच खाबू तो खायला उत्सुक होता. ती पुरी खाबूच्या मुखात पडली आणि खाबूला सुखद धक्का बसला. थोडय़ाशा गोड आणि अवर्णनीय चवीचं पाणी खाबूला खूपच आवडलं. खाबूला आवडलेल्या फ्लेव्हर्समध्ये जिरा, हजमा हजम, लसूण आणि िलबू असे चार फ्लेव्हर्स होते. प्लेटमध्ये एकच पुरी शिल्लक होती. खाबूपुढे पेचप्रसंग निर्माण झाला होता. अखेर खाबूने शेवटच्या पुरीसाठी हजमा हजमला पसंती दिली आणि आणखी एका पाणीपुरीची ऑर्डर देत पुन्हा सगळे फ्लेव्हर्स निगुतीने चाखले.

पाणीपुरी विथ फाइव्ह फ्लेव्हर्स

कुठे : मुलुंड पश्चिमेला नाहूरच्या दिशेने बाहेर पडल्यावर समोरच मॅक्डोनाल्ड लागतं. हे  उजवीकडे ठेवून सरळ चालायला सुरुवात करायची. पाचरस्त्याच्या अलीकडेच उजव्या बाजूलाच हा पाणीपुरीवाला आपला ठेला सांभाळून बसतो. त्याशिवाय घाटकोपर पूर्वेकडेही ही पाणीपुरी स्टेशनच्या बाहेर असलेल्या पाणीपुरीवाल्याकडे मिळते.

viva@expressindia.com