उत्तम परफ्यूम कसा ओळखायचा, स्त्रीपुरुषांसाठीचे परफ्यूम वेगळे कसे, मुळात सुगंधाची निर्मिती कशी केली जाते यांपासून ते परफ्यूमबाबतचा क्सासी चॉइस कसा असावा अशा अनेक सुगंधी कोडय़ांची उकल करणारे पाक्षिक सदर..  सुगंधाची परिभाषा समजण्यासाठी परफ्यूमरी उद्योगाच्या इतिहासात थोडं डोकवायला हवं. त्याचाच हा प्रयत्न.

सुगंधी द्रव्यांचा इतिहास फार प्राचीन आणि मनोरंजक आहे. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये सुगंधाच्या वापराबाबत उल्लेख आढळतात. या सर्वामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो प्राचीन इजिप्शियन संस्कृतीचा. या संस्कृतीत सुगंधाचा संबंध थेट देवतांशी जोडलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळात विविध फुले, पानं, फळं, वनौषधी यांचा वापर सुगंधासाठी केला गेला. माणसाच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे आणि प्रयोगशीलतेमुळे सुगंधाचं रहस्य त्याचं त्याने उलगडलं. काही फुलांवर, पानांवर उष्णतेचा परिणाम होतो. धुराच्या किंवा वाफेच्या संपर्कात आले की, सुगंध अधिक तीव्र होतो, हे माणसाला जाणवलं. त्यातूनच ढी१ऋ४े४े हा शब्द आला. या शब्दाचा अर्थ बाय फ्यूम्स किंवा थ्रू स्मोक. अर्थातच धुरापासून तयार झालेला.

पुरातन काळापासूनच माणूस सुगंधाकडे आकृष्ट होत होता. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमध्ये स्वच्छतेला फार महत्त्व होतं. दररोज आंघोळ करणं.. खरं तर प्रत्येक जेवणानंतर अंघोळ ही इतिप्तमध्ये तेव्हा प्रथा होती. परफ्यूम किंवा सुगंधी द्रव्य ही अंग स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्येदेखील देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अंगावर गोड गंध मिरवणं आवश्यक समजलं जायचं. ग्रीक संस्कृतीत आजच्या अ‍ॅरोमा थेरपीची मूळं सापडतात. त्या काळी आरोग्यकारक आणि ताजेतवाने करणाऱ्या काही सुगंधांचा उपचारांत वापर करण्यात यायचा. इ.स. पूर्व ४००० पासून चाडेचार पाच हजार र्वष मनुष्याच्या उत्तरक्रियेमध्ये सुगंधाचं स्थान अबाधित होतं. मृत्युसंस्कारांच्या वेळी आत्मा देवाला भेटायला जातो असं मानून त्यासाठी सुगंधी द्रव्य, तेलं आवर्जून वापरली जायची.

थोडक्यात, ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन संस्कृतींमध्ये सुगंधाचा प्राथमिक वापर हा स्वच्छतेच्या दृष्टीने शुचिर्भूत होण्यासाठी केला जात होता. त्यानंतरच्या काळात प्राचीन भारतीय संस्कृती, ग्रीक, रोमन, इजिप्त, चायनीज संस्कृतींमध्ये फुलं, पानांबरोबर, त्याचं तेल, डिंक, लाकूड यापासून मिळणारा सुगंध वापरायची प्रथा सुरू झाली. इ.स. पूर्व ७५०च्या आसपास इजिप्शियनांना ओलिबॅनम आणि मरपासून सुगंध काढून घ्यायची पद्धत शोधून काढली. आपल्या गुग्गूळादी डिंकापासून निर्माण होणाऱ्या सुगंधी वनस्पतींच्या जातीशी याचं नातं आहे.

परफ्यूम निर्मितीचा मानवी संस्कृतीच्या इतिहासातील कळस गाठला गेला इजिप्तमध्ये क्लिओपात्राच्या काळात. सुगंधाचा वापर आकर्षित करून घेण्यासाठी, वश करून घेण्यासाठी केला जाऊ लागला याच काळात. परफ्यूमला भावनिक महत्त्व मिळालं आणि परफ्यूमचा रोमँटिसिझम सुरू झाला. परफ्यूमरी या कलेला चेहरा द्यायचा ठरवला तर तो क्लिओपात्राचा असेल. ती म्हणे समुद्रात नाव घालण्यापूर्वी तिला सुगंधी द्रव्य लावून घ्यायची.. मार्क अँथनीला ती येण्याची खबर त्या सुगंधानेच द्यावी हा त्यामागचा हेतू. औषधोपचारांचा पितामह म्हणतात त्या हिप्पोक्रेटिसनं सुगंधाचा वापर रोगराईला दूर ठेवण्यासाठी केला. त्यामुळे ग्रीकांच्या अ‍ॅरोमाथेरपीला सुरुवात झाली आणि सुगंधाला औषध विज्ञानाचं अधिष्ठान लाभलं. पुढे अलेक्झांडर द ग्रेटच्या कारकीर्दीत पूर्वेकडचा व्यापारउदीम वाढला आणि वेगळ्या वासाचे मसाले, फुले, पाने यांचे नवीन सुगंध परफ्युमरीत दाखल झाले. भारत, चीन, आफ्रिका, अरबस्तान या भागाकडे बहुमूल्य सुगंधासाठी बघितलं जाऊ लागलं. सुगंधाला सोन्याएवढा भावदेखील मिळू लागला आणि मागणी वाढली. सुगंधाचं जग विस्तारलं आणि एक झालं. सुगंधनिर्मितीचं उद्योगात रूपांतर व्हायला मात्र एकोणिसावं शतक उजाडावं लागलं. सुगंधाची पुढची गोष्ट पुढच्या सुगंधी कट्टय़ावर.

(लेखकद्वयी सीनिअर परफ्यूमर म्हणून एका खासगी उद्योगात कार्यरत आहेत.)

viva@expressindia.com