सुगंधनिर्मितीची कला ग्रीकांपासून अरबांपर्यंत आणि अरबांपासून पुन्हा युरोपात इटली आणि फ्रान्सपर्यंत कशी येऊन पोचली याची कथा. सुगंध आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कसा झाला याचा इतिहास.

सुगंधाची परिभाषा समजून घेण्यासाठी परफ्यूमरी इंडस्ट्रीचा इतिहास थोडा समजून घ्यायला हवा. याची सुरुवात आपण मागच्या लेखात केली. इ.स. पूर्व ४००० वर्षांपासूनचा सुगंधी इतिहास आपण पाहिला. प्राचीन इजिप्शियन, ग्रीक, रोमन, भारतीय संस्कृतीमध्ये सुगंधाचा वापर शुचिर्भूत होण्यासाठी, देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केला जात असे. पुढे क्लिओपात्रापासून परफ्यूमचा रोमँटिसिझम सुरू झाला. सुगंध साठवून ठेवणं ही त्या सुरुवातीच्या काळातली सर्वात अवघड गोष्ट असावी. इसवी सनाच्या नवव्या आणि दहाव्या शतकात अरबांमुळे सुगंध जपून ठेवण्याची क्लृप्ती जगाला उमजली. अत्तरं आणि अरब यांचं नातं तेव्हापासूनचं.

अरबांनी ग्रीकांकडून रसायनशास्त्र जाणून घेतलं आणि फुलांमधील नैसर्गिक सुगंध काढून घ्यायची कला अवगत केली. नवव्या आणि बाराव्या शतकादरम्यान अरबांनी सुगंधी द्रव्यांसाठी मुद्दाम फुलांची लागवड सुरू केली. डिस्टिलेशन करून फुलांमधली सुगंधी द्रव्य काढून घेऊन जतन करण्याचं कसब अरबांनी साधलं.

अरबांनी सुगंधाची संस्कृती समृद्ध केली आणि बाराव्या-तेराव्या शतकात अरबांची हीच संस्कृती मध्ययुगीन युरोपात प्रचलित झाली. युरोपात आयात झालेल्या सुगंधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, सुगंधी अर्क यामुळे परफ्यूमरी इंडस्ट्री मोठी होत गेली. सुगंधी इतिहासाचं इटालियन पर्व सुरू झालं चौदाव्या शतकात. या काळात रोझमेरी या वनस्पतीचा अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट काढला गेला. अल्कोहोल वापरून बनवलेलं ते पहिलं परफ्यूम. अजूनही हे परफ्यूम ‘हंगेरी क्वीन वॉटर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

इ.स. १५५३ मध्ये इटलीची कॅथरीन डी मेडिसी फ्रान्सची महाराणी म्हणून फ्रान्समध्ये दाखल झाली तेव्हा तिच्याबरोबर तिच्या सुगंधी हातमोज्यांची फॅशनही प्रचलित झाली. मोठय़ा प्रमाणावर सुगंधी वनस्पतींची लागवड सुरू झाली ती या नव्या फॅशनमुळे. सुगंधाची राजधानी फ्रान्सपर्यंत येऊन पोचण्याचा हाच कालावधी होता. संत्र्यासारख्या सुगंधी वनस्पतींची लागवड इथे होतीच. गुलाब, चमेलीसारख्या सुगंधी फुलांच्या लागवडीसाठीही पोषक वातावरण फ्रान्समध्ये होतं. त्यामुळेच ग्रास (फ्रेंच उच्चार – गहास) हे फ्रेंच शहर ‘सिटी ऑफ फ्रेग्रन्स’ म्हणून उदयाला आलं. इथे हा सुगंधी उद्योग चांगला रुजला आणि परफ्लूमरी इंडस्ट्री चांगली बहरली. इथेच (The Maitres gantiers) परफ्यूमर्सची सहकारी संघटनाही जन्माला आली.

सोळाव्या आणि सतराव्या शतकात फ्रान्समध्ये राजेरजवाडे आणि दरबारी मातबरांसाठी खास सुगंध तयार करण्यात यायचे. त्यामुळे सुगंधाच्या व्यवसायाला बरकत आली. फ्रान्सला सुगंधी इतिहासात मोलाचं स्थान मिळालं ते कायमचं. या काळात फ्रान्समध्ये काही क्लासिक परफ्यूम्स तयार झाले. इ.स. १७९२ मध्ये ‘द हाऊस ऑफ म्यूलेन्स’नी असाच एक क्लासिक परफ्यूम लाँच केला – Eau de Cologne 4711. जर्मनीच्या कलोन प्रांतात राहणाऱ्या एका इटालियन परफ्यूमरने हा सुगंध निर्माण केला. म्हणून त्याला हे नाव दिलं. आपल्याला सुपरिचित कलोन हा तोच सुगंध.

सुगंधनिर्मिती क्षेत्राचं खऱ्या अर्थानं औद्योगिकीकरण झालं ते एकोणिसाव्या शतकात. ‘व्हॅनिलिन’चं आगमन या क्षेत्राला कलाटणी देणारं ठरलं. कृत्रिम सुगंध निर्माण करणं व्हॅनिलिनच्या मदतीने शक्य झालं. सिंथेटिक परफ्यूमरीसाठी वापरला गेलेला हा पहिला घटक पदार्थ. सिंथेटिक रॉ मटेरिअल वापरून तयार झालेला पहिला फाइन फ्रेग्रन्स म्हणजे जिकी. १८८९ मध्ये Jicky by Guerlain हे परफ्यूम दाखल झालं. पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फॅशन डिझायनर्सनी, मोठय़ा फॅशन हाऊसेसनी त्यांचे स्वत:चे सुगंध निर्माण करायला सुरुवात केली. पॉल पॉयरेटने १९११ मध्ये Perfume de Rosine ची निर्मिती केली. पाठोपाठ १९२१ मध्ये कोको शनेलचा शनेल नं. 5 हा परफ्यूम आला आणि फाइन फ्रेग्रन्सची एक्झॉटिक वाटचाल सुरू झाली. आज बहुतेक सर्व मोठय़ा डिझायनर्सचे स्वत:चे परफ्यूम्सही आहेत.

विसाव्या शतकातच सुगंधाची ओळख ते साठवणाऱ्या कुपीशी एकरूप होत गेली. कारण परफ्यूमर आणि ‘बॅकारात’, ‘लॅलिक’ यांसारख्या क्लासिक ग्लासमेकर्सची युती झाली. त्यानंतर परफ्यूमर्सनी ‘व्हॅन क्लीफ’, ‘कार्टिअर’सारख्या मोठय़ा ज्वेलर्सशी संधान बांधलं आणि या कंपन्यांनी क्लासिक परफ्यूम्स लाँच केली. त्यानंतर कॉस्मेटिक कंपन्या आणि परफ्यूमर्सचीही हातमिळवणी झाली आणि ई. लॉडेर सारख्या कंपन्या स्वत:चे फ्रेग्रन्स बनवू लागल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुगंध आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. अनेक घरगुती वापराच्या गोष्टी निर्माण करताना सुगंध पेरला जाऊ लागला.

(लेखकद्वयी सीनियर परफ्यूमर म्हणून एका खासगी उद्योगात कार्यरत आहेत.)

viva@expressindia.com