वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आणि नव्या पिढीच्या अस्सल भाषेत कल्लाकरणाऱ्या कलाकारांशी गप्पांचं हे सदर. मधुबालानं पडद्यावर अजरामर केलेली भूमिका निभावणं आणि त्याच वेळी लतादीदींची गीतं रंगमंचावर सादर करणं हे शिवधनुष्य प्रियांका बर्वे ही गायिकाअभिनेत्री पेलतेय.

मुघलआझम, म्युझिकलया भव्यदिव्य संगीत नाटकाद्वारे अनारकलीम्हणून हिंदी रंगमंचावर अवतरून तिनं दिग्गजांची दाद मिळवलेय. यापूर्वी तिनं मराठी संगीत नाटकं, चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केलंय. प्रेमाला’, ‘पॅचअप साँगसारख्या तिच्या वेगळ्या काही अल्बम्सनं संगीतविश्वात आणि वेबविश्वातही कल्ला केलाय.

गायिका-अभिनेत्री म्हणून प्रियांका बर्वे हे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव आहे. सध्या प्रियांका बिझी आहे ‘मुघल ए आझम, द म्युझिकल’ या अभूतपूर्व संगीत नाटकाच्या प्रयोगांत. ‘मुघल ए आझम’ या चित्रपटावर आधारित संगीत नाटक येतंय, हे कळल्यावर अनारकली कोण? हा प्रश्न अनेकांना पडला होता. फिरोझ अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात प्रियांकाला ‘अनारकली’ साकारायची सुवर्णसंधी मिळाली. या भूमिकेचं शिवधनुष्य उचलणं तितकंच अवघड होतं. जवळपास तीन महिने या नाटकाची तालीम सुरू होती. प्रियांका सांगते की, ‘फिरोझ सरांनी आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली. मला उच्चारांवर काम करायला लागलं. नाटकातले उर्दू आणि हिंदी शब्द मराठी बाजानं येऊन चालणार नव्हतं. कमाल अहमद यांच्याकडून हिंदी आणि उर्दूचे धडे गिरवले. मुळात मी गजल शिकलेली असल्यानं ‘नुक्त्या’ची सवय होती. पण उर्दू भाषेचा लहेजा नि नजाकत उच्चारांतून येणं खूप गरजेचं होतं.’

या नाटकाशी अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली नावं जोडली गेली आहेत. अनारकलीची वेशभूषा केलीय प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं. नृत्य हा या नाटकाचा खूप मोठा भाग आहे. त्याला न्याय दिलाय मयुरी उपाध्यायच्या अप्रतिम कोरिओग्राफीनं. पस्तीसजणींसोबत प्रियांका नृत्य करते आणि गातेही. हे तिच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. प्रियांका तीन र्वष कथक शिकलेली असल्यानं नृत्य करणं तुलनेनं सोपं गेलं. तिची एन्ट्री होते ‘मोहे पन घट में’ गाण्यानं. प्रियांका सांगते, ‘रागदारीवर आधारलेलं हे गाणं अदाकारी करून गायचं श्वास लागू न देता.. हे खूप आव्हानात्मक काम होतं. ‘प्यार किया तो डरना क्या’मध्ये बेभान होऊन नाचणं आणि तो अ‍ॅटिटय़ूड आणणं, हे थोडं कठीण वाटत होतं. रिहर्सलदरम्यान एका क्षणी वाटलंही, समजा हे नाही जमलं तर.. तो विचार बाजूला सारून जिद्दीनं मी खूप मेहनत घेतली. फक्त गाणंच नव्हे तर माझा अभिनय आणि नृत्यही तितकंच सरस पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधली. त्यासाठी फिरोझ सरांसह माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांची खूप मदत झाली. त्यानंतर ग्रँण्ड प्रीमियरच्या वेळी मला माझी ‘अनारकली’ सापडली. त्या दिवशी मला बिलकुल भीती वाटत नव्हती. खूप आत्मविश्वास होता. तेव्हा रंगदेवतेची अनामिक ऊर्जाही जाणवली.’

‘मुघल-ए-आझम’चा मुंबईत ग्रँड प्रीमिअर झाला. त्या प्रयोगाला ऋषी, रणधीर, कुणाल असे पृथ्वीराज कपूरांचे तीनही नातू उपस्थित होते. शिवाय इरफान खान, शबाना आझमी, श्रीदेवी, बोनी कपूर असे अनेक दिग्गज त्यावेळी आले होते. अत्यंत सुंदर झाला तो शो. प्रियांकाचं कौतुक झालं. शंकर महादेवन सहकुटुंब आले होते. प्रियांका सांगते की, ‘शंकरजींसारख्या इतक्या मोठय़ा माणसानं आणि माझ्या आयकॉननं केलेलं कौतुक माझ्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. ते म्हणाले की, द होल क्रेडिट गोज टू फिरोज, नो डाउट. बट  प्रियांका बर्वे वॉज द शोस्टॉपर. इट इज हर शो.  शीज इज जस्ट आउटस्टॅण्डिंग.’ कलेला भाषेचं बंधन नसतं. आपल्या कामाचा स्कोप वाढवू तेवढी अधिक संधी मिळू शकते, असं प्रियांकाचं मत आहे. ती म्हणते की, ‘मी मराठी लोकांसोबत काम करताना खूप कम्फर्टेबल असते.

हिंदी लोकांसोबत काम करताना आपण उगाच बुजतो, मराठी माणूस म्हणून. हिंदी बोलताना मराठीभाषक असल्याचं जाणवणंही योग्य नाही. राष्ट्रीय स्तरावर काम करताना भोवतालच्या हिंदी माणसांत आपल्याला बुजायला होऊ  शकतं. मी शिकावू वृत्तीनं तिथं गेले. शिवाय पाश्र्वगायन करतानाही आपल्याला दुसऱ्या भाषांमध्ये गाता तेव्हा मला ही भाषा नाही येत, असं कारण देऊन चालत नाही. त्यामुळं काम करताना भाषा चांगलीच पाहिजे, असं मला वाटतं.’

मराठी संगीत नाटकांतून प्रियांकाचं अभिनय करिअर चालू झालं. तिनं ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’मध्ये काम केलंय. मराठी रंगभूमीमुळंच तिला हिंदी रंगभूमीवर आत्मविश्वासानं पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. हिंदी नाटय़क्षेत्रात प्रोफेशनालिझम खूपच आहे. मुघल ए आझमचा दोनशेजणांचा कास्ट आणि क्रू आहे. चार-पाच मॅनेजमेंट कंपन्या या टीमसाठी काम करतात. नेमून दिलेल्या वेळा पाळणं सगळ्यांनाच भाग असतं. त्याबाबतीत कधीच कुणाला झुकतं माप दिलं जात नाही. काटेकोरपणं वेळ पाळणं आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे काम होतं. योगाभ्यासानं सुरुवात होऊन पुढं अभिनय, नृत्य आणि गाण्याचा सराव करताना दिवस कधी संपायचा ते तिला कळायचंही नाही. त्या सरावामुळं तिची एनर्जी लेव्हल वाढली. व्यायामाचं महत्त्वही कळलं. तिला नाटकातले सलीम-अनारकली आणि अकबर-अनारकलीचे सीन अधिक भावतात. ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणत अनारकली निडर होते. त्यानंतर अकबर नि अनारकलीमधले सवाल-जवाब आहेत. तेव्हा अनारकलीचं बदललेलं व्यक्तिमत्त्व दाखवायला प्रियांकाला खूप मजा येते. गाता गाता आर्जवं करणाऱ्या अनारकलीचा आत्मविश्वास एकदम वाढतो आणि अकबराच्या नजरेला नजर देत अनारकली म्हणते की, ‘प्यार किया तो डरना क्या..’ या गाण्याची कोरिओग्राफी सुरेख झाली आहे. प्रेक्षकांनाही या गाण्याविषयी उत्सुकता वाटते. प्रियांकाला ‘बेकस पे करम’ हेही गाणं खूप आवडतं.

तीन वर्षांपूर्वी बोस्टनमध्ये झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळामध्ये सुमारे पाच हजार रसिकांसमोर ‘संगीत मानापमान’चा प्रयोग झाला होता. त्याबद्दल ती सांगते की, ‘तो प्रयोग अगदी अविस्मरणीय झाला होता. प्रत्येक नाटय़गीताला वन्स मोअर मिळाला होता. अजूनही त्या प्रयोगाची दाद मिळतेय. एका आज्जींनी बॅकस्टेज येऊन मला शंभर डॉलर्सचं बक्षीस दिलं होतं. दुसऱ्या एका आज्जींनी माझी नि राहुलदादाची तिथं दृष्ट काढली. स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं नि टाळ्यांचा गजर होणं थांबतच नव्हतं..’ सध्या ‘मुघले ए आझम’चे ‘एनसीपीए’मधले सगळे शो ‘सोल्ड आउट’ झालेत. त्यानंतर मार्चमध्ये ही टीम दिल्लीच्या ‘त्यागराज स्टेडिअम’मध्ये परफॉर्म करणार आहे. एप्रिलमध्ये पुन्हा ‘एनसीपीए’ला प्रयोग असतील. परदेशातही प्रयोग करायचं ठरतं आहे. प्रियांकानं चित्रपटांसाठी लावणी, सॅड साँग, लव्ह सॉंग्ज, रॅप सॉग अशी वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायली आहेत. तिच्या ‘संगीत मानापमान’चा प्रयोग पुण्याच्या ‘वसंतोत्सवा’त होणार आहे. तिच्या प्रयोगशील कारकीर्दीसाठी भरभरून शुभेच्छा!

संगीत नाटकात भूमिका साकारताना आपण एक व्यक्तिरेखा जगतो. ती जगता जगता गातोही. त्या गाण्याला रसिकांची दाद मिळणं हे माझ्या दृष्टीने एक कलाकार म्हणून सगळ्यात मोठं समाधान आहे

– प्रियांका बर्वे