यंदा खूप वाट पहायला लावलेला पाऊस आता मात्र आपल्यावर चांगलाच खूश दिसतोय. या वार्षिक पाहुण्याच्या आगमनाने आपणही आपलं वेळापत्रक, फॅशन फंडे सारं काही बदलतोच. पाऊस आला की, वॉर्डरोब बदलतो आणि फॅशनच्या सर्व उन्हाळी बाजाराचा गाशा गुंडाळत ‘मान्सून फॅशन’ वर डोकावते. दमट केस, कोमेजलेला चेहरा आणि कपडय़ांची तर दैनाच म्हणा ना.. हे असं एकदा तरी या पावसाच्या मोसमात आपल्या मनात येतंच. पावसाची मजा आणि फॅशनची सजा असं वाटत असेल तर यावर इलाज आहे. मान्सून फॅशनचं हे युद्ध जिंकण्यासाठी ‘व्हिवा’नं दिलेल्या या काही टिप्स..

* कूलॉट्सची चलती : या पावसाळ्यात मिनी स्कर्ट्स, शॉर्ट्स घालून ‘वेल टोन्ड’ पायांना आणखी उठाव द्या. अघळपघळ, लूझ अशा कूलॉट्ससुद्धा सध्या स्टाइल चार्टमध्ये सरशी घेत आहेत. कूलॉट्स म्हणजे गुडघ्यापर्यंत लांबीच्या अघळपघळ ट्राउझर्स.
* हलकंफुलकं : पावसाळी वातावरणात जाड कपडे वाळण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ घेतात. त्यामुळे जाडजूड जीन्सचा पर्याय जितका लांब तितकंच चांगलं. त्याऐवजी शिफॉन, पॉलिस्टर किंवा फार फार तर पातळ सुती मटेरिअलच्या कपडय़ांची निवड करा.
* रंग हे नवे नवे : आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांची छटा आणखी रंगतदार करण्यासाठी या पावसाळ्यात काही व्हायब्रंट रंगाचे कपडे वापरा. खरं तर पावसाळ्यात वातावरण डल असतं. निसर्गात ग्रे शेड्स अधिक असतात. म्हणून तुम्ही रंगीत कपडे वापरले तर चांगले दिसतात. यल्लो टय़ुनिक, नारंगी ट्रेंच कोट, निऑन रंगाचे फुटवेअर हे असं काहीसं धम्माल कलरफुल कॉम्बो यंदाच्या मान्सून फॅशनदरम्यान जरूर करा. आपल्या आवडीचे रंग वापरायचा हाच तर सीझन आहे.
* मॅट मेकअप : या मोसमात क्रीम बेस्ड मेकअप म्हणजे सर्वात मोठा शत्रू. वॉटरप्रूफ असला तरी क्रीम बेस्ड मेकअपमुळे चेहरा चिकचिकीत होते. त्यामुळे मॅट मेकअपला जास्त महत्त्व द्या. मॅट मेकअप ट्रिक्स वापरत पावसातही तुमचं सौंदर्य खुलवा.
* काजळ टाळा : तुमचे सुंदर काळेभोर काजळ लावलेले डोळे कितीही आवडत असले तरीही या सीझनसाठी काजळाचं प्रेम जरा बाजूला ठेवा. काजळ पाण्यामुळे फिस्कटण्याचा धोका असतो. असं झालं तर सगळ्या मेकअपवर पाणी पडतं. याला पर्याय म्हणून वॉटरप्रूफ आयलायनरचा वापर करा.
* केसांची काळजी : या मान्सूनमध्ये ‘स्लिक्ड बॅक हेअरस्टाइल’ इन आहे. मोकळे सोडलेले भुरभुरणारे केस नकोतच. त्याऐवजी मागे सारून बांधलेल्या केसांची स्टाइल सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहे. केसांचा रूक्षपणा टाळण्यासाठी नेहमी पर्समध्ये लिव्ह इन कंडिशनर असू द्या.
* धातू आणि चामडय़ाचा वापर टाळा : फेव्हरेट लेदर पर्स कपाटात ठेवून द्या. ऑक्सिडाइज्ड किंवा मेटल ज्वेलरी यांना या मोसमात खराब होण्यापासून वाचवा किंबहुना त्यांचा वापर टाळा. त्याऐवजी काही फंकी, हलक्या अ‍ॅक्सेसरीज, ट्रेण्डी पॉलिस्टर बॅग्स आणि वॉटर रेझिस्टंट घडय़ाळं वापरा.
या काही टिप्स फॉलो करत ऑस्सम मौस्सम समजल्या जाणाऱ्या पावसासाठी बी फॅशन रेडी!
(myntra.com च्या फॅशन स्टायलिस्ट संहिता दासगुप्ता यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.)
– प्रतिनिधी