फार्मसी आणि बायोमेडिकल सायन्समधील आपल्या संशोधन विषयावर लक्ष केंद्रित करतानाच आपल्या भोवतालाबद्दलची निरीक्षणं नोंदवतेय युनिव्‍‌र्हसिटी ऑफ सेंट्रल लँकेशायरमधली दिबा सिंग.

हाय फ्रेण्ड्स, मी मूळची मुंबईकर, सध्या प्रिस्टनकर. ‘विदेशिनी’ सदराच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळालेय. चारचौघांसारखं आमचंही मध्यमवर्गीय घर. मला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी होती. आजोबांशी माझी खूपच गट्टी होती. मात्र  पॅरालिसिसमुळं ते फारसे हिंडूफिरू शकत नव्हते. त्यांच्या आजारपणामुळं मी कासावीस होत असे. तेव्हापासून या आजारासंदर्भात काहीतरी संशोधन करावं, असं डोक्यात होतंच. ते पुढं परावर्तित झालं, माझ्या पी.एच.डी.च्या विषयांत. मात्र मला हवे असलेले ‘मॉलिक्युलर आणि सेल्युलर बायोलॉजी’ हे विषय आपल्याकडं उपलब्ध नव्हते. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील युनिव्‍‌र्हसिटीचा युनिव्‍‌र्हसिटी ऑफ सेंट्रल लँन्केशायरशी (UCLan) टायअप आहे. माझ्या अभ्यासक्रमातील दोन वर्षं भारतात आणि एक वर्ष UCLan मध्ये अशी विभागणी होती. ब्रिटनमधल्या टॉप-टेन युनिव्‍‌र्हसिटीमध्ये UCLan ची गणना केली जाते. शिवाय काही मोजक्याच युनिव्‍‌र्हसिटीजमध्ये मॉलिक्युलर आणि सेल्युलर बायोलॉजीचा अभ्यासक्रम वाजवी शुल्कासह उपलब्ध आहे, त्यात UCLan चा समावेश होतो. सध्या मी UCLan मध्ये फार्मसी आणि बायोमेडिकल सायन्समध्ये पीएचडी करतेय. त्याआधी इथंच मॉलिक्युलर आणि सेल्युलर बायोलॉजीत बी.एससी. (ऑनर्स) केलंय.

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

इथं यायचं ठरलं तेव्हा फारशी एक्साइटमेंट नव्हती. पण व्हिसा वगैरे हातात पडल्यावर थोडीशी एक्साइट झाले. नवा देश, नवी माणसं.. कसं होईल आपलं? असे विचार मनात येऊ लागले. किंचितशी नव्‍‌र्हसही झालेले. घरच्यांना माझी काळजी वाटत होती. थोडक्यात, थोडी खुशी थोडा गम.. आमच्या घरात शिक्षणासाठी परदेशी जाणारी मी पहिलीच होते. इथं पोहचल्यावर दोन-तीन दिवसांनी होमसिक वाटायला लागलं. नंतर अभ्यास सुरू झाल्यावर सगळं ठीकठाक झालं. मला स्वयंपाक करायला बिलकुल येत नव्हता. इथं आल्यावर यूटय़ूबवर पाहून शिकले. एका मैत्रिणीकडून भाजी करायला शिकले. आम्ही जवळपास तीसजणं एकत्र आलेलो. तेव्हा आम्ही सहा मैत्रिणी एकत्र राहात होतो. त्यातल्या काही परतल्यात. इथं येण्याआधी व्हच्र्युअली इथली ठिकाणं पाहिली होती. जागेच्या   संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट आधीच झालेलं होतं. सगळा परिसर नीटनेटका  आणि अगदी सुरक्षित आहे.

माझी एन्ट्री अजूनही आठवतेय मला. सगळंच परकं भासलं होतं. आपल्यासारखी माणसं, आवाज, गर्दी काहीच नाही. कुठं जावं काही कळत नव्हतं. थंडीनं जाम कुडकुडत होते. युनिव्‍‌र्हसिटीतर्फे आम्हांला न्यायला आलेल्यांना शोधून काढावं लागलं. त्या पहिल्यावहिल्या बसप्रवासात शहराची पहिली झलक दिसली.  ग्रीन, क्लीन, प्रिटी सिटी.. खूप भारी वाटलेलं. सुरुवातीच्या काळात थोडंसं अजीब फिलिंग वाटायचं. हे कुठं आलोय आपण.. आता सहा वर्षांनी, लोकांशी परिचय झाल्यावर वाटतंय की, मीही या शहराचा एक भाग झालेय. ब्रिटिश हवामान त्याच्या लहरीपणाबद्दल प्रसिद्ध आहेच. एकाच दिवसात सगळे ऋतू अनुभवाला येतात. मी इथं आले तेव्हा खूप थंडी होती. बोचरे वारे वाहात होते. थोडय़ाच दिवसांत मी त्या वातावरणात रुळले. इथं आल्यावर ब्रॉड माइंडेड झालेय. आयुष्याकडं बघण्याचा दृष्टीकोन बदललाय. कुटुंबाचं महत्त्व कळतंय. कोणत्याही प्रकारची सांस्कृतिक किंवा भाषेची समस्या उद्भवली नाही. मुंबईकराची दिलदार मनोवृत्ती अंगी भिनल्यानं वावरणं सोप्पं गेलं. अर्थात आपल्या घराची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी होऊ  शकत नाही, पण इथं अ‍ॅडजस्ट व्हायला सोपं गेलं.

इथले लोक खूप अ‍ॅक्टिव्ह, विनम्र स्वभावाचे, सुसंस्कृत, मदतीस तत्पर आणि चिअरफुल आहेत. चटकन दिलगिरी व्यक्त करतात. वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत. लेक्चरला उशीर झाल्यास वर्गात घेत नाहीत. मी पहिल्याच लेक्चरला दहा मिनिटं उशिरा गेलेले.. मग मात्र कानाला खडा लावला. लोकं अनोळखी लोकांशीही संवाद साधतात, पण तोही एका सीमेत राहून. ते ती कधीच पार करत नाहीत. मतं प्रदर्शित करतात, पण ती पूर्वग्रहदूषित नसतात. मी मुंबईची आहे, हे कळल्यावर अनेक जण मुंबईला यायची इच्छा व्यक्त करतात. माझ्या इंग्रजी उच्चारांवर चांगला अभिप्राय देतात. काळ उलटतोय, तशी इथल्या लोकांची पुराणमतवादी वृत्ती बदलतेय.

माझा अभ्यास डॉ. अँथनी अ‍ॅशटोन यांच्या मार्गदर्शनाखाली चाललाय. ते युनिव्‍‌र्हसिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये शिकवत होते. ते स्वत: इम्पिरिअल कॉलेजमध्ये शिकलेत. त्यांच्यासारख्या तज्ज्ञ आणि ज्ञानी शिक्षकामुळं मला संशोधनात खूप मदत होते आहे. माझे दुसरे सुपरव्हाइझर डॉ. जयपॉल सिंग यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त आहे. अशा ज्ञानवंतांसोबत काम केल्यानं आपल्याला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. संशोधन क्षेत्रात असल्यानं साहाजिकच माझे १२- १५ तास लॅबमध्ये जातात. काही वेळा त्याचा ताण येतो, खूप दगदगही होते, पण माझे सहकारी आणि मित्रमंडळींच्या सहकार्यानं सारं काही निभावून जातं. ते मला सतत प्रोत्साहन देतात. त्यांच्या मदतीचा हात कायम तत्पर असतो. ही मित्रमंडळी यूएसए, सायप्रस, पाकिस्तान, नॉर्वे या देशांतील आहेत. माझ्या संशोधनाचा विषय फार्मसी आणि बायोमेडिकल सायन्स या विषयांशी निगडित असला तरी, विशेषत: न्युरोसायन्स अर्थात मेंदूचा अभ्यासाशी तो अधिक निगडित आहे. मी exocytosis प्रक्रियेत किस अँण्ड रन (क्षणिक परिणाम) प्रकारच्या मार्गात आढळून येणाऱ्या प्रोटिन्सचा शोध घेतेय. जेणेकरून त्याचा उपयोग अल्झायमर, डिप्रेशनसारख्या मेंदूशी निगडित व्याधींच्या उपचारांसाठी करता येईल.

मला इथं सुरक्षित वाटतं. युनिव्‍‌र्हसिटीची चांगली सुरक्षाव्यवस्था असून सतत गस्त चालू असतं. रात्री उशिरापर्यंत काम करणारे किंवा लायब्ररीत अभ्यास करत असणाऱ्यांसाठी बसची सोय आहे. शिवाय शहरातही पोलिसांच्या गाडय़ा रात्रभर गस्त घालत असतात. माझ्या इथल्या वास्तव्यात मी बऱ्याच ठिकाणी फिरलेय. एक्सेटरची माझी पहिलीच नि एकटीची ट्रीप होती. तेव्हा फारशा ओळखीही झाल्या नव्हत्या. तेव्हा या देशात पहिल्यांदा आल्यावर थोडीशी भिरभिरलेले, तोच अनुभव पुन्हा आला.. नवीन जागा, नवीन माणसं.. तिथं अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्स केलं. जंगलात फिरले. तो फारच चांगला अनुभव होता. त्याखेरीज स्कॉटलंड, ग्लासगो, एडिंबरा, लंडन, मॅन्चेस्टर आदी ठिकाणी मित्रमंडळींसोबत गेलेय. प्रवासाच्या निमित्तानं नवीन माणसं भेटतात, ओळखी वाढतात आणि आपण आपल्या त्याच त्या वर्तुळाच्या बाहेर येऊन वेगळे अनुभव घेतो. त्या ठिकाणच्या सौंदर्याची अनुभूती मनात साठवून ठेवतो. इथं आल्याआल्या थोडी होमसिक झालेले. मात्र काही काळानं रुळलेदेखील. दरवर्षी भारतात येतेच. दिवसभरात दोन-तीनदा घरच्यांशी वायबर कॉल्स, फेसटाईम आणि व्हॉट्स अपच्या माध्यमातून संपर्कात असते. लॅबमध्ये खूप काम असतं. त्यामुळं आराम करायला नि घरकामासाठी वीकएण्डला फारच थोडा वेळ हाती राहातो. ड्रॉइंग, वाचन वगैरे छंदांना वेळ मिळत नाही. इथं आले तेव्हा लेक्चर्स होती आठवडय़ातून दोनदा. वाटलेलं बरंय हे. मग कळलं की, इथं सेल्फस्टडीवर भर आहे. सतत अभ्यास करणं, नोट्स काढणं, संदर्भ शोधणं यात वेळ कसा जातो ते कळत नाही. प्रोफेसरना नावानं हाक मारणं सुरुवातीला मला विचित्र वाटलेलं. अजूनही मला त्याची सवय झालेली नाहीये.

मला वाटतं, परदेशात शिक्षण घेताना माणूस कणखर होतो. मी स्वत: अधिक जबाबदार आणि निर्णयक्षम झालेय. भारतात अगदी लाडाकोडात वाढलेली होते. इथं सगळ्याच गोष्टी स्वत:च्या स्वत: करायला लागल्या. मग ती स्वच्छता असो, स्वयंपाक असो किंवा साधं बिल भरणं असो. अभ्यास करता करता काम करत असले तरी काटकसरीनं राहायला शिकलेय. स्वत:च्या कोषातून बाहेर पडून चार नवी माणसं जोडायची जादू इथं येऊन शिकलेय. मन मोठं असावं, हा धडा गिरवलाय. २०१४मध्ये वडील गेल्यानं मला घरी धाव घ्यावी लागलेली. इथं परतल्यावर खिन्नतेच्या खोल गर्तेत होते. घरची सतत आठवण येत होती. तो काळ माझ्या जीवनातला सगळ्यात बिकट काळ होता. पण मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांनी मला या विषण्ण मनोवृत्तीतून बाहेर पडायला मदत केली. ते सतत उमेद देत. माझ्या पाठीशी खंबीरपणं उभे राहात. काही काळानं मी स्थिरावले. माझा थिसिस लवकरच पूर्ण करून याच क्षेत्रात नोकरी करायचा विचार चालू आहे. कारण माझं हे क्षेत्र वेगळं असून भारतात त्यात तितकीशी प्रगती झालेली नाहीये. विश मी लक..

दिबा सिंग (प्रिस्टन, यूके)

(शब्दांकन – राधिका कुंटे )