दिवाळीची खरेदी हा विषय दरवर्षी तितक्याच उत्साहाने चर्चा घडवणारा आणि प्रत्यक्षात येणारा. ‘गरजेपुरती खरेदी’ ही संकल्पना कधीच मागे पडली आहे आणि ‘हौसेखातर खरेदी’ आता पचनी पडली आहे. हौसेला मोल नसतं, हेदेखील आपल्याला चांगलंच उमगलेलं आहे. ‘लक्झरी शॉपिंग’ला गेल्या काही वर्षांत वाढता प्रतिसाद मिळतो आहे तो यातूनच.

‘या वर्षी दिवाळीला आम्ही ‘बोस’ची साऊंड सिस्टीम- होम थिएटरसाठी घेणार आहोत..’

‘मला ‘स्वॉच’ घ्यायचंय यंदा!’

‘नोकरी लागल्यानंतरची ही पहिली दिवाळी. नेहमीच्या खरेदीबरोबर मी ऑनलाइन शॉपिंग साइटवरून ‘आयवॉच’ मागवलंय..’

‘यंदा भावाला गिफ्ट द्यायला ‘गुची’चा परफ्यूम घेतला आहे.’

‘‘लुई व्हिटॉन’ची बॅग घ्यायची आहे मला. यंदा शक्य नाही, पण पुढच्या दिवाळीत नक्की!’

लक्झरी शॉपिंगची लाट आता मध्यमवर्गापर्यंत येऊन पोचली आहे आणि लक्झरी ब्रॅण्ड्सची तरुणाईला नुसती भुरळ पडली आहे असं नव्हे, तर व्यवस्थित प्लॅनिंग करून अशा महागडय़ा आणि मौल्यवान ब्रॅण्ड्सची खरेदी रीतसर होत आहे.. वरचे हे संवाद याचाच दाखला देतात. वाढत चाललेला इंटरनेटचा पसारा आणि मध्यमवर्गाच्या वाढलेल्या आकांक्षा यातून लक्झरी ब्रॅण्ड्सची नुसती ओळखच झाली नाही, तर ते आपल्यासाठीदेखील आहेत, याची जाणीव होत गेली. दिवाळीसारख्या निमित्ताने ही ब्रॅण्डेड खरेदी केली जातेय.

दिवाळीची खरेदी हा विषय दर वर्षीचा. दर वर्षी दिवाळीची तीच गर्दी, तरीही तोच उत्साह बाजारात दिसतो. गेल्या काही वर्षांत यामध्ये फरक झालाय तो खरेदीच्या बदलत्या स्वरूपाचा, सवयीचा, प्राधान्यक्रमाचा आणि आवडीनिवडीचा. दिवाळी बाजारावर निर्विवाद वर्चस्व दिसतंय ते तरुण पिढीचं. त्यामुळे अर्थातच ऑनलाइन शॉपिंगला बहर आलाय. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात बहुतेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर सवलतींचा धुमाकूळ सुरू होता. आता लक्झरी शॉपिंगसाठी ऑनलाइन साइट्स धुंडाळल्या जात आहेत. मोठी खरेदी, महत्त्वाची खरेदी आणि मिरवायला आवडेल अशी खरेदी दिवाळीत करायची अशी आपली सवय. ‘गरजेपुरती खरेदी’ ही संकल्पना जाऊन आता हौसेखातर खरेदी पचनी पडली आहे. हौसेला मोल नसतं, हेदेखील आपल्याला चांगलंच माहिती असल्याने आता अशा मौल्यवान खरेदीकडे लोकांचा कल वाढतोय.

भारतीय बाजारपेठेत लक्झरी शॉपिंगची वाढ  वेगाने होते आहे.  सध्या या लक्झरी मार्केटची भारतातली उलाढाल १८ अब्ज डॉलरच्या पुढे गेलेली आहे आणि ती चार वर्षांत ५० अब्ज डॉलपर्यंत पोचणार आहे, असा अहवाल नुकताच ‘अ‍ॅसोचेम’ने सादर केलाय. ही झाली आकडेवारी. प्रत्यक्षात कुठल्याही मोठय़ा मॉलमधील लक्झरी शोरूममधील वर्दळीवरून या ब्रॅण्ड्सची तरुणाईला पडलेली भुरळ दिसून येते. मुंबई- पुण्यात अनेक लक्झरी ब्रॅण्ड आपापली स्टोअर्स थाटत आहेत.  या स्टोअरमध्ये खरेदी किती होते हा मुद्दा नाही, पण तिथे तरुणाई रेंगाळते नक्की आणि आपल्या ड्रीम शॉपिंगच्या यादीत या ब्रॅण्डला स्थान देते. वाढलेला आंतरराष्ट्रीय प्रवास आणि विदेशातील खरेदी यातून तरुणाईला विदेशी लक्झरी ब्रॅण्डची ओळख होते. त्यातून परवडणारा ब्रॅण्ड असेल तर ब्रॅण्ड लॉयल्टी वाढत जाते. मग तो स्टेटस सिम्बॉल बनतो. दिवाळीच्या खरेदीमध्ये लक्झरी शॉपिंग वाढतेय ते यामुळे.

लक्झरीची क्रेझ

गेल्याच आठवडय़ात ‘स्वॉच’नं आपलं पहिलं कॉर्पोरेट स्टोअर मुंबईत सुरू केलं.अभिनेत्री राधिका आपटे हिच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. स्वॉच, टॉमी हिलफिगर, कॅलव्हिन क्लाइन, राल्फ लोरेन, नाइकी, बर्बरी, ख्रिश्चन डिओर, अदिदास, बेनेटन, झारा अशी काही नावं तर घरात आलेली आहेतच आणि आता त्यांची ‘ब्रॅण्ड लॉयल्टी’वाढत आहे. डोल्चे गबाना, फेरगामो, व्हर्साचे हे ब्रॅण्डही भारतात येऊ घातले आहेत. प्रादा, अरमानी, लुई व्हिटॉन, शनेल, गुची हे मध्यमवर्गीय तरुणींच्या ‘ड्रीम शॉपिंग’च्या यादीत असलेले ब्रॅण्ड आहेत.

मिडल लेव्हल आणि प्रीओन्ड लक्झरी

लक्झरी शॉपिंग म्हणजे काही मोजक्या अतिश्रीमंतांची चैन. ते आपल्या खिशाला परवडू शकतच नाहीत, असा समज अगदी आत्तापर्यंत होता; पण सेलेब्रिटी किंवा सो सॉल्ड लब्धप्रतिष्ठित मंडळींनाही कधी ‘हायस्ट्रीट फॅशन’ ब्रॅण्डची भुरळ पडतेच आणि सामान्यांनाही परवडू शकतील असे नावाजलेले ब्रॅण्ड त्यांनाही हवे असतातच. यातूनच ‘मिडल लेव्हल लक्झरी ब्रॅण्ड’ ही संकल्पना आली. ऑनलाइन शॉपिंगमुळे या मधल्या फळीतले ब्रॅण्ड्स सामान्यांच्या आवाक्यात आले. ब्रिटनच्या युवराज्ञी केट मिडलटन यांनी मिरवलेला ‘अ‍ॅण्ड’ किंवा ‘झारा’चा ड्रेस आता आपल्या जवळच्या शॉपिंग मॉलमधून आपणही खरेदी करू शकतो, हा आत्मविश्वास हळूहळू लक्झरी शॉपिंगकडे वळवतो आहे तो असा. त्याबरोबर वापरलेल्या लक्झरी अ‍ॅक्सेसरीज विकत घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढतं आहे. प्रीओन्ड लक्झरी गुड्सची बाजारपेठदेखीलऑनलाइन शॉपिंगच्या बरोबरीने विस्तारते आहे. लुई व्हिटॉन, शनेल यांच्या हँडबॅग, फूटवेअर, गॉगलसारख्या अ‍ॅक्सेसरीज अशा शॉपिंग साइट्सवरूनच विकत घेणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. http://www.luxepolis.com, http://theluxurycloset.com/, http://www.labelcentric.comअशा वेबसाइट्सवर ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी-विक्री विनासायास होऊ लागल्याने त्याकडे ओढा वाढतो आहे.