११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या पाश्र्वभूमीवर ५० तरुणतरुणींना वेगाच्या आकर्षणाबद्दल आणि नियम मोडण्यातल्या तथाकथित थ्रीलबद्दल बोलतं केलं. या रिअॅलिटी चेकमध्ये बहुतांश तरुणाईनं केवळ पोलिसांनी पकडू नये म्हणून नियम पाळतो, असं मान्य केलं. ही मानसिकता म्हणजे जीवाशी खेळ आहे आणि ती बदलायलाच हवी.

या आठवडय़ात देशभर ‘रोड सेफ्टी वीक’ साजरा केला जातोय. रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरस्पीडिंग आणि वाहतुकीचे नियम मोडणं हे अपघातांचं प्रमुख कारण असतं. वेग हा तर तरुणाईशीच जोडलेला शब्द. वेगात थ्रील असतं हे मान्य. पण गाडी चालवताना हाच वेग जीवाशी येतो. बेदरकारपणे वाहन चालवण्यात तरुणच आघाडीवर असतात. या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर ५० तरुणतरुणींना त्यांच्या वेगाच्या आकर्षणाविषयी बोलतं केलं. वेगाविषयी आणि नियम पाळण्याविषयीच्या अचानक विचारलेल्या प्रश्नांना काही मुलांनी सावधपणाने तर काहींनी प्रामाणिकपणे उत्तरं दिली. वेगाचं आकर्षण तर आहेच, पण वाहतुकीचे नियम मोडण्यात धन्यता मानण्यात येतेय, हेदेखील काहींच्या उत्तरांवरून दिसलं. केवळ पोलिसांनी पकडू नये म्हणून सिग्नलला थांबतो, असं अनेकांनी बिनदिक्कतपणे मान्य केलं.

मुंबई, ठाणे, पुणे, वसई, कोल्हापूर, सोलापूर या शहरांतील तरुण- तरुणींना वेगानं गाडी चालवायला आवडते का, शहरातल्या रस्त्यावर ते शक्य आहे का, सिग्नल तोडण्यात थ्रील वाटतं का, काय स्पीडने गाडी चालवता असे प्रश्न अचानकपणे विचारले. बहुतेक तरुणांनी सिग्नल तोडण्यात थ्रील वाटत नाही, भीती वाटते, असं सांगितलं. पण बहुतेकांनी हवालदार नसेल तर सिग्नल पाळत नाही, हेदेखील कबूल केलं. विनापरवाना गाडी चालवणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. शक्यतो सकाळी आणि रात्रीच्या वेळी ट्रॅफिक हवालदार नसताना मुले सिग्नल पाळत नाहीत. दंड भरावा लागेल,  या भीतीने मुलं नियम पाळतात आणि ट्रॅफिक हवालदार असल्यावर गाडीचा वेगही कमी करतात, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईचा चारुहास शेळके म्हणाला, ‘‘मला १००- १२० च्या वेगाने दुचाकी चालवून बघायची आहे. आपल्या मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे हे शक्य होईल असं मला वाटत नाही. सिग्नल तोडणं यात थ्रील नाही, पण कधी कधी घाईच्या वेळी सिग्नल तोडला जातोच. काही महिन्यांपूर्वी आम्ही मित्र बाइकवरून ‘ट्रिप्सी’ जात होतो. हेल्मेट आणि लायसन्ससुद्धा नव्हतं. एका चौकात सिग्नलला चक्क ट्रॅफिक हवालदारालाच पुढचा रस्ता विचारला. त्याच वेळी लक्षात आलं आपण तिघे बसलोय बाईकवर. हवालदार पाठी यायच्या आत आम्ही धूम ठोकली.’’

पुण्याच्या गायत्री खैरनारला तिचे अनुभव विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘ मला ६०च्या वेगाने गाडी चालवून बघायची आहे. पुण्यात खूप दुचाकींची गर्दी जास्तच. मग कधी रस्ता मोकळा असतो, तेव्हा सिग्नल तोडावासा वाटतोच. एकदा मी आणि माझ्या दोन मैत्रिणी एकाच दुचाकीवरून जात असताना सिग्नलपाशी पोलीस हवालदार दिसले. पण ट्रॅफिकमधून आमच्यापर्यंत ते पोचेपर्यंत आम्ही गाडी पळवली. हे चुकीचं आहे खरं. पण त्या वेळी दंड वाचला म्हणून हुश्श वाटलं होतं.’ एका मुलानं तर नाव न सांगण्याच्या अटीवर – मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी वेगात गाडी चालवतो, असं सांगितलं.

मुंबईच्या श्रद्धा शिंदेला मात्र सिग्नल तोडण्यात काहीही थ्रीलिंग वाटत नाही. गिरीजा कालेकर म्हणते,  मुलांपेक्षा मुलीच गाडी व्यवस्थित आणि सुरक्षितपणे चालवतात. सायली वर्तक, सिद्धार्थ म्हात्रे. मोनिका पाटकर या मुलांनी मात्र वाहतुकीचे नियम नेहमीच पाळतो, असं सांगितलं. ‘कधी कधी घाईत नियम मोडले जातात, पण सुरक्षेचं पुरेपूर भान ठेवून मी गाडी चालवत असते आणि जर त्या दरम्यान वाहतूक पोलिसांनी अडवलं तर त्यांना सहकार्य करणं मी माझं कर्तव्य समजते’, असंही सायली म्हणाली.

नियम मोडण्यासाठी बनवले आहेत, हा अ‍ॅटिटय़ूड वाढत चालला आहे, असं या छोटय़ा सर्वेक्षणातून दिसलं. वाहतुकीचे नियम हे आपल्या भल्यासाठी आहेत. ते पाळण्यात आपलाच फायदा आहे. परदेशी शिस्तीचे गोडवे गाताना आपण आपल्या देशात मात्र कुठलाच नियम पाळण्यास राजी नसतो. उलट नियम तोडण्यात थ्रील वगैरे मानतो. ही मानसिकता बदलायलाच हवी. लोकहो, नियम मोडणारी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे कुणाला इम्प्रेस करण्यासाठी तर मुळीच वेगाने वाहन चालवू नका. ड्रायव्हिंगचा आनंद शांतपणे, नियम पाळून गाडी चालवण्यातूनही मिळतो. करू या ना प्रयत्न?

महाविद्यालयातील मुलांशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की, ही मुलं क्रेझ म्हणून वेगाने गाडी चालवतात. वेगात गाडी चालवली किंवा स्टंट्स केले की, मुली आकर्षित होतात असं त्यांना वाटतं. याबाबतीत मी मुलींचंच प्रबोधन केलं की, जो मुलगा स्वत:चा जीव धोक्यात घालू शकतो तो तुमचाही जीव धोक्यात घालू शकतो. तरुणाई स्वतची कॉलर ताठ करण्यासाठी हे स्टंट्स करते. हेल्मेट न वापरता गाडी चालवणं, ओव्हरस्पीडिंग  यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. भिवंडीला एका लग्न ठरलेल्या तरुणाच्या बाबतीत घडलेली घटना मला अजून स्मरणात आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी बाइक घेऊन तो बाहेर पडला आणि ओव्हरटेक करताना त्याचा अपघात झाला. ज्या घरातून वरात निघणार त्या घरातून त्याची अंत्ययात्रा निघाली. मी पालकांना असं आवाहन करते की, मुलांच्या हातात गाडी देण्यापूर्वी  पाल्याला वाहतुकीचे नियम समजावून सांगणं गरजेचं आहे. मानसशास्त्रानुसार मुलांना वेगाने गाडी चालविण्याची सवय लागली की, नंतर त्यावर संयम ठेवणं अवघड होतं. मी नवीन पिढीला असे आवाहन करू  इच्छिते की, तुम्ही ज्याप्रमाणे पर्यावरण आणि प्राण्यांविषयी जागरूकतेने काम करीत आहेत त्याचप्रमाणे  स्वत:च्या सुरक्षेविषयी जागरूक असलं पाहिजे.

डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, मुख्यालय (ठाणे)

viva@expressindia.com