प्री वेडिंग फोटोशूट हल्ली लग्नाच्या फोटो इतकंच कॉमन झालं आहे. वेगळ्या ठिकाणी जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करता येईलच असं नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट आवर्जून केलं जातंय. सोशल नेटवर्किंग साइट्सवरदेखील अशा प्री वेडिंग फोटोशूटचा बोलबाला आहे.

लग्न सोहळा म्हटला की भरजरी कपडे, डिझायनर दागिने, मेकअप, हेअरस्टाइल अशा काही गोष्टी आजकाल अगदी ‘मस्ट’ असतात. फोटोग्राफर हा सुद्धा आता त्या मस्ट कॅटेगरीमध्ये आलेला आहे. वेडिंग फोटोग्राफीसुद्धा हल्ली ‘कॅण्डिड’ लागते आणि त्याशिवाय लग्न जणू अपूर्णच वाटतं. संपूर्ण लग्न सोहळ्यातल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या दृश्यस्वरूपात साठवून ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं. या लग्नसोहळ्याच्या फोटोसोबत ट्रेण्डिंग गोष्ट म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट! साखरपुडा आणि लग्न या दरम्यान साधारण हे फोटोशूट केलं जातं. आताची जनरेशन इतकी अ‍ॅडव्हान्स आहे की, प्री-वेडिंग शूटची संकल्पना आपल्याकडे फारच लवकर आणि सहज रुजली आहे.

लग्नातले पारंपरिक कपडे आणि दागिने लेवून लग्नविधी आणि पाहुण्यांसोबतचे असे ठरलेले टिपिकल फोटो तर होतातच. याशिवाय वेगवेगळ्या कपडय़ांमध्ये, लुक्समधले फोटो काढायला प्रीवेडिंग फोटो शूट निमित्त असतं. एखाद्या निसर्गरम्य, रोमँटिक ठिकाणी जोडीने जाऊन हे खास शूट केलं जातं. दोघांकडचे कुटुंबीयही कधीकधी या फोटोशूटमध्ये समील होतात. पण या फोटोशूटमध्ये संपूर्ण फोकस हा त्या जोडप्यावरच असतो. वधूवरांची जर प्रेमाची गोष्ट असेल तर ती या फोटोशूटमधून उलगडली जाते. वधूवरांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे फोटोशूट केलं जातं. फोटोग्राफर या फोटोशूटसाठी नीट प्लॅनिंग करतात. वधूवरांचा वेळ घेऊन, खास लोकेशन ठरवली जातात. कपडे, अ‍ॅक्सेसरीज जाणीवपूर्वक निवडल्या जातात. अगदी कॅज्युअल वाटतील असे नैसर्गिक हावभाव या फोटोशूटच्या माध्यमातून टिपले जातात. लग्नात हवे तसे फोटो काढता येतातच असं नाही. ती कसर या प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून भरून काढली जाते.

शहराजवळची पण निसर्गाच्या सान्निध्यातली जागा प्रीवेडिंग शूटसाठी निवडण्याला तरुण जोडपी प्राधान्य देतात. पण एखाद्या कपलची लव्हस्टोरी शहराच्या गजबजाटात फुलली असेल आणि तीच छायाचित्रांच्या माध्यमातून मांडायची असेल तर मात्र शहराचीच पाश्र्वभूमी निवडली जाते. दक्षिण मुंबईचा रहदारीचा तरीही रोमँटिक असा मरीन ड्राइव्ह त्यासाठी अनेकांना आयडियल वाटतो.

यासंदर्भात फोटोग्राफर राजेश माने म्हणाले की,  ‘प्री वेडिंग फोटोशूटचं लोकेशन हे बजेटवर अवलंबून असतं. या लोकेशन्समध्ये लवासा, अ‍ॅम्बीव्हॅली पासून ते येऊरचं जंगल, वसईचा किल्ला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मढ, अलिबाग, नरीमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, दक्षिण मुंबईतल्या जुन्या वास्तूंचा परिसर, गोराई, डहाणू या ठिकाणांना पसंती दिली जाते. यापैकी एखाद-दोन ठिकाणांवर जाऊन फोटो शूट केलं जातं. वधूवरांशी बोलून त्यांचं ड्रेसिंग काय असावं, मेकअप कसा असावा याबद्दल ठरवलं जात. मेकअप जेवढा नॅचरल, स्कीन टोन सोबत जाणारा असेल तेवढा चांगला. कारण त्यात फोटो चांगले येतात. बऱ्याचदा ही लोकेशन्स निर्जन असतात. अशा वेळी सुरक्षेची काळजी आणि काही ठिकाणी आवश्यक असणारी परवानगी घेणं जरुरीचं असतं.’

अशा स्पेशल फोटो शूटचा खर्च साधारण २५,००० ते ४५,००० रुपयांपासून सुरु होतो आणि पुढे मागणीनुसार बजेट वाढत जातं. फोटो काढल्यानंतर एडिटिंगचंदेखील काम करावं लागतं. त्यामुळे फोटो अजून आकर्षक दिसतात. हे फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड  केले जातातच; त्यासोबत त्याचं अल्बम डिझाइनही केलं जातं. सॉफ्ट कॉपीज जरी देण्यात येत असल्या तरी काही निवडक फोटोंचा अल्बम केला जातो. तो अल्बम लग्नाच्या अल्बमसारखा अवजड नसतो. केवळ १० ते १५ पानांचा असतो. अल्बम प्रिंटींगमध्ये ग्लॉसी, मॅट, वेलवेट, लेदर, सिल्क प्रिंट, मेटॅलिक प्रिंट, प्रीमिअम प्रिंट, प्रीमिअम प्रो असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट आहेत. कव्हरसाठी कॅमियो, स्पार्कल, थ्रीडी, लेदर, वूड पॅड व इतर मटेरिअलमध्ये बनवले जातात.

फोटोग्राफर जगदीश ठाकूर म्हणाले, ‘फोटोग्राफरच्या वेबसाइट्समुळे, सोशल नेटवर्किंग साइटच्या वापरामुळे प्री वेडिंगचा ट्रेण्ड सगळीकडे पसरलाय. त्यामुळे ज्यांनी इतरांचे फोटो पाहिलेले असतात ते त्यातून त्यांना नेमकं काय हवं ते येऊन सांगतात. बजेटनुसार आम्ही त्यांना शूट सजेस्ट करतो.  फोटो शूटसाठी मग थीम ठरवली जाते किंवा काही प्रॉपर्टी – म्हणजे कधी कार किंवा स्पोर्ट्स बाईकचा वापर केला जातो. या प्रॉपर्टीची सोय करण्यात येते. कॉस्च्युम ठरवलं जातं.’ प्रीवेडिंग फोटोशूटमधील या फोटोंचा वापर डिजिटल निमंत्रण पत्रिकेत केला जातो. प्री वेडिंगचं व्हिडियो शुटींगदेखील केलं जातं आणि ते लग्नाच्या दिवशी मांडवात दाखवलं जातं. ‘प्री वेडिंग शूट आवर्जून करण्याचा ट्रेण्ड शहरातल्या तरुणतरुणींमध्ये दिसतो’, असं जगदीश ठाकूर सांगतात.

प्रत्यक्ष लग्नासाठी जितका खर्च केला जातो, तसाच फोटोग्राफीवर देखील हल्ली केला जातो. प्री वेडिंग, वेडिंग, रिसेप्शन, कॅण्डीड फोटोग्राफी असं पॅकेजच त्यासाठी असतं. लग्नसोहळ्याच्या रम्य आठवणी जपणं सर्वाना कायमच हवंहवंसं वाटतं. त्यातून चित्रपटांचा प्रभाव आणि ‘जिंदगी में एक बार..’ची हौस असा सगळा हा शूटिंगचा मामला आहे. हा खर्च पाहता भविष्यकाळात वधू-वर देशाबाहेर जाऊनदेखील प्री- वेडिंग फोटोशूट करु लागले तर आश्चर्य वाटू नये. त्यासोबतच सेल्फीला असणारी पसंती पाहता पुढे  सेल्फी काढूनच प्री वेडिंग शूट होणंही शक्य आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि स्किल्स वापरून नवनवीन ट्रेण्ड येत आहेत. त्यातून प्रेमळ आठवणींना आणखी अविस्मरणीय करण्यात येत आहे; जेणेकरून आठवणींच्या रुपातले हे क्षण पुन्हा पुन्हा उलगडून पाहता येतील. त्यामुळे प्रेमाचा साक्षीदार असणारा हा प्री वेडिंगचा अल्बम.. मुद्दाम निर्माण केलेली आठवण पण आयुष्यभर लक्षात ठेवायची साठवण म्हणून लोकप्रिय होत आहे.

प्रीवेडिंग शूटसाठी लोकप्रिय लोकेशन्स

  • वरळी सी लिंक
  • मरीन ड्राइव्ह
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
  • येऊरचं जंगल
  • कर्जतजवळचं चौक
  • पुण्याजवळ लवासा
  • पानशेत, सिंहगड
  • औरंगाबाद लेणी परिसर
  • वसईचा किल्ला
  • साताऱ्याचा अजिंक्यतारा