लग्नासाठी कपडय़ांची, दागिन्यांची तयारी तर होतेच, पण या सगळ्या तयारीतली कल्पक गोष्ट म्हणजे रुखवत! रुखवत ही संकल्पना दिवसेंदिवस बदलतेय आणि यातला महत्त्वाचा बदल म्हणजे रुखवताच्या सजावटीत केवळ नववधूच नव्हे तर वरदेखील सामील होतो आणि या दोघांच्या सहजीवनाचा कलात्मक प्रवास सुरू होण्याचं हे निमित्त ठरतं. रुखवत हा मग एक आठवणींचा ठेवाबनून जातो.

‘ती’च्या आयुष्यातला लग्न हा एक मोठा टप्पा आणि महत्त्वाचा बदल! झोपण्याच्या पांघरुणापासून ते ब्रश ठेवण्याच्या जागेपर्यंत आणि लाइटच्या बटणापासून ते हळदीच्या बरणीपर्यंत सगळंच तिच्यासाठी बदलून जातं. आधीच्या घरात सगळंच ‘तिचं’ असतं आणि आता मात्र काहीच तिचं.. तिच्या सवयीचं नसतं. तिच्याकडे तिचं ‘स्वत:चं’ असं काही असावं, सवयीचं काही तरी असावं आणि तिच्या संसाराला काही कमी पडू नये म्हणून मुलीसोबत संसारोपयोगी वस्तू देण्याची पद्धत रूढ झाली. ती देताना त्याचं प्रदर्शन करण्यासाठी रुखवत मांडण्याची पद्धत आली. ही रुखवताची पद्धत केवळ मराठी कुटुंबांमध्येच नव्हे तर इतर प्रांतांत, इतर धर्मातदेखील वेगवेगळ्या नावांनी आहे हे विशेष. पहिलं वर्षभर तरी नव्या नवरीला संसारोपयोगी काही विकत घ्यायला लागू नये एवढी सोय करून तिची पाठवणी करावी असा रिवाज त्यामागे आहे. काळ बदलला आणि मुलीच्या रुखवतावरच्या वस्तूही बदलल्या. आपली मुलगी कशी कलागुणसंपन्न आहे हे दाखवण्यासाठी मुलीने केलेली कलाकुसर रुखवत म्हणून यायला लागली. कालांतराने आई, बहीण, मैत्रीण, काकू, मावशी, आत्या, वहिनी, आत्याची नणंद, वहिनीची बहीण, आऊची काऊ अशा सगळ्यांनी केलेले कलाकुसरीचे नमुने मुलीच्या नावाने रुखवत सजवायला लागले. त्यात आइस्क्रीमच्या काडय़ांपासून बनवलेला महाल किंवा जहाज ते लोकरीचा पायमोजा एवढी व्हरायटी असायची. कृत्रिम फुलं, ‘फॅब्रिक पेंटिंग’ किंवा भरतकाम केलेली एखादी चादर अशा गोष्टी हमखास असायच्या. कुरडया, पापड, लोणची, मुरंबे यांसह वेगवेगळ्या रंगांचे लाडू, वडय़ा, सुकामेवा अशा गोष्टी रंगीबेरंगी बरण्यांमध्ये भरून ठेवल्या जायच्या. आता हे रुखवत प्रकरण पूर्ण बदलतंय.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
mahavikas aghadi marathi news, vanchit bahujan aghadi marathi news, mahavikas aghadi alliance with vanchit bahujan aghadi marathi news
मविआने ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात?

जसजशा मुली स्वतंत्र व्हायला लागल्या, स्वत:ची ओळख निर्माण करायला लागल्या तसतशी आपल्या मुलीचं कौतुक दाखवण्याची पद्धत बदलली. मुलीचे मेडल घातलेले, ट्रॉफी घेतलेले, मोठमोठय़ा सेलिब्रिटींसोबतचे फोटो, त्यांचं कोलाज, मुलीच्या भटकंतीचे फोटो, अल्बम मुलीच्या गुणांचं दर्शन घडवायला लागले आहेत. मुलीबद्दलचं प्रेम, कौतुक, तिच्या यशाचे टप्पे अभिमानाने रुखवताच्या कॅनव्हासवर ‘डिस्प्ले’ व्हायला लागले

रुखवत ही संकल्पना आता केवळ ‘मुलीकडची’ राहिलेली नाही. त्यावर अनेकदा प्री-वेडिंग फोटोशूटचे अल्बम हल्ली दिसू लागले आहेत. दोघांचे एकत्र फोटो, मुद्दाम काढून घेतलेले हे फोटो, सोबत दोघांनी एकमेकांच्या पसंतीने घेतलेल्या सजावटीच्या वस्तू रुखवताचं टेबल सजवायला लागल्या आहेत. दोघांच्या रिलेशनशिपचे पैलू दाखवणाऱ्या, दोघांच्या सामाईक आवडीच्या वस्तू, घरच्यांकडून आलेले शुभसंदेश, मेसेजेस अशा भावनिक गोष्टींचा रुखवतात समावेश व्हायला लागला. नवरा-नवरीच्या नात्याची प्रतीकं, मित्रमैत्रिणींकडून मिळालेल्या शुभेच्छा, नवऱ्यामुलीच्या आणि तिच्या घरच्यांच्या नात्याचे जपलेले काही क्षण, ते दाखवणाऱ्या काही वस्तू, तिची आवडती बाहुली, पहिल्या वाढदिवसाचा फ्रॉक अशा गोष्टीही हल्ली रुखवतावर आवर्जून मांडल्या जातात. मुलीच्या संसाराला काही कमी पडू नये यापेक्षाही तिला आपली उणीव जाणवू नये, सतत आठवण येऊ  नये यासाठी तिच्यासोबत आपल्या आठवणींचं गाठोडं देण्याचा हा ट्रेण्ड मुलींच्या भावनांना नक्कीच जपतोय आणि मुलींनाही तो आवडतोय. नवऱ्यामुलाचा आणि त्याच्या घरच्यांचाही यात समावेश असल्याने दोन्ही बाजूंकडून यात अ‍ॅटॅचमेंट असते. या अर्थाने ‘आठवणींचा ठेवा’ म्हणून रुखवत या संकल्पनेकडे सध्या पाहिलं जातंय. आपल्या आवडत्या वस्तू, व्यक्ती आणि त्यांच्या आठवणी यांच्यात रमणारी मुलगी हे मॉडिफाइड रुखवत स्वत:कडे कायम जपून ठेवेल, यात शंका नाही.