पहिल्या दिवशी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर भरकटलेली मुलगी, इथून आत्ताच परत जावं असं वाटण्याएवढी बावचळलेली होती. आज मात्र स्कॉटलंडनं मला आपलंसं केलंय असं तीच  सांगतेय.. फिजिओथेरपिस्ट संज्योतचा हा स्कॉटिश अनुभव..

प्रचंड गर्दी.. सतत माणसांची ये-जा .. धावाधाव .. विविध भाषांमध्ये सतत होणाऱ्या अनाऊन्समेंट्स .. आणि मी .. छोटीशी बॅग घेऊन एका लांबलचक, अंधाऱ्या भुयारी रस्त्यावरून धावत होते. प्रथमच भारताबाहेरचा विमानप्रवास.. तोही एकटीने. एखाद्या अत्यंत गजबजलेल्या शहरासारखा तो लखलखणारा लंडन हीथ्रो एअरपोर्ट. असंख्य विमानं जगभरातून उतरत होती आणि प्रत्येक मिनिटाला अनेक विमानं उड्डाण करत होती. या सगळ्या गजबजाटात मला स्कॉटलंडला घेऊन जाणारं विमान बघण्यात काही तरी चूक झाली आणि मी रस्ता पार चुकले. कुठल्या तरी दुसऱ्याच दिशेनं विमानतळावर जात राहिले. आपण चुकतोय हे कळलं; पण परत फिरण्याचा मार्गच दिसेना. कुणाला विचारावं, काय करावं काहीच सुचेना. फ्लाइट चुकण्याच्या भीतीने पाय थरथरले आणि क्षणभर डोळ्यासमोर अंधारीच आली. पट्कन पुन्हा घरचा रस्ता धरावा का, असा विचारही मनात आला. पण जाणार कसं? आई-बाबा डोळ्यासमोर दिसायला लागले आणि मग आपण कुठे आलो आहोत, असं वाटायला लागलं. आता जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीच मदत करणार नाही की काय, असाही विचार मनाला शिवून गेला. पण तेवढय़ात.. त्या विमानतळावर प्रेमळ शब्दात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने विचारलं, Madam, is there anything wrong? Have you lost your way? Which flight do you intend to take? Donlt be scared please tell me, I am here to help you’ अगदी देवदूत भेटल्यासारखं वाटलं मला तेव्हा. मग खात्री पटली, आपण एकटय़ा नाही. ही माणसं परकी असली, तरीही आपलीच आहेत!! मग मात्र अगदी सुरक्षितपणे योग्य त्या दरवाजापाशी मला त्या अधिकाऱ्याने स्वत: नेऊन बसविलं, पाणी दिलं आणि त्या क्षणापासून या देशानं मला आपलंसं केलंय.

गेली सात र्वष मी एडिनबराला (स्कॉटलंड) राहते आहे. हे शहर इतकं सुंदर, नयनरम्य आणि राजधानीचं ठिकाण असूनही इतकं शांत असेल अशी मला कल्पनाही नव्हती. इथे आल्यानंतर एक वर्ष मी ‘मास्टर ऑफ फिजिओथेरपी’चं शिक्षण घेतलं आणि इथेच स्थायिक झाले. नोकरीच्या निमित्ताने इथली हॉस्पिटल्स, डे-केअर सेंटर्सचा कारभार कसा चालतो हे खूप जवळून पाहता आलं. इकडची शिक्षणपद्धती वेगळी, प्रोटोकॉल्स वेगळे.. हे सर्व आत्मसात करताना बरेच कष्ट घ्यावे लागले. इथली अत्याधुनिक यंत्रणा, रिहॅबिलिटेशनसाठी उपलब्ध असणारी विविध प्रकारची यंत्रं पाहून अक्षरश: थक्क झाले. प्रत्येक रुग्णाची वेगळी गरज ओळखून त्याप्रमाणे एक्सरसाइज प्रोटोकॉल द्यावा लागतो. गरज पडल्यास योग्य अशी व्हीलचेअर किंवा क्रचेस पुरवणं हे सर्व हॉस्पिटल्समार्फत केलं जातं. इथे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हिस अर्थात ‘एनएचएस’तर्फे हे सगळं केलं जातं. अपंग, वृद्ध किंवा विशेष मुलं, लर्निग डिसेबिलिटी असणारी मुलं यांना बस, रेल्वे इत्यादी वाहनांमधून सोयीने प्रवास करता यावा, म्हणून प्रत्येक ठिकाणी लो फ्लोअर अ‍ॅक्सेस आहे. ते पाहून मला अतिशय आश्चर्य तर वाटलंच; पण समाधानही वाटलं. ९० वर्षांची वृद्धा एकटीने रोज बसमधून प्रवास करू शकते, हे मी प्रथमच इथे पाहिलं. वृद्ध, अपंग आणि गरोदर स्त्रियांसाठी राखीव जागा असतातच, पण चढलेला प्रवासी जागेवर सुरक्षित बसेपर्यंत ड्रायव्हर बस थांबवतो, हे मी प्रथमच अनुभवलं. ऑफिसच्या गर्दीच्या वेळेतही ही माणसं रांगेची शिस्त मोडत नाहीत, राखीव जागांवर कोणीही मुद्दाम हक्क सांगत नाही आणि सुट्टे पसे द्या म्हणून ड्रायव्हरशी वादही घालत नाहीत! लिहिलेल्या स्पष्ट सूचना फक्त तेवढय़ापुरत्या नसून त्या कटाक्षाने पाळल्या जातात. सहप्रवाशाचा कोणत्याही प्रकारे त्रास झाल्यास ड्रायव्हरकडे मोकळेपणाने तक्रार करता येते. हे सारं माझ्यासाठी खूपच नवीन होतं.

स्कॉटिश माणसं अत्यंत मोकळ्या आणि प्रेमळ स्वभावाची. शनिवार-रविवारी मित्रपरिवार, कुटुंबासोबत वेळ घालवणं हा सगळ्यांचा आवडता छंद. सहलीचे कार्यक्रम हवामान ठरवतं. इथे जवळजवळ रोज पाऊस पडतो. क्षणार्धात हवामान पालटतं. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसारच कार्यक्रम ठरविले जातात. स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल, असे दिवस अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे. त्यामुळे असे दिवस अगदी सण असल्यासारखे साजरे केले जातात. एडिनबरामधला निळाशार समुद्रकिनारा, बागा, मुलांना खेळण्यासाठी ठेवलेल्या राखीव जागा अगदी भुरळ पाडतात. निगुतीने राखण केलेल्या सार्वजनिक बागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी फक्त स्थानिक प्रशासनाची नसून प्रत्येकाची आहे हे समजूनच त्यांचा वापर केला जातो.

स्कॉटलंडमध्ये उत्तरेकडे प्रवास करताना जे सृष्टिसौंदर्य  पाहावयास मिळते, ते केवळ अवर्णनीय! दूर-दूपर्यंत पसरलेली मक्याची, राईची शेतं, मेंढय़ांचे कळप, प्रदूषणविरहित आल्हाददायक थंडगार हवा, स्वत:च्या मनातला आवाज ऐकू येईल अशी नीरव शांतता, चांदण्यांनी भरलेलं लखलखतं निळं आकाश आणि मावळतीच्या सूर्याबरोबर क्षितिजावर उमटणारे विविध रंग!! हे सारं पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं.

स्वप्नांच्या या देशात काही त्रुटीही आढळून येतात. ‘एनएचएस’ ही पूर्णपणे सरकारी यंत्रणा आहे. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा, औषधं आणि उपचार उपलब्ध असले तरीही डॉक्टर्स, नस्रेस यांची त्रुटी आहे. जवळच्या क्लिनिकमध्ये नाव-नोंदणी केल्याशिवाय डॉक्टरची भेट घेता येत नाही. स्पेशालिटी क्लिनिक्ससाठी तर (गायनॅकॉलॉजी, डर्मेटॉलॉजी, फिजिओथेरपी आदी) अनेक महिने वेटिंग लिस्ट असते. खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी नाही: परंतु तो खर्च इन्शुरन्सशिवाय सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा नाही. तरीही सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करतं. जास्तीत जास्त डे-केअर सेंटर्सची स्थापना करून नस्रेसना प्रथमोचाराचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक शहराची नगर पालिका कम्युनिटी थेरपिस्ट, सपोर्ट वर्कर्सची नेमणूक करून ‘एनएचएस’वरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करते. काही प्राथमिक औषधं वगळता बाकी कोणतीही औषधं डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे हाडांचे आजार प्रामुख्याने आढळून येतात. तसंच मुलं १८-१९ वर्षांची झाली की आई वडिलांपासून वेगळी राहतात. त्यामुळे एकटेपणा आणि त्यातून बिघडणारं मानसिक स्वास्थ्य हेही ऐकिवात आहे. तरीही मित्रपरिवार, छंद जोपासून प्रत्येक स्कॉटिश माणूस प्रसन्नपणे हसतो, येणाऱ्या-जाणाऱ्यांशी हसून खेळून बोलतो. अडचणीत असलेल्या माणसाला योग्य मार्गदर्शन करतो.

एडिनबरामध्ये भारतीय वस्ती तशी कमीच. पण तरीही दसरा-दिवाळीपासून गणेशोत्सवापर्यंत सर्व सण सगळे एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने साजरे करतात. प्रत्येक जण आपली संस्कृती जपत सण-समारंभात हिरिरीने सहभागी होतो. आपल्या देशापासून हजारो मल दूर राहून आपली परंपरा, संस्कृती आणि संस्कार यांच्याशी नाळ जोडून राहणाऱ्या या माणसांचं कौतुक तर वाटतंच; पण जेव्हा एखादी स्कॉटिश सून आपल्या मुलाबाळांसकट सासू आणि नवऱ्याचं अनुकरण करत गणपतीला भक्तिभावाने नमन करते, दिवाळीला सुरेखशी साडी नेसून दागिने मिरवते तेव्हा तिचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. आपल्या देशाचा सार्थ अभिमान वाटतो. जगातील सगळ्यात मोठा आर्ट फेस्टिवल – फ्रिंज एडिनबरामध्ये दर वर्षी साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यात जगभरातून अनेक होतकरू कलाकार आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी येथे येतात. जादूचे खेळ, विनोदवीर, गिटार-वायोलिनवादनकार यांचे प्रयोग पाहण्यासाठी जगभरातून जवळजवळ दहा-बारा लाख लोकांची एडिनबरामध्ये गर्दी जमते.

कधी कधी काळ्या ढगांनी आभाळ गच्च भरून आलं की मन अंतर्मुख होतं. आपली माणसं, मित्र-मत्रिणी, प्रियजनांच्या आठवणीने मन भरून जातं. कितीही उशीर झाला, तरीही एअरपोर्टच्या बाहेर आतुरतेने वाट पाहणारे आई-बाबा दिसतात, खूप महिन्यांनी भेट झाल्यावर कडकडून मिठी मारणारी बहीण आठवते, रात्री-अपरात्री कितीही उशिरा विमान आलं तरीही प्राण डोळ्यांत आणून वाट पाहणारं माझं सुरेख सासर आठवतं. आताच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे नियमित संभाषण शक्य असलं तरीही वाढदिवस, सणावारी प्रियजनांनी पाठवलेली भेटवस्तू मनाला सुखावून जाते. कितीही दूर असलो, तरीही प्रेमाच्या या अतूट धाग्यांनी आपण मातृभूमीशी जोडलेले आहोत ही भावना मनाला उभारी देते. प्रेमाची माणसं भेटल्यावर अत्यानंद तर होतोच; पण ‘आता काय बाई? परदेशाची हवा लागलेली दिसते!’ असे काही खवचट शेरेही कानावर पडतात. परदेशात राहून माणूस आपले संस्कार विसरतो त्याला आपल्या मायभूमीची, भाषेची कदर राहत नाही असं का बरं वाटतं? संस्कार म्हणजे ‘ठेविले अनंते तसेचि राहावे’ असं तर नक्कीच नाही! इथे राहून आपल्या राहणीमानात, वागण्या-बोलण्यात बदल होणं स्वाभाविक असतं आणि काही अंशी ते आवश्यकही असतं, हे मला या परदेश वास्तव्याने शिकविलं. या देशाने मला स्वावलंबन शिकविलं, शिस्त लावली, वैचारिक स्वातंत्र्य दिलं, दृष्टिकोनांची क्षितिजं रुंदावली..

..आणि म्हणूनच मुंबईला ‘बॉम्बे’ म्हटल्यावर जसं कानाला बोचतं तसं एडिनबराला एडिन्बर्ग, एडिन्बरो असे म्हटलं की आवर्जून सुधारावंसं वाटतं. कारण.. या शहराने मला आपलंसं केलं आहे.. आल्या दिवसापासून.. आपुलकीने, प्रेमाने.. संपूर्णपणे!

संज्योत देशमुख फडके

एडिन्बरा, यू.के.