या वर्षांच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्याच्या आधीच सेरेनाला आपण गरोदर असल्याचं कळलं होतं. असं असतानाही ती स्पर्धेत सहभागी झाली. एवढंच नव्हे तर ग्रँड स्लॅम जिंकून तिने आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मागील आठवडय़ात तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता सेरेना विल्यम्स आणि तिचा पती अ‍ॅलेक्सिस ओहानियनवर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. २३ ग्रँडस्लॅम आणि चार ऑलिम्पिक सुवर्णपदकांची मानकरी असणारी सेरेना आजवरची टेनिसमधील सर्वात प्रभावशाली महिला खेळाडू मानली जाते. खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील संघर्षांवर मात करून सेरेनाने बालवयापासून ते आत्तापर्यंत सर्व प्रकारच्या टेनिस कोर्टवर आणि स्पर्धामध्ये आपलं अधिराज्य गाजवलं आहे आणि यापुढेही गाजवत राहील असं दिसतंय, कारण आता पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार असल्याचे संकेत खुद्द सेरेनानेच दिले आहेत.

सेरेना आई झाल्याबद्दल तिला शुभेच्छा दिल्या जातायतच, पण तिला मुलगी झाली याबद्दल अधिक आनंद व्यक्त केला जातोय. कारण कदाचित त्या मुलीच्या रूपाने आणखी एक वादळ काही वर्षांनी टेनिस कोर्टवर पाहायला मिळेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलाय. म्हणूनच सोशल मीडियावर सेरेनाला शुभेच्छा देताना चाहत्यांनी अनेक तर्क-वितर्क लढविले आहेत. सेरेनाचं बाळ गर्भाशयात टेनिस खेळत असल्याचे फोटो एका चाहतीने पोस्ट केले होते. तर एकाने मुलीचं स्वागत करताना म्हटलं आहे की, सेरेनाने आजच आपल्या मुलीला जन्म दिलाय आणि ती टेनिसच्या जागतिक क्रमवारीत ९८ व्या स्थानावर आहे. एका महान टेनिसपटूच्या पोटी मुलीने जन्म घेतलाय, त्यामुळे आणखीन एका कणखर आणि लढाऊ  महिलेचं या भूतलावर आगमन झाल्याचंही म्हटलं गेलंय.

आई होणं हा कुठल्याही महिलेल्या आयुष्यातील परमोच्च आनंदबिंदू असतो. मग ती कुणी सामान्य महिला असो किंवा एखादी सेलिब्रिटी. कारण मातृत्वाला कोणतीही लेबलं लागू होत नाहीत. गेल्या काही वर्षांत जगभरात महिला सक्षमीकरणाच्या चर्चेलाच नाही तर प्रत्यक्ष कृतीलाही उभारी मिळाली आहे. त्यामुळे पूर्वी टॅबू मानल्या जाणाऱ्या गोष्टींकडे अलीकडे मोकळेपणाने पाहिलं जाऊ  लागलंय. म्हणूनच की काय अलीकडच्या काळात ‘बेबी बम्प’ फोटोशूटचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. सेलिब्रिटींपर्यंत मर्यादित असलेली ही गोष्ट आता जनसामान्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात रुळताना दिसत आहे. त्यातही ‘बेबी बम्प’सह ‘न्यूड फोटोशूट’ करून एक नवा विचार रुजविण्याचा प्रयत्न सेलिब्रिटी करताना दिसताहेत. गर्भवती असताना बाळाच्या वाढीनुसार वाढणारा पोटाचा आकार चिंतेचं, लज्जेचं आणि संकोचाचं कारण नसून ते आनंदाचं आणि अभिमानाचं कारण असल्याचा संदेश या फोटोशूटच्या माध्यमातून देण्याचा या सेलिब्रिटींचा प्रयत्न असल्याचं समोर आलंय. त्याचप्रमाणे बाळाला जन्म दिल्यानंतरही पुढे यशाची क्षितिजं गाठता येतात हा संदेशही. अनेक महिलांनी ती गाठल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. या विचारांचं पहिलं बीज पेरलं ते अमेरिकन अभिनेत्री डेमी मूर हिनं १९९१ साली. डेमीने त्या फोटोशूटनंतर स्काऊट नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर ब्रिटनी स्पिअर्स, मिरांडा केर, जेसिका सिम्पसन, मोनिका बेलुची यांनी हे धाडस केलं. अगदी अलीकडेच भारतीय अभिनेत्री सेलिना जेटली हिनेदेखील एका विशिष्ट संदेशासह ‘बेबी बम्प’चा फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केला आहे. या ग्लॅमरस अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात वेगळी ठरली आहे ती म्हणजे सेरेना. कारण अशा प्रकारचं फोटोशूट करणारी ती पहिलीच खेळाडू आहे. मुख्य म्हणजे मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच टेनिस कोर्टवर उतरण्याचा निर्धार तिने व्यक्त केल्याने सर्वाचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर सेरेना म्हणाली होती की, ‘‘दोन आठवडय़ांची गर्भवती असतानासुद्धा कोर्टवर खेळताना अतिउच्च तापमानातही माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाने मला कसलाच त्रास झाला दिला नव्हता. त्यामुळे ती मुलगीच असणार. शेवटी मुलीच या कणखर असतात.’’ सेरेनाचं हे भाकीत किंवा इच्छाशक्ती म्हणा हवं तर, पण ती आज खरी ठरली आहे. कदाचित हीच इच्छाशक्ती तिला आगामी स्पर्धेत खेळायला बळ आणि स्फूर्ती देईल.

भारताच्या दोन फुलराण्या आणि क्रिकेट महिला संघ अलीकडच्या काळात आपल्या कृतीतून बरंच काही सांगून गेला आहे. तरीही ‘मुली वाचवा, मुली वाढवा’, असं अभियान राबवण्याची आवश्यकता भासत असलेल्या या काळात यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे आनंदाने म्हणा.. ‘मुलगी झाली हो..’

viva@expressindia.com