कोणत्याही मालिकेचा, सिनेमाचा, पुरस्कार सोहळ्याविषयीची उत्सुकता वाढवणारी गोष्ट म्हणजे प्रोमो. त्याचंच डिझाइन करणारा कल्लाकार आहे, अमोल पाठारे.

एखादा कार्यक्रम पाहायचा की नाही, हे आपण त्याची एक झलक पाहून ठरवतो. तीच झलक देतो, प्रोमो. अवघ्या ३० सेकंदांत आपल्याला त्या मालिकेतील किंवा कार्यक्रमातील किंवा विशिष्ट भागातील खास गोष्टी हा प्रोमोच आपल्याला दाखवत असतो. त्यामुळेच त्याचं डिझायनिंग हे खास असतं. आजचा कल्लाकार याच क्षेत्रात काम करतो. ‘झी युवा’ आणि ‘झी टॉकीज’चा प्रोमो हेड अमोल पाठारे आजचा कल्लाकार आहे.

Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
prasad oak wife manjiri dance on gulabi sadi
ना गुलाबी रंगाचा ड्रेस, ना साडी; बायको मंजिरीचा डान्स पाहून प्रसाद ओक म्हणतो…; मजेशीर व्हिडीओ व्हायरल
What is a virtual card How does it work
Money Mantra : व्हर्च्युअल कार्ड काय असतं? ते कसं काम करतं?
IPL 2024 Rohit Sharma Celebrating Holi With Wife and Daughter Shared Video on Instagram
IPL 2024: लहान मुलांची पिचकारी, जमिनीवर साचलेल्या पाण्यात डान्स अन् बरंच काही… रोहित शर्माचा रंगपंचमीचा भन्नाट व्हिडिओ पाहिला का?

‘‘प्रोमो करताना मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळता येतात. कधी कॉमेडी, कधी हॉरर तर कधी पौराणिक विषय हाताळता येतात. एखादा सिनेमा करायला घेतला तर कमीतकमी ४-६ महिने त्याच जॉनरमध्ये खेळावं लागतं. प्रोमोजमध्ये खूप कमी वेळात जास्त प्रकार हाताळता येतात, त्यामुळे मजा येते.’’ अमोल पाठारेचं हे मतच या लेखाचा जणू प्रोमो आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण सिनेमा जाणून घ्यायलाच हवा.

अमोलला दहावीपर्यंत वाटायचं की, कला क्षेत्रात काहीतरी करावं. घरात तसं वातावरणही होतं. त्याची आई जेजेमधली. तिची चित्रकला चांगली, तशीच अमोल आणि त्याच्या बहिणीचीही. दहावीला चांगले गुण मिळाल्यावर अमोलने ज्ञानसाधना कॉलेजला प्रवेश घेतला. विज्ञान शाखेतल्या या अभ्यासापेक्षाही त्याचं मन रमलं ते नाटकांमध्ये. त्याला अभिनेता व्हायचं होतं. बारावीनंतर त्याने रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला आणि मग नाटकाची कास सोडली नाही. कॉलेजातला नाटकाचा ग्रूप, अविष्कार, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धात सहभागी होता होताच त्याने प्राणीशास्त्राची पदवी घेतली.

दरम्यान त्याच्या व्यावसायिक नाटकांच्या कामाचा श्रीगणेशा झाला. त्याने ‘यदा कदाचित’, ‘लोच्या झाला रे’, ‘गंगूबाई मॅट्रिक’ आदी लोकप्रिय नाटकांत अभिनय केला. नाटक सुरू असताना त्याला प्रियदर्शन जाधवनं नाटक बसवण्यासाठी विचारणा केली. ते करता करताच ‘वर्ल्ड स्पेस रेडिओ’साठी आरजे म्हणून त्याची निवड झाली. तिथे त्याने ३ वर्ष काम केलं. त्याच्या ‘आता ग बया’ या  रेडिओ डॉक्युमेंट्रीला रापा पुरस्कार मिळाला. दरम्यान त्याने एक बातमी वाचली. त्यात असं होतं की, पाच वर्षांच्या मुलानं लघुपट केला होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.  त्यासुमारासच त्याच्या एका मित्राने चेन्नईच्या गोथे इन्स्टिटय़ूटच्या लघुपट महोत्सवाविषयी सांगितलं. लघुपटासाठी वेळ होता फक्त एक मिनिटाचा. ते आव्हान स्वीकारत सहज म्हणून त्यांनी तयार केलेला लघुपट ‘पॉवर ऑफ लँग्वेज’ हा चक्क भारतभरातून पहिला आला. त्यासाठी पुरस्कार म्हणून बर्लिन महोत्सवात सामील होता येणार होतं. शिवाय जर्मनीतल्या इन्स्टिटय़ूटमध्ये महिनाभर जर्मन भाषेचा अभ्यासक्रम करता येणार होता.

या अनुभवाबद्दल अमोल  म्हणतो, माझ्या करिअरमधले ते सोनेरी क्षण होते. त्यानंतर दिग्दर्शनाची किक् लागली. रेडिओपेक्षा दृश्य माध्यमात काम करावं, असं वाटू लागलं.

‘लहरे’ या हिंदी वाहिनीत असोसिएट प्रोमो प्रोडय़ुसर मग ‘मी मराठी’मध्ये आणि नंतर ‘झी मराठी’मध्ये त्याने साडेपाच वर्ष काम केलं. या काळात त्याने ‘जय मल्हार’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘होणार सून मी या घरची’, ‘झी मराठीचं ब्रँड साँग’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांचं लाँचिंग केलं. ‘सारेगमप’, ‘फू बाई फू’, ‘डब्बा गुल’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे कथाबाह्य़ कार्यक्रम आणि ‘काकस्पर्श’, ‘मी सिंधूताई सपकाळ’ यांसारख्या सिनेमांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लाँच केले. अमोलने या कामाचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. कधी कुणाला साहाय्यक म्हणूनही काम केलेलं नाही. फक्त सिनेमे बघून ते शिकला आहे.

आपल्याला याच क्षेत्रात गती आहे, हे कळल्यावर अमोलने मनात पक्कं केलं की, केलाच तर सिनेमा करेन नाहीतर जाहिरात करेन. थेट सिनेमा करण्याची संधी नव्या दिग्दर्शकाला लगेच मिळेल असं नाही. जाहिरात क्षेत्रातली लॉबी पाहता, तिथेही पोहोचणं त्याला कठीणच वाटलं. मग तुलनेत वाहिनीचा पर्याय चांगला होता. साहाय्यक दिग्दर्शक होण्याचा पर्यायही होता, पण अमोलला ते नको होतं. त्याला प्रोमो करण्यात रस होता. तो म्हणतो, ‘‘प्रोमो म्हणजे अवघ्या ३० सेकंदांत कथेची जाहिरात करणं. काही मोजक्या ओळींमध्ये कथा सांगायची असते. यातून लोकांची उत्कंठा वाढवणं, त्यांना मालिका किंवा तो कार्यक्रम बघण्यास प्रवृत्त करणं, हे काम प्रोमो करतो. पकड घेणारं कथानक, उत्तम संवाद, अघळपघळपणा नसणं, या गोष्टी माझ्यापाशी होत्याच. त्यामुळे प्रोमो करण्यात मला जास्त रस वाटला. शिवाय माझा पिंड मैदानात उतरून काम करण्याचा आहे, त्यामुळे मला हे काम जास्त आवडतं.’’ झी मराठीनंतर त्याने सोनी टीव्ही, कलर्स मराठीतही काम केलं होतं. हिंदी आणि मराठी वाहिन्यांतील फरकाविषयी तो म्हणतो, हिंदूीत पैसा आणि स्केल मोठं आहे. पण मराठीत छान आशय आहे. तो म्हणतो, ‘‘मी चॅनलचंच काम करत असलो तरी भारतीय चॅनल मी विशेष पाहत नाही. आपल्याकडचा फार कमी आशय मला भावतो. खरंतर या माध्यमात खूप ताकद आहे. पण अजूनही अनेक मालिका सासू-सुन याच विषयात अडकून पडलेल्या असतात. मी ‘झी युवा’ आणि ‘झी टॉकीज’साठी प्रोमो हेड म्हणून काम करतो आहे. यातून वेगळ्या पद्धतीचा आशय समोर आणतो आहोत.’’

प्रोमो बनवण्याच्या पद्धतीविषयी तो म्हणतो, ‘‘मालिकेची गोष्ट काय, ती कोणत्या पद्धतीने सादर करायची आहे, हे ठरवावं लागतं. उदा. जय मल्हारच्या लाँचिंगमध्ये आम्ही खंडोबाला सुपरहिरो म्हणून रेखाटलं. त्यातला भव्यदिव्यपणा दाखवला. मुलांना जे आवडतं ते जास्त हिट होतं, असा माझा अनुभव आहे. ‘दिल दोस्ती..’ आणि ‘जय मल्हार’चं टायटल माँटाज मुलांना आवडणारं होतं. ‘जय मल्हार’च्या शीर्षकगीताला तर ‘प्रोमॅक्स गोल्ड’चा पुरस्कारही मिळाला. कुठल्याही गोष्टीतले कोणते मुद्दे ठसवायचे आहेत, ते त्या त्या गोष्टीनुसार, मालिकेनुसार ठरतं. उदा. ‘रुद्रम’ मालिकेत सगळे कलाकार एवढे तगडे आहेत की नुसते चेहरे दाखवले तरी लोक मालिका बघतील. तर गर्ल्स हॉस्टेल या मालिकेतील थरार आम्हाला टिकवायचा होता. तो बिभत्स बनवायचा नव्हता. कारण लोक असं काही पाहिल्यावर चॅनल बदलतात. म्हणून मग टायटल माँटाजमध्ये भूत दिसलं पण सावली, ओरखडे, डोळे यांतूनच. ‘जिंदगी नॉट आऊट’च्या शीर्षकगीतासाठी खूप कमी वेळ हातात होता. शेवटच्या क्षणी कल्पना सुचली की, ही शेवटच्या बॉलची गोष्ट आहे, ती स्लो मोशनमध्ये फँटम कॅमेऱ्याने शूट केली. ही कल्पना सुचण्याचा क्षण म्हणजे ‘युरेका’ होता.’’

अमोलच्या कामाचं अनेक मोठय़ा कलावंतांनीही कौतुक केलं आहे. त्याच्या प्रोमोजना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. झी नेटवर्कच्या जगभरातील कंपन्यांमधून एसीई या ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी दीडशे परफॉर्मर्स निवडले जातात. त्यात त्याची निवड झाली होती. सध्या अमोलसोबत १४ जणांची टीम काम करते. लोकांकडून उत्तम काम काढून घ्यायचं हे आव्हानही अमोलने छान पेललंय. त्याला आव्हानं पेलायला कायमच आवडतं. म्हणूनच पहिल्या लघुपटाच्या वेळी ऐनवेळी मित्राने माघार घेतली असतानाही, अमोलने जिद्दीने तो लघुपट पूर्ण करून दाखवला. अमोलला यापुढे चित्रपटांकडेही वळायचं आहे. शिवाय कामाच्या गडबडीत नाटक मागे राहून गेलंय, याचंही दुख त्याला आहे. तो म्हणतो, ‘‘मी आजवर केलेल्या कामाचा पाया नाटकच आहे. प्रोमोसाठी काम करताना वापरत असलेले अनेक फंडे नाटकानेच दिलेत. दीपक राजाध्यक्ष, चेतन दातार, प्रियदर्शन जाधव आदींकडून मला खूप शिकायला मिळालं. रुपारेलमधल्या नाटकांनी माझा दृष्टिकोन व्यापक केला. कुठेही बिनधास्त पाय रोवून उभं राहायचा आत्मविश्वास आणि ऊर्जा नाटकाने दिली. ’’ अमोलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याच्या करिअरचा प्रोमोच नव्हे तर पूर्ण सिनेमाच दमदार होवो, या सदिच्छा!

राधिका  कुंटे