आत्ताच एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. संगमनेरच्या सुनील सातपुते यांनी काढलेलं स्केच होतं ते की, ‘खुशाली विचारायचा काळ गेला बाबांनो.. माणूस ऑनलाइन दिसला की समजायचं सर्व काही ठीक आहे. परमेश्वर सर्वाना ऑनलाइन ठेवो’, असं एक मध्यमवयीन माणूस म्हणतो आहे असं त्यात दाखवलं होतं. आता हे ऑनलाइन आणि अ‍ॅपडेटेड आयुष्य आपण कसं आणि किती स्वीकारतो आहोत, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. खरं तर आधुनिक तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. त्याला तिसरा हात संबोधण्यापर्यंत त्याचा बोलबाला झाला आहे. मात्र एकंदरीतच ही अ‍ॅप्स म्हणजे तरुणाईच्या विशेषत: मुलींच्या हातातील शस्त्रं झाली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते. यानिमित्ताने, सतत ‘अ‍ॅप’डेट राहणाऱ्या मुलींच्या ऑनलाइन भात्यातील ही शस्त्रं आणि त्यांचा वापर त्या कशा करतात याचा हा गमतीदार आढावा..

आपल्या बऱ्याच गोष्टी स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. साधी वाढदिवसाची गोष्ट घेतली तर अनेकांना इतरांच्या वाढदिवसाच्या तारखा लक्षात राहत नाहीत. त्या ‘फेसबुक ’वर चटकन नोटिफाय होतात. त्यामुळे फेसबुक हे यातलं महत्त्वाचं शस्त्र आहे. आपण कुठेही हॉटेलिंग किंवा बाहेरगावी गेलो तर लोकेशन अपडेट केलं जातं फेसबुक वर. आणि फोटो मग ते फेसबुकच्या साथीने इन्स्टाग्रामवर किंवा स्नॅपचॅटवर फोटो शेअर केले जातात. अलीकडे फिटनेसविषयीची जागरूकता वाढते आहे. त्याचं प्रतिबिंब ‘फिटनेस बॅण्ड’सारख्या गॅझेटमध्ये किंवा ‘हेल्दीफाय’सारख्या हेल्थ अ‍ॅप्समधून दिसतं. अगदी ‘वॉटर रिमाइंडर’पासून ते ‘डाएट फंडय़ा’पर्यंतच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि त्याआधी त्या लक्षात ठेवण्यासाठी या अ‍ॅपरूपी शस्त्रांचा वापर केला जातो. अनेक जणी ‘माया’ किंवा ‘माय पीरिअड अ‍ॅप’, ‘माय पीरिअड ट्रॅकर’ अशा अ‍ॅप्सच्या साहाय्याने मासिक पाळीची नोंद ठेवतात. खाण्यासाठी वाटेल ते असं कितीही म्हटलं तरी ‘झोमॅटो’सारख्याअ‍ॅप्सवर बऱ्यावाईट रेटिंगचं सजेशन वाचल्याशिवाय खायचं कुठे हे नक्की केलं जात नाही. खवय्यांना घरीच काही करून पाहायचं झालं तर अनेक प्रकारची ‘रेसिपी अ‍ॅप्स’ दिमतीला असतातच. ‘एम इंडिकेटर’मध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध सोयी-सुविधा असोत, मनोरंजनासाठी ‘बुक माय शो’ असा सगळ्याचा पुरेपूर वापर केला जातो.

‘व्हॉटस्अ‍ॅप’, ‘फेसबुक मेसेंजर’ आदी समाज आणि संवादमाध्यमं सर्रासपणे वापरली जातात. तेच महत्त्व ‘ट्विटर’ आणि ‘न्यूजहंट’चं आहे. जगभरातील घडामोडींचं मॅगझीन असल्यासारखा त्याचा उपयोग करून घेतला जातो. तर आपल्याला कॉल करणारं कोणी अनोळखी तर नसेल ना, यासाठी सावध राहावं म्हणून ‘ट्रू कॉलर’ मस्ट झालं आहे. ‘युसी ब्राऊ झर’, ‘गुगल प्ले म्युझिक ’ असेल नाही तर ‘कॅण्डी क्रश’ किंवा ‘क्लॅश ऑफ क्लोन्स’ ही गेम्सची अ‍ॅप्स मनोरंजनासाठी आहेतच. एवढंच नाही तर ट्रेनच्या प्रवासात आजूबाजूचीला घेऊन मोबाइलवर ‘ल्युडो’ खेळत वेळ घालवणंही पथ्यावर पडतं आहे. ब्लूटूथवर काट मारत ‘शेअर इट’ हमखास वापरलं जातं, तर ‘एक्सझेंडर’, ‘आयमो’ किंवा फाइल शेअरिंगच्या सुविधांचा वापर केला जातो. ‘व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग’ आवडीचं ठरतं, तर ‘माय जिओ टीव्ही’ किंवा ‘हॉटस्टार’, ‘यूटय़ूब’ मोबाइलवर नसणं म्हणजे घोर पाप मानलं जातं. ‘ओला-उबेर’, ‘पेटीएम’ ही व्यावहारिक अ‍ॅप्स असणं ही गरज आहे.

स्मार्टफोन दिवसेंदिवस अधिकाधिक पर्सन्लाइज्ड होत आहेत. निकडीची वस्तू ठरल्याने असेल, पण त्यांची सुरक्षा आणि खासगीपण जपण्यासाठी पॅटर्न किंवा कोड लॉक, फिंगर टच लॉक वगैरे पर्यायांचा वापर केला जातो. ‘नाइट मोड’चा वापर अनेक जण करतात. अनेक अ‍ॅप्स डाऊ नलोड करताना नेटपॅक किंवा वायफायच्या सुविधेपेक्षा त्यात किती फोन मेमरी खर्ची पडेल यावर सजगतेनं विचार केला जातो. उदाहरणार्थ, ‘अमेझॉन’ किंवा ‘फ्लिपकार्ट’सारखी ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्स केवळ सेलच्या वेळी डाऊ नलोड केली जातात आणि नंतर अनइन्स्टॉल केली जातात.

आपल्या दैनंदिन आयुष्यातली जवळपास प्रत्येक गोष्ट कव्हर करणारी अ‍ॅपरूपी शस्त्रं आहेत. काही वेळा या सगळ्यापासून दूर व्हायचा, तटस्थ राहायचा विचार मनात येतोही.. कधी कधी यातल्या काही अ‍ॅप्ससाठी भविष्यात पैसे मोजावे लागतील असं काही कानावर पडलं की नेहमीच्या व्यावहारिक मनाने ते लगेच अनइन्स्टॉल करायचाही विचार केला जातो. डिजिटल माध्यमाचा उपासही प्रसंगी केला जातो. पण सरतेशेवटी हात स्मार्टपणे अ‍ॅप्स ऑपरेट करतातच. नाइलाज को इलाज क्या.. असं म्हणत नुसतं त्यांना आपलंसं न करता आपल्या भात्यातील शस्त्रांप्रमाणे त्यांचा अचूक आणि अगदी सहजतेने वापर केला जातो आहे.

viva@expressindia.com