गणेशाचे घरातले आगमन आणि सोशल मीडियावरचे आगमन अशा दोन पातळ्यांवर आजची पिढी त्याच्या स्वागताचा सोहळा साजरा करण्यात दंग असते. डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य घटक बनला आहे की दैनंदिन व्यवहारच नव्हे तर आयुष्यातील सगळ्या सुखदु:खाच्या घटना, सणवार यांनाही त्या प्रवाहात आपण ओढून घेतलं आहे. याला गणेशोत्सवही अपवाद नाही. सोशल मीडियावर गणेशोत्सवाचा सगळा तामझाम टाकताना या उत्सवामागची भावना लक्षात घेऊन तो साजरा करण्यापेक्षा त्याचा आभासी उत्सव साजरा करण्यातच प्रत्येकजण रमला आहे..

आपल्यापैकी बरेचजण फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर सतत काही ना काही पोस्ट करत असतो. गणेशोत्सवात भर पडते ती म्हणजे गणपतीशी संबंधित हरएक पोस्टची. या पोस्ट कोणत्याही प्रकारच्या असतात. अगदी गणपतीच्या मूर्तीची सजावट किंवा मखर करताना हॅश टॅग टाकून ‘फेस्टिव्हल स्टार्टेड’चा गजर सुरू होतो तिथपासून मग सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यात हजेरी लावत फेसबुक लाईव्हला जाऊ न गणपतीचा जयजयकार करणं असो किंवा ‘सेल्फी विथ गणपती’ असं टाकून आपला फोटो पोस्ट करणं असो किंवा विसर्जनाच्या वेळेस ‘गणपती चालले गावाला’ असं रडक्या इमोजीचा स्पेशल इफेक्ट सोशल मीडियावर टाकून प्रत्यक्षात मात्र मिरवणूकीत जोरदार नाचणं असो..  हा आभासी सोहळा गणेशोत्सवातील अकराही दिवस सुरूच राहतो.

या सगळ्या धडाधड पोस्टचा पाऊस पडण्यामागचं कारण स्पष्ट करताना स्वत:ची यूटय़ूब वाहिनी असणारे पराग सावंत हे या गणरायाच्या उत्सवाचं मूळ स्वरूपच कमालीचं बदलत चाललं असल्याचं सांगतात. ‘मुळात म्हणजे आपण तांत्रिकदृष्टय़ा एवढे प्रगत आहोत तरीही आपल्याकडे तंत्रज्ञानाचा योग्य वापर होत नाही. सोशल मीडियाचा मूळ उद्देश आपली संस्कृती जगभर पसरवणं हा आहे. आणि कुठेतरी हा उद्देश सफल होताना दिसत नाही. पूर्वी देखाव्यांमधून जी चलत्चित्रं साकारली जायची त्यातून निदान सामाजिक संदेश लोकोंपर्यंत पोहोचायचा तोही आता पोहोचताना जाणवत नाही. आता सोशल मीडियावर विविध फोटोग्राफी व इतर स्पर्धादेखील घेतल्या जातात, परंतु त्यामधून काही सामाजिक संदेश पोहोचताना दिसत नाही. गणेशोत्सवाचं बाजारीकरण झालेलं दिसून येतं. माझ स्वत:चं यूटय़ूब चॅनेल आहे. साधारण पाद्यपूजन, आगमन सोहळा हे जेव्हापासून सुरु झालंय तेव्हापासून मी गणपतीचं शूट करतोय, परंतु दिंडी किंवा वारीमध्ये भाविकांच्या चेहऱ्यावर जे वेगळेपण, देवाचं दर्शन झाल्याचं समाधान दिसून येतं ते वेगळेपण कुठेही आगमन सोहोळ्यातील मिरवणूकीत जाणवत नाही. मी जेव्हा एखादा व्हिडीओ बनवतो त्यावेळेस त्यातून काहीतरी सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी मी निश्चितच घेतो’, असं ते सांगतात.  ‘मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नसते तरीही लोक सेल्फी काढून पोस्ट करतात हे चुकीचं आहे. एवढंच नाही सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये आधी फोटोशूट होतं तेही कुठेतरी चुकीचंच वाटतं’, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीतला गोंधळ घराघरातील गणपती उत्सवातही दिसून येतो.  तुमचा गणपती सोशल मीडियावर किती गाजतोय,  आपापल्या गणपती मंडळाच्या पेजेसला किती लाईक्स, शेअर्स मिळतात हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी तर  प्रत्येकाच्या घरच्या गणपतीचे फोटो, पहिली आरती, प्रतिष्ठापनेची पूजा या सगळ्याची पोस्ट दर मिनिटाला अपलोड होत राहते. या दिवसांत फेसबुकवर आलेले नवे नवे फिल्टर्स आपलं लक्ष वेधून घेतायेत. रुईया कॉलेजच्या विद्यर्थ्यांच्या राजाचा नवा फिल्टर टाकून कितीतरी रुईयाईट्स आपले फेसबुक डीपी बदलताना दिसतात. गणपतीची  पहिली पूजासुद्धा आजकाल मोबाईलचं अ‍ॅप सांगतं! या दिवसांत लोकांचे बदललेले डीपी, रोजच्या स्टोरीज हे सगळंच गणपतीमय झालेलं आहे. पूर्वी मोठय़ांना ‘आता फोनवरूनच पाया पडतो’ असं म्हणणारे आपण आता डीपीवरूनच दर्शन घेतो असंही म्हणू लागलेत!  परदेशात राहणारी मुलं गणपती आले की व्हिडिओ कॉल करून गणपतीची आरतीसुद्धा करू शकतात. व्हच्र्युअली का होईना पण आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतात. ही खरोखर सोशल मीडियाची देणगी आहे. मात्र एकूणच या मीडियाचा पुरेपूर विचार न करता जो अनिर्बंध वापर होतोय त्यामुळे  या उत्सवामागची मूळ भावना बाजूलाच पडली असून केवळ आभासी उत्सव साजरा केला जातोय हेच चित्र स्पष्टपणे दिसते!

viva@expressindia.com